मचाणावरील एक पौर्णिमा

विवेक देशपांडे
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

हळूहळू सूर्य पश्चिमेकडे जाण्याची तयारी करू लागला आहे. आकाशात मावळतीचे रंग भरू लागले आहेत. हे रंग जंगलाच्या पार्श्वभूमीवर अधिकच सुंदर दिसत होते. फक्त निष्पर्ण झाडांची किनार आणि गूढ शांतता या निसर्गठेव्यांच्या सान्निध्यात होणारा सूर्यास्त...

आपण सकाळी आणि संध्याकाळी जंगलात भटकंती करू शकतो, पण संध्याकाळी किंवा रात्रभर जंगलात सध्याच्या काळात भटकता येत नाही. प्राण्यांना त्रास होऊ नये, त्यांच्या निशाचरीवर बंधन येऊ नये या हेतूने अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांच्या बाबतीत हे नियम केलेले आहेत. ते योग्यही आहेत. पण वर्षातील एकच दिवस असा असतो, की या दिवशी आपल्याला सलग २४ तास जंगलात राहता येते. मात्र एकाच दिवशी..!

बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाश हा सर्वात जास्त असतो. उघड्या डोळ्यांनी आपण व्यवस्थित पाहू शकतो इतकी प्रकाशमय ही रात्र असते. ही रात्र म्हणजे जंगलातील प्राणी पाणवठ्यावर आपल्याला हमखास दिसण्याची रात्र; म्हणूनच या दिवशी प्राण्यांची गणना करण्याची प्रथा आहे. यामुळेच निसर्गप्रेमींना वेगळ्या पद्धतीने जंगल वाचायचा अनुभव घेता येतो. या गणतीमध्ये अनुभवी तसेच नवखे अशा सर्वांनाच भाग घेता येतो. असाच एक भन्नाट अनुभव काही वर्षांपूर्वी मी माझ्या आवडत्या नागझिरा जंगलात घेतला होता. 

ऐन उन्हाळ्यातील ती एक प्रसन्न पहाट होती. पहाटे उठून आमची तयारी सुरू होती. कारण आज बुद्ध पौर्णिमा होती. या दिवसाची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. एक छान अनुभव या आजच्या दिवस-रात्रीचा घ्यायचा होता. पूर्वी एकदा मेळघाटच्या जंगलात हा अनुभव मी चितमपल्ली सरांबरोबर घेतला होता. त्यानंतर जंगलात भ्रमंती अनेक वेळा झाली होती. मात्र गणनेसाठी जाता आले नव्हते. दिवसभर खरे तर ग्रीष्माच्या दाहक नजरेने नकोसे केले होते, पण तमन्ना होती ती चंद्रप्रकाशात रात्र जागवण्याची..! विदर्भातला तो उन्हाळा.. म्हणजे पाणी पितानाच त्याची वाफ होते की काय असे भासवणारा. थोडा वर आला तरी गरम धूळ डोक्यात जाऊन अंगाची लाही वाढवणारा. अंगे घामाने सचैल भिजली होती. आम्ही न्याहारी उरकून घेतली. कॅमेरा, दुर्बिणी, पाण्याच्या बाटल्या, रात्रीचे जेवण, कलिंगड, गरज पडल्यास एक टॉर्च अशा अगदी आवश्यक वस्तूंसह आम्ही मचाणाकडे कूच केले. 

वनखात्याच्या गाडीने आम्हाला ‘वाकडा बेहडा’ या आत असलेल्या पाणवठ्यावर सोडले. तिथे एका झाडावर एक मचाण खास गणतीसाठी केले होते. आम्ही वरती जाऊन बसलो. आता पुढचे २४ तास तिथे, एकाच जागी, अजिबात बडबड न करता, डोळ्यात तेल घालून बसून राहायचे होते. हे असे येऱ्यागबाळ्याचे काम नसते, आपल्या धीराची आणि सहनशक्तीची परीक्षा असते! पण हा अनुभव निसर्गप्रेमींनी एकदा तरी घ्यायला हवा. दुपारी १२ ते संध्याकाळी ६ पर्यंत आम्ही बसलो होतो ते केव्हा एकदा ही आग ओकणारी दुपार संपतेय अशी वाट पाहत! मात्र ती सुसह्य झाली ती आमच्या जंगलप्रेमी मित्रमैत्रिणी यांच्या सहवासात. जरा पाचोळा हलला की आम्ही लगेच सावध होऊन आवाजाच्या दिशेने पाहायचो... आणि हमखास दर्शन व्हायचे!

अशीच दुपारी तीनची वेळ. सुमारे तीन तास स्तब्ध बसून झाले होते. थोडासा आवाज झाला म्हणून पाहिले तर चितळांचा एक मोठा कळप दबकत दबकत पाणवठ्यावर येत होता. सुमारे सहा सात माद्या, दोन नर आणि चार पाडसे होती. नर आधी आले. त्यांनी चौफेर नजर टाकली, जणू खात्री करून घेतली. मग त्यांनी पाणी प्यायला सुरुवात केली. मधेच जरा जरी आवाज झाला तरी ते सावध होत. त्यांनी मनसोक्त पाणी उदरात भरून घेतले आणि मग थोडे बाजूला जाऊन उभे राहिले. सर्व माद्या आणि पाडसे एकाच वेळी आली आणि पाणी प्यायला सुरुवात केली. आज जंगलात गाडीचा कोणताही आवाज नव्हता त्यामुळे न भिता तो कळप पाणी पीत होता. हा क्षण टिपावा म्हणून मी कॅमेरा फोकस केला, तर त्या नाजूकशा क्लिक अशा आवाजानेही ते सर्व सावध झाले आणि चक्क आमच्या दिशेने पाहू लागले. तोही क्षण टिपावा म्हणून मी कॅमेऱ्याचे बटण भीत भीत दाबले, पण तेवढ्या आवाजानेही धोक्याची जाणीव झाल्यासारखे सर्व जण उधळले. मला माझी चूक लक्षात आली. उद्या १२ पर्यंत एकही फोटो काढायचा नाही असे ठरवले. आपण इथे फोटो काढण्यासाठी आलेलो नाही तर गणनेसाठी आलो आहोत, याचे भान ठेवायला हवे असे स्वतःला दटावले. प्राणी मोजायचे, मनमुराद पाहायचे आणि नोंदवहीत टिपण करायचे हे मनोमन ठरवले. अशारीतीने पाणी पिताना प्राण्यांना त्रास देणे हे सच्च्या निसर्गप्रेमींचे लक्षण नव्हे.. पण जो चुकतो तो माणूस..! 

थोडा वेळ शांततेत गेला. रानकोंबड्यांच्या आवाजाने सारे जंगल दणाणले. एक नव्हे तर दोन! कदाचित ती नर मादीची जोडी असावी. ते दोघे पाण्यावर आले. हे दृश्य मी प्रथमच पाहत होतो. जंगलात भटकताना यांचा आवाज बरेच वेळा ऐकायला येतो. अनेकदा ओझरते दर्शन होतेही.. मात्र माणसे दिसताच, गाडीची चाहूल लागताच हे वेगाने नाहीसे होतात. त्यांचे फोटो काढणेही अवघड असते. आज संधी होती. परंतु, मगाचच्या अनुभवाने मी शहाणा झालो होतो. त्या दोघानींही पाणी प्यायले आणि पाण्यात थोडा वेळ बसलेही. इतका वेळ मला या रानकोंबड्या बघता आल्या यातच मी समाधानी होतो. एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती. अचानक आपण थर्मास आणला आहे आणि त्यात चहा आहे याची आठवण झाली. म्हणून तल्लफ अली. आवाज न करता चहापान उरकले; त्यानेही उगाचच ताजेतवाने झाल्यासारखे वाटले.  

परत एकदा वाळलेला पालापाचोळा कुरकुरला आणि आम्ही कान टवकारले. महाकाय सांबरांच्या तीन माद्या अत्यंत सावधपणे पाण्यावर येत होत्या. मधूनच काही क्षण थांबत, आजूबाजूला संशयी नजरेने पाहत, खात्री करून त्या एकदाच्या आल्या. पाणवठ्यावर या तृणभक्षी जनावरांना कायमच शत्रूची भीती असते. वाघ, बिबट्या, रानकुत्री कुठे दबा धरून बसलेले असतील याची शाश्‍वती कधीच नसते. त्यामुळे पाणी पिताना त्यांचा कायमच सावध पवित्र असतो. या तिघीनींही भरपूर जल प्राशन केले आणि काय मनात आले कोणास ठाऊक, काठावरच्या चिखलात मनसोक्त लोळल्या. नुकतेच धुळवड खेळून आलेल्या माणसांसारख्या दिसत होत्या त्या सांबर माद्या! उन्हाचा दाह कमी करणे आणि किडे, माश्या यांच्यापासून संरक्षण असा दुहेरी हेतू असतो या चिखलात लोळण्यामागे. मारुतराव चित्तमपल्ली अशा जागांना ‘सांबराचं लोटण’ असे म्हणतात. 

या सांबर दर्शनानंतर लक्षात आले, की हळूहळू सूर्य पश्चिमेकडे जाण्याची तयारी करू लागला आहे. आकाशात मावळतीचे रंग भरू लागले आहेत. हे रंग जंगलाच्या पार्श्वभूमीवर अधिकच सुंदर दिसत होते. कोणताही आवाज नाही, धूर, इमारती नाहीत, फक्त निष्पर्ण झाडांची किनार आणि गूढ शांतता या निसर्गठेव्यांच्या सान्निध्यात होणारा सूर्यास्त अधिकच विलोभनीय दिसत होता. पूर्वक्षितिजावर भल्यामोठ्या पिवळसर चंद्राचेही आगमन झाले. चंद्राचाही लख्ख प्रकाश तेव्हा अनुभवायला मिळाला. हाच चंद्र रात्रभर आमची विजेरी होता. माझ्या कितीतरी पौर्णिमा अशा जंगलांत साजऱ्या झाल्या आहेत. पण कोणतीच एकसारखी दुसरी नाही. प्रत्येक पौर्णिमा ही दरवेळी नवी भासते, नवा अनुभव देते. 

संबंधित बातम्या