पर्यावरणपूरक गणेशोत्सव

विवेक सरपोतदार 
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

गणपती विशेष
 

समाजाची एकता व बंधुभाव वाढीस लागावा, या मोठ्या उद्देशाने लोकमान्य टिळकांबरोबर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आज फारच भव्य स्वरूप धारण केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा गणेशोत्सव काळात उत्साहाने - आनंदाने सळसळलेला असतो. घराघरांतून सर्वत्र गणपतींची स्थापना होतेच, पण सार्वजनिक प्रकाराने गल्लीबोळांमधूनही गणपती मंडळे गणेशाची स्थापना करतात. आता तर या जगप्रसिद्ध गणेशोत्सव असणाऱ्या सार्वजनिक गणपतींना सव्वाशे (१२५) वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे.

तरुणांमधील उत्साह व चैतन्य विधायक मार्गाने वापरले जावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या - सण उत्सवांची गरज आहेच; पण या सगळ्या गोष्टींमुळे ‘पर्यावरणाची’ अपरिमित हानी होत आहे; ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी निश्‍चितच नाही. हे प्रदूषण कोणकोणत्या मार्गांनी होते व ते कसे टाळता येईल, हे पाहणे गरजेचे आहे. याविषयी जनजागृती निश्‍चितपणे होत असली, तरीही अजून हव्या त्या प्रमाणात जागरूकता दिसत नाही.

गणपतीची मूर्ती व पाणी
गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर विहिरींमध्ये तळ्यांमध्ये, नद्यांमध्ये तसेच मुंबईसारख्या ठिकाणी समुद्रामध्ये गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. पूर्वी सर्व गणपतींच्या मूर्ती मातीपासून बनविल्या जात व त्यांचे प्रमाणही कमी असे. त्यामुळे मूर्ती पाण्यात मिसळून जात. तसेच मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जात जे वनस्पतींपासून मिळविले जात त्यामुळे ते घातक नसत; पण आज मात्र बहुतांशी मूर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) बनविल्या जातात.  हे पीओपी लवकर पाण्यात विरघळत नाही किंवा विरघळले तरी त्यासाठी फार काळ जावा लागतो. त्याशिवाय यातील आर्सेनिकसारखे विषारी द्रव्य पाण्यात मिसळते. मूर्ती रंगविण्यासाठी हल्ली वापरले जाणारे रंगही रसायनयुक्त असतात. चंदेरी - सोनेरी असे रंग तर विशेषकरून त्रासदायक असतात. हे सर्व रासायनिक पदार्थ पाण्यात मिसळल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते व हे पाणी पिण्याच्या योग्यतेचे राहात नाही; त्यामुळे नदी - ओढे यात पाणी पिणारी माणसे, जनावरे तसेच समुद्रात समुद्री जीव मृत्युमुखी पडू शकतात. तळी - विहिरींचे पाणी खेड्यांमधून शुद्ध न करता तसेच प्यायले, तर सर्वांच्या स्वास्थ्यावर अनिष्ट परिणाम होतात.

पत्री - फुले आणि पाणी, हवा
गणेशोत्सवात निर्माण होणारे पत्री व फुलांचे निर्माल्य ओलसर असल्याने पावसाळ्याच्या दिवसात लवकर सडून त्यात बारीक किडे - चिलटे यांचा प्रादुर्भाव होतो. काही जण घरात साठवून ठेवलेले पण सडलेले - कुजलेले निर्माल्य घराबाहेर किंवा उकिरड्यावर फेकतात व भटकी जनावरे इतरत्र पसरवितात आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता असते. तर काही जण हे सडलेले - कुजलेले निर्माल्य मोठ्या प्रमाणात गणपतीबरोबर पाण्यातच विसर्जित करतात. त्यामुळे पाणी किती प्रदूषित होत असेल याचा विचार न केलेलाच बरा! हेच पाणी शेवटी समुद्रात मिसळते व दूषित होते. पर्यावरणाची ही दूषित होणारी, बिघडत जाणारी साखळी शेवटी आपल्यालाच घातक आहे.

गुलालाची उधळण व फटाके
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत अनेक जण भरपूर गुलाल उधळतात व फटाके वाजवतात. पण हा गुलाल उधळणे व फटाके वाजवणे एवढे आवश्‍यक आहे का? हवेत गुलालाचे कण बराच वेळ तरंगत राहतात व श्‍वसनमार्गाद्वारे शरीरात शिरतात. तसेच फटाक्‍यांच्या विषारी धुरामुळेही खूप जणांना विशेषतः लहान मुलांना श्‍वसनमार्गाचे विकार, जंतुसंसर्ग होऊ शकतात. ज्यांना दम्यासारखे जुनाट खोकल्यासारखे आजार आहेत, त्यांचे आजार - त्रास खूप प्रमाणात वाढतात. त्याशिवाय फटाक्‍यांमुळेही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते ते वेगळेच.

सजावटीचे सामान
गणेशोत्सवात बरेच जण थर्माकोल, प्लॅस्टिक किंवा पर्यावरणाला घाक असलेल्या पदार्थांचा वापर करून केलेली सजावट गणपतीबरोबर पाण्यात विसर्जित करतात हे अतिशय घातक व चुकीचे आहे. वरील पदार्थांपैकी विशेषतः थर्माकोलचा एकूणच वापर करण्यावर आता जगातील अनेक देशांनी बंदी घातलेली आहे. थर्माकोलचे शीट्‌स किंवा पातळ थर निर्माण करताना वापरले जाणारे रासायनिक पदार्थ अशा प्रकारे एकमेकांत मिसळले जातात, की त्यामुळे थर्माकोलचे कण एकमेकांपासून लवकर विलग होत नाहीत व त्यामुळे वर्षानुवर्षे त्याचे विघटन होऊ शकत नसल्याने वातावरण प्रदूषित होते. पाण्यावर त्याचे कण तरंगत राहतात. जे एकत्र करणे फार अवघड असते आणि त्यामुळे अनेक जाती - प्रजातींचे पक्षी, जलचर, पाणवनस्पती, इत्यादींची उपासमार होऊ शकते. तसेच गणेश मंडळे थर्माकोलचा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यावेळी गणपतीजवळील उदबत्ती, समई यामुळे ज्वलनशील थर्माकोलला  आग लागून अपघात होऊ शकतात. थर्माकोल जळताना अतिशय विषारी व घातक वायू बाहेर पडतात, जे मानवी फुफ्फुसांना घातकही ठरू शकतात. अशाच प्रकारे प्लॅस्टिकही न कुजणारे असल्याने पर्यावरणाला हानिकारकच आहे.

स्पीकर्स, ढोल-ताशे व ध्वनी प्रदूषण
गणेशोत्सवाला स्पीकर्स, बॅंड, ढोल-ताशे यांचा वापर अलीकडे फॅशन म्हणून खूपच वाढलेला दिसून येत आहे. कानठळ्या बसतील एवढ्या मोठ्या आवाजात त्यांचा वापर सुरू असतो. मानवी कानांची क्षमता एका ठराविक डेसिबलपर्यंतचेच आवाज सहन करण्याची आहे. त्या पुढच्या तीव्रतेच्या आवाजांनी कानांना दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे, छातीत धडधडणे असे हलके; तर कानांचे पडदे फाटणे, कायमचे ऐकू न येणे, हृदयरोग (हार्टॲटॅक) असे गंभीर परिणाम होतात. विशेषतः लहान बालके, वृद्ध व गर्भवती स्त्रिया व त्यांच्या पोटातील अर्भकांवर आवाजांचे मोठे गंभीर दुष्परिणाम होतात. या व्यतिरिक्त प्राणी, पक्षी तसेच राहती घरे, जुने वाडे यांच्या पडझडीवर परिणाम होतात ते वेगळेच. आपली क्षणिक हौस, उत्साह किंवा आनंद हा काहींच्या जीवनात कायमचं दुःख आणू शकतो, ही संवेदना जेव्हा आपल्या मनाला भिडेल, तेव्हाच आपण हे असे प्रकार थांबवू शकू.

एकूणच हे सर्व प्रकारचं प्रदूषण पाहता मनात विचार येतो, की आपल्या लाडक्‍या गणपतीला हे सगळं आवडत असेल?  हा आनंदोत्सव मानावा का? आपण ठरवलं तर हे सर्व टाळू शकतो. त्यासाठी काय करता येईल बरं?

  • शक्‍यतो शाडू मातीचीच मूर्ती आणा. नाहीतर शाडू मातीला पर्याय म्हणून आपण सुपारी किंवा कायमस्वरूपी धातूची मूर्ती पूजेला वापरू शकतो.
  • शाडू मातीची घरगुती मूर्ती लहान आकाराच्या आणा. जेणेकरून घरच्या बादलीभर पाण्यात विसर्जन करून ते पाणी झाडांना टाकता येईल.
  • महानगरपालिकेच्या विसर्जन हौदात मूर्ती विसर्जन केल्या नंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी ते पाणी रस्त्यावर किंवा नदीत फेकून न देता योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. 
  • निर्माल्य नदीपात्रात किंवा इतरत्र कुठेही फेकून न देता निर्माल्य कलशात टाकावे किंवा झाडांना खत म्हणून वापर करावा. तसेच गणपती किंवा गौरींना जर आपण योग्य पत्री घालत असू तर ती आयुर्वेदिक औषधी असल्याने देवाच्या मूर्तीवरून उतरविल्यावर ताजी असताना वैद्यांच्या सल्ल्याने औषध म्हणून वापर करावा व उरलेल्या चोथ्याचे खत तयार करावे.
  • गणेशोत्सवात सजावटीसाठी थर्माकोल, प्लॅस्टिक, इ. पर्यावरणाला घातक असाऱ्या वस्तूंचा वापर न करता कागद, पाने, फुले इ. पर्यवरणपूरक वस्तूंचा वापर करावा. अलीकडे पर्यावरणाला पूरक जैव प्लॅस्टिकच्या वस्तूंचा योग्य वापर करण्यास हरकत नाही.
  • नैसर्गिक प्रकारचा गुलाल फक्त कपाळावर लावण्याएवढाच वापरा उगीचच उधळू नये. तसेच गणपती किंवा गौरींना पूजेसाठी नैसर्गिक प्रकारचे हळद-कुंकू, शुद्ध कापूर, उदबत्त्या इत्यादी पूजा साहित्याचाच वापर करावा.
  • तसेच गणपती व गौरींना पत्री वाहताना त्या निसर्गातून योग्य त्याच निवडाव्या; त्यातही एकेक पान पुरेसे आहे. उगीचच ओरबाडून घेऊ नये. मंडईतून पत्री विकत घेतल्यास फसण्याची शक्‍यता असते. तसेच निसर्गातील वनस्पती ओरबाडून काढल्याने नष्ट होतात.
  • बॅंड, लाऊडस्पीकर, डी.जे., ढोल-ताशे यांचा आवाज मर्यादित डेसिबलपर्यंत राहील याची काळजी घ्यावी. ढोल-ताशे हे परंपरागत योग्यच आहेत पण कमीत कमी पथकांचाच वापर करा म्हणजे ध्वनिप्रदूषण न होता मिरवणूकही लवकर संपायला मदत होईल.

     गणपतीची आरती स्पीकरवर मोठ्या आवाजात लावण्यापेक्षा ती सर्वांनी मधुर आवाजात व पारंपरिक रीतीने म्हणावी. आपल्या लाडक्‍या गणपतीचा उत्सव पर्यावरणपूरक असावा, ही काळाची खरी गरज आहे. या पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून  मिळणारा आनंद द्विगुणित असेल.

फोटो फीचर

संबंधित बातम्या