सामाजिक कामात अग्रेसर

रोशन मोरे 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाला समाजप्रबोधनाचे अधिष्ठान होते. तसेच स्वातंत्र्योत्तर काळातदेखील अनेक गणेशोत्सव मंडळांनी विविध उपक्रमांद्वारे समाजकार्यात आपला खारीचा वाटा उचललेला दिसून येते. अशाच सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या पुण्यातील काही मंडळांच्या कामाचा घेतलेला आढावा...

पुणे शहरात लाेकमान्य टिळकांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली. टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवाला पुण्यातील तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी यामध्ये फक्त तीन सार्वजनिक मंडळे सहभागी झाली होती. आता १२७ वर्षानंतर मात्र ही संख्या साडेचार हजाराच्या पुढे गेली आहे. शिवाय दोन हजार पेक्षा जास्त बालमंडळे पुण्यात आहेत. गणेशोत्सव फक्त धार्मिक बाब न राहता तो सामाजिक जनजागृती करण्याचा उपक्रम बनला आहे. सुरवातीच्या काळात ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती हेच मंडळांचे प्रमुख उद्देश होता. व्याख्याने, मेळे, शाहिरी याचे गणेशोत्सवात आयोजन करून ब्रिटीशांविरोधात सार्वजनिक मंडळांनी जनजागृती केली. हीच परंपरा आजही पुण्यात जपली जाते आहे.

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ
पुण्यातील मानाचा चौथा गणपती म्हणून श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ प्रसिद्ध आहे. २००० मध्ये मंडळाने आपले शताब्दी वर्ष साजरे केले. तेंव्हा मंडळाचे ६० वर्षापेक्षा जास्त काळ सजावटीचे काम पाहणारे कलामहर्षी  डी.एस.खटावकर सर यांना अध्यक्षपदाचा मान दिला. खटावकर यांनी अध्यक्ष झाल्यानंतर मंडळ फक्त गणेशोत्सवाच्या दहा दिवसातच नव्हे तर वर्षभर कसे कार्यरत राहील याचे नियोजन केले. त्यातूनच दहीहंडी उत्सवावर होणारा अवाजवी खर्च टाळून गरजू सामाजिक संस्थांना धान्य वाटप करण्यास सुरवात केली. साधारणपणे ११०० किलो पेक्षा जास्त धान्याचे वाटप सामाजिक संस्थांना मंडळ करत असते. आता जी मंडळे सामाजिक संस्थांना धान्य वाटप करतात त्यांच्या समोर सुरवातीला आदर्श तुळशीबाग मंडळानेच ठेवला असे मंडळाचे कोशाध्यक्ष नितीन पंडित सांगतात.  

अनाथांना खरेदीचा आनंद
 मंडळाकडून दरवर्षी अनाथ मुलींना दिवाळीत कपड्यांचे वाटप करण्यात येते. मात्र व्यापाऱ्यांकडून कपडे घेऊन ते अनाथ आश्रमात नेऊन दिले जात नाहीत. तर प्रत्यक्ष अनाथ मुलींना खरेदीचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांना तुळशीबागेत खरेदी करण्यासाठी आणले जाते. मुलींना वाटेल त्या दुकानात जाऊन त्या खरेदी करतात. त्यामुळे ही खरेदी केवळ कपड्यांपुरती मर्यादित राहत नाही. मुलींना जे हवे असते त्याची त्या तुळशीबागेतून खरेदी करतात. यामध्ये मंडळाला दरवर्षी तुळशीबागेतील व्यापारी सहकार्य करत असतात.

वाढदिवसातून मदत
वाढदिवस साजरा करताना चौकात मोठ मोठाले प्लेक्‍स लावले जातात. गणेश मंडळामध्ये काम करताना कार्यकर्ते देखील यामध्ये मागे नसतात. मात्र श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाच्या कार्यकर्ते असे उत्सवी वाढदिवस करण्याचे टाळतात. वाढदिवस असणारा कार्यकर्ता मंडळाच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना मदत करत असतो. सामाजिक संस्थांना त्यांच्या संस्थेत कशाची आवश्‍यकता आहे याची विचारणा केली जाते. त्यानुसार वाढदिवसादिवशी मंडळाच्या माध्यमातून संस्थेला मदत केली जाते. १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा व तुळशीबागेतील व्यापाऱ्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने मंडळाने साजरे केले आहेत.

’ती’चा सन्मान
गणेशोत्सवासोबतच इतर सामाजिक कामात महिलांनी पुढाकार मिळावा , अशी मंडळाची अपेक्षा आहे. त्यामुळेच ’एक दिवस महिलांचा’ या उपक्रमाअंतर्गत मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवाचे एक दिवसाचे नियोजन महिलांकडे दिले जाते. दिवसाची सुरवात महिला अथर्वशीर्षाचे पठण करून करतात. त्यानंतर दिवसभरातील सर्व कामाची जबाबदारी देखील त्याच उचलतात. राजकारण, समाजकारण, क्रीडा, शिक्षण यासारख्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या महिलांचा दरवर्षी मंडळाकडून सत्कार करण्यात येतो.

विद्यार्थ्यांना मदतीचा हात
दिवसभर काम करून रात्र शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पुणे नाईट स्कूलमधील  २५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देवून पुढील शिक्षण घेण्यास या विद्यार्थ्यांना मंडळाकडून प्रोत्साहन दिले जाते. मुळशी सारख्या ग्रामीण भागात विद्यार्थींनीची शाळेतील संख्या फारच कमी आहे. असे मंडळाच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी तेथे सर्व्हे केला. सर्व्हेमधून धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, शाळेत  स्वच्छतागृह नसल्याने मुली शाळेत येण्याचे टाळत आहेत. म्हणूनच भविष्यात मुळशीतील दुर्गम भागातील शाळांना स्वच्छतागृहे बांधून देण्यास मंडळ पुढाकार घेणार असल्याचे मंडळाचे पदाधिकारी सांगतात.

मिरवणुकीतून सामाजिक संदेश
मंडळाकडून जी गणेश विसर्जन मिरवणूक काढली जाते त्यामधून विविध सामाजिक संदेश देणारे देखावे साजर केले जातात. अवयव दानाविषयी जनजागृती करणारा देखावा, माळीण दुर्घटनेतील कुटुंबीयांसाठी मदतीचे आवाहन करणार देखावा, स्मार्ट सिटी विषयी जनजागृती करणारा देखावा ही अलीकडील काही ठळक उदाहरणे म्हणता येतील. 
मंडळाचे अध्यक्ष शिल्पकार विवेक खटावकर, उपाध्यक्ष विनायक कदम, कार्याध्यक्ष विकास पवार यांच्या विचारांमधून मंडळ भविष्यात सामाजिक कामांचा वेग आणखी वाढवणार असल्याचे ध्वनित होते. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपत मंडळाला १२६ वर्षाची परंपरा आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक कामात पुढाकार हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे वैशिष्ट आहे. असे मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे सांगतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत करायची असो वा वारीमध्ये वारकऱ्यांचीसेवा प्रत्येक ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आघाडीवर आहे.

रुग्णसेवा अभियान
ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या १२०० रुग्णांना २ वेळेचे भोजन. चहा नाश्‍त्याची व्यवस्था, रुग्णाच्या नातेवाईकांरिता तात्पुरत्या विश्रांतीगृहाची ससूनच्याच आवारात व्यवस्था तसेच गरोदर महिलांच्या पाच वॉर्डचे नूतनीकरण ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय रुग्णांना औषधोपचार दगडूशेठ ट्रस्टवतीने विनामुल्य करण्यात येतो. त्यामुळे शहरामधील गरीब गरजू लोकांसोबतच ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना फार मोठा आधार मिळतो. 

ज्ञानवर्धन अभियान 
अनेक विद्यार्थी हुशार असूनही त्यांना केवळ आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. शिक्षण सोडून त्यांना इतर कामे करावी लागतात. त्यामुळेच पुणे शहरातील प्रतिकूल परिस्थिती असणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांनासाठी ’जय गणेश’ ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत ट्रस्टकडून पालकत्व योजना राबवली जाते. यामध्ये गरजू, हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेऊन दिली जाते, त्यांची शाळेतील संपूर्ण फी भरली जाते. तसेच त्यांना मोफत वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण दिले जाते. 

ग्रामीण विकासात हातभार
ग्रामीण भागातील समस्यांकडे ट्रस्ट सजगतेने पाहत असते. म्हणूनच दुष्काळग्रस्त भागात विविध उपक्रम राबवून गाव स्वयंपुर्ण करण्याकडे ट्रस्टचा कल आहे. म्हणूनच पिंगोरी हे दुष्काळग्रस्त गाव दत्तक घेतले होते. वृक्षारोपण, गोशाळा, ठिबक सिंचन, वीजनिर्मिती, ॲग्रो टुरिझम आणि ई लर्निंगव्दारे गाव स्वयंपूर्ण करण्यास ट्रस्टचा पुढाकार आहे. तसेच इंदापूर तालुक्‍यातील गारपीटग्रस्त १२ शेतकऱ्यांना ३०० चौ.फुटांची पक्की घरे देखील ट्रस्टकडून बांधून देण्यात आली आहेत. 

बालसंगोपन केंद्र  
देवदासींच्या निराधार निराश्रित १०० बालकांसाठी कोंढव्याच्या परिसरात ट्रस्टकडून विनामूल्य शिक्षण, भोजन, निवासाची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कागद, काच, पत्रा वेचणाऱ्या महिलांच्या २५ मुलांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. शिवाय येवलेवाडी येथील कुष्ठरोगी औद्योगिक कारखान्याच्या पुर्नउभारणीस ६० लाख रुपयांची मदत देखील ट्रस्टकडून देण्यात आली आहे. निराधार असणाऱ्यांसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आधारवडच बनले आहे. यासोबतच वारीमार्गवर ५० लाख झाडे लावण्याचा स्तुत्य उपक्रम देखील राबवण्यात आला आहे. 

छत्रपती राजाराम मंडळ 
गणेशोत्सवाच्या उगमस्थानापैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री गणपती देव ट्रस्टचे छत्रपती राजाराम मंडळाला यंदा १२७ वर्ष पूर्ण होत आहेत. मंडळाने सामाजिक जाणीव ठेवून विविध उपक्रम राबवले आहेत. गेल्या वर्षी येरवडा येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले; तर पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माण तालुक्‍यातील वृक्षारोपण कार्यक्रमाला ३०० वृक्षांचे रोपण मंडळातर्फे देण्यात आले होते. पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा यासाठी मएसो हायस्कूल येथे शाडूच्या गणपती बनवण्याची स्पर्धा मंडळाकडून घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत मूकबधिर विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन सुंदर मुर्ती बनवल्या होत्या. मंडळाचे कार्यकर्ते अशोक देशमुख यांनी पुणे बंगलोर हा ८०० किलो मीटरचा प्रवास ८ दिवसात सायकलवरून करून पर्यावरणाचा व सामाजिक ऐक्‍याचा संदेश दिला आहे. तसेच दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तपेढीला रक्त पुरवले जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात आपल्या लहान मुलांना घेवून महिला गणपती पाहण्यासाठी पुण्यात येत असतात. मात्र या लहान मुलांना दुग्धपान करण्यासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष नसतो त्यामुळे त्यांची कुचंबना होते. हे ओळखनूच मंडळाकडून खास महिलांसाठी शिशुला दुग्धपान करता यावे सासाठी स्वतंत्र कक्ष उभारला जातो.  त्यामुळे केवळ दहा दिवसच गणेशोत्सव साजरा न करता वर्षभर विधायक कामे करत गणेशाची आराधन करण्याचे काम मंडळ करते, असे मत मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर व्यक्त करतात. 

अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ 
टिळकांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातील पुण्यातील महत्त्वाचे मंडळ म्हणजे अखिल नवी पेठ हत्ती गणपती. या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झाली. हे मंडळ आजही आपल्या देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याची परंपरा पाळत आहे. मंडळाकडून वर्गणी गोळा केली जात नाही. कार्यकर्ते स्व:खर्चाने गणेशोत्सव साजरा करतात. आपल्या काम गणेशोत्सवाच्या दहा दिवसा पुरते मर्यादित न ठेवता वर्षभर मंडळाकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. भोर सारख्या डोंगराळ भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाक नव्हते. त्यामुळे मंडळाकडून या शाळेला लोखंडी बाक भेट म्हणून दिले. गावाकडून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थींच्या भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी विद्यार्थी साहाय्य समितीला ५० हजार रुपयांची देणगी मंडळाकडून देण्यात आली. तर रुईया मूक बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना श्रवण यंत्र मंडळाकडून वाटप करण्यात आली. एचआयव्ही बाधीत मुलांसाठी काम करणाऱ्या रवी बापटले यांच्या सेवालय संस्था, सहारा अनाथलय बीड, श्रीकृष्ण शांतिनिकेतन नागपूर, ममता फाउंडेशन, श्री साईसेवा मतिमंद मुलामुलींसाठी निवासी शाळा या संस्थाना प्रत्येक १ लाख रुपयाची मदत मंडळाकडून करण्यात आली आहे. 
 
श्रीशक्तीचा जागर व्हावा. स्त्रियांना देखील समाज समानतेची वागणूक दिली जावी, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून मंडळाकडून २०१३ पासून संपूर्ण महाराष्ट्रात समाजिक कार्य करणाऱ्या ११ महिलांना चतुरस्र नारी पुरस्कार देवून  गौरवण्यात येते. तसेच जानेवारी २०१८ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मंडळाकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक कामात मंडळाचे काम असेच कायम राहणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शामराव मानकर सांगतात.
 

संबंधित बातम्या