घरगुती पार्टी पेये

वैशाली खाडिलकर
सोमवार, 28 जून 2021

फूड पॉइंट

सध्या बाहेर पडून गर्दी करणे सर्वांसाठीच धोक्याचे असल्यामुळे सर्व मर्यादा पाळून घरीच सेलिब्रेशन करायला हवे. अशा घरगुती सेलिब्रेशनसाठी काही पेयपदार्थ...

वेलकम ड्रिंक
साहित्य : दोन संत्र्यांच्या साली काढून फोडी, २ वाफवलेल्या टोमॅटोंच्या फोडी, २ मिरे, १ लवंग, १ दालचिनी तुकडा, २ टेबलस्पून मध, कणभर मीठ व सजावटीसाठी २ पुदिना पाने.
कृती : मिक्सर जारमध्ये संत्र्यांच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, मिरे, लवंग, दालचिनी तुकडा, मध व मीठ असे सर्व साहित्य घेऊन मऊसर प्युरी करावी. ही प्युरी बाऊलमध्ये गाळून घ्यावी. नंतर हे ड्रिंक फ्रीजमध्ये थंड करावे. आयत्यावेळी ग्लासमध्ये ओतावे व दोन पुदिना पानांनी सजवून सर्व्ह करावे.

मेलन मॅजिक
साहित्य : प्रत्येकी १ कप कलिंगड (वॉटरमेलन) व खरबूज (मस्कमेलन) यांचे तुकडे, ७-८ मोसंबीचे तुकडे (बिया काढून), अर्धा कप उसाचा रस, चिमूटभर मीठ, बर्फाचा चुरा.
कृती : ज्युसरमध्ये कलिंगड, खरबूज आणि मोसंबीचे तुकडे घेऊन मऊसर प्युरी तयार करावी. बाऊलमध्ये गाळून घ्यावी व त्यात उसाचा रस व चिमूटभर मीठ घालावे आणि मिश्रण एकजीव करावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये बर्फाचा चुरा घालावा. त्यावर हा ज्यूस ओतावा व लगेच सर्व्ह करावे.

लेमन बेसिल रिफ्रेशर

साहित्य : पाव कप लिंबू रस, अर्धा कप साखर, १ कप रासबेरी फळांचे तुकडे, २ तुळशी पाने, आवडीप्रमाणे बर्फाचे तुकडे व सेव्हन अप सोडा.
कृती : ब्लेंडरमध्ये साखर, लिंबू रस, रासबेरी, तुळशीची पाने हे जिन्नस घेऊन चांगले घुसळावे व मिश्रण तयार करावे. सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतावे. आयत्यावेळी सेव्हन अप सोडा घालून सर्व्ह करावे.

ठंडा ठंडा पपाया ड्रिंक
साहित्य : एक कप पपईचे तुकडे, १ कप संत्र्याचे तुकडे, आवडीप्रमाणे बर्फाचे तुकडे, १ टेबलस्पून मध, चिमूटभर मिरपूड व मीठ.
कृती : मिक्सर जारमध्ये पपई व संत्र्याचे तुकडे घ्यावेत व त्याची प्युरी करावी. प्युरी बाऊलमध्ये गाळून घ्यावी आणि त्यात मध, मिरपूड व मीठ घालून एकजीव करावे. फ्रीजमध्ये ठेवून थंड करावे. आयत्यावेळी ग्लासमध्ये ओतावे व सर्व्ह करावे.

कोको-पाईनॲपल एनर्जेटिक ड्रिंक
साहित्य : दोन कप अननसाचे तुकडे, अर्धा कप ताज्या शहाळ्याची मलई, १ कप शहाळ्याचे पाणी, २ टेबलस्पून साखर पाक, चिमूटभर मीठ व मिरपूड.
कृती : मिक्सर जारमध्ये अननसाचे तुकडे, शहाळ्याची मलई, शहाळ्याचे पाणी, साखरेचा पाक घ्यावा व त्यामध्ये मीठ, मिरपूड घालावी. या मिश्रणाची प्युरी करावी. मिश्रण सर्व्हिंग ग्लासमध्ये ओतावे. आवडीप्रमाणे बर्फाचे तुकडे घालावेत. अननसाच्या चकत्यांनी सजवून सर्व्ह करावे.

सनसेट समर कूलर
साहित्य : दोन टेबलस्पून लिंबू रस, वीस मिलिलिटर साखरेचा पाक, दहा मिलिलिटर रोज सिरप, आवडीप्रमाणे मध, जिंजर सोडा.
कृती : काचेच्या ग्लास जारमध्ये लिंबू रस, साखरेचा पाक, रोज सिरप, मध इत्यादी जिन्नस घेऊन हँड ब्लेंडरने घुसळावे. हे मिश्रण ग्लासमध्ये ओतावे. त्यात जिंजर सोडा घालावा व लगेच सर्व्ह करावे.

रिफ्रेशिंग ट्रॉपिकल फ्रूट्स लस्सी
साहित्य :अर्धा कप ताजे ताक, पाव कप पाणी, प्रत्येकी अर्धा कप  
अननसाच्या व कलिंगडाच्या फोडी, एका पिकलेल्या आंब्याचे तुकडे, आवडीप्रमाणे पिठीसाखर, चिमूटभर मिरीपूड व मीठ, बर्फाचे खडे.
कृती : फूडप्रोसेसरच्या जारमध्ये अननस, कलिंगड, आंब्याच्या फोडी घ्याव्यात. त्यामध्ये ताक, पाणी घालावे. नंतर आवडीप्रमाणे पिठीसाखर, मिरीपूड व मीठ घालावे. बर्फाचे खडे घालून सर्व घुसळून मऊसर मिश्रण करावे. ही लस्सी तयार झाली. काचेच्या ग्लासेसमध्ये ओतून लगेच सर्व्ह करावी.

गव्हांकूर शिकंजी
साहित्य : पन्नास ग्रॅम ताजे गव्हांकूर, पाव कप बारीक चिरलेली पुदिना पाने, प्रत्येकी अर्धा टीस्पून काळी मिरीपूड, जिरे पूड, चाट मसाला, एका लिंबाचा रस, ४ टीस्पून पिठीसाखर, मीठ स्वादानुसार व बर्फाचे तुकडे.
कृती : फूडप्रोसेसरच्या जारमध्ये गव्हांकूर, चिरलेली पुदिना पाने घ्यावीत. त्यामध्ये मिरीपूड, जिरे पूड, चाट मसाला, लिंबू रस, पिठीसाखर, चवीनुसार मीठ व बर्फाचे तुकडे घालावेत. हे सर्व साहित्य घुसळून मऊसर मिश्रण करावे. मिश्रण गाळून घ्यावे व दोन ग्लासमध्ये काढावे. पुदिना पानांनी सजवून सर्व्ह करावे.

मॅँगो मिरॅकल कोल्ड्रिंक

साहित्य : एका कच्च्या कैरीचा किस, एका हापूस आंब्याचे तुकडे, अर्धा लिटर दूध, ४ टेबलस्पून मध, डार्क चॉकलेट बार, २ पुदिना पाने, बर्फाचे खडे आवडीप्रमाणे.
कृती : मिक्सर जारमध्ये हापूस आंब्याचे तुकडे, दूध, मध, बर्फाचे खडे घेऊन घुसळावे. प्लेटमध्ये चार ग्लास मांडावेत. प्रत्येकात तळाशी प्रथम डार्क चॉकलेटचा कीस, त्यावर कैरीचा कीस घालावा. वरपर्यंत वरील मिश्रण ओतावे. चॉकलेटचे तुकडे, आंबा तुकडे, पुदिना पान घालून सजवावे व सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या