इकोफ्रेंडली सजावट

समृद्धी धायगुडे
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
यावर्षी प्लॅस्टिक आणि थर्माकोलवर बंदी असल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची पुरेपूर संधी आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला थोडी बुद्धीला चालना द्यावी लागेल, पण बुद्धीच्या देवतेलादेखील हे जरूर आवडेल. यासाठी इकोफ्रेंडली सजावटीच्या काही सोप्या टिप्स...

गो ग्रीन : तुम्हाला ग्रीनरीची आवड असल्यास वेगवेगळ्या रंगांच्या किंवा वेलींच्या झाडांनी गणपतीमागे सजावट केल्यास नेत्रसुखद अनुभव मिळतो. यामध्ये एकच थीम घेऊन सजावट करायची असल्यास एकाच प्रकारची झाडे घेऊन एखादा कोपरा, खांब सजवल्यास उठून दिसते.  
 रंगीबेरंगी कापडांचे डेकोरेशन : आपल्या घरात बऱ्याच जुन्या पण सिल्कच्या, भरजरी ओढण्या किंवा साड्या असतात. यांचा वापर करून संबंधित जागा तुम्ही सुशोभित करू शकता. यामध्ये तुम्ही नेटच्या कलरफुल ओढण्या, रिबन, बटणांचा, बिड्सचा वापर करू शकता. तसेच या सजावटीलाही फुलांची जोड दिल्यास आणखी आकर्षक सजावट करता येते.

सुवासिक रंगीबेरंगी फुले : भारतीय सणांमध्ये नेहमीच सुगंधित फुलांना, पानांना खूप महत्त्व असते. अशाच सुंदर फुलांची आणि विविध आकाराच्या पानांची सुंदर आरास केल्यास प्रसन्न वाटेल. यामध्ये तुम्ही दोन दिवस टिकणारी फुले वापरू शकता. गणपती दहा दिवस असेल, तर चार किंवा पाच दिवसांनी आरास बदलू शकता. 

विशिष्ट विचाराने केलेली सजावट : ही सजावट करताना तुमच्या कल्पनाशक्तीला बऱ्यापैकी वाव असतो. तुम्ही जर क्रिएटिव्ह व्यक्ती असाल, तर जगातील ताज्या घडामोडी किंवा एखादा संदेश देणारी सजावट करू शकता. यामध्ये अगदी टाकाऊतून टिकाऊ, हिमालयाची थीम, जंगलांची थीम, सोशल मीडियाची थीम, लहान मुले घरात असल्यास बिस्किटांची थीम, नारळाच्या करवंट्या, टाकाऊ प्लॅस्टिकच्या बाटल्या, पत्र्याचे डबे यातून छान कलाकृती करता येते. 

विद्युत रोषणाई : हल्ली बाजारात आकर्षक दिवे मिळतात. यात अगदी छोट्या पणतीच्या दिव्यांपासून ते भिंतींवर टांगण्याच्या लामण दिव्यांपर्यंत सर्व प्रकार माळेच्या स्वरूपात तसेच सुटेदेखील उपलब्ध आहेत. फुले, मोदक, पणती, पाने, चांदणी, समई अशा विविध आकर्षक दिव्यांनी जरी नुसती सजावट केली, तरी उठावदार होते. सध्या म्युझिकवर फिरणाऱ्या एलईडी माळा, दिवे, काचेचे दिवे, पितळ्याचे दिवे, मातीचे दिवे, जार, कंदील असे भरपूर रोशणाईचे पर्याय बाजारात आले आहेत. 

ओरिगामी : घरातील लहान-मोठ्या प्रत्येकालाच ही सजावट करणे शक्य आहे. अतिशय सोपा, सहज आणि कमीतकमी वेळात होणारा हा प्रकार आहे. तुम्हाला थोडीफार क्राफ्टची आवड असल्यास रंगीबेरंगी कागदांची फुलपाखरे, फुले, पाने करून एका कापडी बॅकग्राऊंडवर ती रंगसंगतीनुसार चिकटवू शकता किंवा पिनेने नुसती अडकवू शकता. यातही तुम्ही विशिष्ट थीम करू शकता. 

पेपर क्विलिंग : यात कागदाच्या लांब पट्ट्या विशिष्ट सुयांना गुंडाळून त्याचे वेगवेगळे आकार कागदावर चिकटवून सुंदर डिझाईन करू शकता. यातून गणपतीदेखील साकारता येतो. याच गणपतीच्या आजूबाजूने फुलपाखरे, फुले, वेली करून लावू शकता. या संदर्भात आणखी काही नव्या कल्पना येण्यासाठी यूट्युबवर बरेच व्हिडिओ आहेत, जे बघून तुम्ही शिकू शकता. 
 सजावटीसाठी घरातील बऱ्याच पडून असलेल्या वस्तूंचा वापर करू शकता. अगदी छोट्या छत्र्या, टोपल्या, नारळाच्या करवंट्या, मोरपिसे, पुठ्ठे, ऑनलाइन शॉपिंगमधून आलेली लहान-मोठी खोकी यांचा वापर करून यंदाचा गणेशोत्सव संस्मरणीय करू शकता. 

संबंधित बातम्या