मी मागे वळून पाहत नाही 

पूजा सामंत
गुरुवार, 5 एप्रिल 2018

गप्पा

आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत बालकलाकार ते नृत्यदिग्दर्शक, पुढे निर्माता, अभिनेता, मग दिग्दर्शक असा प्रवास करणारा प्रभुदेवा नुकताच मुंबईत येऊन गेला. ‘मर्क्‍युरी’ हा त्याचा चित्रपट १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त झालेल्या गप्पा...

ः प्रभुदेवा, ‘मर्क्‍युरी’चे वैशिष्ट्य काय? हा चित्रपट का करावासा वाटला? 
प्रभुदेवा ः ‘मर्क्‍युरी’ (पारा) हा ‘सायलेंट सिनेमा’ आहे; पण कलाकारांच्या परफॉर्मन्समुळे आणि कधी सबटायटल्समुळे जगात कुठेही हा सिनेमा कुणालाही सहज समजू शकेल. मी हा सिनेमा स्वीकारण्याचे कारण म्हणजे, या फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक कार्तिक सुब्बूराज अवघ्या २८ वर्षांचा आहे. पण तो अतिशय बुद्धिमान आहे. कार्तिकने ‘मर्क्‍युरी’पूर्वीही काही चित्रपट केले आहेत. त्याने मला ‘मर्क्‍युरी’साठी विचारताच मी होकार दिला. काही वर्षांपूर्वी कोडाईकनाल इथे एका फॅक्‍टरीत पाऱ्याचा स्फोट होऊन अनेक कामगार मृत्युमुखी पडले. त्या शोकांतिकेवर आधारित हा चित्रपट असून त्यात माझी मध्यवर्ती भूमिका आहे. कार्तिकने नॅरेशन सुरू केले आणि ५ - १० मिनिटातच मी चित्रपट करण्याचे ठरवले. सस्पेन्स, थ्रिल जॉन्रचे चित्रपट बघणे आणि त्यात भूमिका करणे मला आवडते. 

ः तुझ्या करिअरला तीस वर्षे पूर्ण झाली. आजवरचा प्रवास कसा झाला? 
प्रभुदेवा ः आजवरचे करिअर खूप छान गेले. मी समाधानी आहे. व्यक्तिगत आयुष्य आणि करिअर यांचा समन्वय घालू शकलो. फारसे शिक्षण नसताना केलेली वाटचाल वेगळाच अनुभव देऊन गेली. म्हणूनच मी असा विचार करत आलो, की जर करिअरची गाडी धावतेय तर त्याचे बॉनेट का उघडावे? मागे वळून स्वतःचे सिंहावलोकन करावे आणि मग कळतनकळत त्याच्याशी तुलना करून दुःखी व्हावे हे नकोच! म्हणूनच मी मागे वळून पाहात नाही.. 

ः शिक्षण पूर्ण न झाल्याची खंत वाटते का? अपुरे शिक्षण आणि चौदाव्या वर्षी करिअरला सुरवात ही भावना आता त्रासदायक वाटते का? 
प्रभुदेवा ः हो, माझे शिक्षण अपुरे राहिले खरे! ही सल आहे, पण मी पदवीपर्यंत शिकू शकलो नसतो. मला शिक्षणात गतीच नव्हती. सहावी-सातवीपर्यंत जेमतेम मी मजल मारली आणि मग सातवीत नापास झालो. प्रगतिपुस्तक बघून वडील मुगूर सुंदर ओरडतील, मारतील, म्हणून मी त्यांना सामोरा जात नव्हतो. माझ्या अस्वस्थतेची त्यांना कल्पना आली. मी माझे प्रगती म्हणावे, की अधोगती - पुस्तक त्यांच्या समोर ठेवले. पण मी नापास झालो म्हणून त्यांनी थयथयाट केला नाही. ‘तुला पुढे काय करायचे आहे?’ असे त्यांनी विचारले. मी घाबरत म्हटले, ‘मला शाळेत जायचे नाही. मला अभ्यास आवडत नाही.’ त्यावर ‘मला माझ्या सिनेमाच्या सेटवर मदत कर,’ असे त्यांनी सांगितले. माझे अप्पा त्या काळातले प्रसिद्ध कोरिओग्राफर होते. दुसऱ्याच दिवसापासून मी त्यांना नृत्य दिग्दर्शनाच्या कामात मदत करू लागलो. मग कसला अभ्यास आणि कसली शाळा? वयाच्या चौदाव्या वर्षी मला एका तमीळ सिनेमात बालकलाकार म्हणून काम मिळाले आणि मी अभिनयातही पाऊल टाकले... 

ः दक्षिणेत काम केल्यानंतर तू हिंदीत आलास. हिंदी आणि दक्षिणेत काम करताना मुख्यतः काय फरक जाणवतो? 
प्रभुदेवा ः एकेकाळी हिंदी आणि दक्षिणेत प्रत्येक बाबतीत फरक होता. तिकडचा सिनेमा ‘लाऊड’ मानला जायचा. त्यांचे बजेट हिंदीच्या तुलनेत कमी होते; तर हिंदीचे ग्लॅमर सर्व प्रादेशिक सिनेमांवर पुरून उरत असे. हिंदी स्टार्स सेटवर उशिरा येतात, त्यांचे सिनेमे बजेटमध्ये आणि वेळेवर पूर्ण होत नाहीत असे एकेकाळी घडत असे. पण आता तो काळ पूर्ण मागे पडलाय. बॉलिवूड फिल्म्स वेळेवर आणि बजेटमध्ये पूर्ण होताहेत. हिंदी सिनेमांचे स्टार्स वेळेवर आपले सिनेमे पूर्ण करताहेत. अनुष्का शेट्टी, प्रभास, श्रद्धा कपूर, तमन्ना भाटिया असे अनेक कलावंत ‘साउथ’मधून हिंदीत मोठे स्टार्स झालेत. हिंदी-साउथ हा भेदभाव दूर झाला आहे. 

ः अभिनय ते निर्मिती, दिग्दर्शन आणि नृत्य दिग्दर्शन असे करिअरचे टप्पे गाठलेस, यातले पहिले प्रेम कोणते? 
प्रभुदेवा ः अर्थात डान्स! नृत्य माझा श्‍वास आहे. लहानपणापासून मी माझ्या वडिलांना डान्स करताना पाहात आलो आहे. मीही डान्स शिकलो, क्‍लासिकल शिकलो. अनेकांना एका सिनेमा-एका गाण्यापुरता डान्स शिकवला. ज्यांना डान्स कशाशी खातात हेही ठाऊक नव्हते, त्यांनाही डान्स शिकवला. 

ः तुला ‘इंडियन मायकेल जॅक्‍सन’ म्हणतात. तुझ्यावर त्याचा प्रभाव जाणवतो... 
प्रभुदेवा ः माझे पहिले गुरू माझे वडील. वयाच्या पाचव्या वर्षीपासून मला गुरू धर्मराज आणि गुरू लक्ष्मीनारायण यांनी भरतनाट्यम शिकवले. मायकेल जॅक्‍सनचे इलेक्‍ट्रिफाइंग डान्सेस मला आवडत, त्याची मोहिनी नक्कीच माझ्यावर पडली. 

ः तुझा फिटनेस मंत्रा काय आहे? 
प्रभुदेवा ः मी जेनेटिकली फिट आहे. डान्समुळे फिटनेस आपोआप राखला जातो. सकाळी ६ वाजता मी उठतोच. शूटिंग ९ वाजता सुरू होते. ६ ते ८ दरम्यान योग, ब्रेकफास्ट, डान्स रियाझ करून आठपर्यंत सेटवर पोचतो. मेकअप करून शूटिंगला वेळेआधी जाण्याची माझी पद्धत आहे. हे मी रजनी(कांत)अण्णाकडून शिकलोय. शाकाहारी संतुलित आहार, पार्ट्यांपासून दूर शांत जीवन यामुळे मी कायम फिट राहिलोय. व्यवसाय फिल्म असला तरी मी फिल्मी नाही... 

ः प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि तुझे संबंध खूप चांगले होते... 
प्रभुदेवा ः याबाबतीत माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. श्रीदेवी उत्तम, परिपूर्ण अभिनेत्री होती हे मी सांगायची आवश्‍यकता नाही. तिच्याबरोबर एकाही सिनेमात अभिनय करण्याची संधी मिळाली नाही. पण मी तिला अनेकदा कोरिओग्राफ केले आहे. तिला नाचताना बघून एकाचवेळी अनेक विजा तळपल्याचा भास मला होत असे. आपल्या कामात ती अतिशय परफेक्‍ट होती. तिच्या लग्नाआधी एका तमीळ सिनेमात तिच्यावर क्‍लासिकल डान्स शूट करतेवेळी पायातील घुंगरू तुटले, त्याने जखम झाली. रिटेक करण्यासारखी तिची परिस्थिती नव्हती पण कुणाचे नुकसान होऊ नये म्हणून ती त्याही अवस्थेत नाचत राहिली... 
आमचे संबंध अतिशय स्नेहपूर्ण होते, तरी श्रीदेवी स्वतःच्या कोशात राहणारी होती. माझी तिची मैत्री नव्हती. एक तर ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होती. आमच्यात आदरयुक्त मैत्रीचे नाते होते. बोनी कपूरबरोबर तिचे लग्न झाल्यानंतर बोनीने सलमानला घेऊन ‘वाँटेड’ सिनेमाची निर्मिती केली. ज्या दिग्दर्शकाकडे सूत्रे दिली त्याच्याबरोबर बोनीचा काही वाद झाला. श्रीदेवीने बोनीला सांगून ‘वाँटेड’चे दिग्दर्शन मला दिले. मी हैदराबादहून मुंबईत आलो तेव्हा मला इथे राहण्यास घर नव्हते. बोनीने माझी तीही सोय केली. जर श्रीदेवीने माझ्यावर या चित्रपटाची जबाबदारी टाकली नसती, तर हिंदी सिनेमांचा मी कधीही दिग्दर्शक झालो नसतो. माझ्यासारख्या कोरिओग्राफरला डायरेक्‍टर म्हणून कोण संधी देणार होते? 
श्रीदेवीची स्वयंघोषित निवृत्ती मनाला पटत नव्हती. टीव्हीवरदेखील येण्याची तिची इच्छा नव्हती. पण माझ्यासाठी ती आमच्या शोवर आली. त्यानंतर ‘आयफा’साठी तिच्यासाठी मला कोरिओग्राफी करायची होती. तिच्या काही सिनेमातील हिट गाण्यांवर मी तिचे डान्सेस बसवले... आणि अवघी आकाशगंगा खाली उतरल्याचा मला आभास झाला... 
यानंतर मला तिच्यासाठी कोरिओग्राफी करण्याची संधी कधीही मिळणार नाही, हे मला सांगूनही तेव्हा खरे वाटले नसते.. श्रीदेवीची एक्‍झिट काळजाचा ठोका चुकवून गेली...  

फोटो फीचर

संबंधित बातम्या