वांग्याचे पदार्थ...

उमाशशी भालेराव
सोमवार, 20 जून 2022

फूड पॉइंट

हिरवा रस्सा
साहित्य ः अर्धी जुडी कोथिंबीर, ३-४ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, २ चमचे धने पूड (हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यावे), वाटीभर दाण्याचे कूट, ७-८ छोटी वांगी, चवीनुसार मीठ, तेल.
कृती ः दोन चमचे तेलात वाटलेला मसाला परतावा. तेल सुटू लागले की त्यात दाण्याचे कूट घालून पुन्हा थोडे परतावे. मसाल्यात चवीनुसार मीठ घालावे. वांग्यांना चिरा पाडून त्यात हा मसाला भरावा. दुसरीकडे दोन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी व त्यात मसाला भरलेली वांगी परतावीत व नंतर थोडे पाणी घालून शिजवावे.

चिजी वांगी मेथी
साहित्य ः एक जुडी मेथी (निवडून धुऊन चिरलेली), १ मोठा बारीक चिरलेला कांदा, २ बारीक चिरलेले टोमॅटो, २ चमचे आले-लसूण पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो पल्प, २-३ हिरव्या मिरच्या, २ चमचे गरम मसाला, १ चमचे धने पूड, ७-८ छोटी वांगी, मीठ, २ चमचे तेल, फोडणीचे साहित्य, वाटीभर चीज. 
कृती ः  कांदा, आले, लसूण, टोमॅटो, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे सर्व तेलात परतून घ्यावे. नंतर मेथी घालून परतावी. मग टोमॅटो पल्प घालावा. त्यावर गरम मसाला, धने पूड व चवीनुसार मीठ घालावे. नंतर चिरा पाडलेली छोटी वांगी घालून परतावे. थोडे पाणी घालून सर्व शिजवावे. भाजी वाढण्यापूर्वी वाटीभर चीज किसून घालावे.

वांग्याचे काप 

साहित्य ः  सात-आठ मोठी गोल वांगी, वाटीभर तांदळाचे पीठ, २ चमचे बारीक रवा, आवडीनुसार तिखट, चवीनुसार मीठ, हळद, हिंग, तेल, अर्धा चमचा जिरे पूड.
कृती ः वांग्यांचे जरा जाडसर काप करावेत. त्यांना थोडावेळ मिठाच्या पाण्यात ठेवून बाहेर काढावे. दुसरीकडे तांदळाच्या पिठात रवा, तिखट, मीठ, जिरे पूड, हळद, हिंग घालावे. पीठ कोरडेच ठेवावे. या पिठात काप दोन्ही बाजूंनी घोळवून, दाबून घ्यावेत. दोन्ही बाजूंना तांदळाचे पीठ लागले पाहिजे. तव्यावर दोन चमचे तेल घालून त्यावर हे काप घालून मंद विस्तवावर दोन्ही बाजूंनी तांबूस करून घ्यावेत. हे काप गरम असतानाच खावेत.

हैदराबादी बघारा बैंगन
साहित्य ः अर्धी वाटी सुके खोबरे, १ चमचा पांढरे तीळ, १ कांदा, २ चमचे धने, अर्धा चमचा जिरे, थोडी खसखस, २ चमचे शेंगदाणे, १ चमचा तिखट, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ चमचे चिंचेचा कोळ, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, ७-८ छोटी वांगी.
कृती ः कांदा बारीक चिरावा. कांदा, सुके खोबरे, पांढरे तीळ, खसखस, धने, जिरे, आले, आले-लसूण पेस्ट, शेंगदाणे, तिखट हे सर्व थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. चवीनुसार मीठ घालावे व हे वाटण चिरा पाडलेल्या वांग्यांमध्ये भरावे. दोन-तीन चमचे तेलात मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात वांगी चांगली परतावीत. चिंचेचा कोळ व थोडे पाणी घालून शिजवावे. वाटलेला मसाला उरला असेल तर तोही त्यात घालावा. आवडीप्रमाणे भाजीला रस ठेवावा. 

चटणी
साहित्य ः चार-पाच छोटी वांगी, चमचाभर चिंचेचा घट्ट कोळ, चमचाभर तिखट, चवीनुसार मीठ, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती ः वांग्याच्या छोट्या फोडी कराव्यात. त्यात चिंचेचा कोळ, तिखट, मीठ घालून मिक्सरवर वाटून घ्यावे. फार बारीक वाटू नये. वाटलेल्या वांग्यांवर मोहरी, जिरे आणि हिंग घालून केलेली तेलाची फोडणी घालावी. ही चटणी चटकदार लागते. आवडत असल्यास चटणी वाटण्यापूर्वी थोडा गूळ घालावा.

संबंधित बातम्या