आले, लसूण, मिरची आणि कोथिंबीर स्पेशल

उमाशशी भालेराव
सोमवार, 18 एप्रिल 2022

फूड पॉइंट

आलेपाक पोहे (दडपे पोहे)

साहित्य ः आल्याचे १ इंच लांबीचे ३-४ तुकडे, अर्धा किलो पातळ पोहे, २ वाट्या खवलेले ओले खोबरे, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, १ चमचा उडदाची डाळ, कोथिंबीर २ चमचे लिंबू रस, चवीनुसार मीठ, साखर, फोडणीचे साहित्य, ३-४ चमचे तेल. 
कृती ः आले किसून घ्यावे. पातळ पोहे घेऊन त्यात खवलेले खोबरे, आल्याचा कीस, मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबू रस सर्व घालून मिसळून दडपून ठेवावे. दहा मिनिटांनंतर तेलात जिरे, हिंग, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात उडदाची डाळ व शेंगदाणे घालून परतून घ्यावेत. कढीलिंब घालावा. खोबरे, आले घालून कालवून ठेवलेल्या पोह्यांवर ही फोडणी घालावी व हे आलेपाक पोहे सर्व्ह करावे. कोथिंबिरीने सजवावे.

आले व ओल्या हळदीचे लोणचे
साहित्य ः प्रत्येकी १ वाटी आले व ओल्या हळदीचे गोल गोल तुकडे, ७-८ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, पाव वाटी मोहरीची पूड, १ चमचा मेथी पूड, १ चमचा हिंग पूड, चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य.
कृती ः आले व ओल्या हळदीचे तुकडे, मिरचीचे तुकडे एकत्र करून त्यात मोहरी पूड, मेथी पूड, हिंग पूड, मीठ मिसळावे. मोहरी, जिरे, हिंग पूड घालून तेलाची फोडणी करून तुकड्यांवर घालावी. सर्व कालवून सारखे करावे. हे लोणचे बरेच दिवस टिकते.

लसणीची सुकी चटणी

साहित्य ः एक वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, ८-१० लसणीच्या सोललेल्या पाकळ्या, २ चमचे लाल तिखट पूड, चवीनुसार मीठ.
कृती ः खोबऱ्याचा कीस थोडा भाजून घ्यावा. नंतर त्यात तिखट, मीठ, लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. ही सुकी चटणी खूप दिवस टिकते.

कोथिंबिरीचा भात
साहित्य ः दोन वाट्या बासमती तांदूळ, १ जुडी कोथिंबीर, ५-६ लसूण पाकळ्या, ३-४ हिरव्या मिरच्या, १ मोठा कांदा बारीक चिरून, मीठ, तेल.
कृती ः बासमती तांदूळ धुऊन रोळीत निथळत ठेवावा. कोथिंबीर निवडून धुऊन चिरून घ्यावी. त्यात हिरव्या मिरच्या व लसूण पाकळ्या घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. नंतर ३-४ चमचे तेलात कांदा परतून घ्यावा. त्यात कोथिंबिरीचे वाटण घालावे व तांदूळ घालून परतावे. चवीनुसार मीठ घालावे व दुप्पट पाणी घालून कोथिंबिरीचा हिरवागार भात करून गरमागरम सर्व्ह करावा.

कोथिंबिरीच्या वड्या
साहित्य ः एक जुडी कोथिंबीर, त्यानुसार ५-६ ओल्या मिरच्या, चण्याचे पीठ, तांदळाचे पीठ, चिमूटभर सोडा, मीठ, आवडल्यास थोडा गूळ (ऐच्छिक).
कृती ः कोथिंबीर निवडून, धुऊन चिरून घ्यावी. मिरच्या वाटून त्यात घालाव्यात. चवीनुसार मीठ घालावे. त्यात चण्याचे पीठ अधिक व थोडे तांदळाचे पीठ घालून कणकेप्रमाणे कालवावे. या मिश्रणाचा लांबट गोळा करून मोदकपात्रात उकडून घ्यावा. नंतर त्यांच्या वड्या कापून शॅलो फ्राय करून घ्याव्यात. गरमागरम वाढाव्यात.

लसणीची ओली चटणी

साहित्य ः दहा-बारा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या, १ वाटी खवलेले ओले खोबरे, ५-६ हिरव्या मिरच्या, आवडीप्रमाणे मीठ, साखर व लिंबू रस, कोथिंबीर.
कृती ः वरील सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. हिरव्या रंगाची ही चटणी दिसते छान व चवीला चटकदार लागते. ही चटणी ब्रेड सँडविचमध्येही घालता येते.

संबंधित बातम्या