गणरायाची आभूषणे 

प्राजक्ता ढेकळे 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

दरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात काही तरी वेगळे करण्यासाठी कुटुंबातील लोकांची धडपड सुरू असलेली पाहायला मिळते. 
प्लास्टिक बंदीमुळे यावर्षी कागदी, कापडी सजावटीचे पर्यावरणपूरक पर्याय अवलंबले जात आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर हा मखरासाठी करत असताना, गणरायाच्या आभूषणांसाठी मात्र सराफी दुकानांकडे पाऊले वळत आहेत. 
गणरायाच्या आभूषणामध्ये चांदीमध्ये मिळणाऱ्या दूर्वा, केवड्याची पाने, मोदक याबरोबरच इतर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. बऱ्याचदा अलंकार म्हणूनही शोभून दिसेल आणि सजावटही कमी करावी लागेल अशा प्रकारच्या दागिन्यांची आणि वस्तूंची खरेदी केली जात आहे.

गजरा हार 
चांदीमध्ये छोट्या छोट्या फुलांपासून तयार केलेला गजरा - हार ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. वजनाने हलका; मात्र दिसायला भरगच्च असणाऱ्या या हाराच्या किमती पाच ते सहा हजारांपासून पुढे आहेत.

जास्वंदाच्या फुलांचा हार 
गंगा-जमुना पॉलिश असलेल्या जास्वंदाच्या फुलांच्या हाराला सध्या भरपूर मागणी आहे. लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारात हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या हाराची किंमत सर्वसाधारण तीन हजार रुपयांपासून पुढे आहे.

चांदीची आयुधे 
चांदीमध्ये वरून भरीव वाटणारी, मात्र आतून पोकळ व वजनाला अत्यंत हलकी असणारी गणपतीच्या हातातील त्रिशूळ आणि परशू ही आयुधे आता चांदीमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. मोठमोठ्या गणपती मंडळांव्यतिरिक्त याप्रकारची चांदीची आयुधे घरातील गणपतीकडे पाहायला मिळत नाहीत. मात्र चांदीमध्ये घरातील छोट्या गणपतीची मूर्तीला शोभतील याप्रकारची आयुधे आकर्षक अशा स्वरूपात विक्रीला उपलब्ध आहेत. याप्रकारची आयुधे सर्वसाधारण सोळाशे ते सतराशे रुपयांपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत.

ड्रायफ्रूट आणि फळांची टोकरी 
बदाम, काजू, वेलदोडे, लवंग, मनुका यामध्ये चांदीचे पॉलिश असलेले ड्रायफ्रूट्‌स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या बरोबर गणपतीला फळांचा नैवेद्य दाखवण्यासाठीदेखील विविध प्रकारची पोकळ चांदीमधील फळे विक्रीस उपलब्ध आहेत. यांच्या सर्वसाधारण किमती सोळाशे रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहेत. याशिवाय चांदीचे पॉलिश असणारे लाडू, केळीचे घडदेखील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.

मीनाकारी वर्कची जास्वंदाची फुले 
नेहमीप्रमाणे चांदीत मिळणाऱ्या जास्वंदीच्या फुलांपेक्षा आता लाल रंगांमध्ये मीनाकारी वर्क असलेल्या जास्वंदाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या प्रकारची फुले लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात विक्रीस उपलब्ध आहेत. याच्या सर्वसाधारण किमती पाचशे रुपयांपासून पुढे आहेत.

चांदीमधील स्पेशल मोदक 
ड्रायफ्रूट्‌स, फळे यांच्याबरोबरच बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचा प्रसादही चांदीमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. सिंगल मोदक, पाच मोदक ते एकवीस मोदकांपर्यंत मोदक विक्रीस उपलब्ध आहेत.

मखरासाठी.. 
पर्यावरणपूरक मखर तयार करण्याबरोबरच गोल्ड पॉलिश असलेले, चौरंगावर मावणाऱ्या आकारातील जाळीदार व कुंदन वर्क असलेले  बस्करही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबरोबरच वरील बाजूला सुंदर मोरपीस आणि पोकळ चांदीचा दांडा असलेले मोरपंख गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. या मोरपंखांची किंमत सर्वसाधारण सहाशे रुपयांपर्यंत; तर जाळीदार बस्कराची किंमत सोळाशे रुपयांपासून पुढे आहे. 
याशिवाय मोदकांचा हार, पायात घालण्यासाठी चांदीचे वाळे, सोंड आभूषणे, चांदीचे कानदेखील चांदीमध्ये बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. याच्या किमती आकार आणि वजन यावर अवलंबून आहेत. 

दूर्वांचा हार, नारळ हार, केवड्यांच्या पानांपासून तयार केलेला हार; याबरोबरच सोन्याचे पॉलिश असलेला चाफ्याच्या फुलांचा हारदेखील बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. या विविध प्रकारच्या हारांच्या किमती सर्वसाधारण आठशे ते नऊशे रुपयांपासून पुढे विक्रीस आहेत. 
चांदीतील मुकुट - कुंदना वर्क आणि आकर्षक अशा पानांचे नक्षीकाम असलेले मुकुट बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. हे मुकुट वजनाने हलके असून छोट्या, मध्यम आकारात उपलब्ध आहेत. 

पूजेचे साहित्य 
गणपतीच्या पूजेच्यावेळी लागणारे पान, सुपारी, दूर्वा, जानवे, केवड्याचे पानही चांदीमध्ये उपलब्ध आहे. याच्या किमती सर्वसाधारण  अडीचशे रुपयांपासून पुढे आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात या प्रकारच्या विविध वस्तूची खरेदी ही गणेशोत्सवाचे वेगळेपण दाखवून देण्यास निश्‍चितच मदत करणारी आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या