पमकिन सूप, नाचणीचे नाचोज

वैशाली खाडिलकर
सोमवार, 3 मे 2021

फूड पॉइंट

सध्याच्या कठीण काळात शक्यतो घरचेच जिन्नस वापरून करावयास सोपे असे हे पदार्थ अवश्य करून घरच्यांना खिलवावेत..

टेस्टी स्टिक्स 
साहित्य : एक कप तांदुळाचे पीठ, पाव टीस्पून काळी मिरीपूड, १ टीस्पून चिलीफ्लेक्स, १ टीस्पून आमचूर पावडर, चिमूटभर साखर, मीठ व तेल जरुरीप्रमाणे.
कृती : स्टीलच्या परातीत तांदूळ पीठ व इतर जिन्नस घेऊन जरुरीप्रमाणे पाणी घालून पुऱ्यांना भिजवतो तसे पीठ मळावे. पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर समान आकाराचे गोळे करावेत. पोळपाटावर एक गोळा घेऊन पोळी लाटावी, कातण्याने पाव सेंटिमीटर रुंद पट्ट्या कापाव्यात. गॅसवर कढईत तेल तापवावे व मंद आचेवर कुरकुरीत तळावे. थंड होऊ द्यावे. घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे. आठ दिवस तरी टिकतात. या स्टिक्स चहाबरोबर किंवा जाता-येता तोंडात टाकता येतात. 
टीप - स्टिक्स करण्यासाठी घरात उपलब्ध असलेले कुठलेही पीठ घ्यावे. 

फोर सीझन पिकल
साहित्य : उपलब्ध भाज्यांचे तुकडे, तेल (जरुरीप्रमाणे), लोणचे मसाला (जरुरीप्रमाणे), लाल तिखट, आमचूर पावडर, मीठ, साखर (जरुरीप्रमाणे).
फोडणीसाठी : तेल, राई, जिरे, हिंग, हळद व कढीपत्ता पानांची पावडर.
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत तेल तापवावे. त्यात भाज्यांचे तुकडे एकेक करून तळावेत व थाळीत पेपर टॉवेलवर काढावेत. तडका पॅनमध्ये खमंग फोडणी करावी. थंड झाल्यावर त्यात लोणचे मसाला, लाल तिखट, आमचूर पावडर, साखर व मीठ घालावे. तळलेल्या तुकड्यांवर ही फोडणी ओतावी आणि व्यवस्थित कालवावे. घट्ट झाकणाच्या काचेच्या बरणीत भरून ठेवावे. सात ते आठ दिवस हे लोणचे टिकते. 
टीप - या लोणच्यात आपल्याकडे उपलब्ध असतील त्या भाज्या घ्याव्यात.

पेअरचे पन्हे
साहित्य : एक पेअर (नासपत), प्रत्येकी पाव टीस्पून काळी मिरी पूड, जिरे पूड, २ टीस्पून कैरी पल्प, २ टेबलस्पून किसलेला गूळ, चिमूटभर मीठ, पाणी जरुरीप्रमाणे.
कृती : पेअर स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करावेत. प्रेशर कुकरमध्ये डब्यात ठेवून मऊसर शिजवावे व थंड होऊ द्यावे. नंतर मिक्सरमध्ये प्युरी करून इतर जिन्नस घालून पुन्हा फिरवावे. गर गाळून घ्यावा. सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे खडे घालून त्यावर पन्हे ओतावे व लगेच सर्व्ह करावे.
टीप - याचप्रमाणे सफरचंद, पेरू यांचेही आंबटगोड चवीचे पन्हे रुचकर 
होते.

पमकिन पिस्ता सूप
साहित्य : एक कप लाल भोपळ्याच्या फोडी, १ दालचिनी तुकडा, १ स्टारफुल, २ लवंग, २ वेलची, स्वादानुसार मीठ, चिमूटभर मिरपूड, १ टीस्पून पिस्ता पावडर, पाव कप फ्रेश क्रीम, १ टीस्पून ऑलिव्ह ऑईल, २ कप व्हेजिटेबल स्टॉक, पुदिना पाने सजावटीसाठी.
कृती : गॅसवर सॉसपॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल तापवावे. त्यात भोपळ्याच्या फोडी, दालचिनी तुकडा, स्टारफुल, लवंग-वेलची आणि व्हेजिटेबल स्टॉक घालून मध्यम आचेवर उकळावे. मऊसर शिजल्यावर गॅस बंद करावा, थंड झाल्यावर मसाले काढून टाकावेत. मिक्सर जारमध्ये त्याची प्युरी करावी, गॅसवरच्या त्याच पॅनमध्ये प्युरी काढावी. त्यात स्वादानुसार मीठ, मिरपूड व पिस्ता पावडर घालून ढवळावे. मिनिटभराने त्यात फ्रेश क्रीम घालावे. गॅस बंद करून सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार सूप काढावे, पुदिना पानांनी सजवून गरमगरम प्यायला द्यावे. हे वेगळे व पौष्टिक सूप ज्येष्ठांना अवश्‍य करून द्यावे.

घरगुती सॉस
साहित्य : एक कप शाकाहारी मेयोनिज किंवा चक्का, प्रत्येकी १ टीस्पून ग्रीन चिली पेस्ट, लसूण पेस्ट, १ टेबलस्पून लोणच्याचा खार, अर्धा टीस्पून मिरी पूड, २ टेबलस्पून लिंबू रस, मीठ व साखर जरुरीप्रमाणे.
कृती : काचेच्या बाऊलमध्ये वरील सर्व जिन्नस घ्यावेत. हँड ब्लेंडरने एकजीव करावे. हवाबंद काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे व जरुरीप्रमाणे वापरावे. हा सॉस बर्गर, सँडविच, पिझ्झा इत्यादींसाठी वापरता येईल.

नाचणी नाचोज
साहित्य : एक कप नाचणीचे पीठ, १ टेबलस्पून तीळ, प्रत्येकी १ टीस्पून धने-जिरे पूड व लाल तिखट, मीठ, तेल जरुरीप्रमाणे.
कृती : स्टीलच्या परातीत नाचणीचे पीठ घ्यावे. त्यात इतर जिन्नस व जरुरीप्रमाणे पाणी घालून चांगले मळून गोळा तयार करावा. पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. एक गोळा घेऊन गोलाकार पोळी लाटावी व कातण्याने त्रिकोण कापून नाचोज तयार करावेत. वरीलप्रमाणे तेलात तळावेत किंवा बेक करावेत.

संबंधित बातम्या