सजावटीचा झगमगाट...

ज्योती बागल
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
 

बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. हे वातावरण आणखी प्रसन्न आणि हवेहवेसे करण्यासाठी घरात आणि गणेश मंडळामध्ये आकर्षक आणि वैविध्यपूर्ण सजावट केली जाते. गौरी-गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या अनेक नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठा गजबजल्या आहेत...

गौरी-गणपतीच्या सजावटीसाठी तोरणे,  झुंबर, फुलांच्या माळा, रंगीत स्टोनच्या लडी, सॅटिन जाळीचे पडदे, अनेक प्रकारचे वॉलपीस, वॉशेबल फुले या प्रकारच्या साहित्यामध्ये नावीन्यपूर्ण वैविध्य पाहायला मिळते आहे.

गणपतीसाठी आवर्जून खरेदी केली जाणारी वस्तू म्हणजे आसन. ही आसने लहान मोठ्या आकारात आणि लाल, चॉकलेटी, केशरी, पिवळ्या, निळ्या अशा अनेक रंगांत उपलब्ध आहेत. याची साधारण किंमत ४० रुपयांपासून पुढे आहे. 

मखरामध्ये लाकडी फोल्डिंग मखर, थर्माकोलचे मखर असे विविध प्रकार उपलब्ध असून आकाराप्रमाणे त्यांच्या किमती कमी जास्त आहेत. लाकडी फोल्डिंग मखराची साधारण किंमत ५०० रुपयांपासून १८०० रुपयांपर्यंत आहे. त्यावर पेंट करून कुंदच्या खड्यांचे वर्क केले आहे. पुठ्ठ्याच्या मखरामध्ये रंगीत चमकीचा वापर जास्त केलेला दिसतो. याच्या साधारण किमती २५० रुपये पासून पुढे आहेत. यामध्ये मोर, मूषक अशी नक्षी बघायला मिळते.  

तोरणांमध्ये मोत्यांची, लोकरीची, फुलांची, एम्ब्रॉयडरी केलेली फॅन्सी तोरणे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. या तोरणांच्या साधारण किमती ८० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत आहेत. तसेच देवघरासाठीदेखील खास फॉईल व मोत्यांपासून तयार केलेली तोरणे बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत ५० रुपये आहे. काही तोरणे आर्टीफिशिअल झेंडूची फुले आणि आंब्याची पाने यांपासून तयार केलेले आहेत. यांच्या साधारण किमती ६० ते ८० रुपये आहेत.

पडद्यांमध्ये मण्यांचे पडदे, कापड व लेसपासून केलेले रंगीत पडदे, नायलॉनचे पडदे, वुलनचा पडदा, झुरमुळ्यांचे पडदे, सॅटिनमधील जाळीचे पडदे इत्यादी प्रकारच्या व्हरायटी दिसतात. कापड व लेसपासून केलेल्या पडद्यांच्या किमती १२० ते २५० रुपयांच्या दरम्यान आहेत. मण्यांपासून तयार केलेली एक स्वतंत्र माळ १० रुपयांना असून या माळा १२० रुपये डझन आहेत. रंगीत स्टोनची लड ३० रुपयांना एक, तर ५० रुपयांना दोन आहेत. हे मणी प्लॅस्टिकच्याच प्रकारात मोडतात. त्यांच्या क्वालिटीनुसार त्यांच्या किमती आहेत. काही माळांना किंवा लडींना वेगवेगळ्या आकाराच्या घंट्या आहेत, जेणेकरून वाऱ्याने ते हलल्यावर छान आवाज येतो. अशी लड ८० रुपयांना एक, तर १५० रुपयांना दोन मिळतात. तसेच रंगीबेरंगी रिबनवर गोल आकारच्या काचा चिटकून आकर्षक लटकन तयार केले आहेत. हे २० रुपयांना एक असून २०० रुपये डझन आहेत. चमकीच्या कागदापासून (गिफ्ट रॅपिंग पेपर) तयार केलेले झुरमुळ्यांचे पडदे ६० रुपये, ८० रुपये, १५० रुपयांना उपलब्ध आहेत. हे सर्व पडदे ३ x ६, ४ x ८, ५ x १० या स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच पडद्यासाठी लागणारी सॅटिनची जाळी मीटरवरदेखील मिळते. ही साधारण ५० रुपये मीटर आहे. या बरोबर नेहमीच्या क्रेप पेपरपासून केलेल्या झालरीदेखील आहेत. यांचा ७० रुपयांना सहाचा एक सेट मिळतो. 

लटकनमधील आणखी एक प्रकार म्हणजे एलईडी लटकन. हे नवीनच बाजारात आले आहेत. यांची साधारण किंमत १५० ते ३०० रुपये जोडी आहे. नवीन असल्याने याला चांगली मागणी आहे.

सजावटीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे बॉल्स मिळतात. ज्यांचा वापर गौरी-गणपतीच्या मंडपामध्ये किंवा छतामध्ये सजावटीसाठी करता येतो. यामध्ये झालर असलेले बॉल्स १२० ते १५० रुपये डझन आहेत. काचेचे लहान बॉल्स १२० रुपयांना अर्धा डझन, तर थोड्या मोठ्या आकाराचे १५० रुपयांना 
अर्धा डझन आहेत. तर जंबो आकाराचे बॉल्स ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच काही बॉल्स हे थर्माकॉलपासून तयार  केले असून त्याला चमकीचा मुलामा 
चढवला आहे. यांची अर्धा डझन, एक डझन अशी पाकिटे मिळतात. साधारण ५० रुपयांपासून हे उपलब्ध आहेत. तसेच काही बॉल्स वेलवेटचे कापड वापरून तयार केले आहेत. हे मध्यम आणि मोठ्या आकारत उपलब्ध असून ६० आणि १२० अशा यांच्या किमती आहेत. 

गणपतीच्या डोक्यावरती लावण्यासाठी छत्री असते. त्या छत्र्या साइजनुसार उपलब्ध असून यात बऱ्याच व्हरायटीज बघायला मिळतात. त्यांच्या साधारण किमती ८०, १२०, १५०, २०० रुपये अशा आहेत. पुठ्यापासून तयार केलेल्या या छत्र्या रंगीत आणि चमकीचा दोरा, चमकीच्या टिकल्या आणि वेगवेगळ्या खड्यांनी सजवल्यामुळे आकर्षक दिसतात. 

गौरी गणपतीच्या मागे लावण्यासाठी कागदी पंखे किंवा वेगवेगळ्या स्वरूपातील वॉलपीस वापरतात. या कागदी पंख्यांच्या किमती १० रुपये ते ३५ रुपयांपर्यंत आहेत. तर वॉलपीसमध्ये गणपतीचे चित्र, मोराचे चित्र, नमस्कार करणाऱ्या मानवी हातांचे चित्र इत्यादी उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती १५० रुपयांपासून पुढे आहेत. तसेच सणसमारंभात आपण जे ‘शुभ-लाभ’ घरात लिहितो याचेदेखील आकर्षक वॉलपीस आहेत, जे स्टिकर सारखे असून ते चिटकवता येतात. यांच्या किमती १५० ते २५० रुपये आहेत.

डेकोरेशनसाठी सर्वांत जास्त वापर कशाचा होत असेल, तर तो फुलांचा. बाजारात अशी अनेक प्रकारची फुले बघायला मिळत आहेत. यामध्ये काही कागदी फुले आहे, तर काही प्लॅस्टिकचे मटेरिअल वापरून तयार केलेली फुले आहेत. यामध्ये कमळाचे फूल, गुलाबाचे फूल, झेंडूचे फूल अशी अनेक फुले दिसतात. ही सुटी फुले मंडप आणि छतासाठी तसेच इतर सजावटीसाठी वापरता येतात. ही फुले सुटी मिळत असल्याने आपल्या सोयीनुसार त्यांचा वापर करता येतो. ही फुले वेगवेगळ्या आकारातदेखील उपलब्ध असून प्लॅस्टिकच्या मटेरिअलपासून तयार केलेली असल्याने वॉशेबल आहेत. साधारण ६० रुपये डझन मिळतात. सुट्या फुलांचा वापर करून गौरी- गणपतीसमोर फुलांची कमान करण्यासाठी फोम वापरतात. त्यामध्ये फुले खोवून सजावट करता येते. हा फोम साधारण ५० रुपयांना मिळतो. काही तयार फ्लॉवर पॉट ७० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच अॉर्किडच्या फुलांचा बंचसुद्धा मिळतो. त्याची किंमत १५० रुपये आहे. तसेच गौरीसमोर ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचे लॉन मिळते. ते स्क्वेअर फुटावर असते. त्याच्या किमती आकारानुसार असून ८० रुपयांपासून पुढे आहेत.        

डेकोरेशनसाठी लाइटिंगच्या रंगीत माळादेखील उपलब्ध आहेत. यामध्ये चायनीज माळा जास्त उपलब्ध आहेत. यांच्या साधारण किमती १२० पासून पुढे घेऊ तशा आहेत. याच लायटिंगच्या माळांपासून लाइटचा मोर तयार केला असून गणपतीच्या मागच्या बाजूला तो छान उठून दिसतो. तसेच मॅजिक स्टिक्सदेखील उपलब्ध आहेत. ज्या लटकवून ठेवल्या असता वाऱ्याने फिरतात आणि त्यांचा रंग बदलतो. यामध्ये गुलाबी, निळ्या, पिवळ्या अशा स्टिक्स आहेत. यांच्या किमती ३० रुपये, ५० रुपये, ९० रुपये अशा आहेत. 

छतामध्ये सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे झुंबर वापरले जातात. यामध्ये कागदी झुंबर, प्लॅस्टिकच्या फुलांपासून आणि मण्यांपासून केलेले झुंबर, काही वेगवेगळ्या खड्यांपासून तयार केलेले झुंबर उपलब्ध आहेत. मोत्यांचे झुंबर २०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत आहेत. कागदी झुंबर ३० रुपयांपासून उपलब्ध आहेत. चमकीच्या कागदांपासून केलेल्या झुंबरांना जास्त मागणी आहे. कारण यामध्ये फिरत्या रंगांचा जास्त वापर केलेला असतो.    

सॅटिन जाळीचे कापड आणि रेशीम कापडापासून तयार छत आणि मंडपही बाजारात उपलब्ध आहेत. हे तयार मंडप ३ x ३, ४ x ४ या आकारात उपलब्ध आहेत. यामध्ये काही डेकोरेटीव्ह असतात, तर काही अगदी साधे असतात. गौरी-गणपतीच्या उत्सवानंतर हे काढून व्यवस्थित पॅक करून ठेवता येतात. यांच्या साधारण किमती तीन हजार पासून १५ हजार पर्यंत आहेत.  
(लेखात दिलेल्या किमतीत बदल होऊ शकतो.)

राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासूनच गौरी गणपतीच्या साहित्याची विक्री सुरू होते. पण यावेळी मात्र गणपती आठवड्यावर आले असताना मार्केट शांत असून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. मालाच्या किमतीदेखील १५ टक्के वाढल्या आहेत. मंदीची झळ आमच्यासारख्या विक्रेत्यांनादेखील जाणवत आहे. 
- मनोज मारणे व मिलिंद मारणे, विक्रेते

सध्याच्या बाजारावर पुरपरिस्थीचा थोडासा परिणाम नक्कीच जाणवत आहे. पण गौरी-गणपती हा मोठा सण असल्याने लोक निराशा झटकून भक्ती-भावाने आणि मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात. त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. आपल्या इथे सजावटीच्या साहित्यात अनेक व्हरायटीज उपलब्ध असतात, त्यामुळे परदेशात स्थायिक असणारे महाराष्ट्रीय लोक गौरी-गणपती येण्याआधी खास खरेदीसाठी पुण्यात येतात आणि खरेदी करून जातात. मखर, एलईडी लटकन परदेशात जास्त जातात. 
- रोहित कर्वे, विक्रेते
 

संबंधित बातम्या