चमचमीत तोंडीलावणी

वैशाली खाडिलकर
सोमवार, 7 मार्च 2022

फूड पॉइंट

मॅंगो कासुंदी

साहित्य : प्रत्येकी १ टेबलस्पून पिवळी व काळी मोहरी, १ हापूस आंब्याचा रस, ४-५ लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, १ इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर जिरे, १ टेबलस्पून धने पूड, २ टेबलस्पून गूळ पावडर, अर्धा टेबलस्पून मिरची व हळद, चिमूटभर हिंग, पाव कप राई तेल, २ टेबलस्पून लिंबू रस आणि मीठ स्वादानुसार.
कृती : लिंबू रस व राई तेल वगळून वरील सर्व जिन्नस मिक्‍सर जारमध्ये घ्यावेत. त्यात पाणी घालून मऊसर पेस्ट तयार करावी. गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये राई तेल तापवावे व वरील पेस्ट मंद आचेवर पाच मिनिटे खमंग वास येईपर्यंत परतावी. थंड होऊ द्यावी. नंतर लिंबू रस घालून एकजीव करावे. काचेच्या बरणीत भरून चार-पाच दिवस उन्हात ठेवावे व नंतर वापरावे. घडीची पोळी, फुलके, पुऱ्यांबरोबर खाता येते.

रेड-चिली जॅम

साहित्य :  दहा काश्मिरी मिरच्या, ४ सुक्या लाल मिरच्या, १ कप साखर, १ टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, पाव टीस्पून मिरी पूड, दोन टेबलस्पून लिंबू रस, स्वादानुसार मीठ (साखरेचे प्रमाण जरुरीप्रमाणे घ्यावे).
कृती : दोन्ही प्रकारच्या मिरच्या डब्यात ठेवून प्रेशर कुकरमध्ये एक शिट्टी आणून शिजवाव्यात. थंड झाल्यावर त्याची प्युरी करावी. गॅसवर पॅनमध्ये ही प्युरी घालावी. त्यात साखर घालून मंद आचेवर शिजवत ठेवावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात जिरे पूड, मिरी पूड, मीठ घालावे. मिश्रण एकजीव करावे आणि मिनिटभराने लिंबू रस घालावा व गॅस बंद करावा. थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर जाम काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा. जरुरीप्रमाणे वापरावा. चपाती, नानबरोबर खाता येतो.

अननस जेली सॅलड

साहित्य : प्रत्येकी २ लाल गाजरे व काकड्या, हिरव्या मिरचीचे तुकडे, पाव टीस्पून मिरी पूड, स्वादानुसार मीठ, कोथिंबीर, सॅलड पाने, १ अननस जेलीचे पाकीट, ड्रायफ्रुट्स तुकडे आवडीप्रमाणे.
कृती : एका बाऊलमध्ये दोन कप गरम पाणी घ्यावे. त्यात जेली पावडर घालावी व एकजीव करून फ्रिजमध्ये ठेवावे. काकडी साले काढून चोचवून घ्यावी. गाजरे किसून घ्यावीत. सॅलड पाने धुऊन बारीक चिरावीत व बाऊलमध्ये घ्यावीत. त्यात मिरची तुकडे, मिरी पूड, मीठ घालून ढवळावे. आयत्यावेळी यात तयार जेली घालावी व हळुवार ढवळावे. लहान बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे. आवडीच्या ड्रायफ्रूटचे तुकडे घालून सजवावे.

केळी-नारळ कोशिंबीर

साहित्य : चार पिकलेली केळी, १ कप ओल्या नारळाचा चव, १ हिरवी  मिरची - लहान आले तुकडा - पाव 
टीस्पून मोहरी पूड - २ काळी मिरे - पाव टीस्पून जिरे यांचे वाटण, मीठ स्वादानुसार, १ टीस्पून साखर, १ कप गोडसर दही.
कृती : केळी सोलून बारीक तुकडे करावेत व बाऊलमध्ये घ्यावेत. इतर सर्व जिन्नस एकत्र करून व्यवस्थित कालवावे. आयत्या वेळी दही घालून सर्व्ह करावे.

शाकाहारी मेयॉनीज सॉस

साहित्य : पाव कप फ्रेश क्रीम, १ टीस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून मोहरीपूड, ४ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, पाव टीस्पून साखर, कणभर मिरीपूड, १ टीस्पून चिली फ्लेक्स, पाव टीस्पून पुदिना व गार्लिक पावडर.
कृती : स्टीलच्या गंजात वरील सर्व जिन्नस एकत्र करावे. थोडे थोडे तेल घालून रवीने घुसळावे. तयार मिश्रण (सॉस) काचेच्या बरणीत भरून वापरावा. पिझ्झा बेसवर किंवा ब्रेडवर लावण्यासाठी उपयोग करावा.

हेल्दी स्प्रेड

साहित्य : दोन टेबलस्पून दूध, पाऊण कप किसलेले चीज, अर्धा कप कोथिंबीर पुदिना चटणी, प्रत्येकी पाव कप किसलेले गाजर व काकडी, हिरव्या सिमला मिरचीचे तुकडे, प्रत्येकी २ टेबलस्पून सेलरी पाने, हिरवा कांदा पात व टोमॅटो (बारीक चिरलेले), स्वादानुसार मीठ व आवडीप्रमाणे साखर.
कृती : वरील सर्व जिन्नस काचेच्या बाऊलमध्ये घेऊन एकजीव करावे. नंतर हवाबंद डब्यात भरून साधारण एक तास फ्रिजमध्ये ठेवावे. स्प्रेड तयार आहे. चपाती, ब्रेड स्लाइसवर हे स्प्रेड लावावे व लगेच खावयास द्यावे.

मिरचीचे लोणचे (तेलाशिवाय)

साहित्य : दोन कप भावनगरी मिरच्यांचे बारीक तुकडे, मोहरी पूड, २ टेबलस्पून बडीशेप पावडर, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून मिरीपूड, ४ टेबलस्पून लिंबू रस, स्वादानुसार मीठ.
कृती : काचेच्या बरणीत वरील सर्व जिन्नस घ्यावेत व आसडावे, म्हणजेच हलकेच हलवावेत. बरणीच्या तोंडाला मलमलचा कपडा घट्ट बांधून उन्हात दोन दिवस वाळवावे व नंतर वापरावे.

इन्स्टन्ट इडली चिली पिकल

साहित्य : २ टेबलस्पून तेल, प्रत्येकी २ टेबलस्पून राई व तीळ, अर्धा टीस्पून हिंग, ४ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, २ टीस्पून आमचूर पावडर, स्वादानुसार मीठ, १ कप इडली चुरा, १ टीस्पून लोणचे मसाला.
कृती : गॅसवर पॅनमध्ये तेल तापवावे. राई व हिंग घालून खमंग फोडणी करावी. नंतर त्यात इतर जिन्नस घालून ढवळावे. शेवटी इडली चुरा घालावा. 
पाण्याचा हबका मारावा व मंद आचेवर परतावे. व्यवस्थित ढवळावे व दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून वापरावे.

संबंधित बातम्या