मंत्रपुष्पांजली

श्रीकांत नवरे
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

पारंपरिक पद्धतीने ज्यांच्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या पूजा होतात त्यांना मंत्रपुष्प किंवा मंत्रपुष्पांजली हे दोन शब्द नवीन नाहीत. अर्थात सध्या कॅसेटचे युग असल्याने ध्वनिफितींच्या माध्यमातूनही नवीन समाजव्यवस्थेला या शब्दांची ओळख, परिचय होऊ लागला आहे. असे जरी असले, तरी मंत्रपुष्पाची पूर्वपीठिका, व्याप्ती, रचना, प्रयोजन, महत्त्व इत्यादी गोष्टींबाबत समाजमन अनभिज्ञ असल्याचे जाणवते. यामुळेच या विषयाची सखोल नसली, तरी प्राथमिक, मूलभूत माहिती समजावी, या उद्देशाने हा लेखनप्रपंच.

प्राचीनकाळी वेदविद्या ही मौखिक परंपरेने चालू असे. म्हणजे संथा देताना आणि घेताना गुरुजी आणि विद्यार्थ्यांकडे आजच्यासारखी हस्तलिखित किंवा छापील पोथी समोर नसे. वेदांचा हा सर्व व्यवहार तोंडी चालत असे. त्यामुळे वेदवाङ्‌मयाचे संरक्षण आणि देखभाल करण्याची ज्यांनी जबाबदारी स्वीकारली त्यांनी वेदमंत्रांचे स्वर आणि अक्षरे यामध्ये कानामात्रेचाही बदल होऊ नये यासाठी अनेक विलक्षण, मौलिक, सूक्ष्म उपाय शोधून काढले. त्यासाठी कठोर परिश्रम केले. अथक प्रयत्न केले. मंत्रपुष्प हा त्यापैकीच एक छोटासा प्रयत्न आहे.

मंत्रपुष्पांजली हा शब्द प्रसन्न, प्रशस्त आणि भारदस्त असला आणि सध्याच्या समाजव्यवस्थेत तो रुढही असला, तरी निरनिराळ्या वेदशाखांच्या प्रयोगकारांनी ‘मंत्रपुष्प’ किंवा ‘पुष्पमंत्र’ असे शब्द योजलेले आढळतात. मंत्रपुष्पांजली या शब्दाचा भावार्थ असा, की एखाद्या विशिष्ट देवतेला उद्देशून त्या देवतेचा विशिष्ट मंत्र म्हणून त्या देवतेजवळ जाऊन नम्रपणाने वाकून त्या देवतेला ओंजळीत फुले घेऊन वाहणे, समर्पण करणे. जवळ किंवा लांब उभे राहून फुले फेकणे, टाकणे किंवा उडवणे नव्हे.

पूजेचे एकूण तीन प्रकार. नित्य, नैमित्तिक आणि काम्य. काम्य म्हणजे एखादी विशिष्ट कामना, इच्छा, आकांक्षा मनात धरून केली जाणारी पूजा. या सर्व प्रकारच्या पूजा या षोडशोपचारे (सोळा उपचार) असल्याने त्यामध्ये मंत्रपुष्प हा एक उपचार आहे. पूजेचा कुठला प्रकार आहे, त्यावर कुठला मंत्र घ्यावयाचा हे ठरते. वैदिक मंत्र, पौराणिक मंत्र, त्या देवतेचा गायत्री मंत्र, बीजमंत्र, नाममंत्र इत्यादी मंत्र मंत्रपुष्पासाठी घेतले जातात.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नेहमी कानावर पडणाऱ्या आणि जनमानसात प्रसिद्ध किंवा माहीत असलेल्या मंत्रपुष्पांजलीचा तपशील समजून घेऊया. यामध्ये सुरवातीला ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः (ऋग्वेद १०-९०-१६) हा मंत्र सस्वर म्हटला जातो. त्यानंतर ‘राजाधिराजाय पासून महाराजाय नमः’ इथपर्यंतचा भाग हा कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकातील आहे. त्या भागाचे पठण होते आणि साम्राज्य भौज्यं इथपासून सभासद इति’ हा सर्व भाग ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणातील आठव्या पंचिकेत आला आहे. मंत्रपुष्प हा कर्मकांडाच्या अंगाने आल्याकारणाने त्यामध्ये संहिता, ब्राह्मण आणि आरण्यकाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये उपनिषदातील मंत्रांचा विचार करण्यात आलेला नाही. कारण उपनिषदांकडे ‘ज्ञानकांडा’च्या भूमिकेतून पाहिले जाते. शिवाय उपनिषदांच्या संथा घेण्या-देण्यापासूनच ते कोणी, कुठे, केव्हा, कसे, किती वगैरेसारखे नियम असल्याने त्या ग्रंथांची शिस्त आणि शास्त्र यांच्या चौकटीत बसत असेल तरच पठण होते.

गणेशोत्सव, नवरात्र आणि मोठ्या प्रमाणावर चालणारे अनेक दिन साध्य असे जे कर्मकांड असते त्यामध्ये मंत्रपुष्पाच्यापूर्वी ‘देवे’ नामक मंत्र म्हणून मग मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. देवे याचा अर्थ ऋग्वेदामध्ये देवाः या शब्दाने ज्या मंत्रांचा शेवट आहे, असे एकूण तीस मंत्र संकलित केलेले आहेत. या सर्व मंत्रांचा अर्थ, आशय आणि विषय पाहिला, की या  मंत्रांच्या निवडीमागे एक विचार, दृष्टी आणि धोरण दिसते. असे म्हणण्याचे कारण केवळ मंत्राच्या शेवटी देवाः असा शब्द आला आहे. एवढ्या मर्यादित उद्देशाने या मंत्रांचे संकलन केले गेलेले नाही. या तीस देवे मंत्रांचे पठण झाल्यावर निरनिराळ्या देवतांना उद्देशून ऋग्वेदातीलच काही मंत्रांचे पठण होते आणि मग वर वर्णन केलेली नेहमीची प्रसिद्ध मंत्रपुष्पांजली म्हटली जाते. त्यानंतर मंत्रपुष्पाची समाप्ती निरनिराळ्या देवतांच्या गायत्रीमंत्र पठनाने होते. कृष्णयजुर्वेदाच्या तैत्तिरीय आरण्यकात निरनिराळ्या देवतांना उद्देशून अनेक गायत्री दिलेल्या आहेत. तैत्तिरीय आरण्यकाविषयी पूर्ण आदर बाळगून आणि त्यांचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून निरनिराळ्या वेदशाखांच्या प्रयोगकारांनी तैत्तिरीय आरण्यकात नसलेल्या वेदातील, पुराणातील देवतांना उद्देश एवढेच काय, पण पारमार्थिक उन्नती केलेले संत, स्वामी, आचार्य, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक यांना उद्देशूनही गायत्री तयार केलेल्या आहेत. परंपरेनी या सर्वांची यथार्थ समीक्षा करून आपल्या नित्याच्या धार्मिक अनुष्ठानात त्यांचा स्वीकारही केलेला आहे.

पोथीतील आणि पोथीबाहेरील ही जी माहिती आपण समजावून घेतली, ती ऋग्वेदाच्या शाकल शाखेच्या अनुयायांना उपयोगी पडणारी आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या लोकांची तैत्तिरीय प्रयोगकारांनी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेच्या मंत्रपुष्पाची रचना थोडी वेगळी आहे. त्यांचे एकूण अठ्ठावन्न देवे मंत्र आहेत. त्यामध्ये संहिता आणि ब्राह्मण या दोन्ही ग्रंथातील मंत्र आहेत आणि ब्राह्मण ग्रंथही सस्वर आहेत. संहिताग्रंथात ब्राह्मण आणि ब्राह्मणग्रंथात संहिता, असे त्यांच्या शाखेचे मिश्र स्वरूप आहे. या देवेचे पठण झाल्यावर तैत्तिरीय आरण्यकातील योपां पुष्प वेद इथपासून प्रत्येवतिष्ठीत इथपर्यंत एकूण सात अनुवाक म्हटले जातात. त्यानंतर ऋग्वेदियांप्रमाणेच मंत्रपुष्पांजली व गायत्रींचेही पठण होते.

तैत्तिरीय शाखेचे रुद्र, उदकशांती, त्रिसपर्ण, मंत्रपुष्प हे सर्वच मंत्र अत्यंत सावकाश, स्वरांचे नियम पाळून अत्यंत धीरगंभीरपणे म्हणावे लागतात. तरच ते कानाला ऐकायला गोड लागतात. वाघ पाठीमागे लागल्यासारखे मंत्र म्हणून टाकल्याने मंत्रातील स्वरांची आणि अक्षरांची हानी होतेच; पण मंत्रांचे आणि मंत्रद्रष्ट्या ऋषींचे अवमूल्यन, अवहेलना, हेळसांड होते. कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय शाखेची जी सहा सूत्रे आहेत त्यामधील हिरण्यकेशी सूत्रांचे अनुसरण करणाऱ्या लोकांचे पुण्यात वास्तव्य आहे. एकूणच तैत्तिरीय शाखेचे अत्यंत सुमधुर आणि श्रवणीय असे मंत्रपठण, श्रवण आणि ते म्हणणाऱ्या ब्रह्मवृंदांचे दर्शन दिवसेंदिवस दुर्मिळ झालेले आहे. हे सर्व मंत्रपठण ध्वनिफीत, ध्वनिमुद्रिका आणि बाजारात मिळणारी निरनिराळी या विषयीची छोटी - मोठी पुस्तके यांवर अवलंबून किंवा विसंबून राहून होत नाही, तर पारंपरिक पद्धतीने ते रीतसर शिकून घ्यावे लागते; पण सध्याच्या झटपट रंगारीच्या जमान्यात एखाद्या विषयाची गुरूजवळ बसून संथा घेणे, सोळा संथा म्हणून तो विषय पाठ करून गुरूला म्हणून दाखविणे आणि गुरूच्या परवानगीने मगच त्या विषयाचा लौकिक व्यवहारात विनियोग, उपयोग किंवा वापर करणे, अशा प्रकारचा संस्कार आज समाजात दृष्टीस पडत नाही. हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे वेदवाङमय योग्य व्यक्तींकडून योग्य व्यक्तींकडे सोपविले गेल्यानेच शुद्ध स्वरूपात टिकून राहिले, हे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

मंत्रपुष्प आणि मंत्रजागर या दोहोंमध्ये दर्जा, गुणवत्ता, प्रामाण्य आणि प्रतिष्ठा या सर्वच दृष्टींनी जमीन-अस्मानाचा फरक असला, तरी वेदमंत्रांमुळे आपल्याला महत्त्व किंवा मोठेपणा मिळालेला आहे, हे मंत्रपठण करणाऱ्या व्यक्तींनी विसरता कामा नये. कारण मोठेपण हे लौकिक, व्यावहारिक आहे आणि वेदमंत्र हे अलौकिक, अपौरुषेच आहेत, असे परंपरा सांगते. 

संबंधित बातम्या