टेस्टी आणि हेल्दी नाश्ता

सुवर्णा जाहगिरदार सुर्वे,  मुंबई
सोमवार, 31 जानेवारी 2022

फूड पॉइंट

नाचणी इडली 

साहित्य : एक वाटी नाचणी, १ वाटी इडली तांदूळ किंवा जाडा तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, १ चमचा चणा डाळ, १ लहान चमचा मेथी दाणे, १ वाटी जाडे पोहे, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार गरम पाणी, ४ चमचे गोडे तेल. (४ जणांसाठी)
कृती : नाचणी, इडली तांदूळ प्रत्येकी दोन वेळा स्वच्छ धुऊन वेगवेगळ्या भांड्यांत ६ तास पाण्यात  भिजत ठेवावे. त्याचप्रमाणे उडीद डाळ, चणा डाळ, मेथी दाणे स्वच्छ धुऊन एका भांड्यात ६ तास एकत्रच भिजत ठेवावे. नंतर सर्वप्रथम भिजलेल्या नाचणीमधील पाणी काढून टाकावे व मिक्सरमधून बारीक वाटून एका पातेल्यात काढून घ्यावे. तसेच तांदूळ व डाळीतील पाणी काढून टाकावे. यामध्ये पोहे घालून सर्व मिश्रण एकत्र मिक्सरमधून वाटून घ्यावे. हे मिश्रण बारीक केलेल्या नाचणी पिठात मिक्स करत पिठात १ ते दीड वाटी थोडे गरम पाणी घालावे व पीठ ५ मिनिटे चांगले फेटावे. हे पीठ झाकण लावून उबदार ठिकाणी ५-६ तास आंबवत ठेवावे, जेणेकरून पीठ आंबून छान फुगून येईल. इडली करताना पिठात चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले ढवळावे. इडली पात्राला तेलाचा हात लावून एक-एक पळी पीठ घालावे. इडली पात्र मोदक पात्रात ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्यावे. नाचणीच्या पौष्टिक इडल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा साजूक तुपाबरोबर अतिशय रुचकर लागतात.
टिप : पिठात रात्री मीठ घालू नये म्हणजे पीठ चांगले फुगून वर येते व इडल्या मऊ होतात.

वरीची इडली
साहित्य : दोन वाट्या वरीचे पीठ, अर्धी वाटी ताजे दही, चवीनुसार मीठ, आवडीनुसार काजूचे तुकडे, ६ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, ४ चमचे चिरलेली कोथिंबीर, आवश्यकतेनुसार कोमट पाणी, २ चमचे पांढरे तीळ, १ इंच आल्याचे बारीक तुकडे, १ चमचा साजूक तूप. (४ जणांसाठी)
कृती : वरील सर्व मिश्रण एकत्र करून पाऊण तास मुरत ठेवावे. पीठ मुरल्यावर इडली पात्राला साजूक तुपाचा हात लावून १-१ पळी पीठ त्यात घालावे. १०-१२ मिनिटे उकडल्यावर इडल्या खाण्यास  तयार.
टिप : या इडल्यांचे बारीक तुकडे करून त्यावर साजूक तुपाची जिरे, कढीपत्ता पाने घालून फोडणी करून ओतावी किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावी.

पालक पिझ्झा 

साहित्य :  तीन वाटी मैदा, २५ पालक पाने, ८ ते १० हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १० लसूण कळ्या, चवीनुसार मीठ, १ लहान चमचा खाण्याचा सोडा, २ चमचे गोडे तेल, बटर, चीज, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पातीचा कांदा व पात, लाल टोमॅटो, काकडी, गाजर, कोबी, टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, लाल तिखट, चाट मसाला. 
(३ जणांसाठी)
कृती : प्रथम पालक पाने, हिरव्या मिरच्या, आले व लसूण एकत्र करून अजिबात पाणी न वापरता बारीक पेस्ट करावी. त्यात मैदा, खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण चांगले एकत्रित करून गोळा करावा व अर्धा तास मुरत ठेवावा. पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, पातीचा कांदा, लाल टोमॅटो, काकडी, कोबी या भाज्यांचे पातळ उभे काप करून घ्यावेत. कांदापात बारीक चिरून व गाजर किसून घ्यावे. अर्ध्या तासाने मैदा चांगला फुगल्यावर त्याचे मोठे गोळे करावेत. एक गोळा पोळपाटावर हलक्या हाताने थापून गोल आकाराचा पिझ्झा बेस तयार करावा. मंद आचेवर कडेने बटर सोडत दोन्ही बाजूंनी थोडा भाजून घ्यावा. असे सर्व पिझ्झा बेस तयार करून घ्यावेत. थंड झाल्यावर एक पिझ्झा बेस घेऊन प्रथम त्यावर स्प्रेडरने बटर लावावे. वर रेड चिली सॉस लावावा. त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरावा. काकडी, कोबी, लाल टोमॅटो, पिवळी सिमला मिरची, लाल सिमला मिरची, कांदा, गाजराचा कीस व कांद्याची पात रचून वरून आवडीनुसार चीज किसावे. पिझ्झा पॅनवर ठेवून कडेने बटर सोडावे. मंद आचेवर ५ ते ७  मिनिटे भाजून घ्यावे. वरून टोमॅटो सॉस, काळी मिरी पावडर, चाट मसाला, लाल तिखट व चिली फ्लेक्स भुरभुरावेत. एक निराळा, पालक पिझ्झा खाण्यास तयार.

स्टफ्ड पालक दहीवडा
साहित्य :  चार वाटी पालक पाने, ६ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, ६ ते ८ लसूण कळ्या, २ वाट्या उकडलेल्या बटाट्याचा कीस, २ वाट्या भाजलेल्या साबुदाण्याचे पीठ, चवीनुसार मीठ, ४०० ग्रॅम फेटलेले दही, ४ चमचे साखर, २ चमचे लाल तिखट, २ चमचे चाट मसाला, २ चमचे काळी मिरी पावडर, थोडी कोथिंबीर, आवश्यकतेनुसार तेल, १ लाल सुकी मिरची, ५-६ कढीपत्ता पाने, १ लहान चमचा प्रत्येकी मोहरी, जिरे, हिंग. (४ जणांसाठी)
सारणाचे साहित्य ः एक वाटी खोवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे, चवीनुसार मीठ व साखर, ६ ते ८ काजूचे बारीक तुकडे, २ चमचे किसमिस, ५० ग्रॅम पनीर कुस्करून, १ लहान वाटी वाफवलेले मटार (सर्व न भाजता एकत्र करून सारण तयार करावे).
कृती : प्रथम पालक पाने, हिरव्या मिरच्या, आले व लसूण कळ्या यांची पाणी अजिबात न घालता बारीक पेस्ट करून त्यात उकडलेल्या बटाट्याचा कीस, भाजलेले साबुदाणा पीठ व चवीनुसार मीठ  घालावे. हाताला थोडे तेल लावून सर्व मिश्रण चांगले एकजीव करावे व घट्टसर गोळा करून १० मिनिटे मुरत ठेवावे. नंतर त्याचा मध्यम गोळा घेऊन हाताला थोडे तेल लावत खोलगट पारी करावी. त्यात २ चमचे सारण भरून हलक्या हाताने पारीचे तोंड बंद करून गोल आकार द्यावा. असे सर्व गोळे करून मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत तळावेत. फेटलेल्या दह्यात चवीनुसार मीठ व साखर घालून त्यावर मोहरी, जिरे, हिंग, लाल सुकी मिरची, कढीपत्ता यांची फोडणी द्यावी. सर्व्ह करताना डिशमध्ये वडे ठेवून त्यावर फोडणी मिश्रित दही घालावे. वरून कोथिंबीर, चाट मसाला, काळी मिरी पावडर, लाल तिखट भुरभुरावे. आगळेवेगळे स्टफ्ड पालक दहीवडे अतिशय रुचकर लागतात.

सॅँडविच ढोकळा
साहित्य : दोन कप बारीक तांदूळ, १ कप उडीद डाळ, पाव कप जाडे पोहे, अर्धा (लहान) चमचा मेथी दाणे, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, आवश्यकतेनुसार तेल, अर्धा चमचा खायचा सोडा, ८ हिरव्या मिरच्या, २ पुदिन्याची पाने, लहान वाटी कोथिंबीर, अर्धा इंच आले, २ चमचे पांढरे तीळ, आवडीनुसार कढीपत्ता पाने, पाव चमचा मोहरी. (४ जणांसाठी)
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन एका पातेल्यात ६ तास पाण्यात भिजत ठेवावेत. त्याचप्रमाणे उडीद डाळ व मेथी दाणे स्वच्छ धुऊन दुसऱ्या पातेल्यात ६ तास भिजत ठेवावी. ६ तासांनंतर दोन्हीमधील पाणी पूर्णपणे काढून मिक्सरमधून वेगवेगळी बारीक करून घ्यावे. उडीद डाळ व मेथी दाण्याचे मिश्रण बारीक करताना पोहे धुऊन त्यातच बारीक करून घ्यावे. सर्व मिश्रण (वाटलेले तांदूळ, उडीद डाळ, मेथी दाणे, पोहे) एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालावे. सर्व चांगले एकजीव करून ५ ते ६ तास आंबवावे. मिरच्या, कोथिंबीर, आले, पुदिना, चवीनुसार मीठ आणि १ चमचा लिंबाचा रस एकत्रित करत किंचित पाणी घालून चटणी करावी. 
आंबलेल्या पिठात अर्धा कप पाणी घालून मिश्रण परत एकदा ढवळून घ्यावे. २ चमचे गरम पाण्यात २ चमचे तेल व पाव चमचा खायचा सोडा घालून मिश्रण मिक्स करून पिठात घालावे. नंतर दोन भांड्यात मिश्रणाचे दोन भाग (अर्धे अर्धे) करत, एका मिश्रणात केलेली हिरवी चटणी मिक्स करावी. एका ताटलीला तेलाचा हात लावून त्यात एक कप पांढरे मिश्रण घालावे व प्रीहिट केलेल्या स्टिमरमध्ये हाय फ्लेमवर पाच मिनिटे वाफवावे. नंतर गॅस बारीक करून झाकण काढून अर्धवट शिजलेल्या ढोकळ्याच्या पांढऱ्या लेअरवर अर्धा कप चटणीमिश्रित हिरवे मिश्रण पसरून झाकण लावावे. परत ५ मिनिटे ढोकळा हाय फ्लेमवर वाफवावा. परत झाकण काढून दुसऱ्या हिरव्या लेअरवर १ कप पांढरे मिश्रण घालून झाकण लावावे. मंद आचेवर १५-२० मिनिटे वाफवून घेऊन गॅस बंद करावा. अर्ध्या तासाने सुरीच्या टोकाला तेल लावून चौकोनी काप करावेत. त्यावर मोहरी, पांढरे तीळ, कढीपत्ता पाने यांची फोडणी द्यावी. गरमागरम चटपटीत सॅँडविच ढोकळा खाण्यास तयार.     

जिंजर गार्लिक चीज ब्रेड
साहित्य : दोन वाट्या मैदा, पाव वाटी कोमट पाणी, १ चमचा साखर, पाव चमचा मीठ, १५ ते २० लसूण कळ्या बारीक चिरून, १ ते दीड इंच आले बारीक चिरून, आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा यीस्ट पावडर, १ चमचा मिल्क पावडर, मोझरेला किंवा आवडीनुसार किसलेले चीज, आवश्यकतेनुसार बटर, ६ चमचे चिली फ्लेक्स, २ चमचे काळी मिरी पावडर. (२ जणांसाठी)
कृती : सर्वप्रथम एका पसरट व खोलगट आकाराच्या भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात यीस्ट पावडर, साखर, मिल्क पावडर चांगले एकत्रित करून फेटावे. लगेच त्यात मैदा, मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र मिसळावे व त्याचा घट्ट गोळा करावा. गोळा पाऊण ते एक तास झाकून ठेवावा, जेणेकरून यीस्ट घातल्याने मैद्याचा गोळा दुप्पट होईल (अतिरिक्त पाणी शक्यतो टाळावे). एका भांड्यात आवडीनुसार बटर गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण तुकडे, आल्याचे बारीक तुकडे, चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण चांगले एकत्रित करावे. मुरलेल्या पिठाचे दोन मोठे गोळे करावेत. एक गोळा घेऊन जाडसर गोळ पोळी लाटावी. त्यावर तयार केलेले लसूण, आले, कोथिंबीर मिश्रित बटर ब्रशने पोळीच्या कडा सोडून सर्वत्र लावावे. त्यावर मोझरेला चीज पसरून वरून चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर घालावी. पोळीच्या कडांना किंचित पाणी लावून कडा बंद कराव्यात. वरून परत लसूण, आले, कोथिंबीर मिश्रित बटर ब्रशने पसरवावे. वरून चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर घालून आवश्यकतेनुसार सुरीने ठरावीक अंतरावर हलक्या हाताने चीर देऊन केक पात्रात ठेवावे. एका पसरट भांड्यात खाली दोन वाट्या जाडे (खडे मीठ) पसरून स्टॅँडवर केक पात्र ठेवावे. मंद आचेवर ब्रेड पाऊण तास बेक करून गॅस बंद करावा. पाच मिनिटांनी ब्रेडला हलकेच चिर दिलेल्या ठिकाणी सुरीने पूर्ण कापून गरमागरम स्लाइस सर्व्ह करावे.
टिप : असा ब्रेड गव्हाच्या पिठाचासुद्धा करता येतो.

संबंधित बातम्या