मारुती चितमपल्लींचा सहवास

विवेक देशपांडे
सोमवार, 27 जानेवारी 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

सेमाडोहला मारुती चितमपल्ली सरांशी दुसऱ्यांदा भेट झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत सुमारे ३२ वर्षे झाली, आम्ही भेटतच राहिलो. त्या क्षणापासून या पक्षी आणि प्राणी मित्रांची मैत्री झाली. एक छानसं गुरुशिष्याचं हे जंगली नातं निर्माण झालं. आजपर्यंत असंख्य जंगलांच्या अनेक वाऱ्या केल्या आणि मारुतरावांचा सहवास मिळत गेला. खरं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व गंभीर या प्रकारात मोडणारं. अबोल किंबहुना अगदी मोजकं आणि कमी बोलणारे. मात्र, जंगल, प्राणी आणि पक्ष्यांबद्दल बोलताना ते तासन्‌तास बोलत असत. समोर बसलेले आम्ही मंत्रमुग्ध होत असू. तसे ते इतर मंडळींत फारसे रमत नसत. अपवाद फक्त मी आणि माझ्या संस्थेचा होता. अनिल गोहाड, प्रदीप उदास, सतीश काळे, स्वाती दामले या मित्रपरिवारात ते जास्त रमत. मी आयोजित केलेल्या कान्हा, बांधवगड, पेंच, महाबळेश्‍वर, ताडोबा, भंडारदरा, कोयना, नवेगावबांध या सर्वच निसर्ग शिबिरांत मारुतराव मनापासून सहभागी झाले. शिबिरात सहभागी झालेल्या हजारो निसर्गप्रेमींना जंगल, पशू, पक्षी, वनस्पती याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. हे सर्व करत असताना त्यांनी स्वतःला तज्ज्ञ कधीच मानलं नाही. आयुष्यभर विद्यार्थी रहाणंच पसंत केलं. एखाद्या फॉरेस्ट गार्डनं जरी कोणती नवीन माहिती सांगितली, जंगलात घडलेला एखादा प्रसंग सांगितला, तरी ते त्याची माहिती तन्मयतेनं ऐकत, त्यावर चर्चा करीत आणि ते सर्व स्वतः जाऊन पाहण्याचा प्रयत्न करीत. त्यांचं म्हणणे असं, की अरण्य हा एक अलिखित ग्रंथ आहे. तो वाचता आला पाहिजे. त्याची लिपी समजावून घेता आली पाहिजे. चितमपल्लींनी ही विद्या अनेक गुरूंकडून आत्मसात केली आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि निरीक्षणशक्ती अफाट आहे. आपण जसं सकाळी वर्तमानपत्र वाचतो, तसं मारुतराव जंगल वाचतात. जंगलात घडणाऱ्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचं ते निरीक्षण करतात. त्यांची जिज्ञासाही लहान मुलासारखी आहे. प्रत्येक दिवसाच्या उगवतीपासून ते मावळतीपर्यंतच्या या घडामोडी दिवस संपताना आपल्या डायरीत ते नोंदवून ठेवतात. अशा सुमारे ५० वर्षांच्या डायऱ्या आजमितीस त्यांच्याकडं आहेत. या रोजनिशीतील काही भाग वाचण्याचं भाग्य मला लाभलं! निरीक्षणाच्या बारीकसारीक गोष्टींची नोंद, टिपणं वहीत कशी करायची हे फक्त त्यांच्याकडूनच शिकावं. त्या नोंदी वाचताना घडलेला तो प्रसंग जसाच्या तसाच डोळ्यापुढं उभं करण्याचं एक अलौकिक सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. फार थोड्या लेखकांना हे जमतं! 

पशुपक्षी, पर्यावरण, जंगल, निसर्ग, व्यक्तिचित्र अशा विषयांवर त्यांनी जवळजवळ ३५ पुस्तकं मराठीमध्ये लिहिली आहेत. पक्षी जाये दिगंतरा, जंगलाचं देणं, नवेगावबांधचे दिवस, रानवाटा, जंगलाची दुनिया, चैत्रपालवी, केशराचा पाऊस, रातवा, पाखरमाया ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं. सर्वसामान्यांना समजेल अशी साधी, सोपी, ओघवती आणि वस्तुस्थितीचं यथार्थ वर्णन करणारी रसाळ भाषा ही त्यांच्या पुस्तकाची वैशिष्ट्यं. ही पुस्तकं वाचली की जंगलात जाण्याची ओढ निर्माण होते. मीही काही वर्षांपूर्वी असाच भारावून गेलो होतो आणि जंगलांवर प्रेम करायला लागलो. त्यांच्या या स्वतःच्या वेगळ्या लेखन शैलीमुळं मराठी साहित्य विश्‍वात निसर्गविषयक लेखनाचं एक नवीन दालनच त्यांनी खुलं केलं. याच आगळ्या वेगळ्या निसर्ग साहित्यामुळंच मराठी सारस्वतांच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. सोलापूरला त्यांच्या जन्मगावी झालेल्या या संमेलनाचे आम्ही साक्षीदार होतो. 

मी गेली ३० वर्षं त्यांच्याबरोबर जंगलभ्रमंती करीत आहे. काही अद्‌भुत गोष्टी त्यांच्याकडून शिकायला, पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. चालता चालता अगदी सहजपणे पक्ष्यांची ओळख, वन्यप्राण्यांची माहिती, जंगलातील वृक्षांची ओळख, त्यांची वैशिष्ट्यं याबद्दलची माहिती ते देत असत. मात्र, माहिती देत असताना लक्षपूर्वक ऐकण्याची सक्तीही असे. मधे आपापसात कोणी बोललं, तर त्यांना राग येत असे. त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष जंगलात ही मेजवानी आम्हाला अनेकवेळा प्राप्त झाली आहे. आपल्या घरांना भिंती असतात, त्यांच्याही घराला आहेत. फरक इतकाच आहे की या भिंती 'पुस्तकांच्या' आहेत आणि यांपैकी प्रत्येक पुस्तक त्यांनी वाचलं आहे. त्यांच्याकडं उत्तम फर्निचर नाही, पण जगातील अनेक पुस्तकं त्यांच्या या अफाट लायब्ररीमध्ये आहेत. त्यांच्या घरी नागपुरात गेलं, की ती पुस्तकंही आपल्याशी कुतूहलानं व्यक्त होऊ पाहत असतात. ग्रंथ हे त्यांचे जवळचे मित्र आहेत. त्यांना अखंडपणे सोबत करीत आहेत. अजूनही एखादं पुस्तक त्यांना हवं असेल आणि नागपुरात मिळालं नाही की ते मला हमखास फोन करतात आणि मीही आनंदनं, तत्परतेनं ती पुस्तकं त्यांना पाठवून देतो. सध्या प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळं विश्रांतीसाठी त्यांचा मुक्काम पुण्यात आहे. मात्र, या काळातही महाराष्ट्रातील प्रसार माध्यमं, पर्यावरण आणि पर्यावरणवाद या विषयावरची १५ पुस्तकं मी त्यांना नेऊन दिली. आज वयाच्या ८९ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं त्याचं लेखन आणि वाचन सुरू आहे. पुस्तकं खरेदी करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज काढणारे मारुतराव हे भारतातील एकमेव व्यक्तिमत्त्व असावे! 

   मारुतरावांची दिनचर्या वाखाणण्यासारखी आहे. अनेक वर्षं जंगलात वनविश्रामगृहात मी त्यांचा रूम पार्टनर (वनविश्रामगृहातील सोबती) राहिलो आहे. त्यामुळे किती काटेकोरपणे ती पाळतात हे मला माहीत आहे. पहाटे ४.३० च्या सुमारास उठणं, थोडं आवरून झाल्यावर प्राणायाम आणि योगासनं करणं. या प्राणायमामुळंच मधुमेहासारख्या घातक व्याधीवर त्यांनी नियंत्रण मिळवलं आहे. मग त्यांचं लेखन सुरू होई. ९ च्या सुमारास हलकासा नाश्‍ता आणि दूध. त्यानंतर भोजनापर्यंत परत लेखन आणि वाचन. एक ते दीडच्या सुमारास शुद्ध शाकाहारी जेवण. चितमपल्ली हे वनखात्यात असूनही शाकाहारी आहेत. याचं अनेकांना आश्‍चर्य वाटतं. कारण वनाधिकारी म्हणजे खाणारा आणि पिणारा अशी अनेकांची समजूत असते. मात्र, सगळेच अधिकारी असे नसतात. दुपारी थोडी वामकुक्षी आणि सायंकाळी परत लेखन/वाचन. रात्री मात्र ते लवकरच झोपायचे. एके रात्री असंच आम्ही नागझिरा जंगलातून फेरफटका मारून आलो. संध्याकाळी थोड्या गप्पा झाल्या. त्यांनी भोजन लवकरच केलं आणि मी आम्ही ज्या नीलय नावाच्या वनविश्रामगृहात राहत होतो तिथून शिबिरार्थींना भेटण्यासाठी निघून गेलो. सर्व सहभागींना दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम समजावून सांगितला आणि १० वाजण्याच्या सुमारास मी नीलयवर परत आलो. दार उघडलं तर चितमपल्ली सर झोपले होते. मला काही केल्या झोप येत नव्हती, म्हणून हळूच मी माझा छोटा टेपरेकॉर्डर काढला आणि आमच्या खोलीच्या जवळ एक छोटी बाल्कनी आहे, तिथं जाऊन बसलो. अगदी लहान आवाजात रफी साहेबांची जुनी गाणी ऐकायला सुरुवात केली. सुमारे ९० मिनिटांच्या या कार्यक्रमानंतर मी हळूच दार उघडलं आणि खोलीत आलो. तक्षणी मारुतराव म्हणाले, ''अहो विवेक, किती छान जुनी गाणी आहेत. मला का नाही उठवलं ही गाणी ऐकायला?'' मी चपापलो आणि म्हणालो, ''सर माझ्यामुळं तुमची झोपमोड झाली. पण मी अगदी हळू आवाजात गाणी ऐकत होतो. मला माफ करा. पण पुन्हा मी अशी गाणी वगैरे लावणार नाही.'' तर ते म्हणाले, ''अहो मी रागावलो नाही, पण इतकी छान गाणी तुम्ही एकटेच ऐकत होतात, म्हणून चिडलोय तुमच्यावर. या पुढं रोज रात्री आपण थोडा वेळ अशी जुनी गाणी ऐकूया... आहेत ना तुमच्याकडे अजून गाणी?'' तेव्हा माझ्या मनावरचं दडपण नाहीसं झालं. त्यानंतरच्या उरलेल्या पाच दिवसांमध्ये रफी, लता, आशा, मुकेश आणि तलत यांच्या गाण्यांमध्ये चितमपल्ली सर इतके रममाण झाले होते, की शेवटी मलाच त्यांना झोपेची आठवण करून द्यावी लागायची. थोडेसे रूक्ष आणि कठोर वाटणारे मारुतराव संगीताचे इतके चाहते होते... हा त्यांच्या मनाचा एक नवीन कंगोरा मला ज्ञात झाला होता. नुकताच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाच हजार गाण्यांचा संग्रह असलेला 'कॉंरवा रेडिओ' आम्ही त्यांना भेट म्हणून दिला. त्या दिवशी ते खूपच खूश झाले. 

समयसूचकता आणि पेशन्स हे चितमपल्लींचे खास गुण. एकदा कान्ह्याच्या जंगलात सायंकाळच्या वेळेस आम्ही सरांबरोबर जंगल सफारीला गेलो होतो. कान्हा मैदानातून जात असता ३०-४० गव्यांचा कळप रस्ता ओलांडत होता. आम्ही जवळ गेलो असताना तो मधोमध थांबून राहिला. आमच्या गाइडनं सांगितलं आणि ड्रायव्हरनं गाडी बंद केली. थोडा वेळ थांबलो, तरीही तो कळप काहीच हालचाल करत नव्हता. काय कारण आहे हे समजत नव्हतं. वळवून गाडी मागं घ्यावी असा विचार करून मागं बघितलं, तर तिथंही अजून १०-२० गवे रस्त्यातच ठाण मांडून बसले होते. चितमपल्ली म्हणाले, ''आता हे दोन्ही कळप वाटेतून दूर झाल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही.'' आम्ही गाडीतच जवळजवळ ३० ते ४० मिनिटं हालचाल न करता बसून होतो. सर आम्हाला गव्यांची वैशिष्ट्यं, त्याचं वजन याविषयी माहिती देत होते. मात्र, त्यांनी सांगितलेलं एक पक्कं लक्षात राहिलं ते म्हणजे ''जंगलातील वाटेवरून जायचा पहिला हक्क हा येथील वन्य प्राण्यांचा आहे.'' काहीही हालचाल न करता, न बोलता गव्यांसारख्या त्या अजस्र धुडांसमवेत जंगलात हतबल होऊन स्वस्थ बसण्याचा तो अनुभव मात्र भन्नाट होता. सहनशीलता म्हणजे काय ते त्या दिवशी समजलं. 

चितमपल्लींसारखा 'वनविद्येचा गुरू' आम्हास लाभला हे आमचं भाग्य आहे. आयुष्याच्या या वनमार्गावर निसर्गाचे अनेक चमत्कार त्यांनी अनुभवले आहेत. ही अनुभवांची शिदोरी त्यांनी आमच्याबरोबर 'शेअर' केली आहे. ते म्हणतात, ''मुलांना विचारी करायचं असंल, तर त्यांना जंगलात न्या, पर्वतांवर चढाई करायला सांगा, तिथल्या हिरवळीवर आणि वाऱ्याच्या येणाऱ्या प्रत्येक झुळकेबरोबर त्यांच्यातील पवित्र भावनाच जागृत होतील.'' त्यांच्या म्हणण्यानुसार कोणतंही जंगल कितीही वेळा पाहिलं तरी कंटाळवाणं कधीच होत नाही. उलट प्रत्येक वेळेस ते नवीनच भासतं. आजकालच्या या इंटरनेट, मोबाइल आणि व्हॉट्सअॅपच्या जमान्यात आपण खऱ्या निसर्गापासून दुरावत चाललो आहोत. या गोष्टी गरजेच्या असल्या तरी त्याचा अतिरेक झाला आहे. आपण त्याच्या आहारी गेलो आहोत. पण एकदा जंगलात जाऊन पहा, तेथील नीरव शांतता, पक्ष्यांचं संगीत, मोकळेपणानं वावरणारे प्राणी, आपल्याशी संवाद साधणारे वृक्ष अनुभवल्यावर हे भौतिक जग... त्याच्या वाचूनही आपण जगू शकतो; किंबहुना अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो याचा दृष्टांत येईल. शहरातील सुसंस्कृतपणाचा कंटाळा आला, की अंगात जंगलीपणा मुरवण्यासाठी माझी तरी पावलं आपसूक जंगलाकडंच वळतात आणि प्रत्येक वेळेस जंगल मला एक वेगळा अनुभव देतं.

संबंधित बातम्या