आंब्याचा गोडवा

प्रणिता उगले
सोमवार, 1 जून 2020

फूड पॉइंट
सध्या आंब्यांचा सीझन सुरू आहे. आंबा कापून आणि त्याचा आमरस करून तर खाल्ला जातोच, पण आंब्यापासून इतरही बरेच पदार्थ केले जातात. त्यामुळे घरी आंबा आला, की त्यापासून वेगवेगळे पदार्थ करण्याचा मोह काही केल्या आवरता येत नाही. शिवाय घरी केलेल्या अशा खास पदार्थांची चव काही औरच असते! 
अशाच काही स्पेशल रेसिपीज...

पोळी 
साहित्य : दोन हापूस आंबे, वेलचीपूड, मीठ, साखर, तूप. 
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन त्याचा रस काढून घ्यावा. या रसात वेलचीपूड, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार साखर घालून घ्यावी. नंतर एक स्टीलची थाळी घेऊन तिला आतून सर्वत्र तूप लावून घ्यावे. या तूप लावलेल्या थाळीत वरील आंब्याच्या रसाचे मिश्रण ओतावे व उन्हात सुकण्यासाठी ठेवावे. त्यावर एखादा पातळ कपडा टाकावा. वरचा भाग सुकल्यानंतर पोळी उलट करून पुन्हा तशीच सुकण्यासाठी ठेवावी. चांगली सुकल्यानंतर त्याचे छोटे भाग करावेत आणि प्लॅस्टिकची पिशवी किंवा एखाद्या चपट्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवावेत.

खीर 
साहित्य : अर्धा लिटर दूध, १ कप आंब्याचा रस, अर्धा कप शेवया, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलचीपूड, १ टेबलस्पून साजूक तूप, पाव कप काजू-बदामाचे काप.  
कृती : प्रथम आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका कढईत तूप गरम करून त्यात शेवया टाकून त्या १-२ मिनिटे परतून घ्याव्यात. नंतर त्यामध्ये दूध मिक्स करून घ्यावे व एक उकळी आणावी. नंतर त्यात साखर घालून २-३ मिनिटे गरम करून घ्यावे. नंतर त्यात वेलचीपूड आणि काजू-बदामाचे काप घालून थंड करायला ठेवावी. खीर थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा रस घालून मिक्स करून घ्यावा. आता खीर थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये दोन तास ठेवावी.  

आम्रखंड 
साहित्य : एक आंब्याचा गर, १ वाटी चक्का, अर्धी वाटी साखर, वेलदोड्याची पूड, बदाम-पिस्त्याचे काप.  
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन घेऊन त्याचा गर काढून घ्यावा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, चक्का आणि साखर एकत्र करून श्रीखंडासारखे फिरवून घ्यावे. नंतर एका भांड्यात हे आम्रखंड काढून त्यामध्ये वेलदोड्याची पूड व बदाम-पिस्त्याचे काप मिक्स करावेत. झाले चविष्ट आम्रखंड तयार! तयार आम्रखंड थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये किमान दोन तास ठेवावे.

केक 
साहित्य : दोन वाट्या रवा, १ वाटी साखर, पाऊण वाटी लोणी किंवा तूप, १ वाटी दही, १ वाटी दूध, १ वाटी आंब्याचा गर, १ चमचा बेकिंग पावडर, ड्रायफ्रूट्स आवडीनुसार. 
कृती : प्रथम एका भांड्यात रवा घ्यावा. त्यात दही, दूध, साखर, लोणी, तूप घालून चांगले मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण ४-५ तास झाकून ठेवावे. आता केक करायच्यावेळी या मिश्रणात बेकिंग पावडर व आंब्याचा गर मिक्स करावा. आता त्यात ड्रायफ्रूट्स घालून चांगले मिक्स करावे. केकच्या भांड्याला तुपाचा हात लावून घ्यावा व त्यात हे मिश्रण ओतावे. आता प्रीहिटेड ओव्हनमध्ये १५० ते १८० तापमानाला ४० ते ४५ मिनिटे केक बेक करावा. केक तयार झाला आहे का बघण्यासाठी त्यात एका बाजूने सुरी खुपसून बघावी. जर सुरी न चिकटता बाहेर आली, तर केक तयार झाला म्हणून समजावे.

आंबा वडी 
साहित्य : एक वाटी पिकलेल्या आंब्याचा गर, अर्धी वाटी साखर, १ वाटी दूध, आवश्यकतेनुसार पिठीसाखर, वेलचीपूड. 
कृती : आंब्याचा गर, दूध व साखर एकत्र मिक्स करून किमान १०-१२ मिनिटे मंद आचेवर मायक्रोव्हेवमध्ये ठेवावे. नंतर हे मिश्रण बाहेर काढून चांगले एकजीव करून घ्यावे आणि पुन्हा एकदा मंद आचेवर ५ मिनिटे मायक्रोव्हेवमध्ये ठेवावे. नंतर बाहेर काढून त्यात ३ चमचे पिठीसाखर व वेलचीपूड टाकावी व हे मिश्रण एका थाळीत पसरून गार होण्यासाठी ठेवून द्यावे. वरून काहीतरी झाकावे. हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.

शिरा 
साहित्य : एक वाटी रवा, दीड वाटी आंब्याचा रस, १ वाटी दूध, दीड वाटी पाणी, अर्धा वाटी साखर, ४-५ बदामाचे काप, चिमूटभर केशर आणि तूप.  
कृती : प्रथम एका कढईत तूप गरम करायला ठेवावे. आता त्यात रवा मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा. आता एक दुसरे भांडे घ्यावे. त्या भांड्यात पाणी आणि दूध एकत्र करून त्याला उकळी आणावी. आता त्यात रवा टाकावा. रवा शिजून घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि आंबारस घालून अजून थोडावेळ शिजू द्यावे. रवा पूर्ण शिजल्यावर वरून केशर आणि बदामाचे काप टाकून सजावावा. गरमगरम आंब्याचा शिरा सर्व्ह करावा.   

कैरीची भाजी 
साहित्य : एक कैरी, २ टेबलस्पून तेल, मोहरी, हिंग, मेथीदाणे, तिखट, मीठ आणि आवडीनुसार गूळ. 
कृती : प्रथम कैरीचे साल काढून तिचे बारीक तुकडे करून घ्यावेत. नंतर हे तुकडे वाफवून घ्यावेत. आता कढईमध्ये तेल, मोहरी, हिंग, मेथीदाणे आणि तिखट घालून फोडणी करून घ्यावी. त्यात कैरीचे तुकडे घालावेत. त्यानंतर त्यात गूळ आणि चवीनुसार मीठ घालावे. झाली कैरीची भाजी तयार!
 
मँगो सालसा 
साहित्य : एक आंबा, अर्धी वाटी कैरीचा कीस, अर्धी वाटी पातीचा बारीक कापलेला कांदा, प्रत्येकी १ लाल-हिरवी शििमला मिरची, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टोमॅटो, २ मिरच्या, १ टेबलस्पून लिंबू रस.  
कृती : प्रथम आंबा स्वच्छ धुऊन, त्याचे साल काढून बारीक तुकडे करून घ्यावेत. लाल-हिरवी शिमला मिरची, टोमॅटो आणि मिरची बारीक कापून घ्यावी. आता एका भांड्यात आंब्याचे तुकडे, कैरीचा कीस, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची, कांदा घेऊन मिक्स करावे. नंतर त्यात लिंबाचा रस घालून पुन्हा हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे. मँगो सालसा खाण्यासाठी तयार आहे. 

लस्सी  
साहित्य : एक आंब्याचा गर, १ कप दही, २ टेबलस्पून साखर (आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करावे.), बर्फाचे तुकडे, सजावटीसाठी टूटीफ्रूटी किंवा चेरी.   
कृती : प्रथम आंबा चांगला धुऊन घ्यावा. आता त्याचा गर काढून घ्यावा. नंतर एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर, दही, साखर आणि बर्फ घालून चांगले फिरवून घ्यावे. झाली थंडगार मँगो लस्सी तयार! लस्सी सर्व्ह करताना वरून टूटीफ्रूटी किंवा चेरी ठेवावी. दिसायला छान दिसते.   

संबंधित बातम्या