कोकटू आणि केशराचा पाऊस

विवेक देशपांडे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

सातपुड्याच्या पर्वतराजींनी वेढलेलं, एका बाजूला उंचच उंच डोंगर तर तितक्‍याच खोल दऱ्या. प्रचंड अशी गवताळ कुरणं, ज्यामध्ये अनेक घाटांचा मेळ आहे असं हे मेळघाटचं जंगल. अमरावती जिल्ह्यातील हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे जंगलप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. 
एकंदर १५९७ चौरस किलोमीटर इतकी त्याची व्याप्ती आहे. त्यातील सुमारे ३५० चौरस कि.मी. इतकं क्षेत्र हे अतिसंरक्षित (कोअर) असून, १२५० क्षेत्र हे मध्यलगत (बफर झोन) म्हणून घोषित केलेलं आहे. 'दक्षिण उष्ण प्रदेशीय पानगळीचं शुष्क वन' हा या वनाचा प्रकार आहे. जंगलातील 'कोअर झोन' आणि 'बफर झोन' अशी विभागणी भारतातील सर्वच व्याघ्र प्रकल्पात याच पद्धतीनं केली जाते. या अतिसंरक्षित क्षेत्राची विशेषकरून दक्षता घेतली जाते. या क्षेत्रात वनाधिकारी आणि वनखात्यातील व्यक्तींशिवाय कोणासही प्रवेश दिला जात नाही. म्हणूनच यामधील वन्यप्राण्यांचे नैसर्गिकरीत्या संरक्षण आणि संवर्धन होते. उन्हाळ्यात टोकाचे ऊन आणि पावसाळ्यात प्रचंड पाऊस (१५०० ते २००० मि.मि.) असा विरोधाभास असला, तरी वेड लावणारं हे जंगल आहे. सिपना, खंडू डोलार, गडगा आणि खापरा या पाच नद्या या व्याघ्र प्रकल्पात वाहत आहेत. 

या जंगलात विविध प्रकारची झाडं, महाकाय वृक्ष आणि लतावेली आहेत. बहावा, काटेसावर, मोह, तेंदू, हळदू, धावडा साजड, तीवस हे वृक्ष आणि प्रामुख्यानं साग आहे. काही ठिकाणी विरळ आणि काही ठिकाणी घनदाट स्तरावर बांबू आहे. मेळघाटमध्ये बांबूची प्रचंड लागवड आहे. आम्ही तिथं असताना बांबूला फुलोरा आला होता. साधारणपणे ३० ते ४० वर्षांनी एकाच वेळेस बांबूला फुलं येतात. मोठं मोहक दृश्य असतं ते. पण त्याच वेळेस त्या बांबूचा अंतही होतो. तो सर्व बांबू मरून जातो. निसर्गाच्या या आविष्काराची कल्पनाच नव्हती. आपल्या मरणाच्या वेळीसुद्धा बांबू फुलं फुलवतो. जणू काही मरणानंतर त्याच्या कलेवरावर वहायला फुलांचं अगोदरच बीज निर्माण होतं आणि त्यातूनच नवनिर्मिती होते. हे निसर्गचंद्र असंच सुरू राहतं.

ुमारे २० वर्षांपूर्वी चितमपल्ली सरांबरोबर 'ऑडियो कॅसेटच्या' निमित्तानं आम्ही काहीजण मेळघाट, ताडोबा आणि नवेगावबांधच्या जंगलात अभ्यासासाठी गेलो होतो. एक दिवस चिखलदऱ्याला मुक्काम करून आम्ही सेमाडोहला मुक्कामाला गेलो. सेमाडोहला वनखात्याची खूप छान वनविश्रामगृहं आहेत. जारूळ, सायाळ, शाल्मली, मालती-माधव, अशी समर्पक नावं याला दिलेली आहेत. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही गोलाकार आहेत. निम्म्या भागात शयनगृह, पावभागात स्नानगृह आणि उरलेल्या भागात बाल्कनी अशी सुरेख रचना केलेली आहे. कौलारू छप्पर आणि जंगलाला मिळतीजुळती अशी रंगसंगती आहे. आजूबाजूला सागाची उंचच उंच झाडं आहेत. थोड्या अंतरावरच सिपना नदी आहे. भोजन झाल्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तो दिवस पौर्णिमेच्या आधीचा होता. अंधाराचं साम्राज्य होतंच, पण आवश्‍यक तेवढा प्रकाशही होता. पक्षांची गाणी सुरू होती... आणि अचानक दूरवर काहीतरी हलताना दिसलं. ते अजस्र धूड विश्रामगृहाच्या दिशेनंच येत होतं. कोणीतरी कमांडर बॅटरीचा झोत त्या दिशेनं टाकला आणि लक्षात आलं, की एक रानगवा निश्चल उभा होता. डोळ्यांवर प्रकाशाचा झोत पडल्यानं तो सावध झाला आणि तिथंच उभा राहिला. कोणीतरी वनरक्षक होता त्यानं हळूच तो टॉर्च बंद केला आणि मग लक्षात आलं, की गव्यानं खाली मान घालून चरायला सुरुवात केली. खरं तर हा प्राणी इतका ताकदवान असतो, की एका धडकेनं चारचाकी गाडी लिलया उलटवू शकतो. प्रसंगी प्रथेनुसार आम्ही घाबरायला पाहिजे, पण एक हजार किलोचा तो गवा आम्हाला पाहून माघारी वळला होता... चक्क माणसाला घाबरला होता! एक अस्वल सोडलं, तर मनुष्यजातीला हे सर्वच प्राणी घाबरतात असं मला वाटतं. 

मी येणार आहे हे कोलकाजच्या माझ्या वनरक्षक मित्राला माहीत होतं. आम्ही झोपायला जायच्या तयारीत असतानाच 'देशपांडे सर कुठं आहेत?' हे विचारत एक व्यक्ती आली. मी आवाजावरूनच ओळखलं तो वानखेडे होता. खास भेटण्यासाठी एवढ्या रात्री एकटाच कोलकाजवरून आला होता. त्याच्याशी बोलताना पूर्वी घेतलेल्या शिबिरांची आठवण झाली. हे असं 'जंगली मित्र' भेटले, की झोपेचं खोबरं होतं... पण त्यांच्या सहवासातले ते बहारीचे क्षण परत 'जागे' होतात. वानखेडे परत निघाला. मी विचारलं, 'अरे आता इतक्‍या रात्री कुठं जाणार?' 'घरी चाललो जी,' तो म्हणाला. 'अरे बाबा आता राहा इथंच, सकाळी आम्हीच तुझ्याबरोबर कोलकाजला येतो,' असं मी म्हणताच त्याच्या चेहेऱ्यावर हास्य फुललं... आणि राहिला गडी आमच्याबरोबर. 

आम्ही पहाटे उठलो आणि कोलकाजकडं कूच केली. कोलकाजचं रेस्ट हाऊस अत्यंत मोक्‍याच्या जागी बांधलेलं आहे. खाली अर्धवर्तुळाकार सिपना नदी वाहते. तिचा डोह आहे. मागं पसरलेलं घनदाट जंगल आपण उंचावरून पाहत असतो. एक भला मोठा सर्च लाइट काठावर बसवलेला आहे. रात्रीच्या वेळी पाण्यावर येणारे प्राणी याच्या प्रकाशझोतात पाहता येतात. दिवसभर आम्ही तारुबंदा, रायपूर या ठिकाणी जाऊन आलो. दुपारच्या चहाला आम्ही वानखेडेकडं होतो. आमचा चहा होतो न होतो तोच वानखेडे आम्हाला त्याच्या वैयक्तिक 'स्नेक पार्क'ला घेऊन गेला. हा सर्पतज्ज्ञ होता आणि नाग, मण्यार, गवत्या, धामणीपासून ते अजगरापर्यंत समस्त सरपटणारे मित्र त्याच्या संग्रही होते. बोलता बोलता तो म्हणाला, 'साहेब थोडं थांबा, यांना जरा दूध पाजू आणि आपण निघू जंगलाकडं...' हे म्हणेपर्यंत स्वारीनं एका नागाला उचललं, त्याचं तोंड दोन्ही हातानं उघडलं आणि एक नरसाळं त्याच्या तोंडात कोंबलं. वरून एका बाटलीनं त्यात थोडं थोडं दूध ओतायला सुरुवात केली. आता आमची अचंबित होण्याची पाळी होती. कारण असं जगावेगळं दृश्‍य आयुष्यात प्रथमच पाहत होतो. काही क्षणानंतर धामणीवरही हाच प्रयोग करण्यात आला. 'वानखेडे, अरे बाबा हे काय करतोस तू? अरे असं साप दूध वगैरे पीत नसतो...' यावर तो उत्तरला, 'अहो देशपांडे सर, मी रोज सोताच्या खर्चानं त्यांना दूध पाजतो, म्हणून तर ते जिते हायत.' मला त्या क्षणी नीतीमकुमार खैरे या माझ्या सर्पतज्ज्ञ मित्राची आठवण झाली. त्यानं हा विनोदी प्रकार पाहिला असता, तर वानखेडेचं काही खरं नव्हतं. वानखेडेला समजवण्याचा वृथा प्रयत्न करणं आम्ही थांबवलं होतं. एक मात्र खरं, ही गोष्ट सोडली तर वानखेडे म्हणजे अनुभव समृद्ध चालतं-बोलतं जंगल होता. वनखात्यात वनरक्षक म्हणून नोकरी, त्यामुळं रोजचाच जंगलाशी संबंध. प्राणी आणि पक्षी यांचं अगाध ज्ञान त्याच्याकडं होतं. आमचं पुस्तकी ज्ञान त्याच्या अनुभवसंपन्न ज्ञानापेक्षा तोकडं होतं हे मान्यच करायला हवं! 

हे दिवस फेब्रुवारीचे होते आणि त्यात आज 'माघी पौर्णिमा' होती. उगवतीचं पूर्ण चंद्रबिंब थोडं लालसर दिसत होतं. शीतल आणि मंद चंद्रप्रकाशात जंगलाची गूढता आणखी वाढली होती, अगदी जी. ए. कुलकर्णींच्या कथांसारखी! 

काही वेळानं वनरक्षक आणि खानसामा ही दुहेरी भूमिका वठवणाऱ्या त्या व्यक्तीनं जेवण तयार असल्याची अदबीनं सूचना दिली. भात आणि पिठलं, तसंच जोडीला आमच्याकडील लसणाची चटणी अशा पंचतारांकित भोजनानंतर चितमपल्ली सर म्हणाले, ''आता लवकर झोपा, उद्या पहाटे आपल्याला 'केशराचा पाऊस' अनुभवायला जायचं आहे. पहाटे चार वाजता सर्वजण तयार राहा आणि झोपताना दारं नीट लावून घ्या. कारण या भागात अस्वलं, वाघ आणि बिबट्यांचा वावर आहे.'' एवढ्या सूचना करून चितमपल्ली सर त्यांच्या खोलीकडं रवाना झाले. जाण्यापूर्वी मी भीतभीतच सरांना विचारलं, ''इथं कुठं केशराची बाग? आणि त्याचा पाऊस असतो तरी कसा?'' ''देशपांडे यांचं उत्तर तुम्हाला उद्या पहाटेच मिळेल...'' जाता जाता सर आमची उत्सुकता मात्र वाढवून गेले.

एव्हाना सूर्य रुटीनप्रमाणं पश्‍चिम क्षितिजाकडं कूच करीत होता. वानखेडेनं आम्हाला अजून एक आमिष दाखवलं. 'साहेब, चला जरा जंगलामंदी जाऊन येऊ, पर पायी बरका?' आमच्याबरोबर मारुतराव होते. त्यांना आम्ही कोलकाजला सोडलं आणि वानखेडेबरोबर जंगल तुडवायला निघालो. कच्च्या रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि आम्ही वानखेडेच्या मागून निघालो. एव्हाना अंधार जाणवू लागला होता. चंद्रोदय व्हायचा होता. अचानक वानखेडे, 'सर, जरा थांबा' असं म्हणाला. खिशातून मोठी विजेरी काढली आणि समोर प्रकाशझोत टाकला. क्षणार्धात असंख्य डोळे चमकले आणि काही कळायच्या आत चौखूर उधळले. तो चितळांचा एक मोठ्ठा कळप होता. या एक तासाच्या जंगल भ्रमंतीत सशापासून ते सांबरापर्यंत असंख्य प्राणी आम्ही पाहिले. आम्हाला काही वेळा टॉर्चच्या प्रकाशात डोळे दिसायचे पण प्राणी पटकन ओळखता यायचे नाहीत. पण हा पठ्ठ्या मात्र ही रानडुकरं आहेत, हा 'मेल सांबर' आहे, ही 'जंगल कॅट' आहे हे त्यांच्याकडं न पहाताच सांगायचा. जमिनीपासून किती अंतरावरती हे डोळे चमकतात त्यावरून तो कोणता प्राणी आहे हे सांगायचा. अनुभवानं आणि जंगल पालथं घालायला सुरुवात केल्यावर आपसूकच समजत जातं! 

सुमारे दोन तासांच्या जंगलभ्रमंतीनंतर प्राणी 'पाहून' आणि पक्षी 'ऐकून' आम्ही तृप्त झालो होतो. कावळानामक पक्षानं कोकलून आम्हाला भुकेची जाणीव करून दिली होती. भोजनोत्तर सरांबरोबर चर्चा सुरू झाली... आणि माझं मन अचानक काही वर्षं मागं गेलं. याच मेळघाटात निसर्गप्रेमींसाठी आम्ही सलग चार वर्षं 'मेळघाट पदभ्रमण आणि निसर्ग निरीक्षण शिबिरं' आयोजित केली होती. निवृत्त प्रधान वनसंरक्षक माधवराव गोगटे आणि मारुतराव चितमपल्लींनी या शिबिरांमध्ये मार्गदर्शन केलं होतं. मी त्यावेळी तारुबंदा कॅंपला होतो. सकाळी आठची वेळ होती. शिबिरार्थी जंगलात गेले होते. मी आणि आमचे दोन कुक आम्ही कॅंपवर निवांत बसलो होतो. अचानक वनखात्याची एक जीप आली आणि चितमपल्ली सर खाली उतरले. मी स्वागत करून बसायला खुर्ची देणार इतक्‍यात ते म्हणाले, 'नको, मी आता 'कोकटूला' निघालोय, येताय का माझ्याबरोबर? मात्र लगेच निघावे लागेल.' माझी मोठी पंचाईत झाली. कारण हो म्हणावं, तर शिबिरातील सुमारे १०० निसर्गप्रेमींची जबाबदारी माझ्यावर होती आणि असं अर्धवट सोडून जाणं बरोबर वाटत नव्हतं. मात्र, त्याचवेळी एक अत्यंत आयती चालून आलेली सुवर्णसंधी आपण गमावतोय याची जाणीवही होत होती. माझी मनःस्थिती मारुतरावांनी जाणली आणि ते स्वतःहूनच म्हणाले, ‘ठीक आहे देशपांडे, तुम्ही इथं थांबणं गरजेचं आहे, पण अशी संधी वारंवार येत नसते... बघूया जाऊ आपण परत कधीतरी!'

संबंधित बातम्या