सोपे संख्यावाचन आणि थोडी गंमत 

मंगला नारळीकर
सोमवार, 20 मे 2019

गणित भेट
गणिताची भीती वाटते? छे! किती गमती असतात त्यात...

‘काल आमच्या घरी एक गंमत झाली. आपण गेल्या वेळी ठरवलं होते ना, की संख्यावाचन सोपे करायचे! पंचवीसऐवजी वीस पाच, सदतीस ऐवजी तीस सात असे वाचन करायचे; तर मी आईला म्हटले, आपण वीस पाच तारखेला माझी पार्टी करू या. तिला समजले मी काय म्हणतोय पण पंचवीसऐवजी वीस पाच का म्हणायचे हे तिला पटत नव्हते. थोड्या वेळाने बाबा तिला म्हणाले, यंदा नंदूचे वय दोन अंकी होणार आणि तू चाळिशीत प्रवेश करणार. ती म्हणाली, की मी अजून एक वर्षाने चाळिशीत जाणार आहे. बाबा म्हणाले, की एकोणचाळीस म्हणजे चाळीशीतच येतेस की! तेव्हा ती म्हणाली, की तिला आपली नवी संख्यावाचनाची पद्धत पसंत आहे. ती तीस नऊ वर्षांची होते आहे, चाळिशी अजून एक वर्ष दूर आहे,’ नंदूने त्याच्या घरी झालेला संवाद सांगितला. 

‘छान, म्हणजे वेगळ्याच कारणासाठी तुझ्या आईला आपले संख्यावाचन पसंत पडले. एकोणचाळीस, एकोणतीस या संख्या चाळीसपेक्षा एक कमी, तीसपेक्षा एक कमी या अर्थाच्या संस्कृत संख्यांपासून आल्या आहेत. चौऱ्याऐंशी, अठ्ठ्याहत्तर, पंच्याण्णव, सत्तावीस असे जोडाक्षरांचे शब्द टाळायला आणि बोलणे व लिहिणे यात सुसंगती आणून संख्यावाचन आणि संख्यालेखन सोपे करायला ही पद्धत घ्यावी असे आपण ठरवले होते,’ मालतीबाई म्हणाल्या. 

शीतलने आणखी एक मुद्दा लक्षात आणून दिला. ती म्हणाली, ‘आपण चार अंकी किंवा त्याहून मोठ्या संख्यांचे वाचन करताना सर्वांत मोठ्या स्थानावरच्या अंकापासून सुरुवात करून क्रमाने उतरत्या स्थानावरचे अंक वाचतो. पण दशक एककाची दोन अंकी संख्या वाचताना मात्र एकदम क्रम उलटा करतो, याचाही सुरुवातीला त्रास होतो. उदाहरणार्थ, चार हजार सातशे त्रेचाळीस या संख्येत पाहा. ही संख्या लिहिता - वाचताना आधी चार हजार, मग सातशे किंवा सात शतक आणि शेवटची दोन अंकी संख्या वाचताना मात्र दशक एककाच्या संख्या उलट क्रमाने येतात!’ ‘खरे म्हणजे ही नवी पद्धत सोपी आहे. आधी सवय नसली, तरी अर्थ समजायला सोपीच आहे. त्र्याहत्तर शब्द माहीत नसला तर अर्थ समजायला वेळ लागेल, पण सत्तर तीनचा अर्थ लगेच समजतो. म्हणूनच शाळेत जाऊन संख्यावाचन न शिकलेले लोक या पद्धतीत बेरीज वजाबाकी लवकर करतात. उदाहरणार्थ, भाजी विकणाऱ्या आजी किंवा फळे विकणारे काका,’ बाई म्हणाल्या. ‘आपण हीच सोपी पद्धत वापरू या. गणित शिकायला सुरुवात करणाऱ्या लहान मुलांना नक्की पसंत पडेल,’ नंदूने अनुमोदन दिले. 

‘आता एखादे सोपे कोडे देता का?’ सतीशने विचारले. 

मालतीबाई सांगू लागल्या, ‘एका ग्लासात १०० मिलिलिटर दूध आहे, तर दुसऱ्या तशाच ग्लासात १०० मिलिलिटर पाणी आहे. पहिल्या ग्लासातून १० मिलिलिटर दूध पाण्याच्या ग्लासात घातले आणि ते ढवळून त्यातला मिश्रणाचा १० मिलिलिटर द्रव दुधाच्या ग्लासात घातला. आता दुधाच्या ग्लासात थोडे पाणी आहे, तर पाण्याच्या ग्लासात थोडे दूध आहे. दुधाच्या ग्लासातून जेवढे दूध गेले, त्यापेक्षा कमी पाणी त्यात आले, की त्यापेक्षा जास्त पाणी त्यात आले?’ 

‘जरा चक्रावून टाकणारे कोडे आहे. आम्ही सावकाश करून पाहतो... प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करेल. पुढच्या वेळी पाहू या उत्तर..’ सतीश म्हणाला.
 

संबंधित बातम्या