चटपटीत चाट

उमाशशी भालेराव
सोमवार, 13 डिसेंबर 2021

फूड पॉइंट

हिवाळा असो वा पावसाळा किंवा उन्हाळा; कोणत्याही ऋतूमध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे चाट! म्हणून घरी करता येतील अशा चटपटीत चाटच्या काही पाककृती...

कोणत्याही प्रकारच्या चाटसाठी पुढील दोन चटण्यांची गरज असते.

हिरवी चटणी 
भरपूर कोथिंबीर, थोडा पुदिना, इंचभर आल्याचा तुकडा, आवडीनुसार २-४ हिरव्या मिरच्या, जिरे व मीठ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून सरसरीत हिरवी चटणी तयार करावी. आवडत असल्यास या चटणीत ५-६ लसूण पाकळ्या घालाव्यात.

आंबटगोड चटणी 
 चिंचेचा कोळ घेऊन त्यात योग्य प्रमाणात गूळ किसून घालावा. त्यात 
थोडी धने-जिरे पूड, हिंग, थोडे तिखट व चवीनुसार मीठ घालून सर्व उकळून घ्यावे.

बाकरवडी चाट
साहित्य ः बाकरवड्या, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक चिरलेला कांदा, फरसाण, बारीक शेव, दही, दोन्ही चटण्या.  
कृती ः बाकरवड्यांचा चुरा करून घ्यावा. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी व बारीक चिरलेला कांदा घालावा. थोडे फरसाण व बारीक शेव घालून फेटलेले दही घालावे. त्यावर आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.

दहीभल्ला चाट
साहित्य : दोन वाट्या उडदाची डाळ, आल्याचा तुकडा, १ चमचा जिरे, २ मिरच्या, मीठ, दही,  साखर, तेल, उकडलेले मूग, पापडी, बारीक शेव व दोन्ही चटण्या. 
कृती : दोन वाट्या उडदाची डाळ चार, पाच तास भिजत घालावी. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. वाटतानाच त्यात जिरे, आले व मिरची घालावी. वाटून झाल्यावर त्यात मीठ घालावे. मिश्रणाचे लहान गोळे करून तेलात तळून घ्यावेत. हे तळलेले वडे लगेच पाण्यात घालावेत. नंतर प्रत्येक वडा हातात घेऊन दाबून पाणी काढून टाकावे. तीन-चार वाट्या दही घुसळून घ्यावे. त्यात मीठ, जिरे पूड व थोडी साखर घालावी. उडदाचे वडे प्लेटमध्ये पसरून ठेवावेत. त्यावर हे दही घालावे. त्यावर उकडलेले मूग,  कुस्करलेली पापडी व शेव भुरभुरावी. वर दही व दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.

शेव बटाटा दही पुरी
साहित्य : बारा-पंधरा भेळेच्या चपट्या पुऱ्या, उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, बारीक शेव, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, दही, कोथिंबीर.
कृती : भेळेच्या चपट्या पुऱ्या बशीत मांडून घ्याव्यात. त्यावर उकडलेल्या बटाट्याच्या बारीक फोडी, चिरलेला कांदा घालावा. त्यावर बारीक शेव व दोन्ही चटण्या घालाव्यात. त्यावर भरपूर फेटलेले दही घालावे. कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करावे.

गोलगप्पे चाट
साहित्य :  पाणीपुरीच्या १२-१५ फुगलेल्या पुऱ्या, २ उकडलेले बटाटे, वाटीभर मोड आलेले उकडलेले मूग, दही, बारीक शेव, दोन्ही चटण्या, आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा.
कृती : पुऱ्यांना मधोमध भोक पाडून डिशमध्ये त्या मांडून ठेवाव्यात. प्रत्येक पुरीमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या दोन तीन फोडी, थोडे उकडलेले मूग व हवा असल्यास बारीक चिरलेला कांदा घालावा. या पुऱ्यांवर फेटलेले भरपूर दही व त्यावर दोन्ही चटण्या थोड्या थोड्या घालाव्यात. वरून बारीक शेर भुरभुरून घालावी. कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

सामोसा चाट

साहित्य : प्रत्येकी १ सामोसा, बारीक चिरलेला कांदा, चुरलेले फरसाण, दही, बारीक शेव, हिरवी चटणी व चिंचेची आंबट गोड चटणी.
कृती : प्रत्येकी एक सामोसा घेऊन त्याचे तुकडे करावेत. त्यात बटाट्याची भाजी असतेच. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालावा. चुरलेले फरसाण घालून वर फेटलेले दही घालावे. त्यावर बारीक शेव व आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालून सर्व्ह करावे.

रगडा पॅटिस चाट
साहित्य :  पांढरे वाटाणे, मीठ, हळद, तिखट, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, बारीक शेव, हिरवी चटणी व आंबटगोड चटणी.
कृती : पांढरे वाटाणे रात्रभर भिजत घालावे. सकाळी शिजवतानाच त्यात मीठ, हळद व आवडीप्रमाणे थोडे तिखट घालावे. ही उसळ मऊ शिजवून घ्यावी. यात मसाला किंवा फोडणी घालत नाहीत. पॅटिस करण्यासाठी उकडून घेतलेले बटाटे सोलून किसून घ्यावेत. त्यात हिरवी मिरची, आले, लसूण, जिरे वाटून घालावे. चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव कालवावे. हा बटाट्याचा गोळा थोडा चिकट वाटल्यास ब्रेडचे दोन स्लाइस थोडे ओले करून कुस्करून घालावे. तयार मिश्रणाचे छोटे छोटे पॅटिस करून शॅलो फ्राय करावेत. सर्व्ह करताना प्रत्येक डिशमध्ये दोन पॅटिस घालून त्यावर पांढऱ्या वाटाण्याची उसळ म्हणजेच रगडा घालावा. त्यावर शेव, आवडीप्रमाणे दोन्ही चटण्या घालाव्यात व सर्व्ह करावे.

कचोरी चाट
साहित्य :  प्रत्येकी १ कचोरी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक शेव, दही व दोन्ही चटण्या. 
कृती : प्रत्येकासाठी एक कचोरी घ्यावी व ती मधोमध फोडावी. त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी, बारीक शेव व दही घालावे. त्यावर आंबट गोड चिंचेची चटणी घालून सर्व्ह करावे. आवडत असल्यास हिरवी चटणीही घालावी.

फ्रूट चाट
चाटचा हा प्रकार उत्तर भारतात फार लोकप्रिय आहे. 
साहित्य :  उपलब्ध असतील ती सर्व फळे, मीठ, मिरपूड. 
कृती : सर्व फळांच्या फोडी करून घ्याव्यात. सर्व्हिंग बाऊलमध्ये त्या फोडी घालून त्यावर मिरपूड व किंचित मीठ भुरभुरून घालावे व सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या