फळांचे पौष्टिक पदार्थ... 

वैशाली खाडिलकर
सोमवार, 24 जानेवारी 2022

फूड पॉइंट

फ्रूट्स मेलडी इन ऑरेंज सॉस 

साहित्य ः तीन टेबलस्पून साखर, १ कप ऑरेंज ज्यूस, २ टेबलस्पून लिंबू रस, प्रत्येकी पाव कप काळे व हिरवे ऑलिव्ह, स्ट्रॉबेरी, अननसाचे तुकडे.
कृती ः गॅसवर नॉन-स्टिक पॅनमधे तीन टेबलस्पून साखरेमध्ये तितकेच पाणी घालून मंद आचेवर दोन मिनिटे तपकिरी रंग येईपर्यंत उकळावे. नंतर त्यात एक कप ऑरेंज ज्यूस घालून ढवळावे व मिनिटभर उकळावे. लिंबू रस दोन टेबलस्पून घालून एकजीव करावे. हा सॉस तयार झाला. सॉस काचेच्या बाऊलमधे घ्यावा. त्यात काळे व हिरवे ऑलिव्ह फळांचे तुकडे, स्ट्रॉबेरी व अननसाचे प्रत्येकी पाव कप तुकडे घालावेत व एकजीव करावे. मिश्रण थंड होऊ द्यावे. लहान सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे व लगेच खावयास द्यावे.

फ्रेशफ्रूट्स ड्रीम
साहित्य ः  एक कप गार दूध, १ टेबलस्पून ऑरेंज जाम, १ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, पाव कप पीच/किवी आणि आपल्या आवडीच्या फळांचा गर, किसलेले चॉकलेट.
कृती ः फूड प्रोसेसरच्या जारमधे एक कप गार दूध, ऑरेंज जाम, व्हॅनिला आइस्क्रीमचा एक स्कूप, पीच, किवी किंवा आपल्या आवडीच्या फळाचा गर घालून फिरवून मऊसर मिश्रण तयार करावे. मिश्रण सर्व्हिंग ग्लासेसमध्ये काढावे व त्यात आवडीप्रमाणे किसलेले चॉकलेट घालून लगेच खावयास द्यावे.

ट्रॉपिकल फ्रूट्स सरप्राईज
साहित्य ः  तीन टीस्पून साखर, ३ टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप दही, पाव कप फेटलेले क्रीम, १ टेबलस्पून ब्राऊन शुगर, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, आवडत्या फळांचे तुकडे.
कृती ः  गॅसवर नॉन-स्टिक पॅनमध्ये तीन टीस्पून साखर व तितकेच डेसिकेटेड कोकोनट घेऊन मंद आचेवर दोन मिनिटे ढवळावे. हे कोकोनट कॅरेमल तयार झाले. एका बाऊलमध्ये दही, फेटलेले क्रीम, ब्राऊन शुगर, व्हॅनिला इसेन्स घालून हॅँड ग्राइन्डरने मऊसर मिश्रण करावे व फ्रीजमध्ये गार करावे. काचेच्या उभट ग्लासमध्ये आवडत्या फळांच्या (किवी, अनननस आणि आंबा इ.) तुकड्यांचा थर द्यावा, त्यावर क्रीम मिक्स्चर घालावे व वर कॅरेमल कोकोनट घालून सर्व्ह करावे.

मॅँगो ओट बाऊल
साहित्य ः  एक कप ओट्स, २ टेबलस्पून नारळाचे दूध, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, प्रत्येकी १ चिमूट दालचिनी पूड, जायफळ पूड, काळी मिरी पूड, पाव कप आमरस, मध, ड्रायफ्रूट्स.
कृती ः  एक कप ग्लुटेन फ्री ओट्स हलकेसे भाजून गरम पाण्यात शिजवून घ्यावेत आणि काचेच्या बाऊलमध्ये काढावेत. त्यात नारळाचे दूध व व्हॅनिला इसेन्सचे चार थेंब घालून एकजीव करावे. दालचिनी पूड, जायफळ पूड, काळी मिरी पूड ढवळावे. शेवटी आमरस व आवडीप्रमाणे मध घालावा. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढावे व आवडीच्या ड्रायफ़्रूट्सचे तुकडे घालून लगेच खावयास द्यावे.

बेक्ड योगर्ट विथ फ्रूट्स
साहित्य ः एक कप दही, १ कप फ्रेश क्रीम, १ कप कंडेन्स्ड मिल्क, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, आमरस, आवडीच्या फळांचे तुकडे.
कृती ः  ओव्हन १६० डिग्री से.वर प्रीहीट करावा. एका काचेच्या बाऊलमध्ये एक कप दही हँड ग्राईन्डरने घुसळावे. नंतर त्यात फ्रेश क्रीम, कन्डेन्स्ड मिल्क, व्हॅनिला इसेन्सचे चार थेंब घालावेत व मऊसर मिश्रण तयार करावे. बेकिंग ट्रेमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी घालावे. त्यात ग्लास ठेवून वीस मिनिटे बेक करावे. नंतर ग्लास काढून थंड होऊ द्यावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये हे ग्लास ठेवावेत. प्रत्येकात घट्ट आमरस घालावा. आवडीच्या फळांचे तुकडे घालून सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या