भुलेश्वरची गणेशरूपे

संतोष शेणई 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
भुलेश्वर मंदिरातील शिल्पे आपल्याला भूल घालतात. या शिल्पांच्या ओढीने पुन्हा पुन्हा पाय तिकडे वळतात. येथील शिल्पांमध्ये श्रीगणेशांचे विविध वैशिष्ट्यपूर्ण रूपात दर्शन घडते. त्याचबरोबर मंदिराच्या मूल रूपाकडेही आपले लक्ष वेधले जाते.

पुण्यालगतचा सासवड-माळशिरस परिसर काही वैशिष्ट्यपूर्ण स्थानांमुळे अभ्यासकांचे आणि पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. त्यातील भुलेश्वरचे मंदिर विशेष लक्ष वेधून घेते. पुण्यापासून साधारण ४५ किलोमीटरवर आणि यवत गावाच्या नैऋत्येस सहा-सात किलोमीटरवर हे मंदिर आहे. आपण आता मंदिर म्हणायचे, पण तेथील शिल्पे पाहता तो पूर्वी योगीजनांचा साधनामठ असला पाहिजे. योगीशिल्पे, योगिनीशिल्पे, मातृकापट, भैरव, हंस-मत्स्यशिल्प आणि जुन्या मंदिराची रचना पाहता योगीजनांच्या साधनामठाकडेच निर्देश होतो. तेथील रामायण-महाभारतातील प्रसंगांची शिल्पेही सुंदर आहेत. गौरीहर पूजनाचे भारतातील एकमेव शिल्प याच मंदिरात पाहता येते. या मंदिरातील श्रीगणेशांची विविध रूपे अभ्यासकांना पुन्हा पुन्हा साद घालतात. 

या साधनामठाचा मूळ भाग साधारण बाराव्या-तेराव्या शतकातील आहे, तर नंतरचा वाढवलेला भाग पेशवाईतील म्हणजे अठराव्या शतकातील आहे. मंदिराच्या दारात उभे राहिले, की समोरच्याच भिंतीवरील द्विस्तरीय कुटावर उठावचित्रासारखी दिसणारी काही शिल्पे आहेत. हे कूट चुन्याविटांचे आहेत. त्यावरील उठावशिल्पेही चुन्याचीच असावीत. त्यात गणपतीचे पहिले दर्शन होते. मात्र हे प्रथमदर्शन नक्कीच विलोभनीय नाही. केवळ नजर टाकून आपण आत जातो. मूळ मंदिरभागात गेल्यावरच शिल्पखजिना समोर येतो. 

योगी गणेश 
मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच मारुतीचे दर्शन होते. उजव्या हाताला दगडी जिना दिसतो. तो चढून गेल्यावर डाव्या बाजूला एका खांबावर गणरायांचे सुंदर शिल्प दृष्टीस पडते. याला म्हणायचे गणेशस्तंभ. या स्तंभावरची गणेशमूर्ती डाव्या पायावर उभी आहे. डावा पाय गुडघ्यात किंचित लवलेला. उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवलेला. दोन्ही हातांनी उजव्या पायाचा गुडघा धरला आहे. पाहता क्षणी ही नृतस्थिती वाटते. स्थानिक लोक या मूर्तीची ओळख ‘नृत्यगणेश’ म्हणूनच करून देतात. मनगटात कडे, दंडावर बाजूबंद, छातीवर उरूसूत्र स्पष्ट दिसते. मुकुट त्रिचक्रांकित आहे. या मूर्तीच्या समोरच्या खांबावरच नृत्यस्थितीतील पार्वती दिसते. गणेशाप्रमाणेच पार्वतीच्या डाव्या पायाची लकब दिसते. पण उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या गुडघ्याऐवजी पोटरीवर ठेवलेला आहे. खालचा डावा हात प्रलंब अवस्थेत आहे. तर वरच्या हातात मोदक असावा. गणेश शिल्पाचे वरचे दोन्ही हात आणि पार्वती शिल्पाचे उजवीकडचे दोन्ही हात भग्न आहेत. पार्वतीच्या चेहऱ्यावर शांत भाव आहेत. कानात कर्णकुंडले, छातीवर रुळणाऱ्या मौक्तिकमाला, मनगटात कडे, दंडावर वाकी, कमरेवर, मांडीवर लोंबकळणाऱ्या आलंकारिक माळा, पायात नूपुर हे सारे स्पष्ट दिसते. पार्वतीची नृत्यस्थिती स्पष्ट दिसते. या मंदिरासंदर्भात एक सांगोवांगीची कहाणी आहे. त्यानुसार भिल्लीण वेषातील पार्वती नृत्य करून शंकरांना भुलवते, ते भुलतात म्हणून ते भुलेश्वर. या कहाणीतील नृत्य करणारी पार्वती ती हीच असे स्थानिक सांगतातही, पण शिल्पातील पार्वती भिल्लीण वेषात नाही, त्यामुळे ही कहाणी या शिल्पासंदर्भात स्वीकारणे फारसे पटत नाही. 

शिवपार्वतीएवढाच पार्वतीनंदन नृत्यनिपुण होता. समर्थ रामदास स्वामीनी नृत्यगणेशाचे सुंदर वर्णन केले आहे. 
सगुण रूपाची ठेव। 
महा लावण्य लाघव। 
नृत्य करितां सकळ देव। 
तटस्थ हाती॥ 

पुराणांमध्ये आणि शाहिरी वाङ््‌मयामध्येही गणेशांच्या नृत्यनिपुणतेचे वर्णन करून त्यांना वंदन करण्यात आले आहे. या सगळ्याचा प्रभाव पडून गणेशस्तंभावरील शिल्पात नृत्यगणेशच असावा असेच आपल्याला वाटू लागते. मंदिराच्या आतील द्वारापाशी तलपट्टीत नृत्यवादनात रमलेले गजमुखी दिसतात, त्यामुळेही आपण गणेशस्तंभावरील शिल्पात नृत्यगणेशांचे दर्शन घेऊ लागतो.

तेवढ्यात तेथील दुसरा माहिती पुरवतो, की याला ‘शक्ती गणपती’ असेही म्हणतात आणि या खांबाला ‘शक्तीस्तंभ.’ पार्वतीशिल्प असलेल्या खांबाला ‘शक्तीस्तंभ’ संबोधणे योग्यच आहे. पण ती ‘गणेशशक्ती’ नाही, तर ‘शिवशक्ती’ आहे हे विसरता येत नाही. त्यामुळे शक्तीच्या समोरचा म्हणून ‘शक्ती गणपती’ हे स्वीकारता येत नाही. ‘शक्ती गणपती’ शिल्पात गणेशासमवेत आलिंगनावस्थेत शक्ती असते आणि हे शिल्प शक्तीयुक्त नाही, हे लक्षात घ्यायला हवे. पण स्थानिक व्यक्ती आपला हट्ट न सोडता सांगते, की हा नृत्यगणेश नाही, तर हा एक योगासनातील प्रकार आहे. योगासनांमुळे शक्ती मिळते म्हणून याला ‘शक्ती गणपती’ म्हणतात. 

या दाव्याबरोबर मी थोडा चमकलो. कारण गणेशस्तंभावरील शिल्प, नृत्यगणेश म्हणून माझ्या मनाने स्वीकारलेले नव्हतेच. शक्तीगणेश म्हणूनही ते स्वीकारलेले नव्हते. पण स्थानिकांच्या आताच्या या दाव्याबरोबर मनातील विचाराला दिशा मिळाली. हा योग्यांचा साधनामठ आहे. त्याच्या प्रवेशापाशीच हा गणेशस्तंभ आहे. या स्तंभावर एका बाजूला शिवगण आहे. त्याच्या शेजारून एक सर्पाकृती वर गेलेली दिसते. ही सर्पाकृती कुंडलिनीची आठवण करून देते. चक्रस्तंभावरील पहिले चक्र मूलाधार चक्र. या चक्राची देवता गणेश हीच आहे. म्हणजे हा गणेशस्तंभ आपल्याला चक्रस्तंभच सुचवतो. म्हणून तर या स्तंभाच्या तळाशी गणेशशिल्प आहे. याचा अर्थ असा, की हा नृत्यगणेश किंवा शक्ती गणपती नाही, तर ‘योगी गणेश’ आहे. अन्यत्र स्थिर बैठकीतील योगी गणेश शिल्पित झालेला आढळतो, येथे तो योगासनात आहे, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. योग्यांच्या साधनामठाच्या सुरुवातीलाच योगासनातील गणेशाचे दर्शन होणे याचे महत्त्व वेगळेच. 

यक्ष गणेश 
या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला यक्ष गणेशांचे दर्शन होते. दक्षिण दरवाजापाशी स्तंभहस्तावर यक्षगणेशांचे चतुर्भुज रूप आहे. यक्ष गणेश येथे छताला पाठ लावून स्तंभहस्तावर उभा आहे. त्याच्याकडे पाहिल्यावर असे वाटते, की या संपूर्ण मंदिराचा भार जणू या गणपतीने आपल्या पाठीवर पेलला आहे. अन्य स्तंभहस्तांवर भारवाहक यक्षच आहेत. बावीसशे वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्यांपासून चालत आलेली ही भारवाहक यक्षांची परंपरा येथेही दिसते. गणरायांचे हे यक्षरूपही जुनेच आहे. ओम यक्षकिन्नेर सेविताय नमः म्हणजे यक्षकिन्नरांकडून सेवा स्वीकारणाऱ्याला नमस्कार असो, असे आपण म्हणतो. यक्षांनी गणपतीची सेवा का करावी? कारण तो त्यांचा यक्षराज आहे. मत्स्य पुराणानुसार गणेश हे महायक्ष कुबेराचे रूप आहे. तसेच विनायक, वक्रतुंड, गजतंड ही इतर काही यक्षांची नावे आहेत. या सर्वांना गणेशाने स्वतःत सामावून घेतले आहे. शुंग-कुशाणांच्या काळात कधीतरी विनायकाला गजमुखी यक्षाचे स्वरूप प्राप्त झाले असावे. वाराणसीला पंचमुखी यक्ष विनायक मंदिर आहे. तसेच, टिटवाळ्याला सिद्धिविनायकाच्या चरणाशी यक्ष आहे. यावरूनही श्रीगणेशांचे यक्षत्व स्पष्ट होते. कुबेर व गजानन या दोहोंचेही रूप आठवा. दोघेही तुंदिलतनू लम्बोदर आहेत. त्यांच्यातील या साम्यामुळेच आनंद कुमारस्वामींनी गणपतीला यक्षश्रेणीत गणले आहे. कुबेर, लक्ष्मी व गणेश यांच्या एकत्र किंवा लक्ष्मीसमवेत गणपती अशा प्रतिमाही सापडल्या आहेत. या प्रतिमाही यक्षराज कुबेर व गणराज यांचे एकत्वच सांगतात. या लेखाच्या मर्यादेत गणपती व यक्ष यांच्यातील नात्याची आणखी चर्चा करीत नाही. मात्र एक खरे, की गणरायांचे असे स्पष्ट यक्षरूप शिल्पात सापडत नाही. म्हणूनच येथील स्तंभहस्तावरील भारवाहक यक्षगणेशांचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरते. 

मातृकापटातील स्त्रीगणेश 
भुलेश्वरमध्ये मातृकापटात गणेशाची तीन स्त्रीरूपे आढळतात. हेही या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. श्रीगणेशांचे रूप आपल्याला चित्रात, शिल्पात, नृत्यात, नाट्यात आढळते. त्यामानाने स्त्रीगणेशाची चर्चा झालेली आढळत नाही. गणपतीचे स्त्रीरूप फारच थोड्या ठिकाणी शिल्पित झाले आहे. महाराष्ट्रात भुलेश्वरखेरीज साताऱ्याजवळील पाटेश्वर मंदिरात आणि अंबाजोगाईला स्त्रीगणेश आढळतात. गणेशाचे स्त्रीरूप गणेशानी, गणेश्वरी, गजानना म्हणून ओळखले जाते. दक्षिण भारतात वैनायकी किंवा विघ्नेश्वरी म्हणून तिचा परिचय आहे.  मध्यकाळात मुख्य देवता म्हणून गणपतीची उपासना होण्यास सुरुवात झाली आणि त्याचबरोबर उदयाला आलेल्या गाणपत्य संप्रदाय आणि योगिनी संप्रदाय यांच्यामुळे वैनायकी देवतेला महत्त्व प्राप्त झाले असावे. एच. डी. भट्टाचार्य यांच्या मते गणेश मुख्य देवता म्हणून पूजला जाऊ लागला. त्याच वेळी गणेशाची शक्ती गणेशानी हिची पूजा होऊ लागली. स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींमधील पहिले नाव गजानना आहे. मत्स्यपुराणात उल्लेखलेल्या दोनशे स्त्रीदेवतांपैकी एक वैनायकी आहे. देवी-सहस्त्रनाम ग्रंथात विनायकी, लंबोदरी आणि गणेश्वरी या तीन नावांचा उल्लेख आला आहे. 

बडोद्यातील जैन मंदिरात असलेल्या हंस विजय संग्रहातील ‘चतुष्षष्टियोगिनी’ या हस्तलिखितात योगिनींच्या नावाबरोबर ‘गणेश्वरी’ हे नाव आलेले आहे. बौद्धधर्माच्या वज्रयान पंथात ‘गणपतीहृदया’ नावाने ती परिचित आहे. 

गणेशाची शक्ती ती गणेशानी असा परिचय भुलेश्वरच्या मंदिरात करून दिला जातो. पण स्त्रीगणेशाची शक्ती म्हणून जशी ओळख दिली जाते. तशी ती कधी योगिनी, तर कधी मातृका म्हणूनही ओळखली जाते. मग ती नेमकी कोण? 

भुलेश्वर मंदिरात प्रदक्षिणामार्गावर निरंधार भागात थोड्या उंचावर तीन गणेशानी दिसतात. तिन्ही मूर्ती स्वतंत्र नाहीत. इतर देवतांच्या शक्तींबरोबर गणेशानी आढळतात. त्यातील दोन मूर्ती लगेच लक्ष वेधतात. तिसऱ्या मूर्तीची शुंडा तोडण्यात आल्याने ती निरखल्यानंतरच लक्षात येते. या मूर्तीच्या पायापाशी अन्य दोन्ही गणेशानींप्रमाणेच उंदीर आहे. हातात पाश आहे, त्यामुळे ही तिसरी गणेशानी ओळखता येते. एका शिल्पपटात माहेश्वरी आणि ब्राह्मी यांच्यासमवेत तर दुसऱ्या शिल्पपटात वैष्णवी व कौमारी यांच्यासमवेत गणेशानी आहे. या दोन्ही शिल्पपटात अनुक्रमे माहेश्वरी व वैष्णवी मध्यभागी आहेत. शुंडा तुटलेली गणेशानी असलेल्या शिल्पपटात कौमारी (मध्यभागी) व वैष्णवी यांच्यासमवेत आहे. तिन्ही पटात डावीकडे गणेशानी आहे. पद्मासनात बसलेली आणि सालंकृत आहे. महेश्वराची शक्ती ती माहेश्वरी, ब्रह्माची शक्ती ती ब्राह्मी, विष्णूची शक्ती ती वैष्णवी आणि कुमाराची शक्ती ती कौमारी. या अर्थाने गणेशाची शक्ती ती गणेशानी असे होईल. पण भुलेश्वरचे मंदिर हे योग्यांचा साधनामठ आहे. तेथे योगी व योगिनींचे शिल्पपट आहेत. हे लक्षात घेतले आणि मंदिराच्या अगदी सुरुवातीचा योगी गणेश आठवला, की वाटते येथील गणेशानी योगिनीच आहेत. 

गणेशानी या योगिनी, मातृका की शक्ती याचा निर्णय होत नाही. गणेशस्तंभावर नृत्यगणेश आहे, शक्तीगणेश आहे की योगीगणेश आहे, याच्याही निर्णयाप्रत 
येणे कठीण होते. पण एक खरे भुलेश्वरची सर्व गणेशरूपे मनाला व नयनाला भूल घालतात.

संबंधित बातम्या