कोकटू आणि केशराचा पाऊस

विवेक देशपांडे
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

आज शहरातील सिमेंटच्या जंगलात माणूस इतका अडकून पडला आहे, की स्वतःभोवती पसरलेल्या निसर्गाच्या अफाट सौंदर्याचा अनुभव घ्यायला, पाहायला त्याला सवडच नाहीये! पण मी मात्र अशी अनेक जंगलं अनुभवली आहेत. त्यातलंच एक म्हणजे सातपुड्याच्या पर्वतराजींनी वेढलेलं, एका बाजूला उंचच उंच डोंगर तर तितक्‍याच खोल दऱ्या. प्रचंड अशी गवताळ कुरणं, ज्यामध्ये अनेक घाटांचा मेळ आहे असं हे मेळघाटचं जंगल! अमरावती जिल्ह्यातील हा व्याघ्र प्रकल्प म्हणजे जंगलप्रेमींसाठी एक समृद्ध ठिकाणच आहे. 

 भूतकाळातला प्रसंग मी आठवत होतो आणि लक्षात आलं, आपण याच परिसरात तर आहोत. ''कोकटूला आपण जाऊया परत कधीतरी'' हे वाक्‍य माझ्या मनात रुंजी घालत होतं. अनायसे पौर्णिमा होती आणि ती जर कोकटूमध्ये अनुभवता आली तर किती छान! मी चितमपल्ली सरांना विचारलं, ''आपण उद्या कोकटूला जाऊ शकतो का?'' अचानक विचारलेल्या या प्रश्‍नावर मारुतराव म्हणाले, ''अहो असं एकदम कसं जाता येईल आपल्याला? तिथं जायचं म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. आता रात्र झाली आहे. आपण उद्या बघूया.'' सकाळी तिथले डिव्हीजनल फॉरेस्ट ऑफिसरच सरांना भेटायला कोलकाजला आले आणि त्यांच्याकडं सरांनी हा विषय काढला. ते म्हणाले, ''सर तुम्हाला परवानगीची काय आवश्‍यकता आहे. जरूर या, मात्र लगेच परत या.'' तेव्हा कुठं मला हायसं वाटलं. कारण कितीतरी वर्षांनी ती हुकलेली संधी परत चालून आली होती. खरं तर वनखात्याशी संबंधित नसलेल्या कोणत्याच माणसांना या कोअर क्षेत्रात जायला मज्जाव आहे. पण साक्षात वनमहर्षी आमच्याबरोबर असल्यानं हा योग जुळून आला. 

 आम्ही कोलकाजवरून निघालो आणि तारुबंदा, ढाकणा, बेळकुंडमार्गे कोकटूकडं कूच केली. आम्ही येत असल्याची सूचना वायरलेसवरून सर्व ठिकाणी पोचली होती. ढाकण्यापासून जंगल अधिक दाट होत चाललं होतं. कारण हा 'कोअर' एरिया होता. आम्ही बेलकुंडवरून कोकटूकडं निघालो खरं, पण वाटेत एक प्रवेशद्वार लागलं आणि त्याला कुलूप लावलेलं होतं. आसपास कुठं फॉरेस्ट गार्ड््‌स आहे का हे बघितलं. मात्र, काहीच पत्ता लागेना. काही वेळानंतर सायकलवरून एक वनमजूर येताना दिसला. त्याच्याकडं चौकशी केली असता, हा फॉरेस्ट गार्ड तिथून दहा-बारा किलोमीटरवर त्याच्या घरी गेला असल्याची माहिती मिळाली. आमच्या ग्रुपपैकी सतीश काळे आणि स्वाती दामले शोध मोहिमेवर रवाना झाले. आम्ही एका झाडाखाली पथारी पसरली. सुमारे दीड तासानंतर फॉरेस्ट गार्ड आणि किल्लीसह विजयाची खूण करत हे दोघं परतले. एव्हाना दुपार टळून गेली होती. आम्ही कोकटूकडं निघालो. जेमतेम एकच गाडी जाईल असा कच्चा रस्ता, आजूबाजूला अजिबात मानवी वस्तीचा लवलेश नाही, घनदाट जंगल. फक्त आमच्या गाडीचा आवाज जंगल भेदत चालला होता. 

 संध्याकाळच्या सुमारास आम्ही कोकटूच्या वनविश्रामगृहात पोचलो. स्वागताला वनखात्यातर्फे एकच वनरक्षक होता. दिडशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेलं ते रेस्ट हाउस पाहताच; थोडी भीती वाटली. मात्र, प्रवासाचा शीण नाहीसा झाला तो आजूबाजूला चरत असलेली चितळं पाहून. ती शांतपणे चरत होती. आम्ही तिथं आहोत हे त्यांच्या खिसगणतीतही नव्हतं. मी फोटो काढायला कॅमेरा रोखला आणि 'क्‍लिक'च्या मोठ्या आवाजानं तमाम चितळवर्ग दचकला. क्षणार्धात आमच्याकडं पाहिलं आणि धूम ठोकली. कदाचित ७-८ मनुष्य प्राण्यांचा कळप एकदम पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ असावी! 

 कोकटूचं जे वनविश्रामगृह आहे त्याच्या थोडंस खालच्या बाजूला एक निर्झर वाहतो. आमचा गार्ड पाणी आणायला खाली चालला होता. आम्ही म्हणालो, 'चल आम्हीही तुझ्याबरोबर येतो.' झऱ्यापाशी पोचलो तर इतकं नितळ, स्वच्छ पाणी बऱ्याच वर्षांनी पहिल्याचं समाधान मिळालं. अगदी पारदर्शक आणि तळ दिसत होता. त्यादिवशी अगदी अधाश्यासारखं पाणी पिऊन घेतलं होतं. हिमालयात ट्रेकच्या वेळेस असं पाणी जागोजागी मिळतं, पण इथं जंगलात इतकं शुद्ध पाणी म्हणजे आश्चर्य होतं. त्यादिवशी संध्याकाळचा 'चहा' बिसलेरी पाण्याचा होता. 

चहाची तल्लफ सर्वांनाच आली होती. फॉरेस्ट गार्डला सांगताच 'हो जी... आत्ता आणतो' म्हणाला. थोड्या वेळानं ७-८ कप चहा आला. प्रत्येकाला कप भरून चहा नामक पेय देण्यात आलं. एक घोट घेताच चहात काय आहे ते समजलं. त्यात थोडा गूळ घातला होता आणि लिंबूही पिळलेलं होतं. 'दूध संपलं जी,' वनरक्षक खाली मान घालून भीतभीतच म्हणाला. त्यादिवशी 'ब्लॅक टी' आणि 'लेमन टी' दोन्हींचा अनुभव आम्ही प्रथमच आणि एकाच वेळी घेतला. पण खरं सांगतो तो चहा अमृतासमान भासला. या जंगलात हा चहा मिळाला हेच खूप होतं. काश्‍मीरमध्ये 'नमकीन चहा' प्यायलो होतो, पण याची खुमारी काही औरच होती. अशा ठिकाणी वेळेला जे मिळतं ते न कुरकुरता स्वीकारणं हा एकमेव पर्याय तुमच्यापुढं असतो! अंगात थोडी तरतरी आली होती आणि हळूहळू अंधाराचं साम्राज्यही पसरू लागलं होतं. कंदिलाच्या प्रकाशात मारुतरावांनी कोकटू, आजूबाजूचा परिसर, तेथील वृक्ष, जंगल, प्राणी आणि पक्ष्यांविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. या कोअर एरियात कोणालाच येण्यास परवानगी नसते. कोणतंही झाड तोडलं जात नाही. नवीन झाड लावलं जात नाही आणि पडलेली झाडं उचललीही जात नाहीत. सुमारे साडेतीनशे चौरस कि.मी.चं हे जंगल अतिसंरक्षित असल्यानं नैसर्गिक स्वरूपात राखलं जातं. मानवाचा संपर्क नसल्यानं प्राणी आणि पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वाढत असतात, वावरत असतात. 

रातकिड्यांचा गजर सुरू होता. दूरवर घुबडाचे आवाज आणि जवळच्या झाडापाशी 'रातव्याचा' काप्पू... काप्पू... काप्पू... असा सलग जप ऐकू येत होता. या वातावरणात झोप काही केल्या येईना. म्हणून रेस्ट हाउसमधील फायर प्लेसपाशी आम्ही गप्पा मारत रात्र जागवायचा निर्णय घेतला. थोडी लाकडं पेटवली आणि थोड्या वेळानंतर ती संपत आली. आमच्या केअरटेकरला सांगायचा अवकाश, त्यानं खैराचा एक भला मोठा ओंडकाच आणून आत घातला. या लाकडाचं वैशिष्ट्य म्हणजे जळताना धूर खूप कमी होतो आणि उष्णता जास्त निर्माण होते. आता पहाटेपर्यंत उबेची निश्‍चिती होती. केशराचा पाऊस मनात पिंगा घालत होताच. 

पहाटे साडेतीन वाजताच चितमपल्ली सर उठले आणि आम्हाला बघून चकीत झाले. त्यांना वाटलं, की आम्ही लवकर उठलो आहोत. पण माघी पौर्णिमेची ती चंदेरी रात्र अशी झोपून थोडीच वाया घालवणार होतो आम्ही? 'एखादी पांढरी शाल, पांढरा रुमाल, पाण्याची बाटली बरोबर घ्या, शक्‍यतो फिक्कट रंगाचे शर्ट घाला.' या सूचना सरांनी दिल्या आणि मी, अनंत गोहाड, स्वाती दामले, सतीश काळे, मुकुल गुरू आणि वनरक्षक सरांच्याबरोबर चंद्रप्रकाशातील त्या पावसात भिजायला निघालो. चित्रा गोहाड मात्र आमच्याबरोबर आल्या नाहीत. त्या खोलीतच झोपून राहिल्या. 

अजिबात आवाज न करता सुमारे तासभर चालल्यावर आम्ही एका रायमुनीयाच्या झाडाखाली येऊन थांबलो. मारुतरावांनी पांढरी शाल झाडाखाली चार टोकांना धरायला सांगितली. आम्ही स्तब्ध उभे होतो; पावसाची वाट पाहत. थोड्या वेळानं असं लक्षात आलं, की त्या पांढऱ्या शालीवर केशरी रंगाच्या असंख्य ठिपक्‍यांची नक्षी तयार झाली होती. अंगावर हलकेसे दवबिंदू पडत होते आणि आमच्या सर्वांचाच 'केसरिया' झाला होता. हे अनोखं दृश्‍य आम्ही आयुष्यात प्रथमच अनुभवत होतो. हा केशराचा पाऊस चांदोबाच्या साक्षीनं अंगावर झेलताना एक विलक्षण अनुभूती मिळाली होती, डोळे तृप्त झाले होते. आनंद जंगलात मावत नव्हता. रात्री चितमपल्ली सरांना विचारलेल्या प्रश्नाचं प्रात्यक्षिकासह आपोआपच उत्तर मिळालं होतं! 

मारुतराव सांगू लागले, 'या भागात रायमुनीया, रानचमेली, केकड, आरंगा इत्यादी वृक्ष आहेत. या सर्वांना हिवाळ्यात फुलोरा येतो. फुलांचे परागकण वाऱ्यासंगे हवेत जातात, त्यावर दव पडतं आणि ते खाली पडतात... बघता बघता साऱ्या जमिनीवर केशरी रंगाचा सडा पडतो.' आम्हाला जाणवत होतं, की वातावरणातही एक हलकासा मंद सुगंध पसरला आहे. चितमपल्ली सरांची निरीक्षण शक्ती किती अफाट आहे आणि निसर्ग व जंगल त्यांच्या अंतःकरणात किती ओतप्रोत भरलेलं आहे याची प्रचितीही या क्षणी आम्हाला आली. आम्ही किती भाग्यवान की निसर्गाच्या या अनोख्या आविष्काराचे आणि जंगलातील केशरी रंगपंचमीचे माघी पौर्णिमेला आम्ही सर्वजण साक्षीदार झालो होतो. खरं तर या मंतरलेल्या वातावरणात तिथून जाण्यासाठी कोणाचाच पाय निघत नव्हता. पक्षांची पहाटेची किलबिल सुरू झाली होती. इतक्‍यात झाडावरील वानरानं भयसूचक आवाज (Alarm Call) काढून आम्हाला जाणीव करून दिली, की मंडळींनो निघा आता... कारण बिबट्या किंवा वाघोबा आजूबाजूलाच आहेत. 

रेस्ट हाउसवर परतलो, तर गोहाडकाकू म्हणाल्या, 'आहो, तुम्ही मला या भयाण जंगलात एकटीलाच सोडून गेलात. मी केव्हापासून हाका मारते आहे, पण इथं कोणीच नाही. तुमच्याबरोबर फॉरेस्ट गार्डही होता का? मला वाटलं, की तो शेजारच्या खोलीतच आहे. आत्ता तुम्ही परत येताना जेव्हा तुमचा आवाज लांबून ऐकायला आला, तेव्हा माझ्या जिवात जीव आला.' त्यांना ही अजिबातच कल्पना नव्हती, की आम्ही सारेजण जंगलात निघून गेलो आहोत. शेजारच्या खोलीत कोणीतरी आहे, या भरवशावर त्या काही तास एकट्याच होत्या. जेव्हा या रेस्ट हाउसमध्ये आपल्या खेरीज कोणीच नाही हे त्यांना समजलं, तेव्हा मात्र त्या थोड्या घाबरल्या होत्या. पण आमची वाट पाहत धीरानं बसून होत्या. यावेळी 'अज्ञानात सुख असतं' या म्हणीचा प्रत्यय आला. नशीब इतकंच, की त्या काही तासांत कोणत्याही जंगली श्‍वापदानं या रेस्ट हाउसला भेट दिली नव्हती. आजही हे आठवलं, की गमतीनं काकूंना म्हणावसं वाटतं, 'तुम्हाला वाघ आणि अस्वल घाबरले होते बहुतेक!’

संबंधित बातम्या