ताडोबातील ‘माया’जाल 

विवेक देशपांडे
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!
विवेक देशपांडे

कोकटूच्या केशराच्या पावसात नखशिखांत भिजून आम्ही ‘ताडोबा’कडे कूच केले. दिवसभराचा प्रवास संपवून आम्ही चंद्रपुरात पोचलो खरे आणि अचानक आभाळ भरून आले. झाडे डोलू लागली. जोराच्या वाऱ्यामुळे झाडांवरील पानांनी आसमंतात विहार करण्याचा आनंद लुटला. ऐन फेब्रुवारीच्या महिन्यात पावसाने आमचे स्वागत करावे ही अपेक्षाच नव्हती. कोकटू ते ताडोबा हा प्रवास मोठा विलक्षण होता, कारण आमच्या गाडीत वनमहर्षी मारुतराव चितमपल्ली होते. त्यांचे अनुभवकथन सुरू होते. यामुळे विदर्भातील डांबरी रस्त्याऐवजी जंगलातून विहार करीत असल्याच्या भास होत होता. मारुतरावांच्या जंगलातील चाळीस वर्षांच्या समृद्ध वास्तव्यातील काही पानेच आमच्यासमोर उलगडली जात होती. मधेच एखादी शंका आम्ही विचारायचो नाहीतर पूर्णवेळ ते बोलत होते. सुरस आणि कान तृप्त करणारे अनुभव आम्ही फक्त ऐकण्याचे काम करत होतो. 

अचानक आलेला पाऊस अचानक गेलाही आणि आम्ही तासाभरातच ताडोबाला पोचलो. आमच्या सर्वांची ही पहिलीच भेट होती. महाराष्ट्राचे सध्याचे वाईल्ड लाइफचे प्रधान  मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी आमचे स्वागत केले. आणि ताडोबा तलावाच्या काठावर असलेल्या वनविश्रामगृहात आमची निवासाची व्यवस्था केली. त्यादिवशी जंगलात आमच्या आठ जणांखेरीज कोणीच नव्हते. नितळ पाणी असलेला आणि जंगलाच्या मधोमध असलेला हा ताडोबा तलाव म्हणजे या जंगलाची शान आहे. नुकतीच माघी पौर्णिमा झाली होती. चंद्र अजून वर यायचा होता. मी, अनंत गोहाड, चित्रा गोहाड, स्वाती दामले, सतीश काळे, प्रदीप उदास आणि मुकुल गुरु तिथल्या छोट्या कँटीनच्या बाहेर गप्पा मारत बसलो होतो. गोहाड वहिनी आणि स्वाती बोलत बोलत थोड्या दूर गेल्या व अचानक त्या घाबरून परत फिरल्या. कारण चितळांचा एक कळप अचानक उधळला होता आणि त्यातल्या एका चितळ महाशयांनी स्वातीला धडक दिली होती. माणसाचा धक्का लागला तर आपण रागाने बघू शकतो, पण इथे जंगलात प्राण्याचा धक्का लागला तर काय करणार? ‘बरं झालं धक्का मारणारं चितळ होतं...!’ अशी आम्ही स्वातीची ती नशीबवान असल्याबद्दल चेष्टा केली; पण ती घाबरली होती. इतक्यात कँटीनवाल्याने ‘पोड्या (विदर्भात ‘ळ’ चा ‘ड’ का होतो माहीत नाही) आणि भाजी तयार असल्याची सूचना दिली. आता चांदोबाने तलावाच्या बाजूने हळूच डोके वर काढले. चंद्रभोजन उरकून मी आणि स्वाती, चितमपल्ली सरांच्या भेटीला त्यांच्या खोलीत गेलो. रेस्ट हाउसच्या बाहेर तलावासमोर पायऱ्या आहेत. आम्ही तिथे बसून ‘ऑडिओ कॅसेट’बद्दल प्रदीर्घ चर्चा केली.  

मारुतरावांचे साहित्य प्रचंड आहे. पण त्यांचे जंगलातील अनुभव त्यांच्याच आवाजात कोणी रेकॉर्ड केले नव्हते. त्याची मुहूर्तमेढ चंद्राच्या साक्षीने रोवली गेली होती. ती रात्र आम्ही कधीच विसरू शकणार नाही, कारण वनमहर्षींना बोलते करण्याचे नक्की झाले होते. जवळ जवळ तीन तासांनी आम्ही आमच्या रेस्ट हाउसवर परतलो. तोपर्यंत गोहाड आम्हाला शोधूनही आले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही कोळसा कॅम्पवर गेलो. तिथले रेस्ट हाउसही खूप जुने आणि सुंदर आहे. इथे बसले की समोर तलावाचे दर्शन होते. स्थलांतरित पक्षी दिसण्याचा हा कालावधी. आम्हाला तिथे पट्टकदम्ब म्हणजे बारहेडेड गूज, स्थानिक जांभळी कोंबडी म्हणजे पर्पल मूरहेन असे पक्षी दिसले. संध्याकाळी आम्ही ताडोबाला परतलो. संध्याकाळी काकोडकर सरांनी आसपासच्या वनाधिकारी आणि वनरक्षकांसाठी चितमपल्ली सरांचे खास लेक्चर ठेवले होते. ही रात्रही संस्मरणीय ठरली. (ही गोष्ट २००० सालातली आहे). काकोडकर सरांनी आम्हाला त्यांची सर्च लाइट असलेली जीप दिली आणि आम्ही रात्रीचे ताडोबा अनुभवले. ससे आणि हरणांशिवाय काहीच दिसले नाही, पण रातव्यापासून ते घुबडापर्यंत अनेक पक्षी पाहायला मिळाले आणि त्यांचे आवाज ऐकायला मिळाले. ही नाईटसफारी चितमपल्ली सरांमुळे आम्हाला अनुभवायला मिळाली.. ती गूढ तरीही चित्तथरारक होती, कारण आम्ही जंगल पाहत नव्हतो तर ऐकत होतो!

ताडोबा म्हणजे व्याघ्रदर्शन हे समीकरण आमच्या बाबतीत आत्तापर्यंत तरी खोटे ठरले होते. पण ताडोबा जंगलाने मला जे काही दिले ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. त्यानंतर ताडोबाला जाण्याचा योग्य तब्बल सोळा वर्षांनी आला. 

हा देखील फेब्रुवारी महिनाच होता. नागपूरवरून दोन तासातच आम्ही ताडोबाच्या जंगलात जाऊन पोचलो. एमटीडीसीच्या अतिशय छान रिसॉर्टवर आमचा मुक्काम होता. प्रशस्त खोल्या, उत्कृष्ट भोजन व्यवस्था होती. फक्त एकच की या वेळी जंगलाच्या बाहेर मुक्काम होता. ताडोबाचे जंगल हे निसर्गाचे लेणे ल्यालेले जंगल आहे. इथले वन्यजीवनही संपन्न आहे. मुख्य म्हणजे इथे नक्की वाघ दिसतो अशी ख्याती दूरवर पसरली असल्याने इथे कायमच माणसांची गर्दी असते. ताडोबाला १९९५ मध्ये व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळाला व त्यानंतर त्याचे ताडोबा, मोहर्ली आणि कोळसा असे तीन विभाग केले गेले. सध्या कोळसा विभागात जाताच येत नाही. मात्र मोहर्ली आणि ताडोबात भटकता येते. मोहर्लीमध्ये बांबूचे वन जास्त प्रमाणात आहे. हे शुष्क पानगळीचे जंगल आहे. प्रामुख्याने साग आहे. उन्हाळ्यात सागाची सगळी पाने झडतात. या सागाबरोबर बेहडा, मोह, तेंदू, करंज, कुसुम या प्रकारचेही वृक्ष आहेत. फेब्रुवारी महिन्यात पळस, पांगारा आणि काटेसावरीला लालभडक फुले पाहायला मिळतात आणि त्यावर येणारे असंख्य पक्षीही आपले लक्ष वेधून घेतात.   

आम्ही दुपारी दोन वाजता मोहर्ली गेटमधून सफारीला सुरुवात केली. ऊन जाणवत होते आणि वाराही पडलेला होता. नेहमीच्या प्राण्यांनी हजेरी लावली होती. मात्र इतरांबरोबर मला यावेळी उत्सुकता होती ती वाघ दिसण्याची. खरे तर इतकी वर्षे जंगलात भटकंती करतोय. अनेकदा वाघ दिसला आहे, पण या जंगलात मात्र अजूनही त्याचे दर्शन झाले नव्हते... अचानक ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला बघायला सांगितले. खाली एकाच ठिकाणी ताजी विष्ठा भरपूर प्रमाणात दिसली. गाइड म्हणाला, ‘सर हिथं रानकुत्री हागलीत... थोड्या येळ पूर्वीची हाय ही घान.’ आम्ही रानकुत्र्यांना शोधायला निघालो. पण ती काही दिसली नाहीत. मधेच एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध वानरांची एक मोठी टोळी बसली होती. आम्ही अगदी जवळ गेलो तरी ते उठायच्या विचारात नव्हते. अचानक त्यांच्यातला मुखिया काही कारण नसताना आमच्या जिप्सीवर धावून आला. अचकट विचकट हावभाव केले आणि रागाने परत टोळीपाशी गेला. नंतर काय घडले कोणास ठाऊक, पण अचानक अंगात आल्यासारखे एका क्षणात सगळे उधळले आणि समोरच्या झाडावर जाऊन आमच्याकडे बघत बसले. त्यांचे काहीतरी बिनसले होते हे खरे. गाइड म्हणाला, ‘सर आपण तेतीया तलावाच्या बाजूला चक्कर मारू. ‘माया’ आणि तिचे चार बछडे दिसून राहिलेत.’ आम्ही लगेच सगळे हो म्हणालो. कारण फारसे काही न दिसल्यामुळे चेहऱ्यावर जी मरगळ आली होती, ती ‘माया’ या एकाच शब्दाने निघून गेली. या मायाबद्दल खूप ऐकले होते. ताडोबात आलेल्या जवळजवळ प्रत्येक पर्यटकाला तिने हमखास दर्शन दिले होतेच. आम्ही थोडा वेळ तेतीया तलावापाशी थांबलो. चितळांचा एक कळप बाजूलाच चरत होता. संध्याकाळ होईपर्यंत तिथेच थांबायचा आम्ही विचार केला.

थोडा वेळ शांततेत गेला आणि अचानक वानरांनी ख्याक ख्याक करायला सुरुवात केली. चितळांनीही सावध होऊन एकाच दिशेने माना फिरवल्या. त्यातील नराने ‘कु..क्क..’ असा आवाज काढला व त्या कळपाने धूम ठोकली. इतक्या अचानक हे घडले की आम्ही स्तिमित झालो. इतक्यात आमचा गाइड दबक्या आवाजात म्हणाला, ‘सर वाग हाय जी...’ आम्ही बघितले तर गवतात काहीतरी हालचाल दिसली. क्षणार्धात ते देखणे जनावर आमच्या जिप्सीच्या समोरून रस्त्यावर आले. ‘सर माया हाय ती’ ...ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण पहिल्याच सफारीत इतक्या पटकन येईल ही अपेक्षाच नव्हती. ‘सर आता तिचे बच्चेही हितच कुठंतरी असणार.’ पण माया आली.. तिने आम्हाला पाहिले.. आम्ही तिला पाहिले.. आणि काही सेकंदातच ती परत जंगलात निघून गेली. तितक्या कमी वेळात माझा मित्र सचिन देशपांडे याने एक सुंदर फोटो काढला होता तिचा. सगळे खूप एक्साईट झाले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी चर्चा होती, ती फक्त मायाची!

सकाळी सहा वाजताच आमची दुसरी सफारी सुरू झाली. आज गाइड बदलला होता. काल माया दिसल्याचे त्याला सांगितले होतेच. तो म्हणाला, ‘सर आज दुसरी जगह घुमकर आते है। और बाद मैं फिर तेतीया तलाव चलेंगे...’ आता हा आमच्याशी हिंदीत का बोलत होता ते आम्हाला समजत नव्हते. त्याला सांगितले की बाबा रे आम्ही पुणेरी आहोत. मग त्याने मराठीत बोलणे सुरू केले, ‘हो सर आपण परत एकदा तेतीयाला जाऊ, कारण मायाचे बच्चे तिथेच आसपास दडवून ठेवले आहेत तिने. दिसण्याचे चान्सेस आहेत. ती एरिया नाय सोडून जायची ती इतक्यात.’ 

सकाळची साडेआठची वेळ होती. आम्ही तेतीया तलाव रस्त्यावरच दबा धरून बसलो होतो. आमच्यासारखे आणखी आशाळभूत तीन गाड्यांतून तिथे थांबले होते. तलावात सांबरांचा एक कळप पाणी पीत होता. इतक्यात गाइडचे लक्ष गवताकडे गेले आणि त्याने पटकन दुर्बीण मागितली. त्याने पाहिले आणि तो म्हणाला, ‘सरजी गवतात वाग हाय... मायाच असन.’ आम्ही पहिले तर ती वाघीण अतिशय शांत बसली होती आणि लक्ष समोरच्या पाणी पिणाऱ्या सांबरांवरती होते. अचानक माया थोडी उठली आणि दोन पावले चालते न चालते तोच वानरांनी अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली. सांबरांनी ते ऐकले आणि तो कळप चौफेर उधळला. माया परत गवतात बसली आणि वानरेही शांत झाली.

गाइड म्हणाला, ‘सर, माया शिकारीच्या मूडमध्ये आहे. आपण इथेच थांबून राहूया.’ आम्ही शांत बसलो असता मागच्या जिप्सीत दोन हौशी महिला मोठ्या आवाजात, ‘तो बघ वाघ दिसला का नाही अजून तुला...’ अशी काहीतरी बडबड करत होत्या. आमच्या गाइडने त्यांना झापले आणि शांत राहायला सांगितले. काही क्षण गेले. दबकत दबकत सांबरं परत पाण्यावर आली. त्यांचा पाणी पिण्याचा समारंभ पुन्हा एकदा सुरू झाला. आमचे लक्ष मायावर होते आणि मायाचे सांबरांवर. त्यामधील एक सांबर मायाने हेरून ठेवले असावे. सांबारांची कदाचित खात्री झाली होती, की माया निघून गेली असावी. चतुर माया अजिबातच न हलता त्या पिवळ्या गवतात दबा धरून बसलेली आहे, ही कल्पना त्यांना आली नाही.

काठावरचे एक अननुभवी सांबर गवताकडे बघत उभे होते. क्षणार्धात माया उठली... तिचा वेग अशक्य होता... पापणी लवायच्या आत केवळ तीन झेपांमध्ये तिने सांबाराची मान पकडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने इतर सांबरांनी जंगलात धूम ठोकली. आमच्या जिप्सी चालकाने जिप्सी अगदी योग्य ठिकाणी नेली. काही क्षणातच सांबराने प्राण सोडले. हे बघताना खरेतर थ्रिलही वाटत होते, पण दुःखही तितकेच झाले. मी अनेक शिकारी बघितल्या असल्याने मला फारसे जाणवले नाही. पण इतरांना मात्र हे दृश्य बघवत नव्हते. पण भुकेपोटी केलेली ही शिकार म्हणजे जंगलातील नित्य घडणाऱ्या घडामोडींपैकी एक होती. मायाचे काम अजून झाले नव्हते, कारण दूरवर झाडीत तिचे बछडे जेवणासाठी वाट पाहत होते. तिने शिकार तोंडात धरली आणि जमिनीवर घासत घासत ती जंगलातील आतल्या भागात दिसेनाशी झाली. आमचा तर विश्वासच बसत नव्हता. कारण आल्या आल्या संध्याकाळच्या फेरीत माया दिसते काय आणि दुसऱ्या फेरीत सहसा न दिसणारी गोष्ट म्हणजे ‘लाईव्ह शिकार’!

गाइड म्हणाला, सर तुमचा ग्रुप फारच लकी आहे. आम्हाला महिनोनमहिने शिकार बघायला मिळत नाही. सचिनला मायाच्या प्रत्येक हालचालीचे अतिशय सुंदर फोटो मिळाले होते. चितळ, सांबर, नीलगायी, रानडुक्कर यांचे आयुष्य तसे क्षणभंगुर असते. आज निवांत बागडत असतात, चरत असतात; पण कोणत्या क्षणी मृत्यू झडप घालेल याची खात्री नसते. अनिश्चितता तर यांच्या पाचवीला पुजलेली असते. आत्ताचा हा क्षण आपला; पुढे काय हे वाघ किंवा बिबट्याच जाणो...! 

ताडोबाने काय आणि इतर जंगलांनी काय मला खूप काही दिले आहे. मी ज्या जंगलात जातो त्याच्या लगेच प्रेमात पडतो. त्या जंगलात समरस होतो आणि त्याचा एक सुगंध माझ्या हृदयात कायम भरून रहातो. ताडोबाच्या या जंगलानेही मला आपलेसे केले, परत परत येण्यासाठी!    

संबंधित बातम्या