बाप्पासाठी प्रसाद

शैलजा भाले
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

गणपती विशेष
प्रसादामध्ये सर्वांना परिचित असलेले मोदक, शिरा, पंचखाद्य हे पदार्थ तर असतातच, पण याशिवाय पंचखाद्य लाडू, साखरभात, मालपुवा असे पदार्थदेखील प्रसादासाठी करता येऊ शकतात. अशाच काही प्रसादाच्या रेसिपीज...

पंचखाद्य लाडू 
साहित्य : एक वाटी बारीक रवा, १ वाटी डेसिकेटेड खोबरे, १ वाटी खवा, १ वाटी साखर, १ चमचा बदाम पूड, १ चमचा काजूपूड, १ चमचा खारीकपूड, अर्धा चमचा वेलचीपूड, १ चमचा खसखस. 
कृती : कुकरचा डबा घेऊन त्यात रवा पसरावा व त्यावर खारीकपूड पसरून घालावी. त्यावर खवा मोकळा करून पसरावा आणि त्यावर काजू-बदामपूड पसरावी. या थरावर साखर पसरून वेलचीपूड पसरून टाकावी. त्यावर डेसिकेटेड खोबरे पसरून त्यावर खसखस पसरावी. याप्रमाणे थरावर थर पसरून डबा कुकरमध्ये ठेवून ६-७ शिट्ट्या करून कराव्यात. कुकर थंड झाल्यावर डबा बाहेर काढून त्यातील मिश्रण एका ताटात घालून एकत्र करावे व त्याचे अतिशय छोटे-छोटे लाडू करावेत, अथवा मोदकपात्रात घालून मोदक करावेत. प्रत्येक लाडू झाल्यावर तो डेसिकेटेड खोबऱ्यात घोळून घ्यावा.

‘वळिवा’चे लाडू 
साहित्य : सव्वा वाटी गव्हाचे पीठ, १ चमचा बेसन, ४ चमचे मैदा, १ चमचा बारीक रवा, १ वाटी बारीक किसलेला गूळ, छोटा तुकडा जायफळ, ४ वेलदोडे, ४ काजू, ३ बदाम, २ चमचे खसखस, १ कप दूध, चवीपुरते बारीक मीठ, तळण्यासाठी रिफाईंड तेल. 
कृती : गव्हाच्या पिठात बेसन, रवा, मैदा व कणभर मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे. जायफळ, वेलदोडे, बदाम, काजू, खसखस हे सर्व चांगले बारीक करून घ्यावे. एका भांड्यात किसलेला गूळ घेऊन त्यात गूळ भिजेल एवढेच दूध घालावे. गूळ व दूध एकजीव करून घ्यावे. त्यात १ चमचा कच्चे तेल घालावे. या मिश्रणात पिठाचे मिश्रण व ड्रायफ्रुटची पूड घालून चांगले मळून घ्यावे. मळताना आवश्‍यक वाटले, तर थोडे दूध घालावे. पाणी घालू नये. हे मिश्रण भिजवून एक तासभर झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. या पिठाचे छोटे छोटे गोळे करावेत. प्रत्येक गोळ्याची पोळपाटावर वळून सरी करून घ्यावी. सरी म्हणजे दोरीप्रमाणे वळावे. या सरीला ४-५ वेढे देऊन चकलीप्रमाणे आकार द्यावा. कढईत तेल चांगले तापल्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्यावे. 
टीप : वाटी, कप, चमचा हे आपण नेहमी वापरतो ते घ्यावे.

मालपुवा 
साहित्य : एक लिटर म्हशीचे मलईयुक्त दूध, ३ वाट्या साखर, १ वाटी मैदा, अर्धा चमचा वेलची पूड, पाव किलो साजूक तूप, केशर, १ लिंबू. 
कृती : कढईमध्ये दूध आटवत ठेवावे. ते निम्म्यापेक्षा थोडे कमी होईल इतपत आटवावे. त्यात केशर घालावे. ४-५ चमचे पिठीसाखर घालावी. ५० ग्रॅम (लहान वाटीभर) तूप घालून तूप मिश्रणात एकजीव होईपर्यंत ढवळत राहावे. तूप चांगल्या प्रकारे मिसळल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यामध्ये १ वाटी मैदा घालून मिश्रण एकसारखे करून घ्यावे. एकही गुठळी राहू नये. हे मिश्रण साधारणपणे इडलीच्या पिठाइतपत करावे व २० मिनिटे बाजूस ठेवावे. यानंतर पॅनमध्ये साजूक तूप घालून तूप तापल्यावर पुरीच्या आकाराचे मालपुवे करून घ्यावेत. 
पाकासाठी ३ वाट्या साखरेत दीड वाटी पाणी घालून एकतारी पाक करून घ्यावा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस व अर्धा चमचा वेलची पूड घालावी. तयार झालेले मालपुवे या पाकात टाकावेत. अर्ध्या तासाने पाकातील मालपुवे डिशमध्ये काढून घ्यावेत व त्यावर काजू, बदाम, पिस्ते यांचे काप व केशराच्या काड्या घालाव्यात. 
टीप : दुधात पिठीसाखर घालावी. तयार पिठात एकही गुठळी नको. मालपुवा पाकात जास्तवेळ ठेवू नये.

नारळाच्या करंज्या 
साहित्य : एक मोठा नारळ, २ वाट्या बारीक रवा, २ वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, ४ चमचे दूध पावडर, १-१ चमचा काजू व बदाम यांची सरसरीत पूड, पाव चमचा विलायची पूड, मोहन व तळण्यासाठी अर्धा लिटर तेल, जिलेबीचा रंग व केशर, मीठ. 
कृती : गव्हाचे पीठ व बारीक रवा एकत्र करून घ्यावे. त्यात पाव वाटी गरम तेलाचे मोहन व चिमूटभर मीठ घालावे. हे मिश्रण पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे व ३ तास झाकून ठेवावे. नारळ खोवून घ्यावा. त्यात चवाच्या पाऊणपट साखर घालावी. एकत्र करून मध्यम गॅसवर ठेवून सतत हलवत रहावे. साखर पूर्णपणे विरघळल्यावर त्यामध्ये ४ चमचे दूध पावडर, काजू, बदाम, वेलची यांची पावडर व आवडीनुसार जिलेबीचा रंग व केशर घालावे. हे मिश्रण थोडेसे घट्ट होत आले, की गॅस बंद करून थंड होण्यासाठी खाली काढून ठेवावे. झाकून ठेवलेल्या पिठाचा गोळा घेऊन हाताने छान मळून घ्यावा व त्याचे पोळीसाठी करतो त्या आकाराचे गोळे करून घ्यावेत. (साट्यासाठी अर्धी वाटी साजूक तूप गरम करून त्यात २ चमचे गव्हाचे पीठ घालून एकजीव करावे) १-१ गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी. त्यावर तयार केलेला साटा लावून पोळीची गुंडाळी करावी. गुंडाळी सुरीने कापून हव्या त्या आकाराच्या लाट्या करून घ्याव्यात. १-१ लाटी घेऊन पुरीच्या आकारात लाटून त्यावर तयार केलेले सारण आपल्या आवडीप्रमाणे घालून करंज्या करून घ्याव्यात. लाटी लाटताना तेल किंवा पीठ लावायचे नाही. सर्व करंज्या तेलात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात.

अननसाचा शिरा 
साहित्य : एक वाटी जाड रवा, १ वाटी अननसाच्या फोडी, १ वाटी साखर, अडीच वाटी पाणी, अर्धी वाटी साजूक तूप, ५-६ काजूच्या पाकळ्या, ३-४ बदामाचे काप, अर्धा चमचा वेलची पूड, केशर.
कृती : कढईत अर्धी वाटी साजूक तूप घालून पुरेसे गरम होऊ द्यावे. गरम झाल्यावर त्यात एक वेलदोडा व रवा घालून मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. एका बाजूस अडीच वाट्या पाणी उकळून ठेवावे. रवा भाजून झाल्यावर त्यात ते पाणी घालावे, हलवावे व झाकण ठेवून मंद आचेवर शिजत ठेवावे. ५ मिनिटांनी साखर रव्यामध्ये घालून हलवावे व पुन्हा ५ मिनिटे मंद आचेवर झाकणासह ठेवावे. ५ मिनिटे झाल्यावर शिरा हलवून पहावा व त्यामध्ये अननसाच्या फोडी घालून मिक्‍स करून घ्यावे. एका छोट्या कढईत साजूक तूप गरम करून त्यात काजूच्या पाकळ्या, बदामाचे काप गुलाबी रंगावर तळून घेऊन वेलचीपूडसह शिऱ्यावर घालून मंद आचेवर २ मिनिटे ठेवावे. डिशमध्ये शिरा घेऊन त्यावर केशराच्या काड्या टाकाव्यात.

बालूशाही 
साहित्य : एक वाटी मैदा, पाव वाटी बारीक रवा, ४ वाट्या साखर, २ वाट्या ताजे घट्ट दही, पाव किलो साजूक तूप, १ वाटी तेल, १ लिंबू, १ लहान चमचा सोडा, मीठ. 
कृती : मैदा व रवा एकत्र करून चाळून घ्यावा. त्यात सोडा घालावा. मीठ चवीनुसार घालावे. तेल गरम करून पिठाचा मुटका होईल इतपत मोहन घालावे व हाताने चोळून घ्यावे. चांगले मिसळले गेल्यावर त्यात दही घालून घट्ट भिजवून ३ तास झाकून ठेवावे. ३ तासांनी हे पीठ पुन्हा चांगले मळून घ्यावे व मोठ्या पेढ्याच्या आकाराचे गोळे करावेत. एकेक गोळा हातावर घेऊन मळून मळून पेढ्यासारखा करून मेदूवड्याप्रमाणे मध्यभागी बोटाने खोलगट खड्डा करावा. अशा प्रकारे तयार केलेले सर्व गोळे तुपात गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. 
पाक करताना ४ वाट्या साखरेत २ वाट्या पाणी घालून दोनतारी पाक करून घ्यावा. त्यात १ चमचा लिंबाचा रस घालून १ उकळी घ्यावी. गरम पाकामध्ये तळलेले गोळे टाकून २ तास मुरू द्यावेत. २ तासांनी पाकातून बाहेर काढावेत. सजावटीसाठी आवडीनुसार बालूशाहीवर ड्रायफ्रूट्‌स काप व केशर घालावे. 

फ्रूटखंड 
साहित्य : पाव किलो मलई चक्का, अर्धी वाटी लोणी, पाव किलो साखर, पाव किलो हापूस आंब्याचा गर (पल्प), अननस, सफरचंद, चिक्कू, द्राक्ष यांच्या साल काढून लहान फोडी व डाळिंब दाणे प्रत्येकी पाव वाटी, ३ सोनकेळींच्या फोडी, ५ काजू व ५ बदामाचे तुकडे, अर्धा चमचा वेलची पावडर, केशर. 
कृती : सर्व प्रथम चक्का, लोणी, साखर व आंब्याचा पल्प एकत्र करून ३ तास ठेवावे. ३ तासांनी हे मिश्रण पुरणाच्या चाळणीतून काढून घ्यावे व 
त्यात ड्रायफ्रूट्‌स, वेलची पावडर व फळांचे तुकडे घालून हलवून घ्यावे. सजावटीसाठी वरून डाळिंब दाणे व केशर घालावे. फ्रूटखंड मुरण्यासाठी १-२ तास ठेवावे. चांदीच्या वाटीतून बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

गुलाबजाम-साखरभात 
साहित्य : गुलाबजामसाठी ः एक वाटी खवा, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, दीड वाटी साखर, अर्धा चमचा वेलची, तळण्यासाठी तेल. 
साखरभातासाठी : एक वाटी बासमती तांदूळ (शक्‍यतो जुना असावा), १ वाटी साखर, १ वाटी साजूक तूप, ६-७ लवंग, ७-८ काजू व बदाम, जिलेबीचा रंग, केशर काड्या. 
गुलाबजाम कृती : खवा सारखा करून घेऊन त्यात गव्हाचे पीठ लागेल तसे घालून घट्ट मळावे. मळून झाल्यावर त्याचे शेंगदाण्याएवढे छोटे-छोटे गोळे करावे व ते तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. पाकासाठी दीड वाटी साखरेत १ वाटी पाणी घालून तीनतारी घट्ट पाक करून त्यात तळलेले गोळे टाकावे व अर्धा तास मुरू द्यावेत. मुरल्यानंतर सर्व गुलाबजाम चाळणीत घेऊन जास्तीचा पाक काढून टाकावा. 
साखरभात कृती : प्रथम तांदूळ धुऊन घेऊन २ तास बाजूस ठेवावे. २ तासांनी जाड बुडाचे पातेले घेऊन त्यात एक मोठा चमचा साजूक तूप घालावे. तूप तापल्यावर त्यात ६-७ लवंगा टाकाव्यात. लवंगा फुलल्यावर त्यात तांदूळ घालून चांगले परतून घ्यावे. याच वेळी दुसऱ्या बाजूस ३ वाट्या पाणी उकळत ठेवावे. तांदूळ चांगले परतल्यावर त्यात प्रथम दीड वाटी उकळते पाणी घालावे व त्यासोबत जिलेबीचा रंग आवडीनुसार घालावा. भात झाकण ठेवून मंद आचेवर ५ मिनिटे ठेवावा. भात मोकळा होणे गरजेचे आहे. त्यानुसार उकळते पाणी घालावे. जास्त मऊ शिजू देऊ नये. भाज शिजत आला, की त्यात साखर घालावी व उलथण्याने साखर सर्वत्र हलक्‍या हाताने मिसळून घ्यावी व भात मंद आचेवर २ मिनिटे झाकून ठेवावा. नंतर गॅस बंद करून आणखी १० मिनिटे तसाच ठेवावा. म्हणजे तो चांगला मुरतो. तयार झालेला भात परातीत काढून घ्यावा. भात केलेल्या पातेल्यात थोडेसे तूप घालून त्यावर परातीतील भाताचा एक भाग घालावा व त्यावर १ भाग तयार केलेले गुलाबजाम पसरून घालावे. त्यावर उरलेला भात घालून त्यावर गुलाबजाम घालावेत व त्यावर केशर घालावे. एका छोट्या कढईत पळीभर साजूक तूप घालून त्यात काजू, बदाम सोनेरी रंगावर तळून घ्यावे व तुपासह हे सर्व भातावर पसरून घालावे. हे पातेले गॅसवर तवा ठेवून तवा तापल्यावर त्यावर झाकण घालून ५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. 
टीप : १. गुलाबजाम छोट्या आकाराचे हवेत. २. केशर जिलेबीच्या रंगाबरोबर घातले तरी चालेल.

संबंधित बातम्या