कैरीचे पदार्थ

उमाशशी भालेराव
सोमवार, 23 मे 2022

फूड पॉइंट

मेथांबा
साहित्य ः दोन वाट्या साल काढलेल्या कैरीच्या फोडी, २ वाट्या चिरलेला अथवा किसलेला गूळ, १ चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा मेथ्या, ३-४ चमचे तेल, मीठ फोडणीचे साहित्य.
कृती : तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद व मेथ्या घालून खमंग फोडणी करावी. त्यात कैरीच्या फोडी घालाव्यात. वाटीभर पाणी घालून कैरीच्या फोडी शिजवाव्यात. फोडी मऊ झाल्यावर त्यात तिखट पूड, गूळ व अंदाजे मीठ घालून पुन्हा थोडा वेळ शिजवावे. गार झाल्यावर मिश्रण वाटावे. मेथांबा २-४ दिवस फ्रीजमध्ये टिकतो.

कैरीची डाळ
साहित्य ः दोन वाट्या चण्याची डाळ, अर्धी वाटी कैरीचा कीस, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी किसलेले खोबरे, ३-४ लाल सुक्या मिरच्या, मीठ, साखर, कोथिंबीर, ४-५ चमचे तेल, ५-७ कढीपत्त्याची पाने, फोडणीचे साहित्य.
कृती : चण्याची डाळ ४-५ तास पाण्यात भिजवून ठेवावी. नंतर रोळीत उपसून कोरडी करून घ्यावी. नंतर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. हिरव्या ओल्या मिरच्याही वाटून घ्याव्यात. वाटलेली डाळ, वाटलेली हिरवी मिरची, खोबरे, कोथिंबीर, कैरीचा कीस सर्व एकत्र कालवावे. खमंग फोडणी करून त्यात कढीपत्त्याची पाने व सुक्या मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. जाळीत मीठ, साखर व फोडणी घालून कालवावे. ही कैरीची डाळ ताजीच खावी. फार काळ टिकत नाही.

कढी
साहित्य ः एक कैरी, २-३ चमचे चण्याचे पीठ, २ वाट्या ताक, ७-८ कढीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती :  कैरीच्या फोडी करून शिजवून पल्प करून घ्यावा. ताकात चण्याचे पीठ, कैरीचा पल्प, चवीनुसार मीठ व साखर घालून सर्व एकजीव कालवावे. तेलात जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात कढीपत्त्याची पाने व हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतावेत. ही फोडणी ताकावर घालावी. कढी उकळून घ्यावी व कोथिंबिरीने सजवून वाढावी. कढी घट्ट वाटल्यास थोडे पाणी मिसळून पुन्हा उकळावे.

सार
साहित्य ः अर्धी वाटी कैरीच्या फोडी, १ वाटी गूळ, अर्धा चमचा मेथ्या, २ चमचे चण्याचे पीठ (बेसन), मीठ, तिखट, फोडणीचे साहित्य, २-३ चमचे तेल, २ सुक्या मिरच्यांचे तुकडे, ५-८ कढीपत्त्याची पाने.
कृती : तेलात मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात मेथ्या तांबूस होईपर्यंत परताव्यात. नंतर त्यात सुक्या मिरच्यांचे तुकडे व कढीलिंबाची पाने घालावीत. कैरीच्या फोडी व ४ वाट्या पाणी घालून शिजवावे. फोडी शिजल्यावर त्यात चवीनुसार मीठ, तिखट, गूळ घालावा. चण्याचे पीठ पाण्यात कालवून त्यात घालावे. सार घट्ट वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे. सार चांगले उकळून घ्यावे. सार वाढण्यापूर्वी काही जण त्यात थोडे ओले खोबरे वाटून त्याचे दूध काढून घालतात.

सासव
साहित्य ः  पंधरा-वीस गोटी आंबे, १ वाटी खवलेले खोबरे, पाव वाटी साखर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, १ चमचा मोहरी, हिंग, तूप, मिरपूड.
कृती : आंबट-गोड चवीचे लहान आकाराचे पिकलेले पण घट्ट आंबे घ्यावेत. धुऊन आंब्याच्या साली काढाव्यात. 
खोबरे व मोहरी वाटून घ्यावे. मीठ, साखर, तिखट व पाव वाटी पाणी सर्व एकत्र कालवून ठेवावे. त्यात साल काढून ठेवलेले आंबे बाठीसकट घालावेत. हिंग, तुपाची फोडणी घालून सर्व मिश्रण १० मिनिटे उकळावे. वाढण्यापूर्वी मिरपूड घालावी. आंबट, गोड, तिखट, खारट अशा सर्व चवींचे सासव मस्त लागते.

संबंधित बातम्या