नागझिरा आणि बांधवगड

विवेक देशपांडे 
सोमवार, 28 डिसेंबर 2020

मैत्री अरण्याशी
निसर्गात फिरायला तर आवडतं, पण आपण कसे फिरतो? कधी विचार केला? निसर्गाचे नि जंगलाचे काही अलिखित नियम असतात, तिथं वावरताना ते पाळायलाच हवेत!
विवेक देशपांडे

नागझिरा जंगल म्हणजे माझे दुसरे घरच आहे. कारण आत्तापर्यंत मी साधारणपणे ३६ वेळा या जंगलात गेलो आहे. चालत, सायकलीवरून, मोटारसायकलने, हत्तीवरून, बंद गाडीतून, गाडीच्या टपावरून, ओपन जिप्सीने.. अशा सर्व पद्धतीने मी हे जंगल पाहिले आहे. या जंगलावर मी मनापासून प्रेम केले आहे. खरेतर या जंगलानेच मला जंगल पाहायचे वेड लावले. अनेक वर्षे या जंगलात फिरत असताना वनमहर्षी मारुतराव चितमपल्लींचा ‘जंगलमय सहवास’ मला लाभला. असे भाग्य क्वचितच कोणाच्या वाटेला येते...!

एप्रिल महिन्याचे ते शेवटचे दिवस होते. सूर्याने जंगलावर चौफेर हल्ला केला होता. माझ्या संस्थेचे निसर्गनिरीक्षण शिबिर जंगलात सुरू होते. त्यावेळी मारुतरावांचा मुक्काम तळ्याकाठी असलेल्या ‘नीलय’ या वनविश्रामगृहात होता. दुपारी तीन वाजता सुमारे दहा गाड्या आमच्या सर्व शिबिरार्थींना घेऊन जंगलातील अनेक वाटांवर रवाना झाल्या. मी नीलयच्या व्हरांड्यात तळ्याकडे बघत निवांत बसलो होतो. चितमपल्ली सर आतमध्ये वामकुक्षी घेत होते. तळ्यावर सांबर, हरणे आणि रानडुकरांचे कळप पाणी पिऊन गेले. काही सांबरांनी काठच्या चिखलात लोळण घेतली होती. उन्हापासून आणि कीटकांपासून वाचण्यासाठी सांबर हा नामी उपाय करतात. अशा जागेला मारुतरावांनी ‘सांबाराची लोटण’ असे गोंडस नाव दिले आहे. 

चार साडेचारच्या सुमारास मारुतराव उठले, की मग मी हॉलिडेहोम जवळ असलेल्या आमच्या कँटीनमधून त्यांच्यासाठी चहा घेऊन येत असे. नीलय ते कँटीन हे अंतर रस्त्याने खूपच लांब होते. मी मात्र नीलय ते लॉगहट्स आणि पुढे तळ्याच्या काठाने असलेल्या पायवाटेने शॉर्टकटने जात असे. त्या वाटेवरून हरणांची, सांबाराची आणि क्वचित प्रसंगी रानडुकरांची ये-जा सुरू असायची. मीही हा रास्ता माझ्या परिचयाचा असल्याने बिनधास्त एकटाच यावरून जात येत असे. त्यादिवशी मी लॉगहट्सवरून निघालो. हॉलिडेहोमच्या अलीकडे वाटेवर एक छोटासा लाकडी पूल आहे. तो तळ्याचा एक भाग आहे. मी त्या पुलाच्या मध्यावर आलो. मला एक वेगळाच दर्प जाणवला. मी कठड्यावरून सहज खाली बघितले आणि.... हादरलोच! एक मादी अस्वल आणि तिचे पिल्लू वर येत होते. क्षणभर काही सुचले नाही. पण भानावर येताच मारुतरावांचे शब्द आठवले... देशपांडे, जंगलात जर कधी अस्वलाची गाठ पडली तर फक्त जोरात पळायचे. मीही उलटा कसलाही विचार न करता नीलयच्या दिशेने शक्य तितक्या जोरात पळालो. धूम ठोकणे या उक्तीचा शब्दशः अर्थ मला त्या दिवशी समजला. नीलयपाशी येताच माझा पळण्याचा वेग मंदावला. मारुतराव बाहेरच होते. त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले अगदी योग्य केलेत तुम्ही विवेक. एका मोठ्या संकटातून तुम्ही वाचलात. नंतरचे दोन दिवस नीलयच्या खानसाम्याने आम्हाला दुपारचा चहा करून दिला.

***

जूनचा महिना होता. आम्ही मध्यप्रदेशातील ‘बांधवगड’मध्ये होतो. सूर्य निर्दयपणे आम्हाला भाजून काढत होता. कुलरमधील पाणीही गरमच येत होते. अशावेळी आमचे पुण्यामुंबईचे मित्र नेहमी म्हणतात... अरे एकतर हिमालयात जा नाहीतर घरातच गपगुमान एसीमध्ये बसा... काय गरज आहे अशा भयानक उन्हाळ्यात मध्यप्रदेशात जाण्याची. वेड लागलंय तुम्हाला. पण खरेच आम्हाला वेड लागले आहे आणि व्यसनही.. जंगलात भटकायचे...! खरेतर प्राणी बघण्याचा हा उत्तम काळ असतो. कृत्रिम पाणवठ्यावर आणि क्षुधाशांतीसाठी जंगलात सैरभैर होऊन फिरणारे प्राणी बघायचे असल्यास ऊन अंगावर घेत आम्ही जंगलात जाणेच पसंत करतो.

बांधवगड हे जबलपूर पासून १९० आणि कटनीपासून १०० किमी अंतरावर हे कान्ह्याच्या तुलनेत छोटे म्हणजे ४५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचे जंगल आहे. क्षेत्रफळाच्या मानाने वाघांची घनता या जंगलात भारतातील इतर जंगलांपेक्षा सर्वात जास्त आहे. मी जवळपास नऊ-दहा वेळा हे जंगल पहिले आहे आणि त्या प्रत्येक वेळी मला व्याघ्रदर्शन झाले आहे. आम्ही गमतीने असेही म्हणतो की इथे मांजरांसारखे वाघ दिसतात! मला आठवते, आम्हाला या वेळी पाचही जंगल सफरींमध्ये प्रत्येकवेळी कमीतकमी एक आणि जास्तीतजास्त चार वाघ दिसले होते. जंगलाच्या मधोमध सर्वात उंच जागी ‘बांधवगड’ हा पुरातन किल्ला आहे आणि आजूबाजूला अनेक गुहा, शिलालेख आणि मूर्ती आहेत. आम्ही बांधवगड किल्ल्यावरून खाली येत असताना एका वळणावर आम्हाला एक वाघीण दिसली.  

ती शांतपणे रस्त्यावरून खाली उतरत होती. आम्ही तिच्यामागून तिच्याच वेगाने तिचा पाठलाग करत होतो. कारण आम्हाला पर्यायच नव्हता. इतक्यात समोरून एक जिप्सी येताना दिसली. ती वाघीण त्या जिप्सीला बघून रस्त्यातच फतकल मारून बसली. मोठे विलक्षण दृश्य आणि प्रसंग होता तो. दोन जिप्सीच्या मधे ती वाघीण शांतपणे रास्ता रोको पावित्र्यात बसून होती. शेकडो फोटो काढले गेले. मधूनच ती आमच्याकडे आणि समोर बघत होती. आम्ही त्या वाघिणीला बघून कंटाळलो, पण तिला माणसे बघायचा कंटाळा आला नसावा. तेवढ्यात अचानक ती उठली आणि समोरच्या रस्त्याकडे निघाली. त्या जिप्सीवाल्याने रिव्हर्समध्ये गाडी चालवणे सुरू केले. कारण तो छोटा घाट असल्याने आणि समोर वाघीण असल्याने गाडी वळवणे शक्य नव्हते. हा पाठशिवणीचा खेळ साधारणपणे १५-२० मिनिटे सुरू होता. नंतर वाघिणीलाच दया आली आणि एका वळणार ती जंगलात शिरली. त्यानंतर काही क्षणातच समोरच्या जिप्सीवाल्याने गाडी वळवून सरळ चालायला सुरुवात केली. आम्हीतर जणू तब्बल एक तास वाघिणीबरोबर ‘कॅट वॉक’ करत होतो. बांधवगडला साधारण उन्हाळ्यात वाघ हमखास बघायला मिळतो. 

दुसऱ्या दिवशी असाच एक बांका प्रसंग माझ्यावर ओढवला होता. जंगलातील सफारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. आमच्या जिप्सीत माझ्या बरोबर माझी पत्नी प्रतिभा, मुली मृण्मयी, गौतमी आणि भाऊ मिलिंदही होता. सकाळी नऊच्या सुमारास एके ठिकाणी चार-पाच जिप्सी थांबलेल्या दिसल्या. आम्हीही तिथे जिप्सी बंद करून थांबलो. अगदी जवळच सांबरांचा अलार्म कॉल सुरू झाला. झाडांवरून वानरांनीही भयसूचक आवाज काढायला सुरुवात केली. तेव्हा लक्षात आले की आसपास कुठेतरी वाघ, बिबट नक्कीच आहे. काहीक्षण गेले आणि अचानक स्पॉटेड डिअरनेही अलार्म कॉल दिला... आणि चार-पाच हरणांनी रस्त्याच्या डाव्याबाजूकडून उजवीकडे धूम ठोकली. पुढच्या जिप्सीचा गाइड सीटवर उभा राहून जंगलात बघत असतानाच त्याला वाघ लोकेट झाला. तो कुठून बाहेर येणार याचा अंदाज बांधत त्याने त्यांच्या ड्रायव्हरला गाडी सुरू करून त्या अपेक्षित ठिकाणी घ्यायला सांगितले. आम्ही सर्वजणही हे सगळे आमच्या जिप्सीतून बघत होतो. 

अचानक एक वाघ बाजूच्या वाळलेल्या गवतातून बाहेर आला. मी उभा होतो आणि गळ्यात कॅमेरा होता. गाइडने सर्वांना बसायला सांगितले. इतर सर्व बसले. मी मात्र उभाच होतो आणि ड्रायव्हरने काहीही सूचना न देता एकदम गाडी सुरू केली. मी बेसावध असल्याने मागच्या सीटवरून मागच्या बाजूला फेकला गेलो. सुदैवाने ही क्रिया घडत असताना माझ्या एका हाताने मी जिप्सीची दांडी पकडली.. पण मी जिप्सीच्या मागे पूर्णपणे उलटा लटकलो. मृण्मयी आणि प्रतिभाने आरडाओरडा केल्याने ड्रायव्हरने जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. पण मला वर येता येईना. वाघ समोर असल्याने कोणीच जिप्सीच्या खाली उतरणे शक्य नव्हते. अशा वटवाघळाच्या अवस्थेत सुमारे दोन-तीन मिनिटे होतो. गळ्यातला कॅमेरा खाली लटकत असल्याने गळा दाबल्यासारखे वाटत होते. मोठी दयनीय अवस्था झाली होती. पण कोणीच काहीच करू शकत नव्हते. बर इथपर्यंत सर्व ठीक होते. मात्र गाडी अचानक सरू झाल्याने वाघ विचलित झाला होता आणि आमची गाडी थांबल्याने त्याला क्रॉसिंग करणे अवघड झाले होते. आमच्या गाडीच्या मागे अजून एक जिप्सी काही अंतरावर थांबली. इतर तीन-चार जिप्सी वाघाला बघण्यासाठी, त्याचे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे होत्या. त्यावेळी त्या वाघाच्या लक्षात आले की या दोन थांबलेल्या जिप्सीच्या मधून आपल्याला जात येईल... आणि नेमके तेच घडले. मी त्याच शीर्षासन आणि अवघडलेल्या अवस्थेत असताना आमच्या दोन जिप्सीच्या मधून शांतपणे वाघोबा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले. साऱ्यांनी श्वास रोखले होते. मी उलटा होऊन जंगलातला तो ‘फुल ग्रोन मेल टायगर’ माझ्यापासून काही फुटांवरून माझ्याकडे बघत जाताना पाहत होतो. पोटात गोळा आला होता मात्र मी धीर सोडला नव्हता. त्याला माझ्याशी काही देणेघेणे नव्हते हे मला अनुभवावरून माहीत होते. पण वाघाने असा अर्धा जिप्सीत आणि अर्धा जिप्सीबाहेर उलटा लटकलेला मानव प्रथमच पहिला असावा. कुतूहल म्हणून जरी तो हे काय प्रकरण आहे हे पाहायला थोडा जरी जवळ आला असता, तर माझी नाही पण इतरांची हृदयक्रिया बंद पडली असती. वाघ सुरक्षित अंतरावर गेल्यावर आमचा गाइड पटकन खाली उतरला आणि माझ्या पृष्ठभागाला टेकू देऊन मला जिप्सीत ढकलले. इतर मंडळींनी ‘बच गया....’ हे सामुदायिक उद्‍गार काढले. माझा डावा खांदा पूर्णपणे दुखावला होता. इतका वेळा शांत असलेल्या गौतमी आणि मृण्मयीला चांगलेच हसू फुटले होते. त्यांना काही केल्या हसू आवरता येत नव्हते. मात्र हे इतक्या अनपेक्षित आणि क्षणार्धात घडले होते की कोणालाच सारासार विचार करायला वेळ मिळाला नव्हता. आत्ता हे लिहितानाही हा प्रसंग जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर परत उभा राहिला आहे.

***

नागझिरा जंगलात पूर्वी एक रूपा नावाची हत्तीण होती. साधारण १९९० पासून अगदी २०१० पर्यंत. धर्मा ध्रुवे हा तिचा माहूत होता. रूपा अतिशय प्रेमळ होती. एकदा नेहमीप्रमाणे आमचा कॅम्प नागझिऱ्यात होता. दुपारी दोनची वेळ होती. नुकतेच भोजन झाले होते. चौकशी कक्षापाशी रूपा आणि धर्मा उभे होते. अचानक धर्माने मला विचारले की देशपांडेसर येता का जंगलात? मला आश्चर्य आणि आनंद दोन्ही एकाच वेळी वाटले म्हणतात तसे झाले. मी म्हणालो धर्मा माझी बायको पण आहे, तिलाही येऊ दे का? ‘हो जी, आना की! पण तीन-चार तास बसायची तयारी ठेवा.’ मी प्रतिभाला विचारले. ती एका पायावर तयार झाली. धर्मा, मी आणि प्रतिभा आम्ही जवळजवळ सूर्यास्तापर्यंत नागझिऱ्याच्या कधीच न जाऊ शकणाऱ्या जंगलात भटकंती करून आलो. वाघ आणि बिबट फक्त दिसले नाहीत. पण इतर सर्व प्राणी आणि रानकुत्र्यांचा एक मोठा कळपही आम्ही पाहिला. पूर्वी राजे महाराजे हत्तीवर बसून शिकारीसाठी जंगलात जात असत. आम्हीही तसेच वावरलो, फक्त आम्ही बंदुकीऐवजी कॅमेराने शूट केले. मी जवळजवळ चार स्लाइड रोल एक्सपोज केले. सूर्यास्ताच्या वेळी आम्ही गौर गल्लीतून परत तलावावर आलो. धर्माने परत रूपाला तलावात डुंबण्यासाठी सोडून दिले. त्यानंतरही मी अनेकवेळा धर्माबरोबर जंगलात गेलो परंतु हा पहिला अनुभव मात्र खूप थरारक होता. 

काय असायचे की रूपाला रात्रीच्या वेळेत जंगलात सोडून दिले जायचे आणि मग सकाळी मीही अनेकवेळा धर्माबरोबर तिला शोधायला जंगलात निघायचो. रूपा पाळीव हत्तीण असल्याने तिच्या पायात साखळदंड होते. साखळदंड जमिनीवरून कुठे घसरत गेले आहेत, वाटेत कोणत्या झाडाच्या फांद्या तुटल्या आहेत, काही पाने खाऊन खाली टाकली आहेत.. हे सर्व बघत बघत तिला शोधायला आम्ही जायचो. कधी ती अगदी जवळच सापडायची. तर कधी तीन चार किलोमीटर पायपीट करावी लागायची. ती दिसली की धर्मा तिच्याशी बोलायचा आणि मग तिच्यावर बसून आम्ही चितळ मैदानाच्या जवळ असलेल्या धर्माच्या घरापर्यंत तिच्यावरच बसून परतायचो. कधी कधी रूपाबरोबर आम्हीही चालत चालत यायचो. ती बरोबर असल्याने प्राण्यांची भीती वाटायची नाही आणि तशीही इतर कोणत्याही प्राण्यांची भीती कधी वाटलीच नाही. आता रूपा वयस्क झाली आहे. ती पेन्शनर आहे. तिला वनखात्याने नवेगाव बांध इथे पाठवले आहे आणि आता तिथे ती आपले उरले सुरले आयुष्य मजेत घालवते आहे.  

***

मी अनेकवेळा सांगितले आहे, की मी कधीच फक्त वाघ दिसावा म्हणून जंगलात जात नाही. अगदी पहिल्या वेळेस आणि नंतरही पाच-सहा वेळा असे वाटले. वाघ दिसालाही... पण मग नंतर चितमपल्ली सरांच्या सहवासात आल्यावर मात्र ही क्रेझ आपोआपच बाजूला पडली. इतर प्राणी, असंख्य पक्षी, फुलपाखरे, कीटक, वनस्पती, फुले, झाडे, या सर्वांनी जंगल समृद्ध असते. मग त्याकडे का दुर्लक्ष करायचे. हे जेव्हा समजले तेव्हा जंगल बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. 

ताडोबाच्या जंगलात असाच फिरत असताना सकाळच्या कोवळ्या उन्हात ‘सिग्नेचर स्पायडर’चे जाळे दिसले. एखाद्या माणसाची सही असावी असेच ते जाळे त्याने विणलेले असते. आम्ही त्याचे फोटो काढत असतानाच एक फुलपाखरू त्यात अडकले. त्या बिचाऱ्याची धडपड सुरू झाली. मात्र त्या प्रयत्नांत ते अधिकच अडकत गेले. ही सूचना कोळीबुवांना मिळताच त्यांचे काम सुरू झाले. आपल्या नांग्यांनी फुलपाखराला बेशुद्ध केले आणि मग त्यातील इतर घटक शोषित गेले. अशा बारीक सारिक घटनासुद्धा आपल्याला जंगलातच दिसतात. पण फक्त वाघ किंवा बिबट्या पाहायचे मनात असेल तर अशा अनेक छान छान घटनांना आपण मुकतो.

आजमितीला मी भारतातील अनेक जंगले पालथी घातली आहेत. मला जंगलाची अद्‍भुत शक्ती खेचून नेते. ऐन उन्हाळ्यातील वैशाख वणवा मी अंगावर झेललाय. वळवाच्या पावसात जंगलात वेड्यासारखा नखशिखांत भिजलोय. पौर्णिमेचे उगवते चंद्र पाहिले आहेत, तर उगवतीचे ते लालसर सूर्य अनुभवलेत. हत्तीवरून वाघाचा पाठलाग केलाय. तर कधी कोळ्याने केलेली फुलपाखराची शिकार आणि वाघाने केलेली गव्याची शिकार पाहिली आहे. मी जंगलात जातो तेच मुळी मनाच्या कुपीतील आठवणींना जागवण्यासाठी आणि नवीन स्मृती उरात भरून घेण्यासाठी. माणसांच्या सिमेंटच्या जंगलात मी फारसा रमत नाही. मग मी परत परत ते हिरवे कण आणि क्षण वेचायला, त्या अरण्याचा तो मस्त गंध नाकात भरून घ्यायला जंगलात जातो. मला जंगलाने खूप छान मित्र मैत्रिणी मिळवून दिले आहेत. माझी फुप्फुसे हिरवी केली आहेत आणि मनाला तर हिरवी कावीळ झाली आहे. मला झाडांशी बोलायचे असते, पक्ष्यांचे संगीतही ऐकायचे असते. मरगळलेल्या मनाला आणि शरीराला ताजेतवाने करण्याचे काम जंगल करते.

मी काही तज्ज्ञ नाही. पण जंगलात भटकताना जे काही बरे वाईट अनुभव आले, ते शब्दांत गुंफून वाचकांपुढे मांडायचा माझा हा छोटासा प्रयत्न होता. हे वाचून जर कोणाला जंगलात जाण्याची इच्छा झाली, तर माझ्या या लेखांचे सार्थक झाले असे मी समजेन. ज्या व्यसनाचा अभिमान बाळगावा असे हे जंगलभ्रमंतीचे व्यसन तुम्हाला लाभो हीच सदिच्छा. आम्हाला जंगलभ्रमंतीमध्ये जो आनंद मिळतो तो इतरांना देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समर्थांच्या उक्तीप्रमाणे ‘घेतीला आनंद वाटीला आनंद.. या परि तो आनंद आणखी कोणता...!’ 

चला तर मग वेडे होऊन जंगलात भटकायला...!  

(समाप्त)

संबंधित बातम्या