थंडीसाठी पौष्टिक सूप्स

उषा पुरोहित, पुणे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

फूड पॉइंट
थंडीच्या दिवसांत गरमगरम खाण्यापिण्याची इच्छा होत असते. अशा वेळी ‘सूप’पेक्षा चांगला पर्याय दुसरा नाही. सूप्स पचायला हलकी असल्यामुळे लहान-मोठे सर्वांनाच आवडतात. अशा पौष्टिक सूप्सच्या रेसिपीज...
उषा पुरोहित

क्रीम ऑफ टोमॅटो सूप 
साहित्य : १ किलो लाल व गोल टोमॅटो, ५ कप दूध, १ टेबल स्पून मैदा, १ टेबलस्पून बटर, १ टीस्पून मीठ, अर्धा टी स्पून ताजी मिरेपूड, अर्धा कप पाणी, २-३ तमालपत्र, थोडे आले, २ लहान वेलदोडे.
कृती :  टोमॅटो चिरावेत, अर्धा कप पाणी, तमालपत्र, किसलेलं आले, ठेचलेले वेलदोडे घालावेत. ते नरम शिजवावे. थंड  करुन मिक्‍सरला लावावा. ते गाळावे, मिश्रण घट्ट हवे असल्यास पॅनमध्ये बटर व मैदा घालावा. रंग बदलू देऊ नका. लगेच दूध घालून मंद गॅस हलवत राहावा. उकळल्यावर टोमॅटो पल्प घालावा. गॅस कमी ठेवावा. मीठ, मिरेपूड, जायफळ पूड घालावी. (क्रीम ऐच्छिक आहे). सर्व्ह करताना ब्रेडचे चौकोनी तळलेले तुकडे (routons) किंवा चीज बिस्किटस्‌ द्यावेत.

चिकन नूडल सूप 
साहित्य : २५० ग्रॅम बोनलेस चिकन, ५० ग्रॅम ॲग नूडल्स्‌ (अंदाजाने घ्यावे), १ छोटं गाजर, २ टेबलस्पून कोबी, २ टेबलस्पून मश्रुम, १ टी स्पून सोयासॉस, २ टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, ४-५ कप चिकन स्टॉक, १ टी स्पून मीठ, चिमूट अजिनोमोटो (ऐच्छिक), मिरेपूड, २ टेबलस्पून व्हिनेगर.
कृती : भाज्या बारीक व लांब चिराव्यात. स्टॉक व चिकन ५ मिनिटे उकळावे. मग चिरलेल्या भाज्या घाळून उकळाव्यात. त्यात कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालावी. सर्वात शेवटी उकडलेले नूडल्स घालावे. लगेच सर्व्ह करावे. 
टीप : नूडल्स आधीपासून घातल्यास सूप फार घट्ट होईल. नूडल्स सूप शोषून घेतील.

हॉट ॲण्ड सावर सूप  
स्टॉकसाठी साहित्य : ३ कप पाणी, १ कप जाड चिरलेला कोबी, अर्धा कप फ्लॉवर, अर्धा कप गाजर, १ कांदा, १ टेबलस्पून सेलरी चिरून, ४ लसूण पाकळ्या, सर्व उकळून, आटवून ३ कप करावे.
कृती : तयार स्टॉक घेऊन १ टी स्पून चिरलेला लसूण, १ टी स्पून बारीक चिरलेले आले, २ टी स्पून बारीक चिरलेले गाजर, २ टी स्पून कोबी, अर्धा कप पातळ चिरलेले मश्रुम, मीठ, मिरेपूड, ग्रीन चिली सॉस,  दीड टीस्पून व्हिनेगर टाकावे. अजिनोमोटो ऐच्छिक.
टीप : या सूपसाठी सेलरी व मश्रुम आवश्‍यक आहे. दुसरे म्हणजे दाटपणासाठी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालू नये. हे क्‍लिअर सूप आहे. गार्लिक ब्रेड बरोबर सर्व्ह करावे.

थाई सूप  
साहित्य : (या सूपसाठी करीपेस्ट लागेल. ती अशी करावी. १ टेबल स्पून काड्यांसकट कोथिंबीर, १ टी स्पून जिरे, १ टी स्पून मिरे, ३ लहान मद्रासी कांदे, नसल्यास १ कांदा, थोडं आलं, लसूण, २ हिरव्या मिरच्या, दीड चमचे धने, लिंबाची साल किसून अर्धा टी स्पून (फक्त पिवळा भाग किसावा), इतर साहित्य २ टेबलस्पून तेल, १ कांदा चिरून, १-१ टेबलस्पून आलं किसून चिरून, गवती चहा थोडा चिरून, १ हिरवी मिरची, लिंबाची किसलेली साल, चिकनचे बोनलेस तुकडे, चिकन स्टॉक ३ कप, चिकन न खाणाऱ्यांनी टोफू किंवा पनीर वापरावे. 
कृती : प्रथम करीपेस्ट बनवा. मग स्टॉक मध्ये तेलावर परतलेला कांदा व इतर साहित्य, चिकन घालावे. करीपेस्ट लागेल तशी घालावी. थोडं नारळाचे दूध शेवटी घालावे. हल्ली मुलांना थाई पदार्थ आवडतात.

क्रीम ऑफ मश्रुम सूप 
साहित्य : २०० ग्रॅम मश्रुम धुऊन पुसून स्लाईस करुन घ्यावेत, १ कांदा, १ टेबलस्पून बटर, अर्धा कप दूध.
व्हाइट सॉससाठी - १ टेबलस्पून बटर, दीड टेबलस्पून मैदा, १ कप दूध, मीठ, पांढऱ्या मिऱ्यांची पूड, क्रीम सर्व्ह करताना देण्यासाठी.
कृती : बटरवर कांदा गुलाबी भाजून घ्यावा.त्यात मश्रुम स्लाईस घालून परतावे. (हे मिश्रण थोडं बाजूला काढावे), उरलेल्या मिश्रणात १/२ कप दूध घालून, मश्रुम दुधात शिजवावे. मिक्‍सरमध्ये वाटावे. बटर गरम करुन मैदा घालावा. १ कप दूध घालावे. हलवत रहावे. मंद गॅसवर शिजवावे. त्यात मश्रुमची पेस्ट घालावी. तयार सूप घट्ट वाटल्यास पाणी किंवा स्टॉक घालावे. सर्व्ह करताना थोडं क्रीम बाजूला काढलेले मश्रुम थोडे घालून घ्यावे. 
टीप ः मश्रूम पाण्यात भिजवून ठेवू नये. ते पाणी शोषून घेतात.

कॉर्नसूप 
क्रीम स्टाइल कॉर्न बनविण्यासाठी साहित्य : दीड कप मक्‍याचे दाणे, ३ कप व्हेज किंवा नॉनव्हेज स्टॉक 
कृती : प्रथम दाणे व स्टॉक मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. मग गाळून घ्यावे. त्यामुळे दुधाप्रमाणे स्टॉक दिसेल. त्यात १/४ कप उकडलेले मक्‍याचे दाणे जरा ठेचून घालावे व १ कप पाणी घालावे. सर्व मंद गॅसवर उकळावे. उकळताना ते हलवत रहावे. या बेसिक सूपमध्ये १/४ टीस्पून मिरेपूड, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून व्हाइट व्हिनेगर, दीड स्पून साखर, १/४ टीस्पून अजिनोमोटो, (ऐच्छिक), हिरव्या मिरच्या बारीक चिरून, दीड स्पून सेलरीच्या काड्या चिरून, नसल्यास कोथिंबीरीच्या काड्या चिरून घालाव्यात. सूप देताना बरोबर सोयासॉस व व्हिनेगरमध्ये मीठ घालून बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्याव्यात.

जिंजर शोरबा 
साहित्य : कांदा १, २ हिरव्या मिरच्या, २ टेबलस्पून कोथिंबीर, पाऊण लिटर पाणी, १ टे तूप, ५० ग्रॅम (२ टेबलस्पून दही) १ टेबलस्पून क्रीम किंवा साय. चिमूटभर हळद, १ चमचा धनेपूड, ६० ग्रॅम आलं.
कृती : प्रथम आले चिरून थोड्या पाण्यात घालून ठेवावे. (पातळ स्लाईस करावेत). कांदा, मिरची इत्यादी चिरून घ्यावे. तूप गरम करुन कांदा, पाण्यासकट आले घालावे. घुसळलेले दही, धनेपूड, हळद, कोथिंबीर, मीठ, क्रीम घालावे. ३ कप किंवा जास्त पाणी घालावे. चिरलेल्या मिरच्यांतल्या बिया काढून हिरवा भाग वापरावा. म्हणजे शोरबा फार तिखट होणार नाही. शक्‍य तो कोवळं आलं वापरावे.

बदामी शोरबा 
साहित्य : दोन बटाटे, १ गाजर, अर्धा कप उकडलेल काबुली चणे, १० बदाम भिजवून सोलून जाडसर वाटावे, १ कप दूध, थोडे आले, १ तमालपत्र, ५-६ मिरे, मीठ, चिमूट साखर, १ हिरवा वेलदोडा.
कृती : बटाट्याची सालं काढून चिरावेत. गाजर किसून घ्यावे. २ कप पाणी घेऊन त्यात बटाटे, गाजर, आले, तमालपत्र, मिरे, वेलदोडा घालावे. ते नरम शिजवावे. तमालपत्र काढून मिक्‍सरला लावावा व सर्व गाळून घ्यावे. दूध घालून मंद गॅसवर उकळावे. मीठ, मिरेपूड, साखर घालावी. सर्वात शेवटी वाटलेले बदाम घालून सर्व्ह करावे.
टीप ः  रंग पांढरा हवा असल्यास गाजरा ऐवजी फ्लॉवर थोडा वापरावा.

टमाटर धनिये का शोरबा 
साहित्य :  मोठे ४ लाल टोमॅटो, कोथिंबीरीच्या जाड काड्या चिरून, २ टेस्पून, ४ लवंगा, ३ वेलदोडे, २ लहान तुकडे दालचिनी ,१टीस्पून बडीशेप पावडर, ४-५ मिरे, ४ कप पाणी, १ टीस्पून आलं, लसूण पेस्ट, थोडं बटर, कोथिंबीर.
कृती : टोमॅटो चिरून घ्यावा. कोथिंबीरीच्या काड्या, पाणी सर्व गरम मसाला घालून शिजवावे. मिक्‍सरमध्ये वाटून गाळून घ्यावे. बटर गरम करुन गॅस बंद करुन आले, लसूण पेस्ट घालावी. उकळल्यावर शेवटी बडीशेप पावडर घालावी. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

टीप : सूप्स बनवताना स्टॉक वापरल्यास सूप्स अधिक चवदार बनतात. स्टॉक नसल्यास पाणी वापरले तरी चालते किंवा पनीर घरी बनविल्यास जे पाणी पडते ते पण पौष्टिक असते. त्या पाण्याला व्हे वॉटर म्हणतात. दुसरे म्हणजे पुष्कळांना प्रश्‍न पडतो क्रीम ऑफ टोमॅटो सूप किंवा क्रीम ऑफ मश्रुम सूप म्हणजे नक्की काय? ढोबळपणे ज्या सूपमध्ये व्हाइट सॉस वापरला असेल त्या सूपला क्रीम सूप म्हणतात. स्टॉक भाज्या वापरुन किंवा नॉनव्हेज सूपसाठी चिकन बोन्स इत्यादी वापरुन स्टॉक बनवतात. सूप अधिक पौष्टिक होण्यासाठी फेसलेलं अंड क्रीम इत्यादी घालतात. जेवणापूर्वी दिलं जाणार सूप फार घट्ट नसावं. जेवणाऐवजी सूप द्यायचे असल्यास ते दाट असावे. अशा सूपला चॉवडर (chowder) म्हणतात. सूपचा रंग गडद हवा असल्यास करामल शुगर घालावी. सूपमध्ये सेलरीचा स्वाद चांगला वाटतो. सेलरी न मिळाल्यास कोथिंबीरीच्या जाड काड्या, बारीक चिरून घाला. सेलरी वापरताना पान न वापरता फक्त देठ चिरून वापरावा.    
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या