गोष्टीची गोष्ट 

मृणालिनी वनारसे 
शुक्रवार, 11 मे 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

दोस्तहो, वानराचा नर झाला... लांडग्याचा कुत्रा झाला.. ओरोचचा फर्डिनंड झाला. फुलपाखरं काही बधली नाहीत... फुलपाखरांनी कधी गाणंही गायलं नाही. जेरीला विंचवाशी सलगी कुणी करू दिली नाही. दूर ओसाडीतली फुलं ॲलिसशी बोलली. घरच्या बागेतली फुलं मात्र मऊ मऊ मातीच्या बिछान्यावर झोपी गेली... 

या गोष्टी म्हटल्या तर सुट्या-सुट्या आणि म्हटलं तर एकमेकींशी जोडलेल्या! तुम्हाला या गोष्टींत काय काय दिसतं? या गोष्टी आपल्या आजूबाजूला किती तरी वर्षं आहेत. अशा बऱ्याच कथा-कहाण्या असतात. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं टिकतात. कधी एकाच गोष्टीतून आपल्याला नवेनवे अर्थ मिळत राहतात, तर कधी गोष्टी एकमेकांशी जोडून एक वेगळीच गोष्ट आकाराला येताना दिसते. गंमतगोष्टींच्या सुरवातीला चिकूला प्रश्‍न पडला, की पुस्तकात तर चित्र दाखवलंय वानराचा होता होता नर झाला.. हे कसं बाई झालं? कोशातून फुलपाखरू बाहेर येतं तसं? नाही नाही! तुम्ही लगेच म्हणाल, ती तर फुलपाखराची फक्त एक अवस्था आहे. छोट्या बाळाचा मोठा माणूस होतो तसं? बाळ असणं ही प्रत्येक माणसाची अवस्था आहे. मग नेमकं कसं? फूल गळून पडतं आणि झाडाला फळ लागतं... नाही नाही मित्रांनो, तुम्ही मला सांगाल, की यातल्या कुठल्याही उदाहरणानं वानराचा नर कसा होतो ते स्पष्ट होत नाही. 

‘वानराचा नर या जन्मी नाही झाला काही... आपण खूप आधीच्या जन्मी माकड होतो.... आणि मग तो जन्म संपल्यावर या जन्मी माणूस झालोय...’ झ्या माझ्या एका छोट्या मित्रानं सांगितलं होतं. 

‘आताची वांदरं माणूस कधी होणारेत गं ताई?’ आणखी एका छोट्या मैत्रिणीनं विचारलं होतं. 

ज्या माणसाच्या मनात ‘वानर ते नर’ या प्रवासाचा विचार पहिल्यानं आला त्या डार्विन आजोबांची तर काय टिंगल त्यावेळी झाली होती माहितीये? त्यांना विचारलं गेलं होतं, माकडांना जर तुम्ही पूर्वज मानत असाल तर ते तुमचे आईकडून पूर्वज की वडिलांकडून? यावर डार्विनचा पाठीराखा हक्‍सले यानं उत्तर दिलं होतं, की इतक्‍या मोठ्या विचाराची जर अशी हेटाळणी होणार असेल तर मी दोन्हीकडून माकड हेच पूर्वज पसंत करतो! 

आज इतक्‍या वर्षांनंतरसुद्धा ‘वानर ते नर’ प्रवासाविषयी खूप साऱ्या शंका आपल्या मनात असू शकतात. शंका असणंसुद्धा स्वाभाविक आहे. हा काही आपला रोजचा अनुभव नाही ना! सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे समजायलासुद्धा म्हणूनच तर वेळ गेला. रोज आपण सूर्याला उगवताना आणि मावळताना पाहात होतो. पृथ्वीला नव्हे. 

पण आता याच उदाहरणामुळंसुद्धा किती गमतीजमती होऊ शकतात बघा हं... सूर्य रोज भेटायला येतो आणि अस्तंगत होतो. हा सूर्य नाही, पृथ्वी फिरते आहे हे ही समजलं. त्यात एक चक्राकार गती आहे. रोज मूळ जागी परत येणं आहे. आता अशी गोष्ट कुणी जन्म-मृत्यूच्या ‘फेऱ्या’बाबत करू लागलं तर? पुढं जाऊन, आपण एकदा माकड होतो, आता माणूस झालोय म्हणजे कुणी ‘बडे’ झालोय आणि यानंतर (जर आपण आपण चांगली कर्मे करत राहिलो तर) एकदम मोक्ष! असं कुणी म्हणू लागलं तर? 

या आणि अशा किती साऱ्या कल्पना... मोठा गोंधळ उडतो ना अशा वेगवेगळ्या कल्पना ऐकून? खरं काय? असा प्रश्‍न मनात येतो. खरं म्हणजे तरी काय? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे खऱ्याखुऱ्या वस्तूंचं जग. म्हणजे पाणी, दगड, झाडं, खुर्च्या... इत्यादी इत्यादी. म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या मानण्यावर अवलंबून नाहीत. ज्या आहेत की नाहीत हे सगळ्यांना तपासता येऊ शकतं अशा गोष्टी. याच्या उलट दुसरं जग आहे ते आपल्या कल्पनांचं जग. इथं काय वाटेल ते होऊ शकतं. चंद्रावर ससा बागडू शकतो. शेवग्याच्या झाडाला आंबे लागू शकतात इत्यादी. आपण आपले राजे. आपण या दोन्ही जगांचे रहिवासी आहोत. आपल्याला फक्त फरक ओळखता यायला हवा. माझ्या मनात मी रोज मंगळावर जाऊन येऊ शकते. पण तो काही ‘खऱ्या’ दुनियेचा भाग नाही हे माहीत हवं. 

आपण ‘वानर ते नर’सारख्या गोष्टी समजावून घ्यायला लागलो की मग मात्र गंमत होते. ही गोष्ट कुठं आहे स्पर्श करून अनुभवता येण्यासारखी! इतक्‍या लाख वर्षांपूर्वीचं कसं काय ठाऊक शास्त्रज्ञ मंडळींना? इथं काम करतात ‘पुरावे.’ अगदी एखाद्या कसलेल्या डिटेक्‍टिव्हप्रमाणं वैज्ञानिक पुरावे गोळा करतात आणि मागं झालेल्या घटना शोधून काढतात. त्यातून मग वेगळ्याच गंमतगोष्टी हाती लागू शकतात. ‘वानर ते नर’ हा प्रवास ‘लांडगा ते कुत्रा’ किंवा ‘ओरोच ते फर्डिनंड’ प्रवासापेक्षा वेगळा कसा हे कळतं. 

काय म्हणता तुम्हाला ठाऊक आहे? मग आम्हालाही सांगा बरं... 

भेटूया एका नव्या गोष्टीसह.. पुढच्या भागात...

संबंधित बातम्या