भटकंतीत भेटलेला गणराया

अजय काकडे
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

गणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसा आपला उ त्साह अजून वाढतच जातो. गणरायाचे दर्शन घ्यायला अष्टविनायक आणि इतर प्रसिद्ध गणपती मंदिरे ही गर्दीने फुलून जातात. शहरात दहा दिवस उत्सवाचे वातावरण असते. पण आपला लाडका गणपती बाप्पा आडवाटांवरसुद्धा आपले अस्तित्व जपून आहे.. निसर्गाच्या सानिध्यात कसल्याही रांगेत उभे न राहता गणेशाचे दर्शन घ्यायचे, तर या आडवाटा धुंडाळत फिरायची तयारी मात्र नक्कीच हवी!
आपल्या महाराष्ट्रात गडकिल्ल्यांच्या सानिध्यात अनेक गणेश मूर्ती आणि शिल्पे अनादी कालापासून पडून आहेत. या मूर्ती केवळ देवतेचे रूप नसून त्या आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा एक प्रकारचा पुरावा आहे. त्यांचा अभ्यास करताना इतिहासात दडलेली रहस्य आपल्याला उलगडतात. डोंगराच्या कडेकपारीत, गड किल्लांवर, गुहेत, प्राचीन मंदिरात भटकंती करताना भेटलेल्या बाप्पाची ही आकर्षक रूपं...

परांडा किल्ल्यातला नृत्यमग्न गणेश
गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीमधे हमखास दिसणारी दैवते म्हणजे देवी आणि हनुमान! पण बऱ्याचदा आपल्याला दुर्गभ्रमंतीमधे गणपतीची वेगवेगळी रूपे देखील पाहायला मिळतात परांडा हा मराठवाड्यातला एक भक्कम भुईकोट म्हणून प्रसिद्ध आहे. इथे येणारे पर्यटक बहुतांशी किल्ल्याची तटबंदी आणि तेथे असलेल्या तोफा पाहतात. पण एका छोट्याशा मंडपवजा खोलीत मांडून ठेवलेल्या हिंदू देवदेवता आणि मूर्ती मात्र दुर्लक्षित राहतात. एका अर्थी ते बरेच आहे म्हणा; संपूर्ण किल्ल्यात अजून फक्त त्याच खोलीत खडूने नावे लिहिली गेली नाहीत. असो...
तर या ठिकाणी एक खजिनाच आहे. इथे आहेत काही वीरगळ,एक शिलालेख असलेली गधेगाळ, महावीर आणि विष्णूच्या मूर्ती तसेच अनेक इतर भंगलेल्या देवदेवता.
पण या सगळ्यात चटकन लक्ष वेधून घेते ती नृत्यमग्न गणेशाची मूर्ती. ही मूर्ती सुमारे पाच फूट उंच असून या मूर्तीला सहा हात आहे. प्रत्येक हातामध्ये विविध आयुधे आहेत, तसेच मोदक, कमळ यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. परांडा किल्ल्याच्या भेटीत, किल्ल्याचे भक्कम दरवाजे आणि बुरुजावर असलेल्या पंचधातूच्या लांबलचक तोफा आवर्जून बघाव्यात

कोरीगडचा गणेश 
पुण्याच्या पश्‍चिमेला कोर-बारसे या मावळात ठाण मांडून बसला आहे तो भक्कम तटबंदीचा कोरीगड किंवा कुआरीगड ! शहापूर या पायथ्याच्या गावातून चढाई करताना आपल्याला निम्म्या अंतरावर दगडात कोरलेल्या घुमटीमधे ही मूर्ती दिसते. या गणपतीचा डावा हात गुडघ्यावर आणि उजवा हात शुभाशीर्वाद देणारा आहे. मागच्या हातांमध्ये आयुधे कोरलेली आहेत.या मूर्तीचा मुकुट थोडा वेगळा आहे हे वैशिष्ट्य. कोरीगडला भेट देणारे दुर्गयात्री या गणरायाचे दर्शन
करूनच पुढे जातात. बहुधा याच गणपती स्थानामुळे कोरीगडच्या दरवाजाला गणेश दरवाजा नाव दिले असावे गणेश घुमटीच्या शेजारीच साधारण दोन खणाचे एक लेणे कोरलेले आहे जे कोरीगडाचे प्राचिनत्व सिद्ध करते. लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण पुणे मुंबईपासून एका दिवसात सहज बघून होते.

लेणी व मंदिरांमधल्या गणेशमूर्ती
पाटेश्वरचे गणपती 

सातारा एमआयडीसीच्या पाठीमागे असलेला पाटेश्वर डोंगर आता तिथल्या शैव पंथाच्या लेणी तसेच अगणित शिवलिंगामुळे चांगलाच लोकप्रिय झाला आहे. देगावमार्गे पाटेश्वरला भेट देताना आपल्याला वाटेत काही घडीव पायऱ्या लागतात. या ठिकाणी उजव्या हातास श्री गणेशाची एक सुंदर अशी मूर्ती आहे. शेंदूर लावलेल्या या गणपतीच्या दोहो बाजूस एक एक स्त्री कोरलेली आहे. गणपतीच्या उजव्या बाजूची स्त्री हातात चक्र आणि चवरी घेऊन उभी आहे. तर डाव्या बाजूची स्त्री एका हातात चवरी घेऊन व दुसरा हात कमरेवर ठेवून उभी आहे. या दोन्ही मूर्ती गणपतीच्या दासी आहेत असे काहींचे मत आहे, तर काहींच्या मते या रिद्धी-सिद्धी आहेत. प्रत्यक्ष गणपती आराम करतानाच्या मुद्रेत आहे.
याच डोंगरावर गणरायाचे अजून एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे वैनायकी गणेश! अभ्यासकांच्या मते वैनायाकीला स्त्री-रुपी गणपती न मानता मातृकांकडून आलेल्या चौसष्ट योगिनींपैकी एक मानले पाहिजे. पाटेश्वरची ही वैनायकी मूर्ती साधारण तेराव्या शतकातील असावी. मूर्ती चतुर्भुज असून हातांमध्ये दंत, परशू, पाश व मोदक अथवा लाडू कोरलेले आहेत. सोंड डाव्या हातावर विसावलेली आहे. गळ्यात नक्षीदार हार आणि हातात कंकणे कोरलेली आहेत. अशाच प्रकारची वैनायकी गणेशाची मूर्ती पुण्याजवळ भुलेश्वरच्या मंदिरात देखील पाहायला मिळते.

दातेगडचा महागणेश
सातारा जिल्ह्यातल्या पाटणजवळचा दातेगड आता दुर्गयात्रींमधे लाडका ठरत आहे.या किल्ल्याच्या,सध्या वापरात नसलेल्या दरवाजामधे दोन भव्य आकाराच्या देवता विराजमान आहेत. एक आहे हनुमान आणि दुसरा आहे विघ्नहर्ता गणेश. याला महा-गणेश म्हणणेच योग्य ठरेल, कारण गडकिल्ल्यांवरच्या गणपतीच्या मूर्तींमधे ही सर्वांत मोठी मूर्ती असावी. दुर्ग बांधणी करणाऱ्या त्या अनामिक कारागिरांनी सुमारे ९ फुटाच्या कमानीमधे हा अंदाजे ६ फुटाचा गणपती स्थापलेला आहे. गणपतीची ही मूर्ती उजव्या सोंडेची चतुर्भुज असून मागील हातामधे परशू आणि अंकुश आहेत तर पुढच्या हातात मोदक आहे. मूर्तीच्या पोटावर नागाचे वेटोळे स्पष्ट दिसते. या गणरायाचे जास्वंदीसारखे भासणारे कान हे या मूर्तीचे एक वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. या मूर्तीच्या देवळीला असलेली जांभळ्या चिऱ्याची कमान काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने कोसळली. मूर्तीलादेखील आता तैलरंग आला आहे. दातेगड भेटीत तिथली विहीर न चुकता पहावी अशीच आहे. गुगल मॅपवर पाहिले तर या विहिरीचा आकार एखाद्या तलवारीसारखा भासतो.

भोरगिरीचा आगळा वेगळा गणेश 
भीमाशंकरजवळच्या भोरगिरीच्या किल्ल्याच्या पायथ्याला एक महादेव मंदिर आहे. हे मंदिर शिलाहार वंशीय राजा झंझ याने बांधलेल्या मंदिरांपैकी एक आहे असे काही अभ्यासकांचे मत आहे. हे एक देखणे मंदिर आहे, नक्षीदार कोरीव दगड या परिसरात सगळीकडे पसरलेले आहेत. याच मंदिराच्या आवारात एक अनोखी गणेश मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीला गरुडासारखे पंख दाखवले आहेत किंवा ती मूर्ती कमरेला एखादे वस्त्र असलेली स्त्रीरुपी असावी असे दिसते. पण ती आहे मात्र आगळी वेगळी.

मेणवलीचा गणपती 
वाईजवळचे मेणवली गाव तिथं होणाऱ्या चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध आहेच. मेणवलीच्या नाना फडणीस यांच्या वाड्याला पर्यटक वाईला आले, की आवर्जून भेट देतात. या वाड्यात प्रवेश करताच आपण एका चौकात येतो. या चौकात डाव्या बाजूला असलेला हा गणपती! एका चौथऱ्यावर साधारण २ फुटाची ही मूर्ती सुबक आहेच पण हिचे वैशिष्ट्य म्हणजे ही वाईच्या प्रसिद्ध ढोल्या गणपतीची हुबेहूब प्रतिकृती आहे. सुंदर कोरीव छत असलेला महाल आणि पेशवेकालीन चित्रे, मंदिरे आणि प्रशस्त घाट , पोर्तुगीज घंटा हे सगळे पाहायचे तर मेणवलीला भेट द्यायलाच हवी

कर्नाटकच्या वस्तुसंग्रहालयातील गणपती
गणरायाचे अस्तित्व महाराष्ट्राबाहेरही आहेच. मुख्यतः दक्षिण भारतात गणपतीच्या खूप सुबक आणि सुंदर मूर्ती कोरलेल्या आढळतात. दक्षिण भारतात दिसणाऱ्या गणेशमूर्ती थोड्या वेगळ्या धाटणीच्या असतात हे नक्की. कोप्पळ जिल्ह्यातल्या अनेगुंडी गावी सापडलेल्या काही गणेशमूर्ती रायचूर येथे एकत्र ठेवण्यात आल्या आहेत. नवरंग दरवाजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वास्तूत एक संग्रहालय असून येथे पुरातन मूर्तींचा खजिनाच आहे.

खिडकीमधे कोरलेला गणपती
सतराव्या शतकातील ग्रॅनाइट खडकात कोरलेली ही मूर्ती पूजेची नसून एखाद्या मंदिराच्या खिडकीमधे कोरलेली आहे. खिडकीची जाळी आणि गणपती हे फारच खुबीने एकत्र कोरलेले आहेत. खिडकीची एक बाजू मात्र भंगलेली आहे. गणपतीची ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे.पैकी वरचा हात भंगलेला आहे उरलेल्या हातात परशू आणि दात तर एकात मोदक आहे. पोटाला विळखा घातलेला नाग आणि कमर-वस्त्रे बघण्यासारखी आहेत.

सिद्धी गणेश
ही मूर्ती सोळाव्या शतकतली असावी. सुखासीन प्रकारातली ही मूर्ती अष्टभुजा आहे. उजव्या हातात अनुक्रमे चक्र, त्रिशूळ, अंकुश असून एक हात अभय मुद्रेत म्हणजे ज्याला आपण आशीर्वाद देणारा म्हणतो असा आहे. डाव्या बाजूचे हात बऱ्याच अशी भंगलेले आहेत. त्यात काही पुष्पे कोरलेली दिसतात.एक हात मात्र पाठीशी धरलेला दाखवला आहे हे या मूर्तीचे वेगळेपण!
मूर्तीवर कोरलेले बाजूबंद, कडी, तोडे आणि डोक्‍यावर पाच फण्याच्या नागाचे छत्र हे कलेचा खास नमुना म्हणून पाहता येतील. भटकंती करताना हे आणि असे अनेक देवदेवता आपल्या नजरेस पडतात.त्या पाहून त्याची नोंद ठेवण्याची सवय लावून घेतली तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो फक्त निसर्गाचा आदर राखून डोळसपणे सगळ्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या