मिश्र भाज्या

उमाशशी भालेराव
सोमवार, 21 जून 2021

फूड पॉइंट

हल्ली कांदा बटाट्याप्रमाणे फ्लॉवर, गाजर, टोमॅटो, बीन्स, दुधी, भेंडी वगैरे फळभाज्या व सर्व प्रकारच्या पालेभाज्या वर्षभर उपलब्ध असतात. त्यामुळे मिश्र भाज्यांचे वेगवेगळे प्रकार करणे सहज शक्य होते. म्हणून मिश्र भाज्यांचे हे काही प्रकार...

महाराष्ट्रीय भोगीची भाजी

साहित्य :  हरभरा, मटार, वालाच्या शेंगा, डबल बी, वगैरे शेंगांचे दाणे सोलून घ्यावेत. पापडी, कोबी, फ्लॉवर, बीन्स, गाजर, पडवळ, तोंडली, बटाटा, नवलकोल, वांगी वगैरे उपलब्ध भाज्या थोड्या थोड्या घ्याव्यात. मेथीची एक मोठी जुडी, तेल, फोडणीचे साहित्य, धने-जिरे पूड, काळा गोडा मसाला, तिखट, मीठ, गूळ.
कृती : सर्व भाज्यांच्या फोडी करून धुऊन घ्याव्यात. मेथीची जुडी निवडून धुऊन चिरून घ्यावी. चार चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात सर्व प्रकारचे सोललेले दाणे व भाज्या घालाव्यात. गरजेप्रमाणे पाणी घालून शिजवावे. मेथी घालावी. दोन-तीन चमचे धने-जिरे पूड, चार चमचे काळा मसाला, आवडीप्रमाणे तिखट, चवीनुसार मीठ व थोडा गूळ घालावा. ही भाजी साधारणपणे सुकीच असते. या भाजीत सहसा कांदा, लसूण घालत नाहीत. पण आवडत असल्यास घालायला हरकत नाही.

 

पंजाबी रस्सा

साहित्य : फ्लॉवर, मटार, बटाटा, गाजर, बीन्स याच भाज्या प्रामुख्याने घ्याव्यात. त्याशिवाय २ मोठे चिरलेले कांदे, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, २ मोठे बारीक चिरलेले टोमॅटो, २ तमालपत्राची पाने, अर्धी वाटी दही, आवडीप्रमाणे तिखट, मीठ, चवीला चिमूटभर साखर. 
मसाल्यासाठी : दोन चमचे मिरे, २ चमचे धने, १ चमचा जिरे, २-३ मसाला वेलदोडे, ७-८ लवंगा, ३-४ छोटे तुकडे दालचिनी - याची कच्चीच पूड करावी. 
कृती : सर्व भाज्या धुऊन मोठ्या फोडी करून घ्याव्यात. 
चार चमचे तेलात तमालपत्राची पाने व बारीक चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतावा. नंतर आले-लसूण पेस्ट घालून परतावे. मग बारीक चिरलेला टोमॅटो व चार चमचे पंजाबी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. मग त्यात अर्धी वाटी आंबट दही घालून परतावे. नंतर सर्व भाज्या घालून, थोडे परतून, दोन कप आधण पाणी, तिखट, मीठ, थोडी साखर घालून शिजवावे. रस आपल्याला हवा त्याप्रमाणे दाट वा पातळ ठेवावा. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावा.

गुजराती उंधियो
साहित्य : पाव किलो सुरती पापडी, ७-८ छोटे बटाटे, २ कच्ची केळी, ७-८ छोटी वांगी, ७-८ यामचे तुकडे, २ रताळी.
मुठियासाठी : एक जुडी मेथी, थोडे बेसन, थोडी कणीक, तिखट, मीठ, हळद, हिंग, २ चमचे तेल. मेथी निवडून धुऊन बारीक चिरून त्यात मावेल इतके बेसन व थोडी कणीक, तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल घालून कालवावे व छोटे छोटे गोळे करून तळून ठेवावेत. 
मसाल्यासाठी : एक वाटी खवलेला नारळ, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ओली लसूण पात (नसल्यास ४-५ पाकळ्या लसूण), २ इंच आले, १ चमचा धने पूड, अर्धा चमचा जिरे पूड, थोडे तिखट, मीठ, १ चमचा वाटलेली हिरवी मिरची, थोडी साखर, थोडा ओवा, चमचाभर लिंबू रस - सर्व एकत्र कालवावे.
कृती : बटाटे सोलून घ्यावेत. केळ्याचे प्रत्येकी तीन तुकडे करावेत. बटाटे, वांगी, केळी यांना चिरा पाडून त्यात अर्धा तयार मसाला भरावा. उरलेल्या मसाल्यात इतर भाज्या कालवून ठेवाव्यात. चार चमचे तेलात मोहरी, जिरे, हळद, हिंग घालून फोडणी करावी. त्यात प्रथम सोलून घेतलेली पापडी परतावी. नंतर इतर भाज्या मसाल्यासहित घालाव्यात. थोडे पाणी शिंपडून शिजवावे. त्यात गरजेप्रमाणे तिखट, मीठ व थोडी साखर घालून शिजवावे. शेवटी मुठिया व भरली केळी घालावीत. झाकण ठेवून सात-आठ मिनिटे शिजवावे. ही भाजी तेलातच शिजवावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावी. 

कर्नाटकी हिट्टमेणसू
साहित्य : बटाटा, बीन्स, फ्लॉवर, गाजर, कच्ची केळी, सुरण, राजगिऱ्याच्या देठी, तोंडली, काकडी, शेवग्याच्या शेंगा (वांगी घालू नयेत). प्रत्येक भाजीच्या ८-१० फोडी करून घ्याव्यात. 
मसाल्यासाठी : तीन चमचे उडदाची डाळ, १ चमचा मिरे, ७-८ लाल सुक्या मिरच्या - हे पदार्थ तुपावर परतून बारीक वाटून घ्यावेत, अर्धा नारळ - याचे घट्ट व पातळ दूध करून घ्यावे, १ वाटी ताक, कढीपत्ता, फोडणीचे साहित्य, मीठ. 
कृती : नारळ वाढवून काढलेले घट्ट दूध बाजूला ठेवावे व नारळाच्या पातळ दुधात सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात. त्यात वाटलेला मसाला व चवीनुसार मीठ घालावे. दुसरीकडे एक चमचा साजूक तुपात मोहरी, हिंग व कढीपत्त्याची ८-१० पाने घालून फोडणी करावी व ती फोडणी भाजीत घालावी. भाजीला पातळसर रस असावा. भाजी गॅसवरून खाली उतरवल्यावर त्यात नारळाचे घट्ट दूध व ताक घालून सर्व्ह करावे.

तवा भाजी
साहित्य : बटाटे, वांगी, गाजर, फ्लॉवर, बीन्स, तोंडली या सर्व भाज्यांचे लांब लांब तुकडे, तेल, फोडणीचे साहित्य, १ मोठा कांदा, १ चमचा आले लसूण पेस्ट, वाटीभर टोमॅटो प्युरी (नसल्यास बारीक चिरलेला टोमॅटो), १ मोठा चमचा गरम मसाला, आवडीप्रमाणे तिखट, मीठ.
कृती : सर्व भाज्यांचे तुकडे तेलात तळून बाजूला काढून ठेवावेत. तव्यावर दोन चमचे तेलात जिरे, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. नंतर आले लसूण पेस्ट व टोमॅटो प्युरी घालून परतावे. गरम मसाला, तिखट, मीठ घालून पुन्हा थोडे परतावे. नंतर तळून घेतलेल्या सर्व भाज्या घालून परतून गरमागरम सर्व्ह करावे.

काँटिनेंटल मिक्स्ड व्हेज स्ट्यू
साहित्य : फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीन्स, मटार, बेबी कॉर्न, ब्रोकोली, सिमला मिरची, २ तुकडे दालचिनी, १ कांदा.
व्हाइट सॉससाठी : चार चमचे मैदा वा कणीक, २ कप दूध, १ वाटी किसलेले चीज, लोणी, मीठ, मिरपूड.
कृती : सर्व भाज्यांचे बेताच्या आकाराचे तुकडे करावेत व थोडे पाणी घालून भाज्या शिजवून घ्याव्यात. शिजवतानाच त्या पाण्यात दालचिनीचे तुकडे घालावेत. म्हणजे सर्व भाज्यांना दालचिनीचा छान वास लागतो. दुसऱ्या पॅनमध्ये दोन-तीन चमचे लोणी विरघळवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा. त्यात मैदा किंवा कणीक घालून पुन्हा परतावे. त्यात दूध व गरजेप्रमाणे थोडे पाणी घालावे व एकजीव शिजवावे. सतत ढवळावे म्हणजे गाठी होणार नाहीत. या व्हाइट सॉसमध्ये शिजवलेल्या सर्व भाज्या आणि अंदाजे मीठ, मिरपूड घालावे. अर्धे किसलेले चीज मिसळावे. स्ट्यू फार दाट अथवा फार पातळ नसतो. आपल्या आवडीप्रमाणे ठेवावे. वरून उरलेले चीज पसरावे. स्ट्यू बेक करायचा असल्यास बेकिंग डिशमध्ये घेऊन वरून किसलेले चीज पसरावे व ओव्हनमध्ये १८० अंशावर १५-१६ मिनिटे बेक करावे.

व्हेज कुर्मा
साहित्य : प्रत्येकी अर्धी वाटी बटाटा, कांदा, फ्लॉवर, बीन्स, गाजर, तोंडली या भाज्यांचे मोठे तुकडे, २ मोठे टोमॅटो, चमचाभर आले लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे गरम मसाला, तिखट, मीठ, २ चमचे तेल.
मसाल्यासाठी : अर्धी वाटी खवलेले खोबरे, ८-१० काजू व थोडी खसखस : सर्व मिक्सरमधून वाटून घेणे.
कृती :  दोन-तीन चमचा तेलात तमालपत्राची दोन पाने व दालचिनीचा एक तुकडा व एक मसाला वेलदोडा घालून परतावे. नंतर बारीक चिरलेला कांदा परतावा. आले लसूण पेस्ट व बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतावे. दुसरीकडे फ्लॉवर, बटाटा, गाजर, बीन्स या सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात. परतलेल्या कांदा, टोमॅटोमध्ये या शिजवलेल्या भाज्या, वाटलेला मसाला, तिखट, मीठ, गरम मसाला घालावा. उकळल्यावर वाटीभर दही घालून मिसळावे. सर्व्ह करताना क्रीम वा वाटीभर दूध घालून कोथिंबिरीने सजवावे. 

केरळी मिश्र भाजी
साहित्य : फ्लॉवर, मटार, बीन्स, गाजर, बटाटा, कोबी, कच्ची केळी या सर्व भाज्यांचे बारीक तुकडे करावेत (वांगी व पालेभाज्या घेऊ नयेत). १ मोठा बारीक चिरलेला कांदा, फोडणीचे साहित्य, ८-१० कढीपत्त्याची पाने, मीठ, साखर, तेल. 
मसाल्यासाठी : तीन-चार हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, २ चमचे धने, १ इंच आले, अर्धा खवलेला नारळ - हे सर्व कच्चेच मिक्सरमधून वाटून घ्यावे.
कृती : दोन चमचे तेलात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. कढीपत्त्याची ८-१० पाने घालून त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. नंतर सर्व बारीक चिरून धुऊन घेतलेल्या भाज्या अंदाजे पाणी घालून शिजवून घ्याव्यात. भाज्या शिजल्यावर वाढलेला मसाला कच्चाच त्यात घालावा. अंदाजे मीठ, साखर घालावे. सर्व एकत्रित उकळल्यावर हा रस्सा तयार! हा रस्सा खूप पातळ असतो. भाताबरोबर खातात (ब्रेडबरोबरही छान लागतो).
 

संबंधित बातम्या