प्रथम तुला वंदितो... 

मोहन दाते, पंचांगकर्ते 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
पार्थिव गणेशमूर्तीची स्थापना कधी करावी? मूर्ती कशी असावी? तिची प्राणप्रतिष्ठा कशी करावी? नैवेद्य काय असावा? त्याचा शास्त्रोक्त अर्थ आणि श्री गणेशाचे विसर्जन कसे करावे, याविषयी मोहन दाते यांनी दिलेली माहिती.

सर्वांचा आवडता गणेशोत्सव आता तोंडावर आला आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी म्हणजेच गुरुवार, ता. १३ सप्टेंबर २०१८ रोजी श्री गणेश चतुर्थी असून या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांकडून पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना व पूजन केले जाणार आहे. या दिवशी सूर्योदयापासून दुपारी २.५२ पर्यंत भद्रा आहे. श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये. त्यामुळे गुरुवारी पहाटे ब्राह्म मुहूर्तापासून दुपारी दीड वाजेपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी ‘मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात श्री गणेशाची स्थापना करून पूजन करता येईल. या वर्षी गणेश उत्सव ११ दिवसांचा आहे. 

अशी असावी घरगुती मूर्ती 
घरातील गणेशाची मूर्ती साधारणतः एक वित उंचीची असावी. ती व्यवस्थित आसनस्थ हवी. तिचे हात, पाय, डोळे, कान सुबक असतील असे पाहावे. हार घालताना, फुले वाहताना अडचण येऊ नये यासाठी मूर्तीचे पाठीमागचे हात व कान यामध्ये अंतर असेल अशीच मूर्ती आणावी. प्लास्टिक, फायबरच्या मूर्ती शास्त्राला मान्य नाहीत. मूर्ती शक्‍यतो चिकणमाती, शाडूची असावी. मूर्ती आदल्या दिवशीच सायंकाळी आणून ठेवावी म्हणजे सकाळी पूजन करणे सोयीचे होईल. मूर्ती घरात आणतेवेळी मूर्ती घेतलेल्या माणसाच्या पायावर पाणी घालून व मूर्तीसह त्याला आरती ओवाळून घरात घ्यावे. पुढे सजविलेल्या मखरात पाटावर किंवा चौरंगावर थोड्या अक्षता घालून त्यावर बाप्पाला बसवावे. मूर्ती ठेवताना मूर्तीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे असणे योग्य आहे, दक्षिण दिशेला मूर्तीचे तोंड असू नये. ते उत्तरेकडेही चालेल. घराच्या प्रवेशद्वाराला फुलांचे तोरण किंवा आंब्याच्या डहाळ्या लावाव्यात. दारासमोर रांगोळी काढावी. मंगलवाद्य म्हणून सनई, चौघडा, नादस्वरम्‌ यांची सीडी, कॅसेट हळू आवाजात लावावी. 

पूजेची तयारी 
आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना करून व नित्य उपासना करून त्याची तयारी म्हणजे फुले, दूर्वा, पंचामृत, नैवेद्य इत्यादी तयारीस लागावे. निरांजनात फुलवाती व तूप घालून ठेवावे. विड्याची पाने, पत्री, हार, मुकुट, फळे काढून ठेवावी. दूर्वांच्या २१-२१ च्या २-३ तरी जुड्या करून ठेवाव्यात. आणखी काही दूर्वा न मोजता; पण निवडून पूजेकरीता वेगळ्या ठेवाव्यात. गंध उगाळून ठेवायचे असल्यास स्वतः उगाळून ठेवावे, अन्यथा चंदन पावडरचाही वापर करता येईल.

पंचामृत एकत्र किंवा वेगवेगळे ठेवावे. गूळ-खोबरे वाटीत ठेवावे. पेढे, बर्फी, मिठाई इत्यादी नैवेद्य खोक्‍यांत न ठेवता वाट्यातून ठेवावा. 

असा असावा पूजेचा क्रम 
आचमन - प्राणायाम - मंगलतिलकधारण - देवांना नारळ विडा ठेवणे - देवांना, मोठ्यांना नमस्कार - संकल्प - महागणपती स्मरण - कलश, शंख, घंटा, दीपपूजन - प्राणप्रतिष्ठापनार्थे - ध्यान - आवाहन - आसन - पाद्य - अर्घ्य - आचमनीय - स्नान - पंचामृत (शिंपडणे - गंधयुक्त स्नान - गंधादि पंचोपचार पूजा - अभिषेक - अत्तर - उष्णोदक - शुद्धोदक - कापसाचे वस्त्र - जानवी (२) गंध - अक्षता, हळद, कुंकू, अष्टगंध, शेंदूर, बुक्का, लावणे - अंगपूजा - वेगवेगळी फुले व पत्री अर्पण - धूप - दीप - नैवेद्य - तांबूल (विडा) - दक्षिणा, फळे अर्पण करणे - आरती - कापूर आरती - मंत्रपुष्प - साष्टांग नमस्कार - प्रदक्षिणा - मंत्रपुष्प प्रार्थना - विशेष अर्घ्यदान - संकल्पपूर्ती. 

दूर्वा व लाल फुले का? 
दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन्‌ लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते. 

नैवेद्य अर्थात मोदकाविषयी 
‘मोद’ म्हणजे आनंद व ‘क’ म्हणजे देणारा. मोदक म्हणजे आनंद देणारा! मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे ‘ख’ या ब्रह्मरध्रांतील पोकळीसारखा असतो. मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणून त्याला ज्ञानमोदक असेही म्हणतात. ज्ञान प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे) पण अभ्यास करून लागल्यावर समजते, की ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याते प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो. 

आपल्या कुटुंबात प्रथेप्रमाणे जितके दिवस गणेश उत्सव असेल तितके दिवस सकाळी पूजा व सायंकाळी आरती करावी. वेगवेगळी श्री गणेश स्तोत्रे आहेत त्यांचे पठण करावे. म्हणजे उत्सवाच्या दिवसात संपूर्ण घर प्रसन्न राहते. 

विसर्जन असे करावे 
या वर्षी २३ सप्टेंबर २०१८ रोजी रविवारी गणपतीचे विसर्जन आहे. ‘आपौ वै सर्वा दैवतः’ या श्रृतिवाक्‍यात पाण्यामध्ये सर्वदेवत्त्व सांगितले आहे. सर्व देवता पाण्याच्या आश्रयाने असतात. त्यामुळे नदीकाठच्या मातीपासून आलेली मूर्ती नदी अथवा प्रवाहित पाणी जिथे असेल अशा ठिकाणी विसर्जित करावी. उत्तर पूजेनंतर श्री गणेश मूर्ती हलवून ठेवावी व विसर्जनाची तयारी करावी. मूर्ती श्रीगणेशाच्या जयघोषात समुद्र, तलाव किंवा विहिरीजवळ न्यावी. विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाण्यात बुडवून दोन वेळा वर काढावी व तिसऱ्यावेळी न काढता खालच्याखालीच विसर्जन करावी. 

पुढील वर्षी श्री गणेशाचे आगमन १० दिवस लवकर, म्हणजे २ सप्टेंबर २०१९ रोजी होणार आहे. 
(शब्दांकन ः संजय पाठक, सोलापूर)

फोटो फीचर

संबंधित बातम्या