‘पूर्व परंपरेचा अभ्यास हवाच...’

सायली पानसे-शेल्लीकेरी
सोमवार, 21 मार्च 2022

गप्पा  

डॉ. आशुतोष जावडेकर... एक बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व, एक सक्षम दंतवैद्य, एक यशस्वी लेखक, उत्तम संगीतकार आणि एक उत्कृष्ट गायक! या कलाकाराबरोबर मारलेल्या गप्पा...

प्रश्न : आशुतोष नुकतंच तुझं ‘हिम्मत रख’ हे नवीन गाणं ऑनलाइन रिलीज झालं आहे, आणि जवळ जवळ पन्नास-साठ हजार लोकांनी ते बघून तुला पसंतीची दाद दिली. सोशल मीडियाचं तुझ्या आयुष्यातलं स्थान काय आहे, हे जाणून घ्यायला आवडेल. 
डॉ. आशुतोष जावडेकर ः सोशल मीडिया माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं माध्यम आहे. लोक असं म्हणतात, की ही सामाजिक माध्यमं अत्यंत उथळ आहेत, कधी कधी असतातही. पण मला वाटतं संगीतात काय किंवा साहित्यात काय, सोशल मीडियानं लोकशाहीकरण केलं आहे. पूर्वी एखादी चांगली गोष्ट लोकांपर्यंत सहज पोहोचत नव्हती, पण आज ती सहज पोहोचवता येते आणि चांगली असेल ती व्हायरलही होते. कलाकाराला या माध्यमांमुळे अभिव्यक्तीच्या खूप संधी मिळाल्या आहेत. फक्त अनेक कलाकार तिथं मिळणाऱ्या प्रसिद्धी किंवा कॉमेंट किंवा लाईकच्या आहारी गेलेले दिसतात; तिथं थोडं तारतम्य ठेवायला हवं. आपण व्यक्त जरूर व्हावं, पण तिथं होणाऱ्या कौतुकानं हुरळून जाऊ नये. स्वतःची ओळख सोशल मीडियाच्या खुंटीवर टांगलेली नसावी.

प्रश्न : अनेक वेगवेगळ्या गोष्टी एकावेळी करण्यासाठी कमालीचं वेळेचं नियोजन आणि अर्थात अंगी कलागुण असायला हवेत, तर कुठले गुण आणि दोष तुझ्यात आहेत असं तुला वाटतं? 
डॉ. आशुतोष जावडेकर ः प्रत्येक कलाकाराला आपल्या मर्यादा माहीत असायला हव्या, तशा माझ्या मर्यादा सांगतो. मी सगळं करत असलो तरी मला हे माहिती आहे, की मी हाडाचा लेखक आहे, तसा मी गायक किंवा संगीतकार नाही. संगीतातला मी लोभी माणूस आहे, पण दुर्दैवानं माझं संगीतात शास्त्रशुद्ध शिक्षण झालेलं नाही. गायक आणि संगीतकार म्हणून माझ्या काही मर्यादा आहेत. अजून एक वाईट गोष्ट म्हणजे, मी आळशी नसलो तरी थोडा निवांत आहे. आता माझी इंग्रजी कादंबरी तयार आहे, खूप वाचक वाट बघत आहेत, पण अजून मी प्रकाशनाचं काम सुरू केलेलं नाही. मी हे मुद्दाम करत नाही, पण दंतवैद्य असल्यानं मी सतत कामात असतो. त्यामुळे थोडा निवांत वेळ मिळाला तर मला तो हवा असतो, सतत काम करण्याचा कंटाळा येतो. 
चांगला गुण म्हणशील तर माझी अभिव्यक्ती सच्ची आणि मनापासून असते. माझा दावा नसतो की मी असाच सूर लावेन किंवा अशी हरकत घेईन, पण जो भाव माझ्या मनात आहे तो मांडायला जी सच्चाई लागते ती माझ्यात आहे आणि म्हणून ती कलाकृती लोकांना पटते आणि आवडते. मग ती कधी शब्दातून येते तर कधी सुरांमधून. हे सगळं करायला आणि दहा व्याप सांभाळायला जी शिस्त लागते ती माझ्यात आहे.

प्रश्न : तुला तुझ्या परिवाराचा भक्कम पाठिंबा आहे. तुझी आई डॉ. प्राची  यांनी त्यांच्या क्षेत्रात स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे आणि तुझे वडील प्रकाश जावडेकर हे राजकरणातलं एक मोठं नाव आहे. त्यांच्या अधिकाराचा, ओळखींचा तुला कोणता फायदा-तोटा होतो? 
डॉ. आशुतोष जावडेकर ः लोकांना असं कायम वाटतं की साहेबांच्या ऑफिसमधून एक फोन फिरत असेल आणि कामं होत असतील. तर मला असं वाटतं की पालक मुख्यतः संस्कार करतात आणि आशीर्वाद देतात. ते दोन्ही माझ्याकडे भक्कम आहेत. माझे आई वडील दोघंही त्यांच्या क्षेत्रात अखंड कार्यरत असतात, त्यांच्या कामातून मला सतत प्रेरणा मिळत असते. मी लहान असल्यापासून घरात सतत लोकांचा वावर, येणंजाणं हे सगळं असल्यानं मला एक प्रकारची जाण आली, जी एक कलाकार म्हणून मला खूप उपयोगी पडते. कला व्यवहार म्हणून जो प्रकार आहे, उदाहरणार्थ, लोकांच्या ओळखी करून घेणं, बोलणं, याला जे कौशल्य लागतं ते माझ्यात नकळत आलं. 
तोटा म्हणजे, माझ्याच बाबतीत असं नाही पण ज्यांचे पालक खूप कर्तृत्ववान असतात, त्या मुलांना सुरुवातीला सहाजिकच खूप दडपण येतं. स्वानुभवावरून मी सांगतो, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं अजिबात सोपं नाही. त्यासाठी थोडा काळ जावाच लागतो, आणि स्वतःचं स्थान स्वतः निर्माण करावं लागतं. कसं आहे की माईकसमोर उभं राहिल्यावर तुम्हालाच गायला लागतं. आई, वडील कर्तृत्ववान आहेत म्हणून गाणं आपोआप चांगलं होत नाही, ते तुम्हालाच गावं लागतं. मी अत्यंत स्वतंत्र बाण्याचा मुलगा आहे, त्यामुळे सव्वीसाव्या वर्षी मी  माझ्या वेगळ्या घरात राहायला गेलो, ही मला खूप चांगली आणि अभिमानाचीच गोष्ट वाटते. 

प्रश्न : एक कलाकार म्हणून आपण अनेक अनुभव घेत असतो. तर एखादा असा कुठला अनुभव तू सांगशील की जो तुझ्यासाठी नवीन आणि वेगळा होता?
डॉ. आशुतोष जावडेकर ः मला वाटतं अनेक चांगले वाईट अनुभव आपल्याला येत असतात आणि त्यातून आपण शिकत असतो. एक अनुभव सांगतो. खूप वर्षांपूर्वी जेव्हा टीव्हीवर गाजणाऱ्या संगीत स्पर्धांना खूप वलय होतं, तेव्हा एका चॅनलच्या स्पर्धेकरिता माझी निवड झाली होती आणि त्यानंतर तिथल्या अंतर्गत राजकारणामुळे मला अशी विनंती करण्यात आली, की तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला नाही तर बरं होईल. त्या वयात, त्या घडीला मला त्या प्रसंगाचं वाईट वाटलं. स्पर्धेत गायलो असतो तर माझा आवाज लोकांपर्यंत पोहोचला असता, त्यातून कदाचित काही नवीन संधी मिळाल्या असत्या. पण आता असं वाटतं की होतं ते चांगल्यासाठीच होतं. त्या दरम्यान मी खूप लिहिलं आणि मला जाणवलं की लेखन हा माझा पहिला प्राण आहे. मी शब्दांत रमतो. शिवाय नशिबात जे असतं ते मिळतंच. मला असं वाटतं, तुम्ही जर जुन्याला धरून बसलात तर नवीन काही मिळतच नाही. मी कधीच असं होऊ देत नाही. 

प्रश्न : तुझ्याबरोबरच्या इतर कलाकारांकडून तू काय शिकलास?
डॉ. आशुतोष जावडेकर ः मला खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी मिळाली. साहित्यातल्या अनेक गोष्टी मी अरुणा मावशी म्हणजे अरुणा ढेरे यांच्याकडून शिकलो. शब्दांचा ठेहराव कसा असतो, अभिवाचन करताना कसं करायचं वगैरे शिकलो. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. जसं ‘अर्ध्या वाटेवर’ हा कार्यक्रम करताना तुला गाताना ऐकलं. त्या कार्यक्रमातली सुगम गाणी गातानाचा तुझा आवाज आणि त्यातलंच एक लोकगीत गातानाचा तुझा आवाज वेगळा जाणवायचा. तेव्हा मला साक्षात्कार झाला की ज्या बाजाचं गीत आहे, त्याप्रमाणे आवाज बदलता यायला हवा. मी असाच आसपासच्या सगळ्या कलाकारांना बघत बघत शिकलो आहे. असाच अनुभव तुझ्या गुरूंचा, आरती अंकलीकर यांचा आहे. एकदा आमच्या भेटीत सहज गप्पा मारताना माझा आवडता संगीतकार कोण असं त्यांनी विचारलं. ए.आर. रेहमान म्हटल्यावर त्याचं एक प्रसिद्ध गाणं त्यांनी म्हटलं. तेव्हा मला जाणवलं की किती वेगवेगळ्या बाजाचं संगीत त्या अत्यंत वेगळेपणानं गातात. 

प्रश्न : वेगवेगळ्या क्षेत्रात सतत चांगलं काम करताना तुझे पाय जमिनीवर घट्ट रोवलेले आहेत, त्याबद्दल काय कारण सांगशील?
डॉ. आशुतोष जावडेकर ः मला वाटतं त्याचं श्रेय माझ्या पेशंटना द्यायला हवं. मी माझी कला आणि प्रोफेशन एकमेकांपासून वेगळं ठेवतो. मी कलाकार असतो तेव्हा दंतवैद्य नसतो आणि वैद्य असतो तेव्हा कलाकार नसतो, अर्थात इमर्जन्सी सोडून. माझं ‘आस’ हे गाणं रिलीज झालं होतं. सावनी रविंद्रनं ते गायलं आणि शंकर महादेवन यांच्या हस्ते ते सकाळी नाईन एक्सनं रिलीज केलं. संध्याकाळी दवाखान्यात आल्यावरही मी त्या गाण्याच्याच धुंदीत होतो. न राहून मी माझ्या पहिल्या पेशंटना त्या कार्यक्रमाविषयी सांगितलं. त्यांनी खुर्चीवर पडल्या पडल्या सगळं ऐकलं, साशंकतेनं माझ्याकडे बघितलं आणि मला सावधानतेचा इशारा देत म्हणाल्या, ‘डॉक्टर, माझा उजवीकडचा आहे हं दात!’

प्रश्न : रंगमंचावर घडलेला एखादा मजेशीर प्रसंग आठवतो का?
डॉ. आशुतोष जावडेकर ः मी ‘लय पश्चिमा’ हा पाश्चात्त्य संगीतावर आधारित कार्यक्रम करतो. त्यात मी एकटा रंगमंचावर असतो आणि मधे मधे पडद्यावर काही व्हिडिओ दाखवले जातात. तर सादरीकरण सुरू असताना एकदा शकिराचं गाणं पडद्यावर सुरू होतं. माझ्यावर अंधार होता. तो व्हिडिओचा सीन सुरू झाला की तो संपायच्या आत मी पाणी प्यायचो. पण त्या दिवशी काही तरी गोंधळ झाला. मी पाणी प्यायला लागलो आणि व्हिडिओ बंद होऊन स्पॉट लाईट माझ्यावर आला. बेसावध असताना माझ्यावर एकदम पडलेल्या प्रकाशामुळे मी जरा गोंधळलो, तसंच पाणी पूर्ण प्यायलं आणि समयसुचकतेचं भान ठेवून म्हणालो, ‘शकिराला बघून आम्हा पुरुषांचं पाणी पाणी होतं, ते असं!’ त्यावर श्रोत्यांच्या कडकडून टाळ्या पडल्या आणि फजिती होता होता राहिली.

प्रश्न : तुझी कला समजून घ्यायला, कला क्षेत्रातला जोडीदार असायला हवा होता असं कधी वाटतं का? 
डॉ. आशुतोष जावडेकर ः माझी पत्नी डॉ. मानसी मॅनेजमेंट सायन्समधली आहे. मी नेहमी तिला म्हणतो, ‘मी पु.लं. नसलो तरी तू सुनीताबाई आहेस.’ कलाकार बायको नाही याचा खरंतर मला आनंदच होतो. याउलट ती मॅनेजमेंटमधली असल्यानं ती व्यवस्थापनाची जबाबदारी छान पार पाडते. लेखकाला लेखन करताना जे वातावरण आणि जी शांतता लागते त्या पद्धतीचा लेखक मी मुळीच नाही. घरकाम करणाऱ्या बायकांच्या कामाचे आवाज, कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज, माझ्या लहान बाळाच्या ओरडण्याचे आवाज, अशा परिस्थितीत मी माझ्या छोट्या घरात लेखन केलं आहे. त्यामुळे मला अशा गोष्टींनी काही फरक पडत नाही. पण अर्थात कधी कधी विचार करायला एकांत लागतो, तेव्हा मानसीच मला सांगते, ‘तुझ्या मनात इतके विचार चालू आहेत तर आता पुढची दहा पानं तरी लिही, आम्ही अजिबात आवाज करणार नाही.’ तिच्या या आधाराची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून माझी ‘मुळारंभ’ ही कादंबरी मी तिला अर्पण करताना लिहिलं, ‘मानसी भावे जावडेकर, या माझ्या सर्वोत्तम मैत्रिणीस!’ एका कलाकाराचा जोडीदार व्हायला घरातल्यांना खूप तडजोडी कराव्या लागतात. कलाकाराला सांभाळून घेणं तितकंसं सोपं नाही.

प्रश्न : नवोदित कलाकारांना काय सल्ला देशील?
डॉ. आशुतोष जावडेकर ः पहिलं म्हणजे मेहनतीला पर्याय नाही. दुर्दैवानं नवीन पिढी सगळ्यात शॉर्टकट काढायला बघते. कलेमध्ये रियाज तर आलाच, पण ‘मेहनत’ या अर्थी मी म्हणतो की तुम्हाला संचित माहीत हवं. तुम्हाला काही का गायचं असेना, तुम्ही सेहगलपासूनचं चित्रपटसंगीत, शास्त्रीय संगीत, भावगीत परंपरा, पाश्चात्त्य संगीतापासून आत्ताच्या संगीतापर्यंत सगळं ऐकलं असलं पाहिजे. त्यावर स्वतःची मतं पाहिजेत, कारण ऐकणं हादेखील गाण्याचा रियाज असतो. लेखनाच्या बाबतीत वाचन हा लिखाणाचा रियाज असतो. थोडक्यात प्रत्येक क्षेत्रात पूर्व परंपरेचा अभ्यास पाहिजे आणि त्यानंतर त्यात नावीन्याची अभिव्यती व्हायला पाहिजे. 
दुसरा प्रेमाचा सल्ला मी असा देईन, की आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ द्या. तुम्ही जगविख्यात कलाकार असाल आणि तुमचा जोडीदार काहीही करत नसेल, तरीसुद्धा हे लक्षात ठेवा की तो आहे म्हणून तुम्ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकत आहात.

संबंधित बातम्या