अनोखी मिष्टान्ने

वैशाली खाडिलकर
सोमवार, 11 ऑक्टोबर 2021

फूड पॉइंट

सणासुदीला गोडाधोडाचे जेवण हमखास केले जातेच. दसऱ्यानिमित्त मिष्ठान्नांच्या काही आगळ्यावेगळ्या पाककृती...

नवरत्न खीर (नवरात्रासाठी)
साहित्य : नवरत्ने - प्रत्येकी २ टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा, मखाणे, पनीर, लाल भोपळा, रताळी व गाजर कीस, भाजलेल्या शेवया, भाजलेले वरी तांदूळ, ड्रायफ्रूट तुकडे, १ लिटर दूध, अर्धी वाटी साखर, अर्धा टीस्पून वेलची, ४ केशरकाड्या, २ टेबलस्पून तूप, गुलाब पाकळ्या सजावटीसाठी.
कृती : गॅसवर कॉपर बॉटम स्टील कढईत दूध मंद आचेवर सारखे ढवळत उकळवावे. नंतर साखर घालावी. दुसरीकडे गॅसवर कढईत तूप घालून लाल भोपळा, रताळी व गाजर कीस, साबुदाणा व मखाणे क्रमाक्रमाने भाजावेत. बाऊलमध्ये किसलेले पनीर घेऊन त्याचे सुपारीएवढे बॉल करावेत. हे सर्व वरील दुधात घालावे. नंतर भाजलेल्या शेवया व वरी तांदूळ घालून ढवळत राहावे व एकजीव करावे. खीर दाटसर झाल्यावर गॅस बंद करावा. वरून वेलची पूड, केशर व ड्रायफ्रूट तुकडे घालावेत. सर्व्हिंग बाऊलमध्ये ही खीर काढून गुलाब पाकळ्यांनी सजवावी.

मिक्स फ्रूट श्रीखंड
साहित्य : दोन लिटर दूध, अर्धा किलो पिठीसाखर, पाव टीस्पून वेलची पूड, चिमूटभर मिरपूड व मीठ, अननस व संत्री तुकडे आवडीप्रमाणे, सफरचंद व चेरीचे तुकडे आवडीप्रमाणे.
कृती : दूध तापवून विरजण लावून दही तयार करावे. फडक्यात बांधून रात्रभर टांगून ठेवावे. सर्व पाणी निघून जायला हवे. नंतर ते फ्रीजमध्ये ठेवावे. हा चक्का तयार झाला. तो स्टील वाडग्यात घेऊन त्यात पिठीसाखर, वेलची पूड, चिमूटभर मीठ-मिरपूड घालून व्यवस्थित एकजीव करावे. फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. आयत्या वेळी आवडीप्रमाणे फळांचे तुकडे घालून सर्व्ह करावे.

स्ट्रॉबेरी बर्फी
साहित्य : प्रत्येकी १ कप खवा व किसलेले पनीर, दीड कप साखर, अर्धा कप स्ट्रॉबेरी ज्यूस, अर्धा टीस्पून स्ट्रॉबेरी इसेन्स, २ टेबलस्पून अक्रोड व बदामाची भरड, मिल्क पावडर जरुरीप्रमाणे, १ टीस्पून तूप.
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत मंद आचेवर खवा परतून घ्यावा. त्यात साखर व स्ट्रॉबेरी ज्यूस घालून ढवळावे. पनीर घालून मऊसर मिश्रण करावे. जरुरीप्रमाणे मिल्क पावडर व इसेन्स घालून मिश्रण घट्ट होत आल्यावर गॅस बंद करावा. थाळीला तूप लावून त्यात मिश्रण ओतावे. वरून अक्रोड-बदामची भरड पेरावी. थंड झाल्यावर बर्फीचे तुकडे करून सर्व्ह करावेत.

टोमॅटोचा शिरा
साहित्य : चार लालसर टोमॅटो, २ वाट्या रवा, २ वाट्या साखर, रवा भाजण्यासाठी २ टेबलस्पून तूप, पाणी जरुरीप्रमाणे, वेलची-जायफळ पावडर अर्धा टीस्पून, काजू तुकडे.
कृती : टोमॅटो गॅसवर उकळत्या पाण्यात दोन मिनिटे ठेवावेत. नंतर पाणी निथळून थंड करून चाळणीवर ठेवून गाळून रस काढावा. गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप घालून रवा खमंग भाजावा. त्यात टोमॅटोचा रस, जरुरीप्रमाणे पाणी व साखर घालून मंद आचेवर शिजवावे. गॅस बंद करून वेलची-जायफळ पावडर घालून ढवळावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून काजू तुकड्यांनी सजवून सर्व्ह करावेत.

भरली केळी रबडीसहित

साहित्य : एक टीस्पून तूप, १ कप ओला नारळ चव, पाव कप बदाम-पिस्ता-अक्रोड भरड, अर्धा कप किसलेला गूळ, पाव टीस्पून दालचिनी पूड, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, ४ हिरव्या सालीची केळी, रबडी जरुरीप्रमाणे.
कृती : गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये नारळ चव व गूळ एकत्र शिजवावे. नंतर त्यात ड्रायफ्रूट भरड, दालचिनी पावडर व व्हॅनिला इसेन्स घालून ढवळावे. गॅस बंद करावा. मिश्रण बाऊलमध्ये घेऊन थंड करावे. केळ्यांची साले काढून दोन इंच लांबीचे तुकडे करावेत व मधे छेद देऊन प्लेटमध्ये ठेवावेत. प्रत्येकात सारण भरावे. गॅसवर कढईत तुपावर मंद आचेवर हलकेसे परतावे. प्लेटमध्ये काढून प्रत्येकावर आवडीप्रमाणे रबडी ओतून सर्व्ह करावे.

नाचणी भाकरी-बॉल्स

साहित्य : दोन नाचणीच्या तयार भाकऱ्या, अर्ध कप भाजलेल्या मखाण्यांची पावडर, प्रत्येकी २ टेबलस्पून खजूर पेस्ट, भाजलेला सुक्या खोबऱ्याचा कीस, भाजलेल्या तिळाचे कूट, खसखस, खारीक पूड, पाव कप काळ्या गुळाची पावडर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स, राजगिरा लाह्या जरुरीप्रमाणे.
कृती : तयार भाकऱ्यांची मिक्सरमध्ये पावडर करून स्टीलच्या थाळीत घ्यावी. त्यात इतर सर्व जिन्नस घालून सर्व एकजीव करावे. समान आकाराचे बॉल्स करावेत व राजगिरा लाह्यांमध्ये घोळवावेत. फ्रीजमध्ये ठेवून जरुरीप्रमाणे सर्व्ह करावेत.

बटरस्कॉच हलवा
साहित्य : अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप दूध, प्रत्येकी पाव कप मिल्कमेड व साखर, १ टेबलस्पून तूप, १ टेबलस्पून बटरस्कॉच सिरप, अर्धा टीस्पून बटरस्कॉच इसेन्स, मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे.
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत तूप घालून मंद आचेवर रवा खमंग भाजावा. नंतर त्यात दूध घालून ढवळत राहावे. मिश्रण दाट झाल्यावर त्यात साखर घालून एकजीव करावे. शेवटी मिल्कमेड घालून ढवळावे. बटरस्कॉच सिरप व इसेन्स घालून एकजीव करावे व मिनिटभराने गॅस बंद करावा. सर्व्हिंग बाऊलमध्ये तयार हलवा काढून ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करावे.

गुलाब पाकळ्यांच्या वड्या
साहित्य : प्रत्येकी १ कप नारळाचा चव व साखर, प्रत्येकी पाव कप ताजा खवा व गुलाब पाकळ्यांचा चुरा, प्रत्येकी पाव कप मिल्क पावडर व मिक्स ड्रायफ्रूट पावडर, ७-८ थेंब रोझ इसेन्स.
कृती : गॅसवर नॉनस्टिक कढईत मंद आचेवर खवा भाजावा. त्यात ओल्या नारळाचा चव व साखर घालून ढवळत राहावे. मिश्रण घट्टसर होत आले की गुलाब पाकळ्यांचा चुरा व मिल्क पावडर घालून एकजीव करावे. मिनिटभराने गॅस बंद करावा. रोझ इसेन्सचे थेंब व मिक्स ड्रायफ्रूट पावडर घालावी.
स्टील थाळीत बटर पेपर लावावा. त्यावर हे मिश्रण ओतावे व त्याच्या वरून दुसऱ्या बटरपेपरने मिश्रण नितळ करावे. थंड होऊ द्यावे व शंकरपाळ्याच्या आकाराच्या वड्या कापून सर्व्ह कराव्यात.

झटपट लाडू

साहित्य : दोन टीस्पून तूप, प्रत्येकी अर्धी वाटी पातळ पोहे, पंढरपुरी डाळे, तीळ, शेंगदाणे व मखाणे, पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, गूळ पावडर जरुरीप्रमाणे, १ टीस्पून वेलची-जायफळ पावडर, बेदाणे जरुरीप्रमाणे.
कृती : गॅसवर कढईत प्रथम सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून प्लेटमध्ये काढावा, थंड झाल्यावर चुरा करावा. त्याच कढईत पोहे, तीळ इत्यादी जिन्नस एक एक भाजून थंड करावेत. हे सर्व जिन्नस थाळीत घेऊन त्यात वेलची-जायफळ पूड व जरुरीप्रमाणे गूळ पावडर घालून एकजीव करावेत. याचे समान आकाराचे लाडू, प्रत्येकात एकेक बेदाणा घालून वळावेत.

पाईनॲपल फ्रेटर्स
साहित्य : दहा बारा अननसाच्या गोलाकार चकत्या, प्रत्येकी अर्धा कप दूध व मैदा, २ टेबलस्पून ब्राऊन शुगर, पाव टीस्पून दालचिनी पूड, १ टीस्पून बेकिंग पावडर, तेल किंवा तूप जरुरीप्रमाणे, जिंजर-आलमन्ड बटरसॉसाठी - प्रत्येकी २ टेबलस्पून आले कीस व लिंबू रस प्रत्येकी, अर्धा कप आलमन्ड बटर, २ टीस्पून मध, १ टीस्पून चिलीफ्लेक्स, कणभर मीठ.
कृती : काचेच्या बाऊलमध्ये मैदा, दूध, ब्राऊन शुगर, दालचिनी पूड हॅँड ब्लेंडरने एकत्र करावे. शेवटी बेकिंग पावडर घालून एकजीव करावे. हे बटर झाले. प्रत्येक अननस चकती यात बुडवून तळावी व प्लेटमध्ये पेपर नॅपकिनवर काढावी. जिंजर-आलमन्ड बटर सॉसकरिता फूड प्रोसेसरमध्ये वरील सर्व जिन्नस घ्यावेत व थोडे थोडे पाणी घालत मऊसर पेस्ट करावी. हा सॉस तयार झाला. सर्व्हिंग प्लेटमध्ये अननस फ्रीटर्स तिरपे मांडावेत व  त्यावरहा सॉस घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या