समृद्ध प्रवास 

पूजा सामंत
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गप्पा
हिंदी सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून आपल्या भावाच्या (मास्टर अलंकार) पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात आलेल्या आणि यथावकाश स्थिर झालेल्या पल्लवी जोशीच्या अभिनय कारकिर्दीला चाळीस वर्षे झाली. सध्या ‘झी मराठी’वर पल्लवीची रहस्यप्रधान मालिका ‘ग्रहण’ सुरू आहे. पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर आठ वर्षांनी झालेले पुनरागमन सुखद आहे.

पल्लवी, बऱ्याच कालावधीनंतर तू अभिनय करते आहेस. ‘ग्रहण’ मालिका स्वीकारण्याचे कारण काय? 
पल्लवी जोशी : ‘ग्रहण’ ही  दैनंदिन मालिका असली, तरी ह्या मालिकेचे शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू झाले. एपिसोड्‌सची चांगली बॅंक निर्माण झाल्यामुळे ऐनवेळी कथेत, मालिकेत, माझ्या भूमिकेत बदल करण्यात येतील अशी शक्‍यता उरली नाही. कथा, माझी भूमिका मला आवडली. प्रेक्षकांना थ्रिलर हा जॉन्र आवडतो. मी ही कादंबरी वाचली आहे. मध्यवर्ती व्यक्तिरेखा होती. कथेचा आवाका आधीच ठाऊक असल्याने मालिका कुठे थांबणार हेही माहीत आहे. अशा काही कारणांनी मी होकार दिला. मी माझे काम एंजॉय करते आहे. 
दुसरे असे, की जरी मी अभिनय करताना दिसत नसले तरी निर्माती म्हणून कॅमेऱ्यामागे काम करते. माझे स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस आहे. 

मध्यंतरी तू ‘मेरी आवाज ही पहचान है’ ही मालिका केलीस... 
पल्लवी जोशी : ‘मेरी आवाज ही पहचान है’ ह्या मालिकेचे निर्माते ओळखीचे होते. त्यांनी चांगली भूमिका देऊ केली, मी होकार दिला. पण मालिका वाढत गेली. भूमिकेचे बेअरिंग बिघडतेय, असे वाटले तेव्हा.. 

‘ग्रहण’ मालिका अंधश्रद्धेचा प्रसार करते, अशी टीका होते आहे, यावर तुझे मत काय? 
पल्लवी जोशी : माझे बालपण अतिशय सुसंस्कृत, प्रगत, पुरोगामी कुटुंबात गेले. माझ्यावर झालेले संस्कार आणि माझे पती (विवेक अग्निहोत्री), सासूसासरे यांचेही विचार तितकेच पुरोगामी आहेत. म्हणूनच अंधश्रद्धा वगैरे गोष्टींशी आमचा दुरान्वयानेही संबंध आला नाही. मनोरंजन विश्‍वातील अनेक कलावंत, अगदी तंत्रज्ञदेखील अंधश्रद्ध असतात. हातात ठराविक ग्रहांच्या, खड्यांच्या अंगठ्या घालतात, काही खास रंग वापरतात.. मला काही हे पटत नाही. माझ्या विचारांचे सोडून द्या; पण ही मालिका आधी लोकांनी पूर्ण पाहावी. काही वेळा मनोरंजन हा घटक मजबूत करण्यासाठी त्यात रहस्य अधिक दाखवले जाते. 
माझा पुनर्जन्मावरही विश्‍वास नाही.. ते खरे असेल - नसेलही! ‘लिव्हिंग इन द मोमेंट’वर मी कायम विश्‍वास ठेवलाय. सोशल मीडियावर कुणीही काहीही व्यक्त होतात.. इंटरनेटचे जसे सदुपयोग आहेत तसे दुरुपयोगही आहेत. टीका करणाऱ्यांनी आधी पूर्ण मालिका पाहावी, असे मला आवर्जून वाटते. 

याव्यतिरिक्त वेगळे काय सुरू आहे? 
पल्लवी जोशी : आमच्या प्रॉडक्‍शन हाऊसतर्फे चित्रपटनिर्मिती सुरू आहे. मी आणि माझा नवरा विवेक (निर्माता, दिग्दर्शक) गेली दोन वर्षे ‘द ताश्‍कंद डायरीज’ ह्या सिनेमाच्या निर्मिती-संशोधन-दिग्दर्शनात आकंठ बुडालोय. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. शास्त्री यांना जाऊन पन्नास वर्षे होऊन गेली, तरी त्यांच्या मृत्यूचे रहस्य उकललेले नाही. पत्रकार अनुज दत्त यांनी अनेक ‘आरटीआय’ फाइल केलेत; पण त्यांच्या प्रश्‍नांना अजून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. विवेक, मी आणि अनेकांनी यावर संशोधन केले. पोलिस स्टेशन ते अर्काइव्ह्ज, वाचनालये ते इंटरनेट सगळीकडे शोध, संशोधन सुरू आहे. मी ह्या ‘द ताश्‍कंद डायरीज’ची निर्माती आहे. मी ह्यात इतिहास संशोधकाची लहानशी भूमिकादेखील केली आहे. मिथुन चक्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, प्रकाश पदावगी, मंदिरा बेदी असे अनेक कलावंत यात आहेत. २ ऑक्‍टोबर ह्या शास्त्रीजींच्या जन्मदिनी हा चित्रपट आम्ही प्रदर्शित करत आहोत. 

आजवरच्या तुझ्या प्रवासाबद्दल काय वाटते? 
पल्लवी जोशी : माझा प्रवास उत्तम झाला. माझे नातेवाईक फिल्मी नाहीत किंवा ‘स्टार सन’ ‘स्टार डॉटर’ असेही काही नाही. पण सुदैवाने मला असे काही दिग्गज दिग्दर्शक भेटले, की त्यांनी माझ्या प्रतिभेला पैलू पाडले. माझ्यात प्रतिभा आहे, पण योग्य दिग्दर्शक भेटले नसते तर त्याचा उपयोग काय झाला असता का? पण श्‍याम बेनेगल, गोविंद निहलानी असे अनेक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक माझ्या आरंभीच्या काळात मला भेटत गेले. अनेक उत्तम भूमिका माझ्या वाट्याला आल्या. माझी गणना ‘चांगली अभिनेत्री’ म्हणून होत असेल, तर त्याचे श्रेय माझ्या या सर्व दिग्दर्शकांना जाते. माझा नवरा विवेक अग्निहोत्रीनेदेखील माझ्याकडून उत्तम परफॉर्मन्स करवून घेतला. त्यामुळे मी माझ्या अभिनयाच्या प्रवासाला ‘समृद्ध प्रवास’ मानते. अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन अशा टप्प्यावर मी घडत गेले. 
गेली चाळीस वर्षे मी बालकलाकार ते अभिनेत्री आणि नंतर लेखन, निर्मिती, दिग्दर्शन अशा क्षेत्रांत पाऊल ठेवू शकले. अभिनयात शिखरावर न गेल्याची खंत करण्यापेक्षा ‘मी घडत गेले आणि माझा प्रवास समृद्ध होत गेला’ यात मी खूप समाधानी आहे. 

तुम्ही पती-पत्नी एकाच क्षेत्रात आहेत. ठिणगी उडण्याची शक्‍यता असते. अशावेळी संसाराचा तोल कसा साधलात? 
पल्लवी जोशी : याचे श्रेय आम्हा दोघांना सारखेच आहे. कारण आम्हा दोघांमध्ये ‘फॅमिली व्हॅल्यूज’ सारख्याच आहेत. विवेक महाराष्ट्रीय नसला तरी त्याची जडणघडण, त्याच्यावरचे संस्कार हे माझ्या संस्कारांसारखेच आहेत.. वुई हॅव कॉमन ग्राउंड, मिडल क्‍लास व्हॅल्यूज अँड इंटलेक्‍चुअल सराउंडिंग, अपब्रिंगिंग! 
आमच्यातदेखील भांडणे होतात - झालीत; पण ती अगदी तेवढ्यापुरती! 
आम्हाला पहिली मुलगी झाली - मल्लिका. ती मोठी होईपर्यंत मी ब्रेक घेतला होता. पुन्हा करिअरकडे वळले, काही वर्षांनी मुलगा (मलंग) झाला आणि पुन्हा ब्रेक घेतला. कारण मुलांचे संगोपन ही माझ्यासाठी प्राधान्याची गोष्ट होती. एकदाच मला हुरहूर वाटली.. मी काही कामासाठी बाहेर गेले होते. भोपाळहून माझे सासूसासरे घरी आले होते.. घरी आले, तेव्हा मल्लिका आमच्या हॉलमध्ये रांगताना मी प्रथम पाहिले. अतिशय एक्‍साइट होत मी सासूसासऱ्यांना म्हटले, ‘अरे वा, मल्लिका तर रांगायला लागली.. लेट मी कॅप्चर धिस मोमेंट!’ मी आमचा व्हिडिओ कॅमेरा आणायला धावत जाणार इतक्‍यात सासूबाई मला म्हणाल्या, ‘पल्लवी, मल्लिकाने सुबहसे ये प्रोग्रेस की है। वो सुबह से रेंगने लगी है, पता है?’ इतरांच्या दृष्टीने ही एक सामान्य बाब असेल, पण आई म्हणून आपल्या अपत्याचे प्रथम रांगणे ही माझ्यासाठी लॅंडमार्क घटना आहे. माझ्यासाठी तो क्षण पुन्हा होणे नाही! माझ्या सासूबाईंनी अगदी सहज मला मल्लिकाच्या रांगण्याची गोष्ट कानांवर घातली.. पण मला हुरहूर लागली, मी आजच कामासाठी बाहेर पडले आणि मातृत्वाचा हा आनंदाचा क्षण माझ्या नजरेतून, हातातून निसटला! 

पूर्णवेळ मातृत्व या आपल्या निर्णयाचा कधी पश्‍चात्ताप झाला का? कधी वैफल्याचे क्षण आले? 
पल्लवी जोशी : होय.. मुलांना, घराला वेळ द्यावा हा निर्णय माझाच होता. पण एखाद्या गाफील क्षणी माझा निर्णय चुकला असे नक्की वाटून गेले मला. मी घरी राहिले, ते दिवस मीडिया अतिशय स्ट्राँग होण्याचे होते. स्टार्सना शिंक आली, तरी त्याचे लाइव्ह कव्हरेज, पेज ३ सारखी वृत्तपत्रे अधिक प्रभावी होत गेली. प्रत्येक दैनिकात एंटरटेन्मेंटला वाव मिळत गेला. माझ्या नकारामुळे त्या ऑफर्स अन्य कलाकारांकडे जाणार हे उघड होते. अगदी नव्या - उभरत्या टीव्ही कलाकारांनादेखील उत्तम कव्हरेज मिळतेय हे पाहून मी मला आश्‍चर्य वाटले. ह्याच क्षणी मी कातर झाले. कारण, घरी राहण्याच्या माझ्या निर्णयामुळे मी सोशल लाइफपासून दूर झाले होते.. निर्णय माझाच होता; पण करिअरपासून दूर होण्यामुळे माझे सोशल लाइफदेखील दुरावणार, हे मला कुठे ठाऊक होते? मी माझ्या भावना विवेककडे व्यक्त केल्या.. खरं सांगते, पेपरदेखील वाचायचा मी बंद केला होता. अनेक ओळखीचे कलावंत, नवे-जुने चेहरे मला दैनिकातून दररोज दिसत होते.. अभिनयात अनेक वर्षे निष्ठेने घालवून मी त्यात कुठेही नव्हते! 
मी त्या दरम्यान विवेकचे डोके खूप खाल्ले. पण हा मत्सर नव्हता, मला वैफल्य आले होते. ‘बेस्ट मॉम’, ‘बेस्ट होममेकर’ असल्याची भावना, रास्त अभिमान त्या क्षणी दूर गेला होता! 

या नैराश्‍यातून तू कशी बाहेर पडलीस? 
पल्लवी जोशी : माझे दोन - तीन महिने त्यात गेले. विवेकने मला खूप सांभाळून घेतले. मी त्यातून बाहेर पडले, कारण आमचे स्वतःचे प्रॉडक्‍शन हाउस असल्याने काम सतत चालू असते. निर्मिती ते स्क्रिप्ट मी ह्यात मनापासून रमते. शिवाय ‘झी सारेगमप’चे अनेक भाग मी होस्ट म्हणून केले.. काम तसे चालूच होते. आताही बिझी आहेच. काही फेजमधून आपण लवकर बाहेर पडू शकतो कारण सकारात्मकता!

संबंधित बातम्या