गौरी-गणपतीची आभूषणे

ज्योती बागल
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
 

गौरी-गणपतीच्या आगमनाची तयारी करताना गौरी-गणपतीच्या आभूषणांनाही विशेष महत्त्व दिले जाते. ही आभूषणे सोन्याचांदीसह मेटल, बेंटेक्स, मोती, प्लॅस्टिक अशा विविध प्रकारात उपलब्ध असून ग्राहक आपल्या सोयीनुसार ती खरेदी करतात.

गौरीच्या दागिन्यांमध्ये मुकुट, मंगळसूत्र, डोरली, हार, कानातले, नथ, बांगड्या, बाजूबंद, मेखला अशा आभूषणांचा समावेश दिसतो. गळ्यातल्या हारांमध्ये कोल्हापुरी साज, पुतळी हार, डोरली, ठुशी, लक्ष्मी हार, तन्मणी आणि मोत्यांचे हार उपलब्ध आहेत. मेटलचा कोल्हापुरी साज १२० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहे. पुतळी हाराच्या किमती ६० रुपये, १८० रुपये आणि ११० रुपये आहेत. पुतळी हारामध्ये गोल चकत्यांवर लक्ष्मीचे फोटो असतात. मेटलचे गोल्डन लॉंग हार ८०० रुपये जोडी मिळतात. तर मोत्यांचे हार अगदी २० रुपयांपासून ५५० रुपयांपर्यंत आहेत. तसेच सात पदरी, अकरा पदरी असे गोल्डन हारदेखील आहेत. यांच्या साधारण किमती ६०० रुपये दरम्यान आहेत.  
ठुशीमध्ये मेटल आणि मोत्यांच्या ठुशी उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती २०० रुपये, ३०० रुपये, १२०० आणि १५०० रुपयांना जोडी आहे. सध्या जिजाऊ ठुशीला मागणी असून तिची किंमत ४५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच पारंपरिक तन्मणीला देखील मागणी असून तिच्या किमती ६० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहेत. मंगळसूत्रांमध्ये लहान आणि लांब दोन्ही प्रकार आहेत. यांची जोडी ३६० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत आहे.  
मुकुटाने गौरीच्या मुखवट्याची शोभा आणखी वाढते. हे मुकुटदेखील मेटल, मोती आणि कागदी पुठ्यांपासून तयार केलेले आहेत. मेटलच्या मुकुटांमध्ये जास्त डिझाइन्स पाहायला मिळतात. गोल्डन रंगात लाल आणि गुलाबी खडे जास्त उठून दिसतात. हे जोडी किंवा स्वतंत्र एक असेही खरेदी करता येतात. या मुकुटांच्या साधारण किमती ९०० ते एक हजार रुपये दरम्यान आहेत. तर मोत्यांचे मुकुट १७० रुपये, ३०० रुपये जोडी आहे. तसेच काही मुकुट फक्त कुंदनच्या खड्यांपासून तयार केले आहेत. यांच्या साधारण किमती ६०० रुपये जोडी आहे. मोत्यांचे मुकुट २०० ते ४०० रुपये जोडी आहेत.

बांगड्यांमध्ये गोल्डन, मोत्यांच्या आणि स्प्रिंगच्या बांगड्या पाहायला मिळतात. यात स्प्रिंगच्या बांगड्या हिरव्या रंगात असून त्या ६० रुपयांना दोन जोडी मिळतात. या बांगड्या सुट्या नसतात, तर स्प्रिंगप्रमाणे १२ बांगड्या एकत्रच असतात. गोल्डन बांगड्या १२० ला चार मिळतात. यांच्या किमती क्वालिटीनुसार वाढत जातात. मोत्यांच्या बांगड्या ५५० रुपयांना चार बांगड्यांचा सेट आहे. 

कमर पट्टे हे गोल्डन आणि मोत्यांमध्ये उपलब्ध आहेत. मोत्यांच्या कमर पट्ट्यांच्या किमती साधारण ७० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. तर गोल्डन कमर पट्टे २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत जोडी आहेत.

मेखला हा कमरेवर छल्ल्याप्रमाणे घातला जातो. हे जास्तकरून गोल्डनमध्ये पाहायला मिळतात. यात अनेक डिझाइन्स असून काहींमध्ये पांढऱ्या आणि रंगीत खड्यांचा वापर केलेला दिसतो. याच्या साधारण किमती ५०० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत जोडी आहेत.

नथींमध्ये जिजाऊ नथ, बानू नथ उपलब्ध आहेत. यावेळी जिजाऊ नथीला जास्त मागणी आहे. या नथीमध्ये डबल खडा वापरला आहे. या नथीची किंमत ३५ रुपये जोडी असून ९०० रुपयांपर्यंत या नथी उपलब्ध आहेत. काही नथींमध्ये एडीस्टोन वापरले आहेत. बानू नथ २०० रुपयांना जोडी मिळते.

गौरीसाठी मोठ्या आकाराच्या झुमक्यांना आणि टॉप्सना जास्त मागणी आहे. गोल्डन झुमक्यांची जोडी १४० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत आहे. बाजूबंद हेदेखील गोल्डन आणि मोत्यांमध्ये उपलब्ध असून, त्यांच्या किमती १५० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत आहेत. गौरीसाठी कागदी वेणी उपलब्ध असून तिची किंमत १०० रुपये जोडी आहे.

गणपतीच्या आभूषणांमध्ये आकर्षक मुकुट, कर्ण आणि कर्णफुले, जास्वंदीचे फूल आणि हार, गणपतीचे वाहन मूषक, दुर्वांची जुडी, सोंडपट्टी, शेला, फेटा इत्यादींचा समावेश दिसतो. गणपतीसाठी मोदक हार, मेटलपासून केलेला जास्वंदीच्या फुलांचा आणि दूर्वांचा असे विविध हार बाजारात उपलब्ध आहेत. या हारांच्या किमती १७५ रुपयांपासून २१०, ३७५, ७०० रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये मोदक हाराला जास्त मागणी दिसते. हे हार लहान आणि मोठ्या मोदकांच्या आकारात दिसतात. यामध्ये ११ मोदक, २१ मोदक असा वापर केलेला दिसतो. मोत्यांच्या माळा २० रुपयांपासून १४० रुपयांपर्यंत आहेत.

मुकुट आणि फेट्यांमध्ये अनेक व्हरायटीज उपलब्ध दिसतात. गोल्डन मुकुट ९०० ते एक हजार रुपये दरम्यान उपलब्ध आहेत, तर मोत्यांच्या मुकुटाची ३०० रुपयांना जोडी मिळते. पण गणपतीसाठी जास्तकरून फेटे खरेदी केले जातात. कारण तयार मूर्तींना आधीचाच गोल्डन रंगाचा मुकुट असतो. त्यामुळे गणपतीच्या मूर्तीला ज्या रंगाची सोवळे असते, त्यानुसार त्याच रंगाचा फेटा घेतला जातो. या फेट्यांमध्ये वेलवेटचे कापड आणि मोत्यांचा वापर जास्त दिसतो. तसेच यामध्ये लाल, केशरी, निळा, पिवळा हे रंग उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहेत.  

मेटलचा शेला ८५ रुपयांपासून ८५० ते १५०० रुपयांपर्यंत आहे. हे लहानमोठ्या साइजमध्ये उपलब्ध आहेत. या शेल्यांमध्ये गोल्डन रंगात काही रंगीत खडे वापरले आहेत. त्यामुळे ते जास्त आकर्षक दिसतात. सोंडपट्टी हीदेखील मेटलमध्ये उपलब्ध आहे. तिची किंमत ४५० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. गणपतीसाठी मेटलचे कर्णदेखील बाजारात पाहायला मिळतात. यांच्या साधारण किमती १५० रुपयांपासून पुढे आहेत. यामध्ये काही वजनाने हलके तर काही भरीव कर्ण उपलब्ध आहेत. तसेच गणपतीसाठी भीकबाळीदेखील उपलब्ध असून ६० रुपये ते १२० रुपये दरम्यान तिची किंमत आहेत.   

गणपतीच्या शस्त्रांमध्ये त्रिशूळ, परशू आणि गदा इत्यादी उपलब्ध असून त्यांच्या किमती ८० रुपयांपासून २७५ रुपयांपर्यंत आहेत. 

तसेच गौरी-गणपतीच्या पुढ्यात ठेवण्यासाठी गजान्त लक्ष्मी, मूषक, मोदक, केळीचे पान, दूर्वा या सारखे पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. गजान्त लक्ष्मी ४०० रुपयांना एक आहे. मोदक ७५ रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहेत. तर मूषक ६५० रुपयांपासून पुढे घेऊ तसे आहेत. केळीचे पान ५६० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आहे. या सर्व वस्तू तयार करताना त्यामध्ये स्टोनपावडर वापरलेली असते, म्हणून त्याची प्लेटिंग लवकर खराब होत नाही व ते बरीच वर्षे टिकतात. तसेच स्टोन्स वापरून केलेले फॅन्सी मोदक दिसतात. यांचा १५० रुपयांना पाच मोदकांचा एक सेट मिळतो.  
(लेखात दिलेल्या किमतीत बदल होऊ शकतो.)
 

संबंधित बातम्या