पाठलाग आणि हुरहूर (पूर्वार्ध)

विवेक देशपांडे 
सोमवार, 13 जुलै 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

निसर्गाने मध्यप्रदेशवर आपला वरदहस्त ठेवला आहे. कान्हा, बांधवगड, पेंच, पन्ना यांसारखी अभयारण्ये म्हणजे मध्यप्रदेशची श्रीमंती आहे. कान्हाला भेट न देणारा निसर्गप्रेमी विरळाच! माझी तर या जंगलाची पारायणे झाली आहेत. कितीही वेळा गेलो, तरी परत परत जावेसे वाटणारे हे कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे. याला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली आहे, म्हणूनच या जंगलाकडे निसर्गप्रेमींचा आणि पर्यटकांचा सतत ओघ सुरू असतो. बरेच परदेशी पर्यटक खजुराहो आणि कान्हामध्ये पाहायला मिळतात. ९४० स्वेअर किमीचे कोअर (गाभा) क्षेत्र आणि १००९ स्वेअर किमीचे बफर क्षेत्र असलेले विस्तीर्ण जंगल आहे. मध्य भारतातील मैकल या (सातपुडा) पर्वतरांगांमध्ये वसलेला हा व्याघ्रप्रकल्प अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आणि पक्षी यांनी समृद्ध आहे. विशेषतः याला सात वृक्षांचे आणि बारा शिंग्यांचे जंगल म्हटले जाते. उंच पर्वतराजी, दऱ्या, ब्राह्मणी दादरसारखे उंचावरचे पठार, श्रवणतालसारखे काही तलाव यांनी कान्हाच्या वैभवात भर टाकली आहे.   

  तो डिसेंबरचा महिना होता. माझा मिलिंद गुप्ते नावाचा पक्षितज्ज्ञ मित्र आहे. त्याने विचारले, ''विवेक, मी फॅमिलीबरोबर कान्ह्याला चाललोय, येतोस का?'' मिलिंदसारख्या तज्ज्ञ मित्राने विचारल्यावर नाही म्हणायचा वेडेपणा मी नक्कीच करणार नव्हतो. मीही आमच्या ''सौं''ना विचारले आणि तिचाही होकार आला. आम्ही जाणार हे आमच्या मित्रमंडळींत पसरले आणि अजून काही ''नवशे'' आम्हाला या सहलीत सामील झाले. यात आमची एकच पंचाईत झाली, ती म्हणजे माझ्या मुली मृण्मयी (वय ८ वर्षे) आणि गौतमी ( वय ३ वर्षे) यांनीही येण्याचा हट्ट धरला. त्यांनाही न्यावे लागणार हे लक्षात आले. तशी मृण्मयी चार वर्षांची असताना माझ्याबरोबर ऐन बर्फात मनालीला आली होती, पण गौतमीला अशी सवय नव्हती. पण हे ''जुळ्यांचे दुखणे'' होते. जंगलात वाघ असतो ही भीती घालून झाली. पण मला वाघच बघायचा आहे, असे म्हटल्यावर पालकांची जी पंचाईत होते, ती स्वीकारून आम्ही १२ जणांनी कान्ह्याकडे कूच केली.    

  किसलीच्या ''भगीरा लॉग हट्स''मध्ये आमचा मुक्काम होता. कान्ह्याचा हिवाळा हा हाडे गोठवणारा असतो. मला आठवतेय त्यावेळेस तापमान दोन डिग्रीपर्यंत खाली आले होते. सकाळी सहा वाजता जिप्सीत बसणे म्हणजे मनालीच्या बर्फात बसण्यासारखे होते. एकंदरीत ही थंडी पाहता सर्व बच्चे कंपनीला रेस्ट हाउसवर ठेवायचे ठरले आणि आमच्यापैकी एकाने त्यांना सांभाळण्यासाठी रेस्ट हाउसवरच थांबायचे ठरवले. स्वेटर, कानटोपी, हातमोजे, कानात कापसाचे बोळे या सर्व थंडीच्या आयुधांसह आम्ही मार्गस्थ झालो. थोड्या वेळाने ऊन पडले आणि समोरच्या कान्हा मैदानात सुमारे १०० चितळांचा कळप चरताना दिसला. सोनेरी-तांबूस रंगाची पाठ आणि त्यावरील पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी सकाळच्या कोवळ्या उन्हात चकाकत होती. सगळ्यांच्या माना खाली होत्या. सकाळची न्याहारी सुरू होती. आम्ही जवळ जाऊन थांबलो. फोटो काढताना शटरच्या नाजूक आवाजानेही त्यातील काही जणांनी माना वर करून आमच्याकडे पाहिले... छान पोज मिळाली होती. सारे काही विलक्षण होते, कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर चितळे फक्त कान्ह्यालाच पाहायला मिळतात. कान्हाला कधीकधी गमतीने ''डिअर पार्क'' असेही संबोधले जाते. आम्ही तिथून निघालो. वाटेत एक भलामोठा वानरांचा कळप ''रास्ता रोको''साठी बसला होता. ड्रायव्हरने अगदी जवळ गाडी नेल्यावर नाइलाजाने ते उठले आणि साताच्या झाडांवर भराभर चढून बसले. त्यांच्या ''सन बाथ''वर आम्ही गदा आणली असल्याने नाराज झाले असावेत कदाचित!     

  एके ठिकाणी झाडाच्या फांदीवर ''नीलपंख'' (Indian roller) बसला होता. स्वच्छ सूर्यप्रकाशात त्याचा फोटो काढणार इतक्यात तो उडाला आणि त्याचे ते फिक्कट आणि गडद रंगाचे पसरलेले पंख पाहून त्याचे ठेवलेले नाव किती सार्थ आहे याची प्रचिती आली. सूर्यप्रकाशात तर त्याचे ते पंख आकाशातून विहार करणाऱ्या ''नीलपरी''सारखे भासत होते. हळद्या, पॅराकिट्स, कोतवाल, पॅरडाइज फ्लाय कॅचर या पक्षांना निसर्गाने किती छान छान रंग दिले आहेत. जंगलात या पक्षांची ही रंगपंचमी पाहताना मन हरपून जाते. इतक्यात समोरच्या बाजूने एक जिप्सी येऊन थांबली. त्यांचा ड्रायव्हर आमच्या ड्रायव्हरला म्हणाला, ''भैय्या, घुमा लो गाडी और कान्हा चलो. टायगर लोकेट हो गया है.'' आणि क्षणात तो वेगात निघूनही गेला. आमच्या जिप्सीला अचानक नवचैतन्य प्राप्त झाले. सर्वांचे चेहरे हर्षाने अगदी फुलून गेले आणि आम्हीही कान्ह्याच्या दिशेने निघालो. तिथे पोचल्यावर लक्षात आले, की तिथून एक किमी अंतरावर एक वाघीण लोकेट झाली असून ''टायगर शो'' सुरू आहे.    

  कान्ह्याचे वन कर्मचारी आणि पाच, सहा हत्ती भल्या पहाटे विविध संभाव्य ठिकाणी आणि दिशांना वाघ शोधायला बाहेर पडतात. ज्या ठिकाणी वाघ दिसतो म्हणजे तो किल्वर असतो, नुसताच बसलेला असतो किंवा चालत असतो. याची सूचना ते नियंत्रण कक्षाला आणि इतर माहुतांना देतात. दरम्यानच्या काळामध्ये दिसलेल्या वाघाला जखडून ठेवण्याचे काम हत्ती करतो. तोपर्यंत त्याला इतर एक-दोन हत्ती येऊन मिळतात आणि त्या वाघाला किंवा वाघिणीला अक्षरशः जखडून ठेवतात. जणू काही त्याला ''नजर कैदेतच'' ठेवले जाते. एव्हाना ही खबर सगळ्या जिप्सिंना पोचलेली असते आणि जो तो गाइड ''टायगर शो''ची तिकिटे काढण्यासाठी धडपडू लागतो. आम्हालाही सहा जणांना १०० टक्के वाघ बघण्याचा परवाना मिळाला. आता पुढचे काम म्हणजे जिथे हा शो होणार असतो, तिथे जाऊन नंबर लावून बसावे लागते. आम्ही गेलो तेव्हा आमच्या आधी तिथे पाच गाड्या होत्या. काही क्षणातच आमच्यामागेही १०-१२ गाड्यांची रांग लागली.   

  ''टायगर शो'' सुरू झाला होता. जंगलातून हत्ती यायचा, त्यावरून चार माणसे उतरायची, नवीन चार माणसे त्यावर हौद्यामध्ये बसायची आणि रस्त्यापासून दूरवर जंगलात हत्ती दिसेनासा व्हायचा. काही मिनिटांतच चेहऱ्यांवर उत्साहाचे, आनंदाचे, समाधानाचे असे विविध भाव घेऊन विजयी वीरांसारखे पर्यटक परत यायचे. काही वेळातच आमचाही नंबर लागला. मुद्दामच आम्ही चार मित्रांना प्रथम जायची संधी दिली. ते आम्हाला सोडून निघाले. आता गाडीत मी आणि माझी पत्नी प्रतिभा असे दोघेच जण राहिलो. इतक्यात एक छोटा हत्ती आमच्या रोखाने आला. माहुताने विचारले, ''कोई दो लॉग है तो चलो, बैठो.'' आम्ही दोघेही हत्तीवर बसलो आणि जंगलाकडे कूच केले. काही वेळातच आमच्या मित्रांचा हत्ती परत येताना दिसला. सर्वांचे चेहरे आनंदाने अगदी फुलून गेले होते. त्यांच्या माहुताने सांगितले, ''जल्दी भगावो भैय्या, शेर उठणे के मूड में हैं.'' मला काय होते ते समजले. कारण सुमारे पाऊण तास झाला होता आणि त्या वाघिणीची हालचालच या हत्तीमुळे बंद झाली होती. हत्ती तरी तिला कितीवेळ डांबून ठेवणार? शेवटी जंगलाचा राजा तो! आम्ही वाघिणीपाशी पोचलो. ती बसली होती, पण बरीच ''डिस्टर्ब'' झालेली होती.   

  इतके हत्ती आणि इतकी माणसे तिचा स्वयंवर मांडल्यासारखे तिला बघून जात होते. माझ्याकडे त्यावेळी ''एम-सेव्हन'' हा पॅनासॉनिक कंपनीचा भला मोठ्ठा व्हिडिओ कॅमेरा होता. मी काही शूटिंग करत होतो. इतक्यात ते उमदे जनावर उठले, तिने हत्तीकडे बघून रागाचा एक कटाक्ष टाकला आणि चालू लागली. कशाचीही परवा न करता. आमचा एकाच हत्ती त्यावेळी तिथे होता. माहुताने वाघिणीचा पाठलाग सुरू केला. कारण त्या वाघिणीला काहीही करून थांबवायचे होते, मागे सुमारे १०-१२ गाड्या म्हणजे ६०-७० मंडळी होती. त्यांना वाघ दाखवायला पाहिजे होता. माहूत हत्तीशी बोलत होता, ''पिछा करो, पिछा करो उसका.'' आणि वेगात तिच्या मागे लागला. ही सर्व थरारक घटना माझ्या कॅमेऱ्यात कैद होत होती. घनदाट जंगलात हा खेळ सुरू होता. हत्ती बेभानपणे तिचा पाठलाग करत होता. कधी डोंगरावर तर कधी उतारावर. माझी व प्रतिभाची चांगलीच फरफट चालली होती. कारण झाडांच्या फांद्या चेहऱ्यावर आपटत होत्या, तर कधी डोक्यात लागत होत्या. मी कॅमेऱ्यात फक्त शूटिंग करत होतो. त्यामुळे मला हे काहीच दिसत नव्हते. एका क्षणी वाघिणीचा पेशन्स संपला आणि ती हत्तीवर चाल करून आली. प्रतिभा थोडी घाबरली होती. त्या क्षणी या घनदाट जंगलात एक वाघीण, एक हत्ती आणि केवळ तीन माणसे होती. मोठा बिकट प्रसंग होता. माहूत आम्हाला सांगत होता, ''डरो मत, कुछ नहीं करेगी ओ, सिर्फ डरा रही है अपनेको.'' पण हा उपदेश ऐकण्याची ती वेळ नव्हती. माहुताच्या हत्तीला सूचना देणे सुरूच होते. ''दबोच ले उसको, छोडना मत!'' हत्ती आपल्या मालकाच्या सूचना तंतोतंत पाळत होता.    

  माझा कॅमेरा कधी आकाशात तर कधी धरतीवर अशा अवस्थेत होता. जवळजवळ तीन किलो वजनाचे ते कॅमेऱ्याचे धूड खांद्यावर ठेऊन शूटिंग करणे म्हणजे एक कसरतच होती. माहूत हत्तीला आणि प्रतिभा मला सूचना करीत होती. जवळपास अर्धा तास हा पाठलाग सुरू होता. पण शेवटी वाघिणीने गुंगारा दिलाच. थोडा वेग वाढवत ती जंगलात दिशेनाशी झाली. एका अत्यंत चित्तथरारक प्रसंगाचे मी आणि प्रतिभा साक्षीदार झालो होतो. इतक्या अनपेक्षित घटनेचे सर्व शूटिंग माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. वाघाचा पाठलाग काय सोपी गोष्ट आहे का? पण आम्ही तो केला होता. आमच्या माहुताच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत होती. कारण आता वाघ दाखविल्याबद्दल मिळणारी बक्षिशी कमी मिळणार होती. आम्ही जिथे गाड्या थांबवल्या होत्या, तिथे आलो. तोपर्यंत वाघीण निघून गेल्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोचली होती. काहींनी आम्हाला, ''आप बडे नसीबवाले है'' अशा ''नाराजी कम शुभेच्छा'' दिल्या. दुसरा एक माहूत म्हणाला, ''सच्ची साब, ऐसा नजारा तो मुश्किलसे ही देखणे को मिलता हैं.'' आता मात्र ही क्रूर प्रथा बंद झाली आहे. कारण अनैसर्गिकरित्या त्या वाघाला जायबंदी करायचे आणि माणसांनी येऊन त्याचे दर्शन घ्यायचे, ही काय वाघ बघण्याची पद्धत झाली का?

संबंधित बातम्या