मचाणावरील एक पौर्णिमा (उत्तरार्ध)

- विवेक देशपांडे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

दोन्ही अस्वले पाण्यातून बाहेर आली आणि त्यांनी जमीन हुंगायला सुरुवात केली. काही क्षणात ती दोघेही मचाणाच्या रोखाने येऊ लागले. अगदी मचाणाच्या खाली थांबले. माझ्या हृदयाचे ठोके मला स्थेतोस्कोप न लावताही ऐकू यायला लागले. अस्वलांना झाडावर चढता येते हे त्यावेळी उगाचच आठवले... 

बुद्ध पौर्णिमेला नागझिरामध्ये प्राण्यांची गणती करण्याची संधी मिळाली होती. सकाळपासून आम्ही मचाणावर बसलो होतो. आता वातावरणात जरा शीतलता आली होती. दिवसभर वाहिलेल्या घामाच्या धारा आता जरा आटल्या होत्या. चंद्रप्रकाश झाडांच्या पानांतून झिरपत होता. काही प्रकाश फांद्यांवरतीच रेंगाळला होता, तर काही जमिनीवरच्या पानांवर येऊन थांबला होता. त्या पानांत ही नवी जान आली होती. रात्र चांदीची होती. या सर्व वातावरणात आम्ही मात्र बुद्धासारखे स्थितप्रज्ञ होऊन मचाणावर बसून होतो. हुं की चू करायचे नाही याचा प्रत्यय घेत होतो. 

त्या चंद्रप्रकाशात नुसत्या डोळ्यांनीही जंगल स्पष्ट दिसत होते. गणनेसाठी बुद्ध पौर्णिमा का निवडतात ते अगदी पटले. आता रातकिड्यांचे गाणे सुरू झाले. रातव्याचा तो कप्पू.. कप्पू.. कप्पू.. असा आवाज सुरू झाला. लांबवर कुठेतरी ग्रे हेडेड फिशिंग ईगल म्हणजे राखी डोक्याचा मत्स्य गरुड याचाही आवाज कानाला जाणवला. चंद्र अजून थोडा वर आला. मी आणि माझ्या बरोबरच्या सर्वांनी पाणी पिऊन घेतले. या रात्रीच्या जंगलाला एक वेगळाच सुगंध असतो. तो हुंगायला मात्र तिथेच जावे लागते. आता आम्हाला रात्र जगायची होती. खरे तर एका जागी बसून कंटाळा आला होता. पण रात्रीच्या या जंगलाच्या दुनियेची ही सफर (एका जागी बसून) करायला तर आम्ही आलो होतो.  

तेवढ्यात अचानक पालापाचोळ्यावर जोरदार पायांचा आवाज येऊ लागला. मला नेमके समजत नव्हते, पण आमचा अनुभवी गाइड ईश्वर म्हणाला, ‘साहेब गवरेडा येऊन ऱ्हाइलाय.. आनी मोटा कडप जवडच हाये.’ हे वैदर्भीय मराठी अर्थातच समजू लागले होते. काही क्षणातच ऐटीत सुमारे ३०-३५ गव्यांचा कळप पाणवठ्यावर आला. नर माद्या वेगळ्या मोजल्या नाहीत. पण सुमारे ८ बच्चे कंपनीही होती. दुर्बिणीतून त्यांचे ते प्रचंड देह अगदी जवळ भासले. वानर, चितळ, मोर किंवा सांबर कोणताच प्राणी आवाज करीत नव्हते म्हणजे वाघ आसपास नसावा... या निश्चित जाणिवेतूनच ही सर्व मंडळी निवांतपणे पाणी पीत होती. खाली त्यांचे जलपान आणि वरती आमचे.

याच दरम्यान एक विचित्र घटना घडली. पाणी पिताना ईश्वरला ठसका लागला आणि त्याचा मोठा आवाज झाला. त्या शांततेत इतक्या टिपेच्या आवाजाला गवे घाबरले. त्यांनी आमच्या रोखाने पहिले आणि धूम पळायला सुरुवात केली. काही क्षणातच पाणवठा रिकामा झाला. ईश्वरला काही सुचेना. तो खजील झाला. अनेक वेळा ‘स्वारी सर, स्वारी सर,’ म्हणून झाले. ठसका लागणे ही नैसर्गिक गोष्ट होती. पण आपल्यामुळे जनावरांना पाणी पिता आले नाही याचेच त्याला वाईट वाटत होते. या आदिवासींचे जंगलावरील प्रेम आणि प्राण्यांप्रती असलेली निष्ठाच त्याच्या या ‘स्वारी सर’मधून व्यक्त होत होती. मनात आले, की भर दिवसा अगदी हरणांचा कळप दिसला तरी मोठ्यांनी आवाज करणारे पर्यटक आणि गोंधळ घालून त्यांना त्रास देण्याचा हेतू असणारे दिखाऊ निसर्गप्रेमी आणि जंगलात वाढलेला एक अशिक्षित आदिवासी... किती मोठा फरक आहे त्यांचा वागणुकीत! ईश्वर म्हणाला, ‘साहेब आता थोडा वेळ कोणीच न्हाई येनार हिते.’ मी त्याला समजावले, पण तो नकळत झालेल्या चुकीनेही फारच खजील झाला होता. 

चंद्र आता चांगलाच वर आला होता. घड्याळात बघितले तर ९ वाजले होते. आता भुकेची जाणीवही व्हायला लागली होती. आमच्या जेवणाचा पराठे, दाण्याची चटणी आणि दही इतका साधा मेनू होता. पोटपूजा उरकून घेतली. या काळात परत एकदा चितळांचा कळप पाणी प्यायला येऊन गेला. त्यांच्या पाठीवरचे ठिपके त्या चंद्रप्रकाशात उठून दिसत होता. सुमारे ११ वाजता ईश्वरने माझा हात धरला आणि दबक्या आवाजात म्हणाला, की काहीतरी येऊन ऱ्हाइलंय.. आवाज बघा कसा येतोय. मी आवाजाच्या दिशेने पाहिले तर एक काळी मोठी आकृती दिसली. मी म्हटले, ‘ईश्वर अस्वल तर नसेल?’ त्यानेही बघितले आणि म्हणाला, ‘होय साहेब, कशी डुलत डुलत येतेय, अस्वलीच हाये.’ ती आली आणि सरळ पाण्यातच  

जाऊन बसकण मारली. मला तर खूप आनंद झाला. काही क्षणातच एक अस्वलही येताना दिसले. त्यानेही आल्यावर भरपूर पाणी पिऊन घेतले. मग दोघांची मस्ती सुरू झाली. पाण्याचा त्यांच्या हातापायांनी होणारा आवाजही खूप मोठा वाटत होता. थोड्यावेळाने दोघे बाहेर आले आणि जमीन हुंगायला सुरुवात केली. जंगलामध्ये दिवसा अस्वले अनेक पहिली आहेत. पण रात्रीच्या चंद्रप्रकाशात पाहण्याची पहिलीच वेळ होती.   

काही क्षणात ती दोघेही मचाणाच्या रोखाने येऊ लागले. अगदी मचाणाच्या खाली थांबले. माझ्या हृदयाचे ठोके मला स्थेतोस्कोप न लावताही ऐकू यायला लागले. त्यांना कदाचित आमचा वास आला असावा किंवा आम्ही तिथे असण्याची जाणीव झाली असावी. अस्वलांना झाडावर चढता येते हे त्यावेळी उगाचच आठवले. आम्ही दोघेही निस्तब्ध झालो. कोणतीही हालचाल केली नाही. सुमारे १५ मिनिटे ते दोघेही तिथेच होते. काही वेळाने परत एकदा ते पाणवठ्यापाशी गेले आणि मग जंगलात दिसेनासे झाले. आम्ही घाबरलो होतोही आणि नाहीही. अस्वलांच्या खूप कथा ऐकल्या होत्या. मात्र ते आठवण्याची ही वेळ नव्हती. मात्र एका छान आणि थोड्या चित्तथरारक प्रसंगाचा मी साक्षीदार नक्कीच झालो होतो. आता लिहायला सोपे वाटते आहे, पण त्यावेळेला...! 

साडेअकरा-बाराचा सुमार असेल. डोळ्यावर थोडी झापड होती. रातवा, पिंगळे यांचा आवाज सुरूच होता. इतक्यात दूरवर कुठेतरी सांबाराचा ‘अलार्म कॉल’ आल्याचे जाणवले. आम्ही कान टवकारले तर चितळांचाही कॉल येऊ लागला. डोळ्यावर आलेली पेंग पटकन नाहीशी झाली. यांचे कॉल म्हणजे कुठेतरी वाघ, बिबटे किंवा रानकुत्र्यांची हालचाल सुरू झाल्याचे संकेत होते. आता यापैकी कोणाचे दर्शन होते याची उत्सुकता लागली होती. काही वेळाने आवाज बंद झाले. ईश्वर म्हणाला, ‘साहेब, जनावर बसलं जणू, कोणास माहीत हिकडे येत का नाही.’ बराच कालावधी गेला आणि वानरांचे ख्याक ख्याक सुरू झाले. चिताळानेही भयसूचक आवाज परत सुरू केला. आमच्या आशा परत पल्लवित झाल्या. यावेळेस आवाज जरा जवळून येतोय असे वाटले. सुमारे ५ मिनिटे लंगूर आणि चितळांचे सावध कॉल्स ऐकू येत होते. नंतर परत एकदा थांबले. अर्धापाऊण तास झाला. पण तसेच काही घडले नाही. ‘आता तो नाय येऊन राहिला,’ ईश्वर पुटपुटला. मला अजूनही पौर्णिमेच्या त्या उजेडात अंधुकशी आशा होती. 

पण... आम्हाला वाघाने फसवले होते. तरी ती वाट पाहण्यातली मजा, आशा निराशेचा खेळ, हा सगळा भन्नाट अनुभव होता. हा अनुभव घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी एखादी रात्र मचाणावर घालवायलाच पाहिजे. गणनेचा हा थरार प्रत्येक वन्यजीवप्रेमीने अनुभवलाच पाहिजे. थर्मासमधला राहिलेला चहा पुन्हा एकदा पोटात गेला. सूर्यप्रभा फाकायला सुरुवात झाली होती. रानकोंबड्यांनी सवयीनुसार बांग दिली. सातभाईंची लगबग सुरू झाली. वेडे राघू पाण्यात नाचू लागले.   

प्रत्येकजण आपापल्या परीने दिवसाचे स्वागत करू लागला. आम्हाला मात्र अजूनही तीन चार तास तिथे ठाण मांडून बसून राहायचे होते... अजून कोणीतरी पाणवठ्यावर येईल या आशेने!

संबंधित बातम्या