पाठलाग आणि हुरहूर

विवेक देशपांडे 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!

कुठेतरी जंगलात फिरताना अचानक सांबराचे किंवा चितळाचे अलार्म कॉल ऐकू येतात. चितळे कान टवकारून एकाच दिशेला बघतात. वानरांचेही ओरडणे सुरू होते आणि उत्कंठा वाढवीत एका क्षणी त्या रुबाबदार राजाचे आगमन होते. तो क्षण म्हणजे खऱ्या अर्थाने वाघ बघणे होय. कधीतरी केलेल्या शिकारीवर तासनतास तो बसून असतो; ते पाहणे किंवा जंगलातील त्या कच्च्या रस्त्यावरून आपल्या जिप्सीच्या समोरून बराच वेळ आपल्याकडे लक्ष न देता चालत चाललेला वाघ पाहण्यात जी गंमत आहे, ती दोरीविना बांधून ठेवलेल्या वाघाला बघण्यात अजिबातच नाही. खरा निसर्गप्रेमी हा फक्त वाघच बघायला कधीच जंगलात जात नाही. फक्त वाघ आणि बिबट म्हणजे जंगल सफारी नव्हे, हे लोकांना केव्हा समजणार? आम्ही लॉग हट्सवर परत आलो. एव्हाना मृण्मयी आणि गौतमीला समजले होते, की आम्ही वाघ बघितला. त्यांचे वय अजून हट्ट करण्याचे होते. आम्ही संध्याकाळी तुमच्याबरोबर येणार असा किंचित हट्ट सुरू झाला. ‘हो, नेऊ हं तुम्हाला,’ असे म्हणून वेळ मारून नेली. मात्र अडीच वाजता दोघीही तयार झाल्या. आता दुपार असल्याने आणि थंडीची तीव्रता तशी कमी असल्याने आम्ही त्यांना घेऊन जायचे ठरवले.  

तीन वाजता सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही किसली गेटमधून आत प्रवेश केला. अर्धा किलोमीटर जातो न जातो तोच सहा-सात जिप्सी थांबल्या होत्या. आम्ही तिथे गेलो आणि क्षणभर अवाकच झालो. समोरच एक मेल टायगर होता आणि त्यानेच केलेल्या सांबराच्या शिकारीवर बसून होता. त्याचे निवांत खाणे सुरू होते. मृण्मयी, गौतमी आणि बरोबरची मंडळी भयंकरच खूश झाली. कारण जंगलात गेल्या गेल्या पाचव्या मिनिटाला वाघ दिसला होता. गाइडने सांगितले, ‘ही शिकार साधारण अर्ध्या तासापूर्वीची आहे.’ भराभर फोटो काढले जात होते, माझे व्हिडिओ शूटिंग सुरू होते. अचानक माझे लक्ष दोन गाड्यांकडे गेले, त्या गाड्यांमध्ये थोडी वयस्कर माणसे होती आणि ती गाइडला सांगत होती, ‘चलो अब वापस जायेंगे, शेर को तो देख लिया..’ गाइड त्यांना समजावत होता, ‘अरे अब तो शुरूवात हैं, अपने पास अभी ढाई घंटा हैं, आप जंगल घुमने नहीं जायेंगे?’ ‘नहीं नहीं, अब क्या देखाना है? शेर तो देख लिया।’ काय म्हणावे या मंडळींना? नशिबाने पहिल्या पाच मिनिटांत आणि तोही ‘किल’वर असलेला वाघ दिसला होता. उरलेल्या वेळात जंगलाचा ‘फील’ घ्यायचा सोडून रेस्ट हाऊसवर जाऊन ताणून द्यायचा क्रांतिकारी विचार या मंडळींचा होता. शेवटी गाइडही हतबल झाला आणि ही बारा मंडळी पाठी फिरली. यापेक्षा करंटेपण काय असू शकते? खरे तर अशा मंडळींनी ‘झू’मध्ये जाणे उत्तम. 

यावेळच्या कान्हा जंगल भ्रमंतीने आम्हाला मात्र वाघांच्या बाबतीत अगदी भरभरून दिले होते. त्या पाचव्या आणि शेवटच्या सफारीमध्येही आम्हाला अजून एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. आम्ही एके ठिकाणी झाडावरचा ‘सर्पगरुड’ पाहत थांबलो होतो. गाइड त्याची वैशिष्ट्ये सांगत होता. समोर एक कुंपण होते. त्याच्या आतमध्ये काही चितळे चरत होती. इतक्यात गाइड म्हणाला, ‘सर बंदर का अलार्म कॉल सुना आपने?’ मला तर जाणवला नव्हता, पण क्षणार्धात चितळे उधळली होती. त्यांच्यापैकी एकानेही अलार्म कॉल दिलेला नव्हता. आम्हाला ही घटना थोडी विचित्र वाटली. काही क्षणातच समोरून वाघ वेगाने चितळांकडे धावत आला आणि जवळजवळ आठ ते नऊ चितळांनी अत्यंत वेगाने कुंपणावरून आमच्या समोर रस्त्यावर उड्या मारल्या. वाघाला आपला वेग कसाबसा आवरता आला. म्हणजे अचानक ब्रेक लावल्यासारखा तो थांबला होता. कुंपणाच्या अलीकडे काही फुटांवर आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावर ‘शिकार हुकल्याचे’ भाव आम्ही स्पष्टपणे पाहिले. ही घटना इतक्या क्षणार्धात घडली होती, की इतर गाड्यांना ती पाहताही आली नाही. या घटनेचे ना फोटो काढता आले ना व्हिडिओ शूटिंग करता आले. आम्ही दिग्मूड या घटनेचे, खरे तर एका अनोख्या घटनेचे साक्षीदार झालो होतो. अशा अनेक घटना रोजच जंगलात घडत असतात. काही भाग्यवंतांना त्या पाहायला मिळतात. बरेच जण मुकतात. मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये आजही ही घटना जशीच्या तशी आहे. शिकार अनेक वेळा पाहिली आहे, पण ‘हुकलेली शिकार’ पाहणे हा योग प्रथमच आला होता.  

नागझिराही माझे अत्यंत आवडते जंगल आहे. ‘दक्षिण विषुववृत्तीय पानगळीचे शुष्क वन’ हा येथील वनाचा प्रकार आहे. या जंगलात साग वृक्ष विपुल प्रमाणात आहेत. त्याचप्रमाणे धावडा, ऐना, तिवस, जांभूळ असे इतरही अनेक प्रकारची वृक्षसंपदा आहे. पावसाळ्यानंतर सर्वत्र हिरवीगार वनवृष्टी दृष्टीस पडते, परंतु मार्चपासून बरेचसे वृक्ष आपला पर्णभार उतरावयाला सुरुवात करतात. एप्रिल-मेमध्ये सर्वत्र ग्रीष्माच्या अमलाची छटा दिसू लागते. जंगलातील वन्यप्राणी अवलोकनाचा हा सर्वात उत्कृष्ट कालावधी समजला जातो. या जंगलात माझ्या ‘ॲडव्हेंचर फाउंडेशन’ या संस्थेने अनेक निसर्ग निरीक्षण शिबिरे आयोजित केली होती. ज्या काळात तिथे वीज नव्हती, त्या काळात आम्ही शिबिराच्या निमित्ताने अनेक दिवस वास्तव्यास होतो. या जंगलात एप्रिल-मी महिन्यांत जंगलातले पाणी आटून जात असे. नीलय या वन विश्रामगृहाच्या समोर जो मोठा तलाव आहे, त्याला मात्र शेवटपर्यंत पाणी असायचे. वन खात्याने या कालावधीमध्ये जंगलातील अनेक पाणवठ्यांवर ट्रॅक्टरने पाणी पुरवठा करणे सुरू केले होते. बशीसारखे आणि थोडेसे खोल असे कृत्रिम पाणवठे ठिकठिकाणी बांधले होते, जेणेकरून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये. आपली तहान भागवण्यासाठी वन्यप्राण्यांना याचा फार उपयोग व्हायचा. तसेच काही निवडक पाणवठ्यांवर ‘मचाण’ही उभी केली होती. या मचाणावर जर आपण थांबलो, तर निश्चितच प्राणी दिसायचे. शिबिरार्थींना ‘केज’मध्ये राहण्याचा अनुभव यावा म्हणून आम्ही त्यांना संध्याकाळच्या सुमारास कपाडा, बंदरचूहा, काटेथुवा, वाकडा बेहडा यासारख्या केजेसमध्ये नेऊन सोडायचो. अट एकच असायची की अजिबात बोलायचे नाही, टॉर्चचा उजेड पाडायचा नाही. येणाऱ्या प्रत्येक प्राण्याचे, पक्ष्यांच्या व इतर आवाजांचे निरीक्षण करायचे. कोणासही रात्री बाहेर येत येऊ नये, म्हणून आम्ही बाहेरून एक कुलूप लावायचो. सकाळी सातच्या सुमारास आम्ही त्यांना परत घेऊन जायचो. सर्व लहानथोर मंडळींना हा अनुभव खूपच चित्तथरारक वाटायचा. संयम आणि सहनशीलता याचा कस लागायचा.  

एकदा असेच बंदरचूहा या ठिकाणी आम्ही दहा निसर्गप्रेमींना दुपारी चार वाजता सोडले. त्यात गौतमी ही माझी मुलगीही होती. ही सर्व मंडळी १० ते १५ वयोगटातील असल्याने रात्रभर त्यांना तिथे ठेवणे बरोबर ठरले नसते. आम्ही त्यांना सोडले, केजला बाहेरून कुलूप लावले आणि रात्री साडेसातच्या सुमारास परत येतो असे सांगून गौतमीच्या हातात एक वॉकीटॉकी दिला आणि कँपवर परत आलो. संध्याकाळी सातच्या सुमारास मी त्यांना परत आणायला निघालो. मंगेझरी रस्त्यावरून बंदरचूहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळलो आणि माझ्या वॉकीटॉकीवर खरखर ऐकू आली. थोडे पुढे गेलो आणि गौतमीचा आवाज ऐकू आला. ‘बाबा, पुढे जपून या, कारण खाली तीन अस्वले आहेत.’ आम्ही पाणवठ्यावर पोचलो. कमांडरचा झोत टाकला तर एक मादी अस्वल आणि तिची दोन पिल्ले तिथे होती. आम्ही वरती सांगितले, की जोपर्यंत अस्वल जात नाहीत, तोपर्यंत तुम्हाला बाहेर काढता येणार नाही. मधूनमधून अस्वले गेली की नाही याची खात्री करून घेत होतो. पण आज त्या तिघांचा मूड काही वेगळाच दिसत होता. केजमधील बच्चे कंपनी आता कंटाळली होती. आम्ही गाडी सुरू केली, दिवे लावले, तर तिन्ही अस्वले समोरच्या ओढ्याकडे जाताना आम्हाला पाठमोरी दिसली. ती पूर्णपणे दिसेनाशी झाल्यावर काही क्षण आम्ही थांबलो. आमचा गाइड ईश्वर खाली उतरला व वरच्या केजकडे गेला. कुलूप काढले आणि सर्वांना सुरक्षित घेऊन आमच्या ‘टाटा सुमो’ गाडीकडे आला. मंडळी घाबरली होती, तरी उत्साहित होती, कारण त्यांना बराच वेळ अस्वले पाहायला मिळाली होती. गाडीत आल्यावर मात्र सर्वांना कंठ फुटले होते. रात्री कँपवर पोचल्यावर मात्र इतर कँपर्सना अस्वलांचे रसभरीत वर्णन करून सांगताना कोणीच कमी पडले नाहीत.  मी कँपवरून ‘नीलय’कडे आलो. जेवण झाल्यावर दिवसभरात कँपवर काय काय घडले, कोण कोणते प्राणी दिसले याची सर्व माहिती मी चितमपल्ली सरांना देत असे. उद्या दिवसभरात कोणते कार्यक्रम आहेत, याची त्यांच्याशी चर्चा केली जायची. नियमानुसार अगदी हलक्या आवाजात जुनी गाणी ऐकत ऐकत सरांना झोप लागायची. मग टेप बंद करून मीही निद्रादेवीच्या अधीन व्हायचो. दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही उठलो, पण ती पहाट जरा वेगळी जाणवली. आकाशात चक्क काळ्या ढगांनी गर्दी केली होती. कुठेतरी दूरवर हलका पाऊस पडल्याचे जाणवले, कारण मातीच्या त्या अत्तराचा सुगंध चराचरात भरून राहिला होता. हा ओला सुगंध हुंगताना मनाला एक तरतरी आली होती. आता उजाडल्याचे जाणवत होते. पण काळ्या ढगांनी सूर्यकिरणांना अटकाव केला होता. वाराही ओलेता होता. अचानक एका रात्रीत बदललेले हे निसर्गाचे रूप पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. पक्ष्यांना पाऊस येणार हे आधीच कळले असावे, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या सुरात गात होता. हॉलिडे होममधून आमचे दोन कँप लीडर्स माझ्याकडे आले. कारण या परिस्थितीत बॅच जंगलात घेऊन जायचे की नाही, याचा खुलासा त्यांना हवा होता. चितमपल्ली सर म्हणाले, ‘या वळवाच्या पावसात जंगलात जाणे धोक्याचे असते. आपण थोडे थांबूया, जर पाऊस थांबला तर नंतरही आपण जाऊ शकतो.’  

हा पाऊस येण्याआधीचा माहोल मला खूपच भावतो. या हवेत एक उत्साह असतो, एक मादकता जाणवते. प्रेयसी येणार हे माहीत असले, तरी त्याआधीची जी मनाची स्थिती असते, तसेच हे वातावरण असते. फार वाट पाहायला न लावता अखेर तो बरसला. ज्या झाडांवर काही पाने शिल्लक होती, त्यांनी बेभान नाचत आनंद व्यक्त केला. काही काही जमिनीवरच्या पालापाचोळ्यांनी आकाशात सूर मारून पावसाचे स्वागत केले. पक्ष्यांची लगबग सुरू होतीच, आता तर ते जास्तच आनंदले... चितमपल्ली सर म्हणाले, ‘विवेक वळवाच्या पहिल्या पावसात भिजणे खूप (लाभदायी) असते.’ मी पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखे आमच्या लीडर्सना सांगितले, ‘लवकर पळत कँपवर जा आणि पूर्ण बॅचला या पावसाचे स्वागत करायला सांगा.. ओलेचिंब होऊन...’ मीही नीलय समोरच्या झाडापाशी गेलो, त्या कोसळत्या धारांना अंगावर झेलण्यासाठी. अरण्यातला हा पहिला पाऊस मी माझ्या हृदयात अजूनही कुपीतल्या अत्तरासारखा जपला आहे...!      

संबंधित बातम्या