उन्हाळ्यासाठी नाचणीचे पदार्थ

वैशाली खाडिलकर
सोमवार, 9 मे 2022

फूड पॉइंट
 

अंबिल
साहित्य : दोन चमचे नाचणीचे पीठ, अर्धी वाटी ताजे ताक, चवीप्रमाणे मीठ, साखर, ३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, चिमूटभर जिरे, तूप. (एका व्यक्‍तीसाठी)
कृती ः अर्धा चमचा तुपावर पीठ भाजून ताटलीमध्ये काढून ठेवावे. थंड झाले की ते ताकात घालून कालवावे. त्यात मीठ, साखर, जिरे, लसूण घालून हलवावे. आवश्यकतेप्रमाणे साधे थंड पाणी घालून मंद गॅसवर अंबिल शिजवावी.

धिरडी
साहित्य ः एक वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी कणीक, लाल तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा तेल, चिमूटभर ओवा, चिमूटभर हळद. (३-४ धिरड्यांसाठी) 
कृती ः नाचणीचे पीठ, कणीक एकत्र करावे. त्यात तिखट, मीठ, कोथिंबीर, ओवा, हळद घालावे. त्यात गार पाणी घालून सरसरीत पीठ भिजवावे. तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून खमंग धिरडी करावीत.

खीर
साहित्य : अर्धी वाटी नाचणीचे पीठ, साजूक तूप, पाव वाटी किसलेला गूळ, २ चमचे खजुराचे तुकडे, वेलची पूड, दूध (३ व्यक्‍तींसाठी) 
कृती : कढईत तूप घालून त्यावर पीठ भाजावे. मग कढई खाली उतरवून घेऊन त्यात कोमट दूध आवश्यकतेप्रमाणे घालावे. कोमट दूध हळूहळू घालत हलवत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. नंतर त्यात किसलेला गूळ, खजूर घालून २ मिनिटे गॅसवर ठेवावे. त्यात वेलची पूड घालावी. गरमागरम खिरीत चमचाभर तूप घालून खायला द्यावे. 
टीप : नाचणी थंड गुणाची असून तिच्यात भरपूर लोह असते. गूळ व खजुरामुळे लोह, तर दुधामुळे दुधामुळे कॅल्शियम मिळते.

पौष्टिक रागी अडाई
साहित्य : प्रत्येकी अर्धी वाटी मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, 
१ वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी ताक, चमचाभर आले पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता (ऐच्छिक), अर्धी वाटी मेथी पाने.
(पाच ते सहा व्यक्तींसाठी)
कृती ः सगळ्या डाळी रात्री भिजत घालाव्यात आणि सकाळी वाटाव्यात. वाटताना अर्धा चमचा तेल घालावे. 
या वाटणात नाचणीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, आले 
पेस्ट, कोथिंबीर, बारीक चिरलेली मेथी, ५ हिरव्या मिरच्या वाटून घालाव्यात. पाणी घालून पीठ सरसरीत करावे. तापलेल्या तव्यावर थोडे तेल घालून खमंग 
धिरडी करावीत.

नाचणीचे लाडू (प्रकार १) 
साहित्य : दोन वाट्या नाचणीचे पीठ, पाऊण वाटी साजूक तूप, वाटीभर किसलेला गूळ, २ चमचे डिंक पूड, काजू व बदाम काप, वेलची पूड. (१२ ते १४ लाडवांसाठी)
कृती : कढईत २ चमचे तुपावर डिंक पूड तळून बाजूला काढावी. त्याच तुपात काजू बदाम काप तळून काढून ठेवावेत. डिंक वाटीने दाबून कुस्करून ठेवावा. तूप पातळ करून घ्यावे. त्यात नाचणीचे पीठ घालून मंद गॅसवर भाजून घ्यावे. १० ते १२ मिनिटे सारखे हलवत पीठ खमंग भाजावे. कढईत अर्धा चमचा तूप घालून त्यात गूळ घालून मंद गॅसवर वितळवून घ्यावा. त्यात पीठ घालून गॅस बंद करावा. पटापट मिक्स करावे. यात डिंक, काजू-बदाम काप, वेलची पूड घालून लाडू वळावेत.

नाचणीचे लाडू (प्रकार २) 
साहित्य ः प्रत्येकी १ वाटी नाचणीचे पीठ व कणीक, अर्धी वाटी बेसन, २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा भाजून चुरडलेला कीस, अर्धी वाटी तूप, २ वाट्या किसलेला गूळ, ३ चमचे भाजलेल्या तिळाची पूड, सुकामेवा काप, वेलची पूड. (१५ ते १८ लाडवांसाठी)
कृती : कढईत तूप घालून तिन्ही पिठे खमंग भाजावीत. गॅस बंद करून दुधाचा हबका मारावा. मग मिश्रण बाऊलमध्ये काढून ठेवावे. कोमट असतानाच त्यात किसलेला गूळ, खोबऱ्याचा कीस, तिळाची पूड, वेलची पूड, तळलेल्या सुका मेव्याचे काप घालावेत. सगळे छान मिसळून मग लाडू वळावेत.

संबंधित बातम्या