फुलपाखरू पाळता येतं? 

मृणालिनी वनारसे
शुक्रवार, 16 मार्च 2018

गंमत गोष्टी

तुम्हाला काय वाटतं? फुलपाखरू पाळता येईल? कुत्रा, मधमाश्‍या आणि फुलपाखरू पाळण्यात काही फरक आहे? आणि फुलपाखराला बोलवायचं तर काय काय करता येईल?

एक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत ओल्या मातीवर चक्क एक पिवळं फुलपाखरू बसलं होतं. आपली सोंड चिखलात खुपसून ते कुणास ठाऊक काय करत होतं. चिकूनं हातातला तांब्या खाली ठेवला आणि आपला हात तिनं सावकाश फुलपाखराजवळ नेला. दोन्ही बोटांची चिमूट करून ती त्या फुलपाखराचे पंख धरणार तेवढ्यात ते उडालं आणि तिच्या डोळ्यासमोरून क्षणार्धात नाहीसं झालं. ‘ही फुलपाखरं नेहमी अश्‍शीच करतात. कध्धीसुद्धा माझ्या मुठीत येत नाहीत.’ ती मनाशी म्हणाली. मी त्यांना मध दिला तर? तर ती माझ्यापाशी येतील का?.. तिला ही कल्पना आवडली. मध द्यायचा आणि फुलपाखरू पाळायचं. त्या लांडग्याच्या गोष्टीत कसं, माणूस हळूहळू लांडग्याला अन्न देऊ लागला आणि लांडगा माणसाजवळ राहू लागला आणि त्याचा कुत्रा झाला, तसं काहीतरी होऊ दे! 

तसंही लांडगे आणि कुत्रे पाळण्यापेक्षा फुलपाखरू कितीतरी छान.. चिकूला स्वतःकडं बघून वाटलं. कुत्रे जवळपास तिच्या उंचीचे दिसायचे. फुलपाखरू तिच्या बोटावर किती छान बसलं असतं आणि छान दिसलं असतं. तिचं स्वतःचं फुलपाखरू. काय बरं नाव ठेवेल ती त्याचं? पिवळं असलं तर म्हणेल लेलो. ती लहानपणी ‘यलो’ला ‘लेलो’ म्हणायची. घरातले सगळेच मग पिवळ्या रंगाला लेलो म्हणू लागली. निळं असेल तर नीलम.. आणि रंगीबेरंगी असेल तर? चिकू विचार करत स्वयंपाकघरात गेली. तिथं बाबा चहा करत होता. त्याच्यापाशी जाऊन ती म्हणाली, ‘मला जरा वाटीत मध दे, मला फुलपाखरू पाळायचंय..’ तिची अजब मागणी ऐकून बाबा हातातलं गाळण खाली ठेवून म्हणाला, ‘तू बरी आहेस का? फुलपाखरू कोण पाळतं का?’ 

‘का? का नाही पाळू शकणार? मधमाश्‍या पाळता येतात, मी पाहिलंय. तर मग फुलपाखरू का नाही पाळता येणार?’ चिकूनं सडेतोड प्रश्‍न विचारला. तिच्या बाणेदार आविर्भावाकडं बाबा बघतच बसला. ‘तरी मी काय कुत्र्याचं पिल्लू मागतेय का?’ चिकू पुढं म्हणाली. तशी बाबा हसू लागला. ‘हसण्यासारखं काय आहे त्यात?’ चिकू फुरंगटून म्हणाली.. ‘कुत्रा, मधमाश्‍या आणि फुलपाखरू यांच्या पुढं पाळू जोडलं तर एक अर्थपूर्ण वाक्‍य जरूर तयार होतं. पण त्यानं फुलपाखरू पाळता नाही येणार..’ बाबा काय बोलला ते चिकूला ढिम्म कळालं नाही. ‘..कारण कुत्रा पाळणं आणि मधमाश्‍या पाळणं यात फरक आहे. फुलपाखरू तर या दोन्हींहून वेगळं आहे,’ बाबा म्हणाला. 

‘तू मला मध दे, मग फुलपाखरू येईल माझ्याकडं,’ चिकूनं तिची आयडिया पुढं रेटली. 

‘तुला फुलपाखराला बोलवायचंय ना? मग आपण अजूनही गमतीजमती ठेवू शकतो. एखादं सडत आलेलं केळं सगळ्यात छान,’ बाबा म्हणाला. 

‘ई.. बाबा खरंच?’ 

‘अगदी खरं!’ बाबा हसून म्हणाला.

संबंधित बातम्या