कुरणांचे आणि हरणांचे कान्हा 

विवेक देशपांडे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!
विवेक देशपांडे

फेब्रुवारी/मार्च हे माझ्या दृष्टीने जंगलात जाण्याचे योग्य दिवस. थंडी कमी झालेली असते पण संपलेली नसते आणि ऊनही तितके वाढलेले नसते. अशाच एका फेब्रुवारी महिन्यात आम्ही जबलपूर सोडले आणि कान्ह्याकडे रवाना झालो. चिराई, डोंगरी, मोचा मागे पडले. दोन्ही बाजूला जंगलाचा फील सुरू झाला होता. खटिया गेटमधून प्रवेश केला आणि जंगलात शिरलो. संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली होती. आम्ही मध्यप्रदेश पर्यटनाच्या ‘भागीर लॉग हट्स’मध्ये पोचलो. ऐन जंगलातील हा निवास निसर्गप्रेमींना नेहमीच सुखावणारा. हवेत हलकासा गारवा जाणवू लागला होता. दिवेलागण झाली आणि परिसर प्रकाशाने उजळला. जंगलाचा एक मंद असा वास आता जाणवू लागला. आमच्या फुप्फुसांनी या वाऱ्याच्या झुळुकीचे स्वागत केले...!

पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्यांत विस्तीर्ण पसरलेल्या या जंगलाची श्रीमंती वेगळीच आहे. जवळजवळ सदाहरित असणारे सालवृक्ष, सागाची सरळसोट झाडे आणि बांबूचे हे जंगल आहे. असंख्य गवताळ कुरणे (meadows), छोटे घाटरस्ते, ब्रह्मनी दादरसारखी सर्वात उंच जागा (इथून कान्ह्याचे विहंगम दृश्य दिसते) यांनी हे जंगल अगदी परिपूर्ण झाले आहे. यातील कोअर झोनचे क्षेत्रफळ सुमारे ९४० चौरस कि.मी. इतके असून बफर झोनचे क्षेत्रफळ १,०१० चौ.कि.मी. आहे. 

सकाळची जंगल सफारी सहा वाजता सुरू होते. आम्ही साडेपाचलाच तयार होऊन जिप्सीत बसलो. घनश्याम हा जिप्सीचा चालक चांगलाच ओळखीचा झाला होता. जंगलात पहाटेचे वातावरण आल्हाददायक असते. पक्ष्यांची किलबिल आणि आसमंतातील आल्हाददायी सुगंध मनाला प्रसन्न करतात. या वातावरणात पक्षी प्राणी पाहायला निघणे म्हणजे सळसळत्या उत्साहाची परिसीमा असते. प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार करून आम्ही निघालो. अजूनही तसा अंधारच होता. पूर्व वाटेवर धुक्याची दुलई होती. गाइड जंगलाची माहिती देत होता. आजूबाजूचे जंगल तसे शांतच होते. जिप्सीही फारशा नव्हत्या. आमच्या पुढे थोड्याच अंतरावर एक गाडी होती. त्याचा थोडासा धुरळा उडाला आणि त्यातच सूर्योदय झाला. वृक्षांवर पडलेले ते सोनेरी किरण त्या धुळीवर पडले आणि त्याचे कवडसे इतके मनमोहक दिसू लागले, की गाडी थांबवून असंख्य फोटो काढले गेले. वळणावळणाचा लाल मातीचा रस्ता धुक्यामुळे धूसर होता, पण सूर्योदयामुळे जंगलाचे रुपडेच पालटले होते. आता धुकेही विरायला लागले होते. जबरदस्त माहौल होता. काही क्षण तिथेच थांबलो. पण थांबलो की थंडी जाणवू लागते. 

आम्ही श्रवणतातकडे निघालो. आता छान उजाडले होते. गाइड पुढच्या सीटवर उभा होता आणि त्याची नजर चौफेर होती. अचानक तो ड्रायव्हरला म्हणाला, ‘रोको रोको रोको!’ ड्रायव्हरनेही लगेच वेग कमी केला. समोरच्या सालाच्या झाडापासून एक भाला मोठा साप बाहेर येताना दिसला. तो अर्ध्या रस्त्यावर आला... आणि इतक्यात उजवीकडच्या झाडावरून मोठ्याने आवाज करत एक गरुड आला. क्षणार्धात त्याने खाली झेप घेतली आणि सापाला उचलून घेतले. आम्ही आ वासून बघतच राहिलो. साप त्याच्या अणकुचीदार नख्यांतून सुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना दिसला. पण तो गरुड उंच गेला आणि त्याने सापाचे लचके तोडायला सुरुवात केली. काही सेकंदाचा हा थरार आम्ही अनुभवला. मात्र हे इतके अनपेक्षित होते की कॅमेरा फोकस करून फोटो काढणे केवळ अशक्य होते. झाडाच्या फांदीवरून सापाची शेपटी वळवळताना काही क्षण दिसली.. नंतर सारे काही शांत झाले. गाइडने मग सांगितले की तो तुरेवाला सर्पगरुड (क्रेस्टेड सरपंट ईगल) होता, तर साप धामण होता. सकाळी सकाळीच अशी गरुडाची शिकार पाहायला मिळाल्याने आम्ही जाम खूश झालो होतो. वाघ, बिबट्या यांची शिकार दिसू शकते पण गरुडाची शिकार दिसणे म्हणजे केवळ नशिबाचा भाग असतो. तो रस्ता, ती वेळ, आपली उपस्थिती हे सारे जमून आले तरच अशा प्रसंगाचे आपल्याला साक्षीदार होता येते.

आम्ही आता कान्हा मेडोजकडे निघालो. मेडोज म्हणजे गवताची कुरणे. पूर्वीच्या काळी इथे माणसांची वस्ती होती. मात्र नंतर या मंडळींना जंगलाच्या बाहेर काढण्यात आले आणि त्या शेतजमिनींवर नंतर चांगल्या प्रकारचे गवत उगवले. अनेक तृणभक्षी जनावरांचा या भागात वावर वाढला, कारण त्यांना मुबलक खाद्य उपलब्ध झाले. कान्हा बिशनपूर, सौफ अशी भली मोठी कुरणे या जंगलात आहेत. हरिण, सांबार, रानगवे, नीलगाय यांसारखे प्राणी या कुरणांमध्ये चरताना विपुल प्रमाणात दिसतात. 

कान्हा मैदानात आम्ही गेलो. आजूबाजूला चितळांचे अनेक कळप चरत होते. कान्ह्यात चितळांची संख्या जवळ जवळ चाळीस हजारांच्या आसपास आहे. कधी कधी कान्ह्याला डियर पार्क असेही म्हटले जाते. आम्ही चितळांचे फोटो काढायला थांबलो. अचानक उजवीकडे असलेल्या कळपात थोडी पळापळ झाली आणि काठ्या एकमेकांवर आपटल्यासारखा मोठा आवाज यायला लागला. घनश्यामने गाडी थोडी मागे घेतली. गाइड म्हणाला, ‘सर वो देखो दो मेल डियर आपसमे लड रहे है।’ आम्ही ती लढाई पाहू लागलो. दोन्ही नर चांगलेच दांडगे होते. उभे राहून एकमेकांवर शिंगे आपटत होते. शांततेत त्याचा आवाज खूप मोठा येत होता. काही वेळा ते थोडे मागे सरकायचे, एकमेकांचा अंदाज घ्यायचे आणि मग पळत येऊन मारामारी करायचे. आपल्या तालमीत जसे दोन पैलवान एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत कुस्ती करतात, तसेच हे वाटत होते. त्याला खडाखडी म्हणतात. सुमारे सात-आठ मिनिटे त्यांची ही लढाई सुरू होती. कळपातील माद्या त्यांच्या या लढतीकडे बघत होत्या. पाडसे मात्र कोवळ्या गवतावर ताव मारत होती, तर कोणी आईचे दूध पिण्यासाठी झटत होती. त्या लढतीत शेवटी एका नराचे शिंग दुसऱ्या नराला जोरात लागले आणि त्याने लढाई सोडून पळ काढला. विजयी नराने त्याचा थोडा पाठलाग केल्यासारखे केले आणि नंतर आपल्या कळपात येऊन चरणे सुरू केले. अशा वेळी पराजित चितळ नराला कदाचित हा कळप सोडावा लागतो. त्यात जर तो नर जखमी झाला असेल, तर मात्र त्याची वाघ, बिबट किंवा रानकुत्र्यांकडून शिकार होऊ शकते. जो फिट आहे अशा शूर नरांशीच माद्या मीलनासाठी तयार होतात हा जंगलाचा अलिखित कायदा आहे. 

एव्हाना नऊ वाजले होते. आम्ही कान्हा म्युझियमपाशी गेलो. इथे शौचालये आणि युरिनल्स आहेत. बरेच जण इथे ‘मोकळे’ होतात. इथल्या छोट्या कॅंटिनमध्ये चहा, कॉफी, नाश्ता, तसेच थंड पेय मिळू शकतात. आसपास जर कुठे वाघ दिसला असेल तर त्याची खबर सर्वप्रथम इथेच येते आणि त्यानुसार ‘टायगर शो’साठी पैसे भरून इथूनच रांगेने जिप्सी सोडल्या जातात. मात्र आज काहीच हालचाल नव्हती. याचा अर्थ जंगलात कुठेच वाघ लोकेट झाला नव्हता. प्रत्येकवेळी जंगलात गेल्यावर वाघ दिसलाच पाहिजे हा हट्ट आता नसला, तरी चार-पाच सफरींमध्ये ते उमदे जनावर एकदा तरी दिसावे हे आशा मात्र कायम असते...!

दहा वाजून गेले होते. आता मात्र भागीर हट्सकडे जाण्याचे वेध लागले होते. वाटेत लॉग हट्सच्या अलीकडे एका झाडाच्या बुंध्यात ‘जंगल आउलेट’ दिसली होती. ती दोन्ही घुबडे झाडाच्या फांदीशी अगदी एकरूप झाली होती. गाइड म्हणाला, ‘सर, ये तो हमेशा यहीपे दिखते हैं।’ मात्र नवख्या मंडळींना ती साइट करणे अवघड जात होते. दुर्बिणीतून त्यांचे ते भेदी डोळे व्यवस्थित दिसत होते. 

भगीरामध्ये आल्यावर अंघोळ, भोजन, डायरी लिहिणे इत्यादी कामे करताना दोन केव्हा वाजले

समजलेच नाही. थोड्या विश्रांतीनंतर परत एकदा संध्याकाळच्या सफारीसाठी आम्ही प्रस्थान ठेवले.

गाइड म्हणाला, ‘सर, आज हम ब्रह्मनी दादर चालते है।’ दादर याचा स्थानिक भाषेतील अर्थ म्हणजे उंच जागेवरील पठार. ब्रह्मनी हे कान्ह्यातील सर्वात उंचीवरील पठार आहे. आम्ही तो घाट चढायला सुरुवात केली. पठारावर पोचण्याच्या आधी जो रस्ता उजवीकडे वळतो, तिथे रस्त्यावर कडेला एक बिबट बसला होता. आमच्या गाइडने तो दुरूनच लोकेट केला होता. आम्ही सर्वांनीही तो पाहिला. मात्र गाडी थोडी जवळ जाताच तो उडी मारून खालच्या बाजूला जंगलात दिसेनासा झाला. या ओझरत्या दर्शनानेही आम्ही सगळे खूश झालो. वाघ दिसतो मात्र बिबट्या दिसणे ही एक पर्वणी असते. मग मोठ्या उत्साहाने आम्ही वरती ‘व्ह्यू पॉइंट’पाशी पोचलो. इथे एक वॉच टॉवर आहे आणि त्यावरून आपल्याला खालच्या कान्हा जंगलाचे विहंगम दृश्य दिसते. सात वृक्षांची दाटी वरून फारच सुंदर दिसते. किती अवाढव्य जंगल आहे, याची खरी कल्पना ब्रह्मनी दादरवरूनच येते. इथेही वॉश रूम्स आहेत. आपल्याला खाली उतरताही येते. खरेतर हा सनसेट पॉइंट आहे. मात्र सनसेटपर्यंत इथे थांबता येत नाही. आजूबाजूला पुरुषभर उंचीचे गवत आणि मधूनच जाणारा नागमोडी रस्ता.. खूप सुंदर अनुभव असतो हा! 

कान्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, जगात फक्त इथेच दिसणारा बाराशिंगा हा हरिण वर्गातील प्राणी. हे हरिण जवळजवळ नामशेष झाले होते. पन्नास वर्षांपूर्वी केलेल्या जनगणनेनुसार यांची संख्या ६६ इतकीच राहिली होती. मात्र निसर्गप्रेमी आणि वनखाते यांच्या संयुक्त प्रयत्नांनी ही प्रजाती आता थोडीफार धोक्याच्या बाहेर आली आहे. कान्हा म्युझियमच्या जवळील मैदानात काही एकर जागेत कुंपण घातले आणि आत बाराशिंगांना सोडण्यात आले. त्यांच्यावर लक्ष ठेवले गेले. त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्यात आली. याचा परिणाम म्हणून आता त्यांची संख्या ५०० च्या आसपास झाली आहे. कान्हा जंगलाने या बाराशिंगांना जीवनदान दिले आहे. मात्र यांची संख्या अजून वाढायला हवी हेही तितकेच खरे. 

त्या संध्याकाळी आम्ही काहीजण किसलीच्या कँटिनमध्ये चहा पिण्यासाठी गेलो होतो.

माझ्याबरोबर पक्षितज्ज्ञ कपिल जोशी होता. कपिलला धूम्रपानाची लहर आली म्हणून कँटिनच्या

इमारतीच्या मागे आम्ही गेलो. तिथे प्रकाश नव्हता. सहजच म्हणून मी हातातील टॉर्च लावला आणि आम्ही दोघेही ताडकन उडालोच... एक बिबट्या आमच्या अगदी जवळून वेगाने कशाच्यातरी मागे मैदानात पळाला. क्षणभर आम्हाला काही सुचेना, कारण ही घटना इतकी अनपेक्षित घडली होती की त्याक्षणी फक्त स्तब्ध होऊन उभे होतो. भानावर आल्यावर आम्ही ग्रुपमध्ये आलो आणि त्यांना ही घटना सांगितली. सगळे भयंकर टेन्स झाले. त्यांनाही मागे घेऊन गेलो. दूरवर कमांडर टॉर्चचा प्रकाशझोत टाकला, पण ना बिबट्या दिसला ना कोणता कॉल आला. कँटीन ते भगीरा हे अंतर आम्ही भीतभीत पार केले. भगीरा लॉग हट्सच्या मॅनेजरला ही घटना सांगितली असता तो म्हणाला, या परिसरात अनेक वेळा बिबट्या आणि टायगर यांची मुव्हमेंट सुरू असते. तुम्ही शक्यतो एकेकटे बाहेर पडूच नका. त्या बिबट्याने कदाचित शिकार केली असावी असाही अंदाज त्याने व्यक्त केला.

तिसऱ्या दिवशी पहाटेच्या सफारीसाठी आम्ही बाहेर पडलो असता युथ हॉस्टेलच्या डॉर्मेटरीच्या इमारतीजवळ जी सालाची झाडे आहेत तिथे बऱ्याच जिप्सी थांबलेल्या दिसल्या. आमच्या गाइडने माहिती दिली की काल रात्री बिबट्याने मारलेले हरणाचे पिल्लू झाडाच्या फांदीवर लपवून ठेवले आहे. उघड्या डोळ्यांनीही फांदीवर शिकार दिसत होती. त्यातला काही भाग खाल्लेला होता. परत एकदा तोच बिबट्या येण्याची शक्यता होती. 

आम्ही सकाळची फेरी संपवून अकरा वाजता परत आलो. मात्र तोपर्यंत बिबट्या आलेला नव्हता. आम्हाला भोजन करून जबलपूरला निघायचे होते. त्यामुळे नंतर काय झाले हे समजले नाही. परंतु, दुसऱ्या दिवशी पहाटे मात्र आमच्या घनश्याम ड्रायव्हरने हॉटेलवर फोन करून कळवले की त्या रात्री बिबट्याने ती शिकार झाडावरून हलवली होती.  

जंगलभ्रमंती करायची असेल तर कान्ह्याला एकदा तरी भेट द्यायलाच हवी. कान्ह्याची भव्यता, विपुल पक्षी जीवन, गवताची असंख्य कुरणे, इथेच दिसणारा बाराशिंगा आणि बऱ्याचदा होणारे व्याघ्रदर्शन... हे सर्व अनुभवता येते. या जंगलाने मला मोहात पाडलेच आहे. इथली शांतता आणि जादूई वन्यजीवन अनुभवायला मी तर वारंवार जातोच! 

 

संबंधित बातम्या