रुचकर आणि चटपटीत

स्वप्नगंधा काळे, बार्शी
सोमवार, 30 डिसेंबर 2019

फूड पॉइंट
सर्वत्र थंडीची चाहूल जाणवू लागली आहे... 
थंडीत भूकही जास्त लागते... अशावेळी रुचकर, चटपटीत आणि गरमागरम पदार्थांना पसंती दिली जाते... अशाच काही रेसिपीज...

पौष्टिक पॅटीस  
साहित्य : दुधी भोपळा, लाल भोपळा, कोबी, तोंडली, गाजर, बीट, काकडी या सर्व भाज्या प्रत्येकी १०० ग्रॅम, आले, लसूण, कोथिंबीर, मिरची, ३ वाट्या थालीपीठ भाजणी, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, २ चमचे चिंचेचा कोळ, ४ मोठे बटाटे, २ कांदे, १ चमचा गरम मसाला. 
कृती : प्रथम दुधी भोपळा, लाल भोपळा, बीट, काकडी या भाज्यांच्या साली काढून घ्याव्या. सर्व भाज्यांचा कीस करावा व कुकरमध्ये उकडून घ्यावा. त्याचबरोबर बटाटेही उकडून घ्यावेत. बटाटे कुस्करून त्यात मिसळावे. कांदा बारीक चिरून व लसूण, आले, मिरची, मीठ टाकून वाटावा. गरम मसाला घालावा. पॅटीस थापून मंद गॅसवर तव्यावर तळून घ्यावेत. सुरुवातीस सोलून ठेवलेल्या साली थोड्या तेलात परतून त्यात अर्धी वाटी शेंगदाणे, ३-४ मिरच्या, कोथिंबीर, चिंचेचा कोळ, मीठ आणि साखरेसह सर्व साहित्य वाटावे. त्याची मध्यम पातळ चटणी करावी. या चटणीबरोबर पॅटीस खावे. या पदार्थांचे वैशिष्ट्य हे की भाज्यांचा एकही भाग वाया न जाता पौष्टिक पॅटीस तयार होते. वाढत्या वयाच्या मुलांना, वृद्धांना खूपच उपयुक्त, सकस आहार आहे. 


शाही बटाटा पॅटीस  
साहित्य : अर्धा किलो उकडलेले बटाटे, १ वाटी नारळाचा कीस, अर्धी वाटी चिरलेले काजू, २ टेबलस्पून बेदाणे, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ इंच आले, १०-१२ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ, साखर, तळण्यासाठी तेल. 
चटणीकरिता ः एक वाटी ओले खोबरे, ५-६ लसूण पाकळ्या, ४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, साखर हे सर्व एकत्र करून चटणी वाटून दह्यात कालवून ठेवावी. 
भरण्याकरिता पुरण ः अर्धा कप नारळ, काजू तुकडे, थोडेसे बेदाणे, मीठ, कोथिंबीर, साखर एकत्र करून त्यात लिंबू पिळून तयार ठेवावे. 
कृती : बटाटे सोलून त्यात थोडासा मैदा किंवा मिल्क पावडर, ओले खोबरे, मीठ, लिंबू, साखर इत्यादी घालून गोळा तयार करावा. त्यातून लिंबाएवढे गोळे तयार करून त्याची वाटी करून त्यात वरील तयार पुरण भरावे व पॅटीस तयार करावे. पॅटीस पावाच्या चुऱ्यात घोळून तव्यावर थोडेसे तेल घालून दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगावर तळून घ्यावे.


सात धान्यांचा ढोकळा 
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, दीड वाटी गहू, २ वाट्या चणाडाळ, २ वाट्या उडीदडाळ, १ वाटी बाजरी, १ वाटी ज्वारी हे सर्व एकत्र करून रवाळ दळून त्याचे पीठ तयार करावे. अर्धा चमचा हळद, ८-१० मिरच्यांचे बारीक तुकडे, १ इंच बारीक चिरलेले आले, चिमूटभर हिंग, २ चमचे तेल, १ वाटी वाफवलेले हिरवे वाटाणे, सोडा, फोडणीचे साहित्य, कोथिंबीर व ओले खोबरे. 
कृती : चार वाटी पिठात वरील सर्व मसाला घालून, कोमट पाण्याने भिजवून ४ तास ठेवावे. ढोकळा करण्यापूर्वी मिश्रण सारखे करावे. कडा असलेल्या थाळीला तेलाचा हात लावून त्यात ढोकळ्याचे पीठ ओतावे व १५-२० मिनिटे मिश्रण उकडून घ्यावे. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून हिंग, मोहरीची फोडणी करून वर घालावी. सर्व्ह करताना कोथिंबीर व नारळाचे खोबरे पसरून घ्यावे.


डाळ ढोकळी  
साहित्य : एक वाटी तुरीची डाळ, २-४ हिरव्या मिरच्या, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, लिंबाएवढी चिंच, थोडा गूळ, कोथिंबीर, १ चमचा धने-जिरेपूड, मीठ, तेल, मोहरी, थोडा काळा मसाला. 
ढोकळीसाठी ः दोन वाट्या कणीक, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ, अर्धा चमचा 
धने-जिरेपूड, २-४ चमचे तेल. 
कृती : नेहमीप्रमाणे तुरीची डाळ, हिंग, हळद, मिरचीचे तुकडे घालून शिजवून घ्यावी. थंड झाल्यावर त्यात चिंचेचे पाणी, गूळ, मीठ, काळा मसाला, कोथिंबीर टाकून २-४ कप पाणी टाकावे आणि डाळ उकळत ठेवावी. गॅस मंद ठेवून अधूनमधून ढवळावे. ढोकळीच्या पिठाच्या पातळ पोळ्या लाटून शंकरपाळ्याप्रमाणे कापून उकळत्या डाळीत एक एक करत हळूहळू सोडाव्यात व हलकेच ढवळत राहावे. सर्व ढोकळी टाकून झाल्यावर त्याला वरून हिंग, जिरे, मोहरी, कढी पत्याची खमंग फोडणी द्यावी. खोलगट बशीमध्ये घालून वरून साजूक तूप घालून सर्व्ह करावी.


कॉलीफ्लॉवरची भरली पुरी  
साहित्य : तीन कप कणीक, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, मीठ, मोहनासाठी तेल. 
भरण्याकरिता : दोन कप किसलेला कॉलीफ्लॉवर, अर्धा कप ओले खोबरे, अर्धा कप दाण्याचे कूट, ६ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, २ लिंबांचा रस, मीठ, तळण्यास तेल, चवीपुरती साखर. 
कृती : भरण्याचे सर्व साहित्य एकत्र करून कढईमध्ये २ चमचे तेल घालून थोडा वेळ परतून बाजूला ठेवावे. वरील पीठ नेहमीप्रमाणे भिजवून त्याच्या लहान लहान पुऱ्या लाटून घ्याव्या. एका पुरीवर कॉलीफ्लॉवरचे पुरण भरून दुसरी पुरी त्यावर ठेवून दाबून घ्यावी. अशा तऱ्हेने सर्व पुऱ्या तयार करून गरम तेलात गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात व चिली सॉसबरोबर सर्व्ह कराव्यात. 
चिली सॉस : पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या, लिंबाएवढी चिंच, ३ चमचे मेथीचे दाणे, अर्धा चमचा मोहरी, तेल, मीठ, गूळ. 
कृती : चिंचेचा रस काढून त्यात गूळ घालून नीट मिसळला की गाळणीने गाळून घ्यावा. त्यात वरील हिरव्या मिरच्या घालून मंद गॅसवर उकळत ठेवावे. दुसऱ्या कढईत थोडेसे तेल घालून त्यात मोहरी व मेथीचे दाणे घालावे. त्यात वरील सॉस घालून पुन्हा गॅसवर उकळी येण्यास ठेवावे. सॉस साधारण घट्ट झाला की तो पुरीबरोबर खायला द्यावा.


वसंत वल्लरी 
वसंतसाठी साहित्य : अर्धा-पाऊण किलो उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा किलो उकडून ओबड धोबड केलेला हिरवा वाटाणा, १ कप ओले खोबरे, कोथिंबीर, प्रत्येकी अर्धाकप काजू तुकडे व बेदाणा, अर्धा टीस्पून मिरेपूड, थोडीशी हळद, १ चमचा आले मिरची पेस्ट, लिंबाचा रस, मीठ व साखर, अर्धा कप दूध, थोडे तांदळाचे पीठ, तूप किंवा तेल. 
कृती : बटाटा-वाटाणा एकत्र करून त्यात वरील सर्व मसाला मिसळावा. दुधात तांदळाचे पीठ मिसळून ते वरील मिश्रणात घालावे. हे मिश्रण ढोकळ्याप्रमाणे सैलसर करावे. ताटाला तुपाचा हात लावून हे मिश्रण त्यात ओतावे व १५-२० मिनिटे ओव्हनमध्ये भाजून घ्यावे. वरून साधारण गुलाबी रंग आला पाहिजे. थंड झाल्यावर त्याच्या एकसारख्या वड्या कापून वल्लरीबरोबर सर्व्ह कराव्या. 
वल्लरीसाठी साहित्य : पाच-सहा मक्‍याच्या कणसांचा कीस, २ कप दूध, अर्धा कप पाणी, लिंबाचा रस, कोथिंबीर, अर्धा कप ओले खोबरे, १ चमचा आले व हिरवी मिरची पेस्ट, मीठ, ३-४ चमचे तूप. 
कृती : थोड्याशा पाण्यात कीस वाफवून घ्यावा. नंतर त्यात २ कप पाणी घालून चांगले उकळू द्यावे. साधारण घट्ट होत आले की त्यात मीठ, साखर, कोथिंबीर, खोबरे, आले, मिरची घालून सारखे ढवळावे. नंतर त्यात लिंबू पिळून खाली उतरावे. सर्व्ह करताना डिशमध्ये प्रथम वसंताच्या वड्या ठेवून वरून वल्लरी घालावे. वरून थोडीशी कोथिंबीर व खोबऱ्याचा कीस घालून सजावट करावी.


पालक आणि टोफू सूप 
साहित्य : शंभर ग्रॅम टोफू, १ मध्यम आकाराची पालक जुडी, अर्धा इंच आले, २-३ लसूण पाकळ्या, १ चमचा तेल, ४-५ कप व्हेजिटेबल स्टॉक, पाव चमचा अजिनोमोटो, १ चमचा सोया सॉस, अर्धा चमचा सफेद मिरेपूड, मीठ चवीपुरते. 
कृती : टोफूचे पाव इंच जाड व एक इंच रुंदीचे त्रिकोणी तुकडे करावेत. पालकाची पाने देठ काढून पाण्यात धुऊन घ्यावीत व जाडसर चिरून बाजूला ठेवावीत. आले-लसूण पेस्ट करावी. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट टाकून परतावी. व्हेजिटेबल स्टॉक टाकून उकळी काढावी. टोफू, अजिनोमोटो, सोया सॉस, सफेद मिरेपूड, चवीपुरते मीठ टाकून मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवावे. चिरलेला पालक त्यात टाकून २ मिनिटे शिजू द्यावे. नंतर गरम गरम वाढावे.


अळू वडी 
साहित्य : सहा-सात अळूची पाने, वाटीभर चिंचेचा कोळ, २ वाट्या गूळ, १ चमचा मीठ, १ चमचा तिखट, १ चमचा गोडा मसाला, २ वाट्या डाळीचे पीठ, २ टेबलस्पून थालीपिठाची भाजणी किंवा ज्वारीचे पीठ, २ टेबलस्पून पांढरे तीळ, १ चमचा तांदळाची पिठी, तळण्यासाठी तेल, पाणी. 
कृती : अळूची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्यावीत. पोळपाटावर उलटी ठेवून त्याच्या शिरा ठेचून घ्याव्यात. डाळीच्या पिठात पिठी, भाजणी, मीठ, तिखट, मसाला, तीळ, चिंचेचा कोळ, गूळ सर्व घालून पाण्याने सरबरीत भिजवावे. अळूच्या पानाला मागून कालवलेले पीठ लावून घ्यावे. त्यावर दुसरे पान ठेवावे व परत पीठ लावावे. अशा तऱ्हेने सर्व पाने एकावर एक ठेवावीत. त्याची गुंडाळी करावी. कुकरमध्ये उकडून घ्यावी. गार झाल्यावर त्याचे तुकडे कापून तळावेत किंवा तव्यावर तेल सोडून भाजून घ्याव्यात. ८-१० वड्या तयार होतील.

संबंधित बातम्या