तरुणाईचे आवडते ब्लॅकफूड 

वैशाली खाडिलकर, मुंबई 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

फूड पॉइंट
सध्या तरुणाईमध्ये ब्लॅकफूडचा बोलबाला आहे. या ब्लॅकफूड कल्पनेची सुरुवात २०१४ मध्ये इटलीत झाली. अॅक्टिव्हेटेड चारकोलचे फायदे लक्षात घेऊन प्रथम तिथे काळा पिझ्झाबेस करण्यात आला व त्यावर रंगीबेरंगी पदार्थांचे टॉपिंग केले गेले. याला तरुणाईने चांगलाच प्रतिसाद दिला... आपल्याकडचे काही काळे पदार्थ वापरून तयार केलेल्या अशाच ब्लॅकफूडच्या काही रेसिपिज... 

पिझ्झा  
साहित्य : दोन टीस्पून ड्राय यीस्ट, चिमटी साखर, अर्धा कप कोमट पाणी, १ कप मैदा, २ टीस्पून अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर, मीठ, ऑलिव्ह ऑइल, आवडीचे टॉपिंग. 
कृती : लहान वाडग्यात यीस्ट, साखर व कोमट पाणी एकत्र करावे. झाकावे व १० मिनिटे ठेवा. मोठ्या वाडग्यात आटा अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर, मीठ घालून एकजीव करावे. यात यीस्ट मिश्रण घालावे. पोळपाटावर घ्यावे व हाताने मळून गोळा करावा. पातळ मलमलच्या कपड्याने झाकून एका वाडग्यात ठेवावा. साधारण २ तासांनी गोळा दुप्पट फुगलेला दिसेल. ओव्हन ४०० अंश फॅऱ्हेनाईटवर प्रीहीट करावे. बेकिंग शीटवर पेपर लावावा. मधोमध हा गोळा ठेवावा. हाताने दाबून गोलाकार, पिझ्झा बेस करावा. यावर ऑलिव्ह ऑइल शिंपडावे. त्यावर आवडीचे टॉपिंग घालायचे. पिझ्झा सॉस, ग्रीन व ब्लॅक ऑलिव्ह फळांचे तुकडे, ओला शिंगाडा तुकडे, काळे तीळ व पांढरे तीळ, काळ्या ऑलिव्ह मनुका, ३ रंगाच्या सिमला मिरचीचे तुकडे, अननसाचे गोल काप घालावे. ड्राय हर्ब्स पावडर व भरपूर किसलेले चीज घालून १५ मिनिटे पिझ्झा कुरकुरीत होईपर्यंत बेक करावा. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावा व लगेच सर्व्ह करावा. काळ्याकुट्ट पिझ्झ्यावर हिरवे काळे टॉपिंग व भरपूर चीज पिझ्झा प्रेमींसाठी पर्वणीच आहे.    


पुलाव  
साहित्य : एक कप रात्रभर भिजवलेला ब्लॅक राईस, प्रत्येकी पाव कप ताजे मटार व मका दाणे, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ बारीक चिरलेला कांदा, तूप, अर्धा टीस्पून जिरे, १ तुकडा दालचिनी, २ लवंगा, २ वेलची, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ स्वादानुसार, २ टेबलस्पून ताज्या बडीशोपच्या काड्या. 
कृती : गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये तूप घालावे, त्यात जिरे घालून ते तडतडले की दालचिनी तुकडा, लवंगा, वेलच्या घालाव्यात. आले-लसूण पेस्ट व कांदा परतावा. हिरव्या मिरच्या आणि ताज्या बजीशोपच्या काड्या घालून २ मिनिटे परतावे. आता भिजवून निथळत ठेवलेला ब्लॅक राईस घालावा. मटार, मका दाणे व स्वादानुसार मीठ घालावे. जरासे कोरडे परतावे. नंतर २ कप पाणी घालावे व ढवळावे आणि झाकावे. गॅसवर मंद आचेवर ठेवून मधेमधे ढवळत, पाणी आटेपर्यंत शिजवावे. भाताचा दाणा शिजला का चेपून बघावे व गॅस बंद करावा. गरमागरम पुलाव तयार. याला गोडूस चव असते. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढावा. सोबत झणझणीत रस्सा द्यावा. 


ब्लॅक ऑलिव्ह पेस्टो सॅंडविच  
साहित्य : दहा ब्लॅक ऑलिव्ह, पाव कप काजू तुकडे, पाव कप ऑलिव्ह ऑइल, २ टीस्पून अक्रोड, अर्धा टीस्पून काळी मिरपूड, पाव कप ताजी बेसिल पाने, मीठ. 
कृती : सर्वप्रथम मिक्‍सर जारमध्ये ऑलिव्ह फळांशिवाय इतर जिन्नस घेऊन मऊसर पेस्ट करावी. नंतर बाऊलमध्ये काढावे व त्यात ऑलिव्ह फळांचे तुकडे मिसळून एकजीव करावे. हा सॉस तयार झाला. ब्राऊन ब्रेडच्या कडा कापाव्यात. एकावर हा सॉस लावावा. त्यावर कांदा, टोमॅटो, काकडीचे गोल काप लावावेत. चीज स्लाइस ठेवावेत. त्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवावा. ब्रेडच्या कडांना पाणी लावून दाबून सॅंडविच तयार करावे. ओव्हनमध्ये किंवा इलेक्‍ट्रिक टोस्टरमध्ये याचे टोस्ट करावेत व लगेच सर्व्ह करावेत. करावयास सोपे व पटकन होतात. 
खास टीप : याचप्रमाणे ब्लॅक बीन सॉस घालूनही सॅंडविच करावे. यासाठी शिजवलेल्या २ कप काळ्या घेवड्याच्या शेंगा, २ लसूण पाकळ्या, ४ टीस्पून चिपोटले सॉस, पाव टीस्पून भाजलेले जिरे, कोथिंबीर, मिरपूड, मीठ व पाणी घालून मिक्‍सरमध्ये मऊसर पेस्ट करून सॉस करावा व ब्रेडला लावावा. आपण राजमा घेऊनही हा सॉस करावा. 
ब्लॅक बीन हुमूसही वापरू शकतो. त्यासाठी २ टीस्पून काळे तीळ पेस्ट, अर्धा कप ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टीस्पून लिंबूरस, २ लसूण पाकळ्या, १ टीस्पून ऑलिव्ह ऑइल, पाव टीस्पून भाजलेले जिरे, मीठ, २ कप काळ्या घेवड्याच्या शेंगा (धुऊन तुकडे केलेल्या), १ लाल मिरची हे एकत्र घ्यावे व मऊसर पेस्ट करावी. हुमूस तयार. ब्रेड स्लाइसवर घालावे व सॅंडविच करावे. 


काळ्या वाटाण्याची उसळ   
साहित्य : एक कप काळे वाटाणे, १ बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, अर्धा कप ओला नारळ चव, १ आल्याचा तुकडा, ६ लसूण पाकळ्या, २ लाल सुक्‍या मिरच्यांचे वाटण, १ टीस्पून चना मसाला, १ टीस्पून चिंचेचा कोळ, १ टीस्पून किसलेला गूळ, मीठ स्वादानुसार. फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, कोथिंबीर.
कृती : काळे वाटाणे रात्री भिजत घालावेत. सकाळी प्रेशर कुकरमध्ये मऊसर शिजवावे. एका स्टीलच्या वाडग्यात पाव कप वाटाणे घ्यावेत व ते बत्त्याने ठेचून उसळीत घालावेत. ज्यायोगे उसळ मिळून येईल. गॅसवर कढईत तेल तापवावे. त्यात शिजलेले वाटाणे व ठेचलेले वाटाणे घालावेत. डावेने एकजीव करावे व जरुरीप्रमाणे पाणी घालावे. वाटण चना मसाला, चिंचेचा कोळ, गूळ पावडर घालून ढवळावे. मंद आचेवर वाफ आणावी. अंदाजाप्रमाणे मीठ घालावे. तडका पॅनमध्ये खमंग फोडणी करावी व त्यावर ओतावी. व्यवस्थित ढवळावे. दणदणीत वाफ आणावी. गॅस बंद करावा. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावी. वरून कोथिंबीर घालावी व लगेच गरमागरम भाताबरोबर किंवा चपाती फुलका, पुरीबरोबर सर्व्ह करावी. 
टीप : काळे वाल मिळतात त्याचीही उसळ याप्रमाणे करावी.


आइस्क्रीम  
साहित्य : दोन कप घट्टसर साय (हेवी क्रीम), १ कप कंडेन्स्ड मिल्क, अर्धा टीस्पून व्हॅनिला सिरप, २ टीस्पून अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर.
कृती : काचेच्या बाऊलमध्ये साय घेऊन २-३ मिनिटे हॅंडब्लेंडरने घुसळावी. त्याचे दाट मिश्रण व्हायला हवे. त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून पुन्हा घुसळावे. नंतर व्हॅनिला सिरप घालावा. शेवटी अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर घालून व्यवस्थित एकजीव करावे. हे आइस्क्रीमचे तयार मिश्रण हवाबंद डब्यात भरावे. कमीतकमी ७-८ तास फ्रीजरमध्ये ठेवावे. नंतर आईस्क्रीमकोनमध्ये घालून लगेच खायला द्यावे. 
टीप : अर्धा टीस्पून लेमन झेस्टही वेगळ्या स्वादासाटी घालू शकतो किंवा १ टीस्पून काळे तीळ घालावे. 


काळी मिरी लोणचे  
साहित्य : एक टीस्पून काळी मिरी, १ कप लिंबू रस, १ टीस्पून पिठीसाखर, १ टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून बडीशेप पावडर, मीठ.
कृती : काचेच्या वाडग्यात काळी मिरी, लिंबूरस, पिठीसाखर आणि मीठ एकत्र करावे. मिक्‍सरमध्ये मोहरी व लिंबूरस घालून मऊसर पेस्ट करावी. वरील मिश्रणात घालावी. हळद, बडीशेप पावडर घालावी. सर्व एकजीव करावे. घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरावे. २-३ दिवस मुरण्यास ठेवावे व नंतर फ्रीजमध्ये ठेवून लागेल तसे वापरावे. दहीभाताबरोबर खावे. लज्जत वाढेल. हे लोणचे सॅलडच्या ड्रेसिंगमध्येही घालू शकतो, छान चव येईल. 


ब्लॅक वेलवेट केक
साहित्य : दोन कप मैदा, पाव कप बटर, २ टीस्पून पिठीसाखर किंवा मध, १ टीस्पून कोको पावडर, १ टीस्पून ऑरगॅनिक खायचा काळा रंग, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ टीस्पून बेकिंग सोडा, पाव कप दही, २ टीस्पून अॅक्टिव्हेटेड चारकोल पावडर, कणभर मीठ आणि सजावटीसाठी रंगीत स्प्रिंकल्स. 
कृती : एका काचेच्या बाऊलमध्ये सर्व कोरडे जिन्नस मैदा, चारकोल पावडर, पिठीसाखर, कोको पावडर, खायचा रंग, बेकिंग सोडा व पावडर मीठ एकत्र करावे व चाळून घ्यावे. दुसऱ्या बाऊलमध्ये बटर, दही, फेटून घ्यावे. व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटावे. त्यात मैदा मिश्रण थोडे थोडे घालत एकजीव करावे. ग्रीस केलेला केक टीनमध्ये ओतावा. रंगीत स्प्रिंकल्स‌ घालावे. १८० अंश सेल्सिअसवर प्रीहीटेड ओव्हनमध्ये टीन ठेवावा. अर्धा तास बेक करावा. टीन बाहेर काढावा. थंड होऊ द्यावा. 


काळे तीळ, काळ्या मनुका चटणी  
साहित्य : एक वाटी काळे तीळ, १ वाटी शेंगदाणे, पाव वाटी कैरीचा कीस, पाव वाटी ओला नारळ, २ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, ७-८ पुदिना पाने, ८-१० काळ्या मनुका, पाव टीस्पून भाजलेले जिरे, लहान गुळाचा खडा. 
कृती : काळे तीळ व शेंगदाणे भाजावेत व मिक्‍सरजारमध्ये वाटून प्लेटमध्ये काढावे. नंतर कैरी कीस, ओला नारळचव, मिरच्यांचे तुकडे, पुदिना, मनुका, पाव टीस्पून जिरे, गुळाचा खडा एकत्र करून वाटावे. थोडे पाणी घालावे. एकदा फिरवावे. नंतर तीळ व दाणे घालून जरुरीप्रमाणे पाणी घालून अंदाजाप्रमाणे मीठ घालावे व चांगले वाटावे. चमचमीत चटणी बाऊलमध्ये काढावी. भाकरीबरोबर खावयास द्यावी. 
टीप : कैरी कीस नसेल तर चिंचेचा कोळ, लिंबूरस व अंबोशीची पूड वापरावी.


काळ्या उडदाची आमटी  
साहित्य : एक कप अख्खे काळे उडीद, ओला नारळ चव, आले व खडा गरम मसाला, धने, जिरे, मिरे, लवंग, वेलची, चक्रीफूल, दालचिनी तुकडा यांचे वाटण. फोडणीसाठी तूप, हळद, हिंग, २ लाल मिरचीचे तुकडे, जिरे व मीठ स्वादानुसार. 
कृती : गॅसवर स्टीलच्या कढईत उडीद भाजावे व प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. ओला नारळ चव, खडा मसाला यांचे वाटण करावे. गॅसवर कढईत तूप तापवावे व खमंग फोडणी करावी. त्यात शिजलेले उडीद हलकेसे ठेचून घालावेत. उडीद शिजताना घातलेले पाणी व जरुरीप्रमाणे आणखी पाणी घालून ढवळावे. वाटलेल्या मसाल्याची गोळी घालावी. स्वादानुसार मीठ घालावे. एक चांगली उकळी आणावी. पळीवाटे होईल एवढे आटवावे. गॅस बंद करावा. सर्व्हिंग बाऊलमध्ये झणझणीत आमटी ओतावी व लगेच गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी. 

संबंधित बातम्या