सावधान! आपण जंगलात आहोत!

विवेक देशपांडे
सोमवार, 27 एप्रिल 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

जंगलात प्रवेश करताना नेहमी आपली डोळे, कान आणि नाक ही इंद्रिये अत्यंत तीक्ष्ण हवीत. आपण प्रथम डोळ्यांनीच पाहतो, आपली नजर चौफेर हवी. झाडावरील एखादा पक्षी किंवा ढोलीतले घुबड गाइड आपल्याला दाखवत असतो, पण आपल्याला मात्र ते दिसत नसते. कारण आपल्याला त्याचा सराव नसतो. अशा वेळेस दुर्बिणीचा वापर उपयुक्त ठरतो. पक्षिनिरीक्षण आणि जंगलभ्रमंतीसाठी 7x35 ही दुर्बीण अत्यंत उपयुक्त ठरते. बुशनले ही अमेरिकन दुर्बीण मला अत्यंत योग्य वाटली, कारण पॅरॅलॅक्‍स रिमूव्ह करण्यासाठी तिची जी लिव्हर आहे, ती खूप छान पद्धतीने वापरता येते. क्षणार्धात समोरचा पक्षी, प्राणी आपल्याला अगदी स्पष्ट पाहता येतो. ऑबजेक्‍ट अतिशय क्‍लिअर दिसते. कुठेही हालचाल झाली, तर प्रथम ती डोळ्यांनाच दिसते. हल्लीच्या नियमानुसार जंगलात तुम्हाला पायी भटकता येत नाही, पण गाडीतून जातानासुद्धा कच्च्या रस्त्यावर तुम्हाला 'पगमार्क्स' दिसतात. गाइडची नजर बसलेली असते. चालत्या गाडीतूनच त्याला हे ठसे दिसतात. ते कोणत्या प्राण्याचे आहे, लहान आहेत की मोठे, नराचे आहेत की मादीचे हे अनुभवावरूनच ओळखता येते. ते जुने आहेत की अगदी ताजे आहेत? त्याची दिशा कोणती आहे? तो प्राणी एकटाच आहे का? त्याबरोबर त्याची पिल्ले आहेत हे सर्व आपल्याला समजू शकते... आणि या ठशांवरून आपल्याला त्या प्राण्याचा माग काढता येतो. 

आपले कानही जंगलात अगदी बारीक आवाज टिपू शकतात. कारण जंगलात इतर कोणत्याही प्रकारचे आवाज नसतात. एक आपला आवाज, दुसरा गाडीचा आणि तिसरा फक्त प्राणी आणि पक्ष्यांचाच असतो. आपला आणि गाडीचा आवाज बंद झाला, की मग जंगल आपल्याशी बोलू लागते. त्याची भाषा समजायला थोडा वेळ लागतो. पण एकदा का ती समजली, की जंगल ऐकू येऊ लागते. सकाळी आणि संध्याकाळी पक्षी मधूर स्वरात बडबडत असतात. एकमेकांशी संवाद साधत असतात. वानरांचा नेहमीचा आवाज वेगळा असतो, पण बिबट, रानकुत्री किंवा वाघ बघितल्यावर ते वेगळाच आवाज काढून जंगलाला सावध करतात. चितळ शिकारी प्राणी दिसला, की कुक... असा वेगळाच आवाज करत चौखूर उधळतो. 

पेंच अभयारण्यात आम्ही एकदा भटकंती करत होतो. डिसेंबरचे ते दिवस होते. तुरीया गेटमधून आम्ही साधारणपणे दोन किलोमीटर आत गेलो असू. चितळांचा एक मोठ्ठा कळप चरत होता. नर, माद्या आणि ७-८ पिल्ले होती. थंडी होतीच, सकाळचे ऊन पडल्यामुळे चितळांच्या पाठी चमकत होत्या. मी गाडीतूनच व्हिडिओ शूटींग करत होतो. अचानक दोन कोल्हे वेगात पळत आले आणि त्यातील एका पिल्लाला त्यांनी हेरले. त्यांचा त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू होता.. आणि पिल्लांची आई त्या दोन्ही कोल्ह्यांना पिटाळायचा प्रयत्न करीत होती. मात्र, एका क्षणी एका कोल्ह्याने चितळाच्या पिल्लाचा पाय तोंडात पकडला. आई जिवाच्या आकांताने पिल्लाला वाचवायला पुढे आली. कोल्ह्याने पाय सोडला, पण दुसऱ्या कोल्ह्याने त्या छोट्या पिल्लाची मान पकडली. काही कळायच्या आत, काही मिनिटांमध्ये अक्षरशः त्या पिल्लाला फाडून खाल्ले. आईचे प्रयत्न तोकडे पडले. मात्र, नंतर एक विलक्षण गोष्ट घडली. जेव्हा कोल्ह्यांनी त्या पिल्लाचा संपूर्ण फडशा पाडला, त्यानंतर काही क्षणातच आईने परत एकदा चरायला सुरुवात केली. जणू काही घडलेच नाही. माझ्या बरोबर माझी पत्नी प्रतिभा आणि मुलगी गौतमी होती. त्यांना मात्र हे दृश्य बघवले नाही. मीही स्थितप्रज्ञासारखा व्हिडिओ शूटिंग घेत होतो. जंगलभ्रमंतीत एखादी शिकार होताना बघायला मिळणे हा अतिशय दुर्मीळ क्षण असतो. एखाद्याचा जीव जात असताना बघणे ही मनाला चटका लावणारी गोष्ट असते. आपल्याला ती शिकार वाटते, परंतु त्यांच्या दृष्टीने ते त्यांचे भोजन असते. आमच्या गाडीचा ड्रायव्हर महेश म्हणाला, 'सरजी आप बहुत नसिबवाले हैं, ऐसा किल तो बहुत कम लोगोंको देखनेको मिलता हैं' आम्ही त्या 'कम लोगोंमे' एक होतो याचे मात्र वाईटच वाटले. मात्र, या सर्व प्राण्यांमध्ये फक्त भुकेपोटीच शिकार करण्याची पद्धत आहे. उगीच दिसतेय त्याला मार आणि ठेव घरात साठा करून ही वृत्ती नसते. ही खोड फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे! 

खरे तर 'जंगलचा कायदा'' हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. पण इथे तोच खरा आणि श्रेष्ठ कायदा आहे, इथे त्याचे योग्य पालन केले जाते. माणसांचे कायदेच जास्त भयानक असतात आणि न पाळण्यासाठी असतात बहुतेक! 

जंगलात भटकंती करताना 'जिज्ञासा' आणि 'हे असे का?' हे प्रश्‍न पडायला हवेत. कारण जेव्हा तुम्हाला त्याची उत्तरे मिळतात, तेव्हा काही अनोख्या गोष्टींचे ज्ञान तुम्हाला मिळते. मोहतुरे नावाचे एक फॉरेस्ट गार्ड नागझिऱ्यात होते. त्यांचे 'फॉरेस्ट बॉटनी'चे ज्ञान अगाध होते. आमच्या प्रत्येक बॅचबरोबर ते जंगलातील झाडे आणि वनस्पती दाखवण्यासाठी अनेक वर्षे येत असत. एकदा नागझिऱ्यात फिरत असताना एका धावड्याच्या झाडापाशी ते आले, त्यांच्या वैदर्भी भाषेत एकदम म्हणाले, 'साहेब ही बघा झाडाला 'जखम' होऊन राहिली आहे.' आम्ही बघितले, तर झाडावर ओरखडे होते. 'साहेब हे बिबट्याचे काम आहे, तो झाडावर नख्या घासतो. माणसांसारखीच झाडांना पण जखम होते.' हे अगदी सहजपणे मोहतुरे सांगून गेले. ते पुढे असेही म्हणाले, 'बिबट आणि अस्वल यांच्या ओरखड्यामध्ये फरक असतो.' इतक्‍या बारीक सारीक गोष्टी आपल्याला या जंगलभ्रमंतीमध्ये आढळून येतात. यालाच चितमपल्ली सर 'जंगल वाचणे' असे म्हणतात. ते म्हणतात, 'जंगल पाहायचे नसते, न्याहाळायचे नसते, तर अनुभवायचे असते आणि वाचायचे असते. आपण जशी वर्तमानपत्रे वाचतो, तसेच जंगल हे वाचायचे असते, तरच ते तुम्हाला समजते.' 

ते दिवस हिवाळ्यातील होते. नागझिऱ्यात 'नीलय' नावाचे वनविश्रामगृह आहे. पहाटेच आम्ही भ्रमंतीसाठी बाहेर पडलो. नीलयच्या उजवीकडे 'चोरखमारा' रस्ता आहे. त्यावरून आमची पायपीट सुरू होती. रस्त्याच्या कडेला एक भलेमोठे 'White ant' (वाळवीचे) वारूळ होते. चितमपल्ली सर माहिती देत होते. त्या वारुळाची पाती ही दक्षिणोत्तर असतात. आत एकच राणी माशी असते आणि भर उन्हाळ्यातदेखील त्याची वातानुकूल यंत्रणा सुरू असते. आतमध्ये वातावरण थंड असते. ही माहिती ऐकत असताना त्यांनी त्या वारुळाचा थोडा भाग हाताने काढून टाकला. आम्ही बघितले तर आत असंख्य वाळवींची लगबग सुरू होती. वारूळ तसेच सोडून आम्ही पुढे निघालो. आम्हाला जिज्ञासा होती की सरांनी असे का केले असावे? सुमारे तीन तासांनी आमची जंगलातील रपेट संपवून आम्ही परत त्याच वारुळापाशी आलो. चितमपल्ली सर म्हणाले, 'देशपांडे, आता बघा बरे तुम्हाला या वारुळात काय फरक जाणवतोय.' आश्‍चर्य म्हणजे तीन तासांपूर्वी सरांनी वारुळाचा जो भाग काढला होता, तो जसाच्या तसाच परत वाळवींनी बांधून काढला होता. नुकताच बांधलेला फक्त तेवढाच भाग हा ओला होता. म्हणजे त्यावरची माती ओलसर होती. आधीची वारुळाची रचना आणि नवीन बांधलेला भाग यात तसुभरही फरक नव्हता. जिज्ञासा आणि अरण्यवाचन म्हणजे काय याचे आपोआप उत्तर मिळाले होते. 

जंगलात विलक्षण शांतता असते आणि आपल्याला अशा शांततेची सवय नसते. पानांची वाऱ्यामुळे होणारी सळसळ जनावरांचे नेहमीचे किंवा अलार्म कॉल्स, पाणी वाहत असेल तर होणारा आवाज, पक्ष्यांचे बोलणे आणि क्वचित प्रसंगी प्राणी पक्ष्यांची एकमेकांशी होणारी भांडणे या व्यतिरिक्त वेगळा आवाज जंगलात फारसा नसतो. पेट्रोलच्या जिप्सीच्या आवाजाला प्राणी सरावलेले असतात, पण ती गाडी सुरू होतानाचा आवाजही त्यांना दचकायला भाग पाडतो. काही हौशी आणि अज्ञानी माणसे जंगलभ्रमंतीच्या वेळेस सतत बडबडत असतात. गाइड एखादा पक्षी दाखवतोय, काही माहिती सांगतोय याकडे त्यांचे लक्षच नसते. आपले घरचे प्रॉब्लेम सांगायला/सोडवायला जंगल हे योग्य ठिकाण नाही हे त्यांना समजतच नाही. एक तर त्यांना फक्त वाघ/बिबट बघायचा असतो. गाइड अशा मंडळींना योग्य ती समज देतो, पण पालथ्या घड्यावर पाणी. जंगलात आपण केलेली कुजबूजसुद्धा प्राण्यांना दूरवर ऐकू येते. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने या शांततेचा भंग करायचा आपल्याला हक्क नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. 

एकदा ३१ डिसेंबर आणि 'पौर्णिमा' 
असा दुग्धशर्करा योग आम्ही नागझिऱ्याच्या जंगलात साजरा करायचा ठरवला. तळ्यावरच्या झाडीतून चंद्रबिंब पूर्ण वर आले होते. आम्ही शांतपणे ते न्याहाळत होतो. इतक्‍यात आरडाओरडा करत दोन मोटार हॉलिडे होमपाशी आल्या. त्यातून मद्यधुंद अवस्थेतील काही तरुण/तरुणी उतरले. बरोबर असलेले ढोल-ताशे वाजवायला सुरुवात केली. हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इअरचा जयघोष आणि अचकट नृत्य सुरू होते. माझे पित्त खवळले. मी त्यांना आवाज न करण्याबद्दल ताकीद द्यायला गेलो, तर चाकू घेऊन एकजण माझ्या अंगावर धावून आला. फॉरेस्ट गार्डमध्ये पडला आणि त्याने मला सांगितले, 'साहेब, ही थोरामोठ्यांची पिलावळ आहे. तक्रार करूनही काही उपयोग नाही. तुम्हाला मारहाण करतील.' आम्हाला नाइलाजाने त्यांना घाबरावे लागले. गप्प बसावे लागले. आता आता पुढचे ४-५ दिवस एकसुद्धा प्राणी इथे फिरकणार नव्हता, इतका मोठ्ठा आवाज या माणसांनी केला होता. शेवटी तर त्यांनी उघड्यावरच स्वयंपाक केला आणि पहाटेच्या सुमारास उघड्यावरच झोपले. जंगलाचे, अभयारण्याचे सर्व नियम त्यांनी धुडकावून लावले होते. आमच्या पुढे हताश होऊन गप्प बसण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला चंद्राच्या साक्षीने निरोप देण्याचा आमचा मनसुबा या बेशिस्त आणि मूर्ख मंडळींनी उधळून लावला होता. आम्ही 
दुसऱ्या दिवशी जंगलातून विषण्ण मनाने निघालो खरे, पण साकोलीपर्यंत एकही प्राणी दिसला नाही. 

जंगलाच्या या नीरव शांततेचा भंग करण्याचा अधिकार कोणासही नाही. जंगलात जायचे असेल, तर त्याचे नियम हे पाळलेच पाहिजेत, तरच जंगलाची शांतता आणि पावित्र्य टिकून राहील. मी आणि माझे सहकारी जंगलात जातो ते एका उदात्त भावनेने, निसर्ग देवतेच्या मंदिरात एका पवित्र भावनेने आणि जंगल मला खूप भरभरून देते. मी एक दिवस जंगलात राहिलो तर माझे आयुष्य पंधरा दिवसांनी वाढते. तुम्हाला वाढवायचेय आपले आयुष्य...? तर मग जा जंगलात!  

संबंधित बातम्या