उपवासाचे पदार्थ

उमाशशी भालेराव
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

नवरात्रामध्ये काहीजण अष्टमीला, तर काहीजण नऊ दिवस उपवास धरतात. अशा वेळी कल्पकता वापरून आपण उपवासाचे काही हटके पदार्थ करू शकतो. उपवास असणाऱ्यांसाठी आणि उपवास नसणाऱ्यांनाही रुचिपालट म्हणून आवडतील असे काही पदार्थ...

काकडीचे सूप
साहित्य :  चार काकड्या, १ बटाटा, मीठ, मिरपूड (ऐच्छिक, कारण काहींना मिरे चालत नाही), जिरेपूड, सजावटीसाठी २-३ चमचे क्रीम व थोडी कोथिंबीर.
कृती : काकडीच्या साली काढून सजावटीसाठी थोड्याशा पातळ चकत्या बाजूला ठेऊन बाकी काकडीच्या फोडी कराव्यात. बटाट्याचे साल काढून फोडी कराव्यात. काकडी व बटाट्याच्या फोडी कपभर पाणी घालून मिक्सरमधून वाटून घ्याव्यात. हे मिश्रण आपल्याला सूप जितके दाट हवे असेल त्या अंदाजाने पाणी घालून उकळून घ्यावे. मीठ, मिरपूड, जिरेपूड घालावी. सर्व्ह करताना प्रत्येक बोलमध्ये सुपावर थोडे क्रीम, काकडीच्या दोन चकत्या व थोडी कोथिंबीर घालावी.

कटलेट्स
साहित्य :  दोन कच्ची केळी, २ बटाटे, २ रताळी, २ चमचे दाण्याचे कूट, २ चमचे उपवास भाजणी, मिरची-कोथिंबीर-जिरे-थोडे आले यांचे वाटण, १ चमचा मीठ, पाव वाटी भगर (वरईचे तांदूळ).
कृती : केळी, बटाटे, रताळी कुकरमध्ये उकडून घ्यावीत. नंतर साली काढून सर्व छान कुस्करून घ्यावे. त्यात दाण्याचे बारीक कूट, उपवास भाजणी, जिरे, मिरची, कोथिंबीर, आले यांचे वाटण व मीठ मिसळावे. मिरचीचे वाटण आपल्याला तिखट कितपत पाहिजे त्याप्रमाणे घालावे. सर्व नीट कालवून घ्यावे. छोटे गोळे घेऊन त्यांना कटलेटचा आकार द्यावा व भगरीत घोळवून साजूक तुपात अथवा शेंगदाण्याच्या तेलात शॅलो फ्राय करावे. दोन्ही बाजूंनी छान ब्राऊन रंग आल्यावर गरमागरम कटलेट्स सर्व्ह करावीत. बरोबर खोबऱ्याची चटणी द्यावी.

दहीवडे
साहित्य : एक वाटी शिजवलेले वऱ्याचे तांदूळ, ४ चमचे साबुदाण्याचे पीठ, जिरेपूड, चमचाभर आले-मिरची ठेचा, २ चमचे दाण्याचे कूट, मीठ, कोथिंबीर, ४ वाट्या दही, थोडी साखर, थोडे किसलेले आले, चिंचगुळाची आंबटगोड चटणी.
कृती : शिजवलेले वऱ्याचे तांदूळ, साबुदाणा पीठ, दाण्याचे कूट, जिरेपूड, मीठ, चमचाभर आले-मिरची ठेचा व बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर सर्व एकत्र कालवावे. छोटे छोटे गोल वा चपटे वडे करून शेंगदाणा तेलात तळून घ्यावेत. ४ वाट्या दही घुसळून त्यात चवीनुसार मीठ, साखर व थोडे किसलेले किंवा ठेचलेले आले घालावे. तळलेले वडे एका डिशमध्ये ठेवून त्यावर हे दही घालावे. वरती थोडे तिखट, जिरेपूड भुरभुरावी. नंतर त्यावर चिंचगुळाची आंबटगोड चटणी घालून सर्व्ह करावे.

शिंगाड्याचा शिरा
साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी दूध, १ वाटी साखर अथवा गूळ. 
कृती : अर्धी वाटी साजूक तुपात शिंगाड्याचे पीठ खूप परतावे. थोड्या वेळाने ते हलके लागेल. छान खरपूस परतल्यावर थोडे थोडे दूध शिंपडत हे पीठ शिजवून घ्यावे. नंतर साखर अथवा गूळ घालून परतून मोकळा शिरा करावा. या शिऱ्यामध्ये वेलची पूड किंवा केशर घालू नये. शिंगाड्याचाच खास वेगळा स्वाद छान लागतो.

कच्च्या केळ्याची कडबोळी
साहित्य : दहा-बारा कच्ची केळी, दाण्याचे कूट, मीठ, जिरेपूड व ओल्या मिरचीचा ठेचा, तळण्यासाठी तूप किंवा शेंगदाण्याचे तेल.
कृती : केळी चांगली मऊ होईपर्यंत कुकरमध्ये वाफवून घ्यावीत. नंतर गार झाल्यावर साल काढून छान एकजीव कुस्करून घ्यावे अथवा वाटून घ्यावे. १ वाटी हा वाटलेला केळ्यांचा गोळा असल्यास पाऊण वाटी शेंगदाण्याचे बारीक कूट त्यात घालावे. चवीनुसार मीठ, वाटलेली मिरची व जिरेपूड घालावी. हा गोळा खूप चांगला मळून घ्यावा. नंतर कडबोळी करून तुपात किंवा शेंगदाणा तेलात तळावीत.

कोफ्ता करी
साहित्य : कोफ्त्यासाठी - चार कच्ची केळी, २ रताळी (अथवा बटाटे), अर्धी  वाटी खवलेले ओले खोबरे, २ चमचे दाण्याचे बारीक कूट, २ चमचे उपवास भाजणी, जिरेपूड, चमचाभर आले-मिरची ठेचा, मीठ.
करीसाठी : एक वाटी शेंगदाण्याचे बारीक कूट, वाटीभर नारळाचे दूध, २ अमसुले, चवीनुसार गूळ, मीठ, २ हिरव्या मिरच्या, जिरे.
कृती : कोफ्ते तयार करण्यासाठी केळी, रताळी उकडून, साल काढून कुस्करून घ्यावीत. त्यात अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे, दाण्याचे कूट, उपवास भाजणी, जिरेपूड, आले-मिरची ठेचा व मीठ सर्व घालून कालवून घ्यावे. छोटे छोटे गोळे करून शेंगदाणा तेलात तळावे. करी करण्यासाठी २ चमचे साजूक तुपात जिरे व मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यात दोन कप पाणी घालून अमसूल, गूळ, जिरेपूड, मीठ घालून उकळावे. नंतर त्यात दाण्याचे बारीक कूट व नारळाचे दूध घालावे (किंवा शेंगदाण्याचे कूट व खवलेला ओला नारळ मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊन घालावे). सर्व मिश्रण उकळल्यावर त्यात तळून ठेवलेले कोफ्ते व थोडी कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

वरई कोथिंबीर पुलाव
साहित्य : एक वाटी वऱ्याचे तांदूळ, ४ लवंगा, २-३ वेलदोडे, ४-५ मिऱ्याचे दाणे (ऐच्छिक), अर्धी जुडी कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, छोटा तुकडा आले, चमचाभर जिरे, १ मोठा बटाटा, १०-१२ काजू, मीठ.
कृती : तासभर आधी वऱ्याचे तांदूळ धुऊन निथळत ठेवावेत. बटाट्याचे साल काढून लांबलांब किसून घ्यावे व शेंगदाणा तेलात छान कुरकुरीत तळून ठेवावे. काजूसुद्धा तळून घ्यावेत. कोथिंबीर निवडून धुऊन घ्यावी. कोथिंबीर, मिरच्या, आले व जिरे यांचे मिक्सरमधून वाटण करून घ्यावे. नंतर पातेल्यात २ चमचे साजूक तूप घालून जिरे, लवंगा, वेलदोडे, मिरे घालून फोडणी करावी. त्यात वऱ्याचे तांदूळ घालून परतावे. नंतर त्यात कोथिंबिरीचे वाटण, चवीनुसार मीठ व थोडी साखर घालावी. दोन ते अडीच वाट्या आधण पाणी घालून वऱ्याचे तांदूळ मोकळे शिजवून घ्यावेत. सर्व्ह करताना त्यावर तळलेला बटाटा व काजू घालावेत.

शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा
साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट, मीठ, २ हिरव्या मिरच्या, थोडे आले व जिरे यांचे वाटण, २ चमचे दही, कोथिंबीर, थोडे ओले खोबरे, सोडा, ४ चमचे तूप.
कृती : रात्री १ वाटी पाण्यात २ चमचे दही व १ वाटी शिंगाड्याचे पीठ घालून भिजवून ठेवावे. सकाळी त्यात चवीनुसार मीठ, मिरची, जिरे, आले यांचे वाटण घालावे. ४ चमचे तूप घालावे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालावी. चिमूटभर सोडा किंवा थोडे फ्रुट सॉल्ट्स घालून पीठ कालवून घ्यावे. नंतर थाळीला तुपाचा हात लावून त्यात हे पीठ घालावे व कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्यावे (साधारण १५ ते २० मिनिटे लागतात). गार झाल्यावर वड्या कापून वर ओले खोबरे घालावे. 

लाल भोपळ्याचा हलवा
साहित्य : अर्धा किलो लाल भोपळा, ४ चमचे साजूक तूप, १ वाटी साखर, अर्धी वाटी मलई अथवा खवा, वेलची पूड, काजू-बदामाचे काप.
कृती : लाल भोपळ्याचे साल काढून फोडी कराव्यात व पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. नंतर छान कुस्करून घ्याव्यात व ४ चमचे साजूक तुपात ५-६ मिनिटे परतावे. चांगले परतल्यानंतर १ वाटी साखर घालावी. साखर विरघळल्यावर सर्व एकजीव होऊन घट्ट झाल्यावर त्यात वेचली पूड व अर्धी वाटी मलई घालावी (अथवा खवा परतून घालावा). सर्व पुन्हा परतावे. नंतर हा हलवा काजू-बदामांच्या कापांनी सजवून सर्व्ह करावा.

शाही रताळे
साहित्य : दोन मोठी रताळी, साजूक तूप, १ लिटर दूध, २ वाट्या साखर, वेलची पूड, केशर, काजू-बदाम. 
कृती : साल काढलेल्या रताळ्याचे पातळ काप करावेत. नॉनस्टिक तव्यावर साजूक तूप घालून हे काप ब्राऊन रंग येईपर्यंत परतावेत. दुसरीकडे १ वाटी साखरेत १ वाटी पाणी घालून उकळावे. साखर विरघळल्यावर हे रताळ्याचे काप त्यात थोडा वेळ बुडवून ठेवावेत व नंतर बाहेर काढून एका उथळ डिशमध्ये नीट मांडून ठेवावे. दूध आटवून उरलेली साखर घालून त्याची रबडी करावी. त्यात वेलची पूड, केशर घालावे. ही घट्ट रबडी रताळ्यांच्या कापावर ओतावी व काजू-बदामाने सजवून सर्व्ह करावी.   

संबंधित बातम्या