मिश्र भाज्यांचे पदार्थ

उमाशशी भालेराव
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

फूड पॉइंट
थंडीच्या दिवसात अनेक ताज्या फळभाज्या व पालेभाज्यांनी मंडई फुललेली असते. पण तुम्हाला त्यापासून साधी भाजी करून कंटाळा आला असेल तर मिश्र भाज्यांचे हे पदार्थ करून पाहा. विविध भाज्या वापरून करता येण्याजोग्या पदार्थांच्या रेसिपीज...

कर्नाटकी हिट्टमेणसू
साहित्य : बटाटा, फ्लॉवर, बीन्स, गाजर, कच्ची केळी, सुरण, राजगिऱ्याच्या देठी, शेवग्याच्या शेंगा, नवलकोल, पडवळ, काकडी. मात्र कच्ची केळी, सुरण, राजगिरा देठी या भाज्या आवश्‍यकच आहेत. वांगी मात्र घालू नयेत. प्रत्येक भाजीच्या ८-१० फोडी घ्याव्यात.
मसाला : दोन चमचे उडदाची डाळ, २ चमचे धने, १ चमचा काळे मिरे, ५-६ लाल सुक्‍या मिरच्या. हे पदार्थ तुपावर परतून बारीक वाटून घ्यावेत. एका नारळाचे घट्ट व पातळ दूध, १ वाटी ताक, १ चमचा तूप, फोडणीचे साहित्य, कढीलिंबाची ८-१० पाने.
कृती : नारळ वाटून काढलेले घट्ट दूध वेगळे ठेवावे. नारळाच्या पातळ दुधात सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात. भाज्या शिजल्यावर चवीनुसार मीठ व वाटलेला मसाला घालून पुन्हा एक उकळी आणावी. दुसरीकडे एक चमचा तुपात मोहरी, हिंग व कढीलिंबाची पाने घालून फोडणी करावी व ती फोडणी भाजीत घालावी. भाजीला पातळसर रस ठेवावा. भाजी विस्तवावरून उतरवल्यावर त्यात खोबऱ्याचे दाट दूध व ताक घालून सर्व्ह करावे. या भाजीला मुख्यत्वे मिऱ्याचा स्वाद असतो.

केरळी मिश्र भाजी
साहित्य : फ्लॉवर, गाजर, बीन्स, बटाटा, कोबी, कच्ची केळी, सुरण वगैरे उपलब्ध भाज्या चिरून फोडी करून घ्याव्यात. (वांगी अगर पालेभाजी घेऊ नये.) १ बारीक चिरलेला कांदा, फोडणीचे साहित्य, कढीलिंबाची पाने, २ चमचे तेल, मीठ, साखर.
मसाला : दोन-तीन हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, २ चमचे धने, आल्याचा इंचभर तुकडा व खोवलेला अर्धा नारळ. सर्व कच्चेच एकत्र वाटून घ्यावे.
कृती : सर्व भाज्या धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. दोन चमचे तेलात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. कढीलिंबाची आठ-दहा पाने घालावीत. त्यात बारीक चिरलेला कांदा लालसर परतून घ्यावा. नंतर त्यात चिरलेल्या सर्व भाज्या व दोन कप पाणी घालून शिजवावे. भाज्या शिजल्यावर त्यात वाटलेला मसाला तसाच कच्चा घालावा. चवीनुसार मीठ, साखर घालावी. सर्व मिळून उकळी आल्यावर ही मिश्र भाजी तयार! या भाजीत रस खूप पातळ ठेवतात. भाताबरोबर खातात. (ब्रेडबरोबरही छान लागते.)

पंजाबी मिश्र भाजीचा रस्सा
साहित्य :  फ्लॉवर, बटाटा, मटार, गाजर, बीन्स याच भाज्या प्रामुख्याने थोड्या थोड्या घ्याव्यात. २ कांदे बारीक चिरून, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ टोमॅटो, २ चमचे दही, तमालपत्राची २ पाने, तिखट, मीठ, (साखर ऐच्छिक), तेल.
मसाला : दोन चमचे धने, २ चमचे मिरे, १ चमचा जिरे, ४ मसाल्याची वेलची, दालचिनीचे छोटे ४ तुकडे, ८-१० लवंगा. सर्व पदार्थांची कच्चीच पूड करून घ्यावी.
कृती : सर्व भाज्या धुऊन मोठ्या फोडी करून घ्याव्यात. चार चमचे तेलात बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतावा. दोन तमालपत्राची पाने घालावीत. नंतर आले-लसूण पेस्ट घालून पुन्हा परतावे. बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. नंतर चार चमचे तयार केलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. दोन चमचे आंबट दही घालून परतावे. सर्व भाज्या घालून थोडे परतून दोन कप आधण पाणी, तिखट, मीठ, (चवीला साखर) घालून सर्व शिजवावे. शेवटी वरून कोथिंबीर टाकून सजवावे. (रस आपल्याला हवा तसा दाट वा पातळ ठेवावा.) विकतचा गरम मसाला घालूनही ही भाजी करता येते.

मिश्र भाजीचा कुर्मा
साहित्य :  फ्लॉवर, गाजर, बीन्स, बटाटा, मटार याच भाज्या प्रामुख्याने घेतात.
मसाला : दोन चमचे भाजून घेतलेली हरभरा डाळ, १ मोठा कांदा, ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आले, दालचिनीचे २ तुकडे, ५-६ लवंगा, ५-६ मिरे, १०-१२ काजू, १ चमचा खसखस, १ चमचा तिळकूट (पांढरे तीळ भाजून केलेली पूड), आवडीप्रमाणे ३-४ हिरव्या मिरच्या. हे सर्व एकत्र मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. वाटीभर दही, तूप, मीठ, फ्रेश क्रीम.
कृती : चार चमचे तुपात वरील वाटण तूप सुटेपर्यंत परतावे. नंतर त्यात वाटीभर दही घालून परतावे. सर्व भाज्या, मीठ व थोडे पाणी घालून शिजवावे. सर्व्ह करताना वरून फ्रेश क्रीम घालावे.

मिश्र पालेभाज्यांची भाजी
सध्या अनेक प्रकारच्या पालेभाज्या उपलब्ध आहेत. मेथी, पालक, आंबटचुका, आंबाडी, लाल माठ, राजगिरा, हिरवा माठ, चवळी, करडई, शेपू, चाकवत याशिवाय मुळ्याचा पाला, बीटचा पाला, नवलकोलचा पाला, फ्लॉवरचा पाला यांची भाजी पण छान होते.
साहित्य :  आपल्या आवडीच्या अनेक पालेभाज्या एकत्र करून धुऊन बारीक चिरून घ्याव्यात. कांदा, लसूण, हरभरा डाळ (तासभर भिजवलेली), तिखट, मीठ, धनेपूड, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती : कढईत दोन-तीन चमचे तेल तापवून मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. नंतर पाच-सहा पाकळ्या बारीक चिरलेला लसूण घालावा. हरभरा डाळ व सर्व पालेभाज्या घालून शिजेपर्यंत परतावे. शेवटी चवीनुसार तिखट, मीठ, धनेपूड घालावी. ही भाजी भाकरीबरोबर छान लागते. (मिश्र पालेभाजीचे थालिपीठ, वडे व भजी पण छान होतात.)

मिश्र भाज्यांचे सूप 
साहित्य :  गाजर, बीन्स, फ्लॉवर, बटाटा, दुधी भोपळा, लाल भोपळा, पालकाची २-३ पाने, १ कांदा, ४ पाकळ्या लसूण, दालचिनीचा १ तुकडा, मीठ, मिरपूड, २ चमचे बटर, क्रीम.
कृती : सर्व भाज्या धुऊन मोठे तुकडे करून घ्यावेत. एका पातेल्यात सर्व भाज्या, बारीक चिरलेला कांदा, चार लसूण पाकळ्या व दालचिनीचा तुकडा घालून कुकरमध्ये शिजवावे. भाज्यांत भरपूर पाणी घालून शिजवावे. नंतर दुसऱ्या पातेल्यावर चाळणी ठेवून भाज्या चाळणीत ओताव्यात. खाली भाजीचे पाणी राहील. ते नंतर सुपात घालता येते. चाळणीतील भाज्यांमधील दालचिनीचा तुकडा काढून टाकावा व बाकी सर्व मिक्‍सरमध्ये फिरवून घ्यावे. पॅनमध्ये दोन चमचे बटर गरम करून त्यात भाज्यांची पेस्ट व भाज्यांचे पाणी घालून सर्व एकजीव करून उकळावे. चवीनुसार मीठ, मिरपूड घालावे. सर्व्ह करताना प्रत्येकाच्या बाऊलमधील सूपवर क्रीम घालावे.

मिश्र भाज्यांचे कॉन्टिनेंटल स्टू
साहित्य :  फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीन्स, कोबी, मटारचे दाणे, ब्रोकोली, सिमला मिरची, बेबीकॉर्न, दालचिनीचे २ तुकडे, १ कांदा.
व्हाइट सॉस करण्यासाठी : चार चमचे मैदा अथवा कणीक, २ कप दूध, १ वाटी किसलेले चीज, मीठ, मिरपूड, बटर.
कृती : सर्व भाज्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करून घ्यावेत. बेबीकॉर्नचे एकात दोन तुकडे करावेत. सर्व भाज्या थोडे पाणी घालून शिजवून घ्याव्यात. शिजवतानाच त्या पाण्यात दालचिनीचे दोन तुकडे घालावेत म्हणजे दालचिनीचा वास सर्व भाज्यांना लागतो. दुसऱ्या पॅनमध्ये दोन चमचे बटर वितळवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यात मैदा अथवा कणीक घालून परतावे. त्यात दूध व गरजेप्रमाणे पाणी घालून सर्व एकजीव करून शिजवावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. या व्हाइट सॉसमध्ये सर्व शिजवलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ, मिरपूड घालावे. नंतर किसलेले चीज मिसळावे. स्टू फार दाट वा पातळ नसतो. स्टू बेक करायचा असल्यास बेकिंग डिशला थोडे बटर लावून त्यात स्टू घालून वर चीज पसरावे व ओव्हनमध्ये १८० अंशावर १५ मिनिटे ठेवावे. हा स्टू गार्लिक ब्रेडबरोबर सर्व्ह करावा.

चायनीज मिश्र भाजी 
साहित्य :  फ्लॉवर, गाजर, बीन्स, कोबी, ब्रोकोली, मशरुम्स, सिमला मिरची, बेबीकॉर्न, १ जुडी कांदापात, लसूण, १ चमचा सोयासॉस, २ चमचे चिली सॉस, २ चमचे टोमॅटो केचप, मीठ, मिरपूड, तेल, १ चमचा कॉर्नफ्लोअर.
कृती : दोन मोठे चमचे तेल तापवून प्रथम त्यात सहा-सात पाकळ्या लसूण बारीक चिरून परतून घ्यावा. सर्व भाज्या लांब-लांब चिरून घ्याव्यात. लसूण परतल्यानंतर पातीच्या कांद्यापैकी फक्त कोवळा कांदा लांब लांब चिरून तो परतावा. नंतर सिमला मिरची व इतर सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर भरभर तीन-चार मिनिटे परतावे. भाज्या फार शिजवू नयेत. थोड्या कुरकुरीतच ठेवाव्यात. नंतर त्यात सोयासॉस, चिली सॉस व टोमॅटो केचप घालावा. चार चमचे पाणी घालून सर्व भाज्यांना सॉस लागेल याप्रमाणे परतून घ्यावे. चवीनुसार मीठ, मिरपूड घालावे. नंतर एक चमचा कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात कालवून हळूहळू भाजीत मिसळावे. त्यामुळे भाजीचा रस थोडा दाट होतो. गरमागरम भाजी सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेली हिरवी कांदापात टाकून सजवावे. (आवडल्यास या भाजीत थोडा शेजवान सॉसही घालावा.)

संबंधित बातम्या