गुहेतला खजिना...खराखुरा! 

मृणालिनी वनारसे
गुरुवार, 17 मे 2018

गंमत गोष्टी
कशापासून काय होते?...

ते वर्ष होतं १९४०. स्थळ - फ्रान्समधलं एक निवांत खेडेगाव. सप्टेंबर महिन्यातला दिवस होता. कडाक्‍याची थंडी अजून 

सुरू झाली नव्हती. मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन या चौकडीला काहीतरी मजेदार करावंसं फार वाटत होतं. त्यावेळी काही इंटरनेट नव्हतं, व्हिडिओ गेम्ससुद्धा नव्हते. वेळ मजेत काढायचा तर तरुण मुलं बाहेरच काहीबाही उद्योग शोधत. मार्सेल आणि चौकडीसुद्धा तेच करत होती. आपला आवडता कुत्रा रॉब याला घेऊन ही मुलं गावाजवळच्या एका वनराजीत मजा करायला गेली होती. सगळे मिळून खेळत होते. तेवढ्यात काय झालं, की रॉब महाशयांना एक ससा दिसला. ससा दिसल्याबरोब्बर रॉब महाशय त्या बिचाऱ्या सशाच्या मागं धावत सुटले. 

ससा कुठं गायब झाला माहीत नाही. पण रॉब मात्र या भानगडीत एका भुयारात शिरला. हे भुयार तिथं कधीपासून होतं, कुणी खणलं होतं काहीच कुणाला ठाऊक नव्हतं. असं एक भुयार आहे आणि ते एका गुप्त खजिन्याकडं घेऊन जातं अशी दंतकथा मुलांनी गावात अनेकदा ऐकली होती. आपल्याला ते भुयार सापडावं आणि त्यानं आपल्याला गुप्त खजिन्यापर्यंत घेऊन जावं अशी कल्पना मनातल्या मनात गावातल्या सगळ्यांनी केली होती. पण पूर्वजांनी सांगितलेली कथा. कुणी प्रत्यक्ष ते भुयार कधी पाहिलं नव्हतं. इकडं रॉब महाशय मात्र त्या अचानक सापडलेल्या भुयारात असे काही शिरले की जणू काही तो त्यांचा रोजचा रस्ता असावा. आत गेले आणि अडले. ते भुयार सगळं दगड मातीनं भरून गेलं होतं ना! 

रॉबच्या मागं आपली चौकडी पोचलीच. रॉब कुठं गेला हे बघायला तेही त्या भुयारात आत शिरले; मात्र त्यांच्या लक्षात आलं की ही जागा काहीतरी वेगळी आहे. मार्सेलच्या मनात कल्पना चमकली, कदाचित हे ते भुयार असेल, गुप्त खजिन्याकडं घेऊन जाणारं. त्याच्या तर अंगावर शहाराच आला. आपणच ते ‘लकी’ ठरणार की काय?
पण भुयारातून मार्ग काढणं काही सोपं नव्हतं. एकतर आत खूप अंधार होता. शिवाय या मुलांकडं काही हत्यारंपात्यारंसुद्धा नव्हती. आपल्याला काहीतरी भारी गवसलंय एवढं त्या चौघांना कळलं होतं. पण त्यांनी आस्तेकदम घेण्याचं ठरवलं. 

उद्या नीट तयारीनिशी यायचं असं ठरवून चौघं घरी गेले. त्या रात्री त्यांना झोप कशी लागली असेल! खजिन्याकडं घेऊन जाणारा दिवस कधी उजाडतो असं त्यांना झालं असेल का!? काय सापडेल खजिन्यात? आणि मग आपण काय काय करू? त्यातल्या प्रत्येकानं स्वप्नं रंगवली असतील. रॉब महाशय तेवढे सुखाची झोप घेऊ शकले असतील. अर्थात त्यांना सशाची स्वप्नं पडत असतील तर काही सांगता यायचं नाही. 

अखेर तो दिवस उजाडला. चौकडी रानाकडं निघाली. आपली जागा चुकायला नको म्हणून त्यांनी तिथं एक खुणेचा दगड ठेवला होता. जवळ जुजबी हत्यारं होती, कुदळ, खोरं इत्यादी. मोठ्यांनी चौकशी केली तर काय सांगायचं? आहे आमची एक गंमत, तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे? आता ती मोठी म्हणजे चांगली सतरा - अठरा वर्षांची झाली होती. आपल्या मनाप्रमाणं थोडंतरी वागायला हवंच ना! मोठ्यांनी त्यांच्याकडं पाहिलं आणि ती गालातल्या गालात हसली. त्यांना त्यांचं तरुणपण आठवलं. त्यांनाही तेव्हा असंच नव्हतं का वाटलं, की आपण भुयार शोधू आणि खजिन्याचे स्वामी होऊ? चालू दे. थोडे दिवस करतील आणि मग निमूट कामधंद्याला लागतील... पालकांनी विचार केला. 

मुलांना मात्र चांगला जोश वाटत होता. ते भुयार त्यांना कुठं घेऊन जाणार होतं? मार्सेलनं सगळ्यात उपयोगाची गोष्ट आणली होती, मेणबत्ती! तिच्या प्रकाशात त्यांनी भुयारातून चालायला... सॉरी.. रांगायला सुरवात केली. जवळपास पन्नास फूट रांगल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन या चौकडीला अभूतपूर्व गोष्ट दिसली. त्यांच्या अपेक्षेतला खजिना की त्याहूनही अमूल्य असं काही? आणि मग या चौघांनी काय केलं? काय म्हणता? ओळखायला काही ‘क्‍लू’ हवाय? लहानपणी भिंतीवर चित्रं काढली म्हणून किती जणांनी ओरडा खाल्लाय? हाच तर क्‍लू!

भेटूया पुढच्या अंकात...

संबंधित बातम्या