उन्हाळ्यातले पेंच

विवेक देशपांडे
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!
विवेक देशपांडे

हिवाळ्यातील पेंचनंतर लगेचच मे महिन्यात परत एकदा पेंचचा योग जमून आला. जंगल भ्रमंतीच्या बाबतीत मिळालेली कोणतीच संधी मी सोडत नाही. हे उन्हाळ्याचे दिवस होते, फक्त पहाटेच किंचित गारवा, दिवसभर मात्र अंगाची काहिली होत होती. यावेळेस आम्ही वेगळ्याच रिसॉर्टवर उतरलो होतो. आम्ही एकंदर १८ जण होतो. जंगलात जायचे असल्यास सहाच्या पटीत जर निसर्गप्रेमी असतील तर सोयीचे होते. जिप्सी गाडीत एकंदर ६ माणसेच बसतात. तसेच समप्रमाणात माणसे असली की दोघादोघांना डबल बेड शेअर करणे सोयीचे जाते. कमी जास्त संख्या झाली, की ते आर्थिक दृष्ट्याही फायदेशीर होत नाही. 

नागपूरला उतरल्यानंतर बरोबर तीन वाजता आमच्या तीन जिप्सी आल्या. एका जिप्सीत महेश होताच. एंट्री गाइड हे नेहमीचे सोपस्कार झाल्यावर आम्ही तुरिया गेटनेच आत प्रवेश केला. यावेळी छायाचित्रकार आणि माझा लहान भाऊ मिलिंद देशपांडे बरोबर होता. तो बरोबर असला की मी फोटोंची अजिबात काळजी करत नाही. अशा वेळी मी व्हिडिओ चित्रण करतो. प्रत्येक ग्रुपमध्ये एकतरी चांगला फोटोग्राफर असावा अशीच या ग्रुप्सची रचना केलेली असते. जिप्सीत बसताच महेश म्हणाला, ‘सर, पिवरथडीमें जायेंगे क्योंकी कलसे लेपर्ड बहोत बार साइट हो रहा है।’

ऐन दुपारची टळटळीत उन्हाची वेळ... येताना अगदी थंडगार अशा घेतलेल्या पाण्याच्या बाटल्या आता गरम झाल्या होत्या. पुढच्या गाडीचा उडणारा धुरळा कपड्यांवर आणि चेहऱ्यावर जमा होत होता. सारखा येणारा घाम पुसून रुमालही धूळ आणि घामाने ओलागच्च झाला होता. आजूबाजूची सालाची झाडे सोडली तर बाकीच्या झाडांचे खराटे झाले होते. गाडीत कोणीच एकमेकांशी फारसे बोलत नव्हते. गाइड इमाने इतबारे दोन्ही बाजूला दिसणाऱ्या प्राणी, पक्षी यांच्याबद्दल माहिती देत होता. कधी फोटोसाठी गाडी थांबवली जात होती. जंगलात अजूनही काहीच मुव्हमेंट जाणवत नव्हती. आम्ही ‘फायरलाइन’ एरियाकडे निघालो आणि डाव्या बाजूने वाघाचा एक वेगळाच आवाज ऐकू आला. महेशने त्वरित ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि तो आवाज स्पष्टपणे ऐकू आला. इतक्यातच रस्त्याच्या उजव्या बाजूनेही आवाज ऐकू येऊ लागला. गाइड म्हणाला, ‘सर, ये तो मेटिंग कॉल है। लेफ्ट हँड से जो आवाज आ रही है वो मेल टायगर है, वर राइट हँड वाली फिमेल है, थोडी देर हम यही रुकते है।’

इतक्यातच आमच्या उरलेल्या दोनही जिप्सी तिथेच आल्या. मला जी माहिती होती त्याप्रमाणे मी गाइडला विचारले, की टायगर का मेटिंग सीझन तो डिसेंबर से फेब्रुवारी तक ही होता है ना? त्यावर गाइडच्या आधी आमच्या महेशने सांगितले, ‘सरजी ऐसा कोई पक्का नहीं है, पिछले महिनेमे मैने इसी रास्तेपे थोडा आगे बाघका मिलन देखा है, सालभरमे किसीभी वक्त उनका मिलन हो सकता है।’ गाइड आणि ड्रायव्हर हे रोजच जंगलात भटकत असतात. त्यांचे ज्ञान हे आपल्यापेक्षा नक्कीच जास्त असते आणि प्रॅक्टिकल असते. 

आता आवाज अजूनच जवळजवळ येऊ लागला. चितळांनी आणि वानरांनी एकाच वेळेस अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली. ‘सर वो देखो पेड के पिछेसे टायगर आ रहा है,’ महेश म्हणाला. आमचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. थांबून थांबून पण मोठा आवाज करून तो वाघ आपल्या सहचारिणीला मीलनोत्सुक साद घालत होता. उजवीकडून तीही प्रतिसाद देत होती. आयुष्यात कधीही न बघितलेली विलक्षण घटना आज पाहायला मिळणार या उत्सुकतेने आम्ही अधीर झालो होतो. मेल टायगर आता फायरलाइन ओलांडून रस्त्याच्या मधोमध आला. आमच्या गाड्यांकडे त्याने कटाक्ष टाकला. असंख्य कॅमेऱ्यांचे ‘क्लिक’ आवाज आले. फीमेलचा आवाजही थोडा जवळ येऊ लागला. वाघ उजवीकडे जंगलात जाऊ लागला. तो कोणत्या दिशेने जाईल आणि फिमेल कुठे असण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन आम्ही आणि आमच्या मागोमाग इतरही गाड्या पटकन त्या जागी जाऊन थांबल्या. 

क्षणोक्षणी उत्कंठा वाढत होती. काही क्षण आवाज थांबल्यासारखे वाटले पण परत एकदा सुरू झाले. आता मात्र ते जंगलातील आतील बाजूकडे जात असल्याचे जाणवले. आम्ही अजूनही आशावादी होतो. आवाज आता आमच्यापासून दूर दूर जात आहेत हे जाणवले. आम्ही निराश झालो. निसर्गनियमानुसार होणारी एक घटना पाहण्याचा एक दुर्मीळ योग आला होता. पण आमच्या नशिबात नव्हता हेच खरे. मी ही घटना मारुतराव चितमपल्ली सरांना सांगितली असता ते म्हणाले, की सहसा वाघांचे मिलन हे जंगलातील आतील भागात होते  

आणि असे उघड्यावर किंवा माणसांचा, जंगलात फिरणाऱ्या गाड्यांचा वावर आहे अशा ठिकाणी होत नाही. महेश म्हटल्याप्रमाणे आम्ही बिबट्या दिसतोय का ते पाहायला निघालो होतो, मात्र त्याऐवजी हा मीलनोत्सुक वाघ आम्हाला बघायला मिळाला.

बरोबर असलेली नवखी मंडळी जाम खूश झाली होती. उन्हाचा त्रास, घाम, धुरळा, हे ते क्षणभर विसरून गेली होती. पाच-सव्वापाचची वेळ असावी. आम्ही पिवरथडीला पोचलो. थोडा वेळ थांबलो. एका झाडाच्या फांदीवर क्रेस्टेड सरपंट ईगल म्हणजे शिखी सर्पगरुड बसला होता. दुर्बिणीतून तो सर्वांनी पाहिला. आम्ही सर्वांनी ते झाड पाहिले होते पण कोणालाच तो सर्पगरुड दिसला नव्हता. गाइडने मात्र तो नुसत्या डोळ्यांनीच पाहिला होता. या गाइड आणि वाहनचालकांची नजर जंगलात अनेक वर्षे हिंडल्याने तयार झालेली असते. आमचा आता परतीचा प्रवास सुरू झाला होता. सूर्य अस्ताला गेला होता. आमच्या दोन गाड्या आम्हाला बाय करून पुढे निघाल्या. आम्ही थोडे सावकाश आणि थांबत थांबत येत होतो, कारण मिलिंदची फोटोग्राफी चालली होती. महेश म्हणाला, ‘चालो बाबूजी अब निकलते है.. शामसे पहले हमें एंट्री गेट पाहूंचना है।’ मीही म्हणालो, ‘चलो.. अब कुछ नही दिखनेवाला।’ महेशने मग जिप्सीचा वेग वाढवला आणि अचानक गाइड म्हणाला, ‘रुको.. रुको.. महेश!’ त्याला डावीकडच्या गवतात काहीतरी दिसले होते. ‘थोडी पीछे लो गाडी... और थोडी.. और थोडी ..,’ डावीकडे लक्ष ठेवून गाइड सूचना देत होता. एके ठिकाणी त्याने गाडी थांबवली. माझ्याकडची दुर्बीण त्याने घेतली आणि तो पाहू लागला. आम्हाला काहीच दिसत नव्हते. आजूबाजूला कोणतेच जनावर नव्हते. झाडांवर वानरेपण नव्हती. त्यामुळे कोणताही कॉल नव्हता आणि अचानक दोन कान दिसले. गाइड दबक्या आवाजात म्हणाला, ‘सर, वहाँ देखो लेपर्ड बैठा है।’ आम्हाला काही केल्या दिसेना. दुर्बीण घेऊन बघितले तरी लोकेट होईना. अचानक मिलिंद ओरडला, ‘अरे तो बघ उठला तो.’ मग सर्वांचेच चेहरे फुलले. कारण जाता जाता मिळालेला हा बोनसच होता. बिबट महाशय उठून चालायला लागले. मी नेहमीप्रमाणे शूटिंग घेऊ लागलो. मिलिंदने फोटो काढायचा प्रयत्न केला. पण उजेड कमी असल्याने त्याने नाद सोडला. 

बिबट थोडा वेळ चालत होता. मधेच त्याने आमच्याकडे कटाक्ष टाकला. समोरच एक झाड होते. त्याची एक इंग्रजी V आकाराची फांदी होती. शांतपणे झाडावर चढला आणि दोन्ही पुढचे पाय खाली सोडून फांदीवर डोके टेकवून आमच्याकडे बघत बसला. मधेच डोळे उघडून कसला तरी कानोसा घ्यायचा आणि परत डोळे झाकून पडून राहायचा. सुमारे अर्धा तास तो तिथेच बसून होता. वेळ संपत आली होती आणि तुरिया गेट अजून दूर होते. अंधारही वाढत चालला होते. गाइड आता घाई करू लागला होता. कारण ठराविक वेळेच्या आत गेटमधून बाहेर पडलो नाही, तर गाइडला दंड आणि गाडीचे परमिटही काही काळासाठी रद्द होते. महेशने गाडीचा वेग वाढवला. तुरिया दिसत असताना अचानक एक मेल स्पॉटेड डियर गाडीसमोर आले. महेशने करकचून ब्रेक दाबला. ते घाबरून पार मागे पळाले. एका मोठ्या संकटातून वाचलो होतो आम्ही. त्यादिवशी सर्वांत शेवटी आम्ही पोचलो होतो. बाहेर दोन गाड्या आम्ही का आलो नाही म्हणून वाट पाहत उभ्या होत्या. त्यांना घडलेला किस्सा सांगितल्यावर ते चुकचुकले. पण जंगलात अशा घटना होत असतात. त्याक्षणी जो त्या जागी असतो त्याला असे काही अनपेक्षित पाहायला मिळते आणि इतरांना नाही. सकाळी सहा वाजता परत येतो असे सांगून गाइड आणि महेश निघून गेले. रिसॉर्टवर पोचल्यावर माझा व्हिडिओ पाहून सर्वजण जाम खूश झाले. दिवसभरात काय काय घडले याची भोजनोत्तर चर्चा झाली आणि सर्व थकली भागली शरीरे निद्रेच्या अधीन झाली. पहाटे जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने जंगलात एक बरे असते, इतकी शांतता असते की कधी कधी चुकल्यासारखे वाटते. पक्ष्यांच्या आवाजाने जाग येणे हे सुख पुण्यामुंबईत कधीच घेता येत नाही. सर्वजण आवरून तयार होते. गाड्या आल्या आणि आम्ही परत एकदा कूच केले ते अरण्याकडे. 

पेंच अभयारण्यात प्रवेशासाठी एकंदर तीन गेट आहेत. तुरिया, कर्माझरी आणि जामंत्रा. कर्माझरी हे जंगलातून २० किमी अंतरावर आहे, मात्र बाहेरून ते ७० किमी लांब आहे. जामंत्रा हे कर्माझरी पासून १२ किमी अंतरावर आहे. आज आम्ही उरलेल्या दोनही गेट्सना भेट द्यायची ठरवली. कर्माझरी गेटकडे जाताना एके ठिकाणी रानकुत्र्यांचा कळप दिसला. आम्ही थांबलो आणि लक्षात आले की यांची तोंडे लाल आहेत. याचा अर्थ त्यांनी नुकतीच शिकार केली असावी. निरखून पाहिले असता एका चितळाच्या मादीचे अवशेष दिसले. आम्ही फोटो काढले आणि थोडा वेळ थांबलो. अचानक जंगलातून अजून एक रानकुत्रा बाहेर आला. कळपापाशी थांबला. त्यांचे काय बोलणे झाले कोणास ठाऊक, पण मंडळी उठली आणि रस्त्यावरून सावकाश पळत निघाली. आम्हीही निघालो त्यांच्या पाठोपाठ. मात्र सुमारे अर्धा तास आमच्या गाडीसमोर पळत होते. त्याने रस्ताही अडला होता. आम्हालाही नाइलाजाने त्यांच्याच गतीने त्यांच्या मागे जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्यांचे जणू रास्तारोको आंदोलनच चालले होते. सुमारे अर्ध्या तासानंतर उजवीकडे एका ठिकाणी सर्वजण थांबले आणि आत जंगलात दिसेनासे झाले. रानकुत्री भक्ष्याचा पाठलाग करतात हे माहिती होते. पण इथे तर आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो.

अलिकट्टा हा सेंटर पॉइंट आहे. या रस्त्याकडे जाताना एक गिधाड रस्त्याच्या बाजूला बसलेले आढळले. त्याच्या अगदी जवळ गाडी गेली तरी ते काही उठले नाही. त्यांची मान पूर्णपणे पांढरी होती. याचे नाव ग्रिफटॉन व्हल्चर म्हणजे भुरे किंवा पांढरे गिधाड असे आहे. पेंचमध्ये एकूण चार प्रकारची गिधाडे आढळतात. व्हाइट रम्पेड, लॉन्ग बिल्ड, व्हाइट स्कॅवेन्जर आणि किंग व्हल्चर. सध्या मात्र जंगलात गिधाडांची संख्या बरीच कमी होत चालली आहे. 

ऊन आता वाढायला लागले होते. अनेक प्राणी पक्षी दिसल्यामुळे सर्वजण खूश होते. आम्ही परत निघालो. वाटेत गाइडने परत गाडी थांबवली. थोडी मागे घेतली आणि बिबट्याचे पगमार्क्स दाखवले. मात्र ते फ्रेश नव्हते, आदल्या दिवशीचे होते. या गाइडमंडळींच्या नजरेला सलामच करायला हवा, कारण आपल्याला न दिसणाऱ्या अशा जंगलातील असंख्य लहानसहान गोष्टी यांना सहजपणे दिसतात. जंगलात यायचे असेल तर गाइडशिवाय पर्याय नाही. यांना जंगलाची लिपी खूप छान वाचता येते. अरण्यवाचन यालाच तर म्हणतात.

संबंधित बातम्या