चतुरस्र अभिनेता 

पूजा सामंत
सोमवार, 1 जुलै 2019

गप्पा

काश्‍मिरी पंडित अशी आरंभी ओळख असलेल्या अनुपम खेर यांचा जन्म शिमल्याचा. चरित्र कलाकार, विनोदी अभिनेता, खलनायक, कधी रंगभूमी गाजवलेला (आजही ‘कुछ भी हो सकता है’ या त्यांच्या हिंदी नाटकाचे प्रयोग सर्वत्र सुरू आहेत). सर्वत्र एकाच वेळी मुक्त संचार असणारे अनुपम हॉलिवूडमध्येही काम करत आहेत. त्यात टीव्ही आणि वेब शोज आहेत. त्यांच्या कारकिर्दीला ३५ वर्षे पूर्ण झाली. ’Lessons Life Taught Me - Unknowingly!’ हे त्यांचे आत्मचरित्र ५ ऑगस्टला प्रकाशित होत आहे. 

अनुपम, गेली ३५ वर्षे तुम्ही अभिनयक्षेत्रात आहात. काय भावना आहेत? 
अनुपम खेर : माझ्या करिअरला ३५ वर्षे झाली, पण हा पूर्णविराम नाही; अर्धविराम आहे.. आय डोंट कंसिडर धिस ॲज माईलस्टोन! ये मेरे लिए इंटरव्हल है। मध्यंतर झाल्यावर आपण कसे थांबतो, चहा घेतो, भेटीगाठी घेतो आणि पुन्हा नव्या जोमाने पुढील भागाकडे वळतो, तसे माझे आहे. माझ्या या ‘मध्यंतरा’त पत्रकारांशी गप्पागोष्टी कराव्यात म्हणून हा प्रपंच... 
काळ वेगाने धावतो आहे.. तुमच्याशी संवाद साधताना माझे लक्ष या खिडकीकडे जाते. या खिडकीतून रहदारी, मुंबापुरीचे दर्शन होते. ही उत्तुंग इमारत माझे स्वतःचे ऑफिस आहे. ‘ॲक्‍टर्स प्रिपेअर’ ही ॲक्‍टिंग ॲकॅडमी मी गेली काही वर्षे चालवतो. मुंबईसारख्या जगातल्या महागड्या शहरात माझे ऑफिस असेल, असे चाळीस वर्षांपूर्वी कोणी मला म्हटले असते, तर मीच काय पण माझ्या साध्याभोळ्या वडिलांनीही त्याला मूर्खात काढले असते. 
शिमल्यात १९५५ मध्ये माझा जन्म झाला. माझे आजोबा, आजी, वडील, आई, काका-काकी, भाऊ आणि चुलत भावंडे अशी १४ माणसे आम्ही एका लहान जागेत अगदी एकोप्याने - आनंदात राहायचो. म्हणूनच म्हटले, इतक्‍या लहानशा जागेतून - शहरातून मी इथवर पोचलो, हे मलाही अविश्‍वसनीय भासते. अभिनेता म्हणून माझी कारकीर्द माझ्या नकळत घडली. हा काही नियोजन, जाणीवपूर्वक आखलेला मार्ग नव्हता. आमची आर्थिक ओढाताण असे. पण तरीही आम्ही सुखी होतो. गरिबीतून मी इथवर पोचू शकलो. नव्या पिढीला मला हेच सांगायचे आहे, की यशाचा राजमार्ग खाचखळग्यांतून, अडचणींतून जातो. यशाला शॉर्टकट नाही! सगळ्या अडचणींवर मात करत मी इथे पोचलो आहे. मी ‘सेल्फ मेड’ आहे, याची संतुष्टता काही औरच असते! 

या प्रवासात आपल्याला पद्मश्री, पद्मभूषण अशी राजमान्यतादेखील लाभली... 
अनुपम खेर : ही ओळख मला सतत स्फूर्ती देते. या किताबांमुळे माझ्यावरची अभिनेता म्हणून, नागरिक म्हणून असलेली जबाबदारी वाढली आहे. माझ्या आईवडिलांचे, भाऊ राजू खेर यांची छायाचित्रे मला सतत मार्गदर्शन करतात अशी माझी भावना आहे. माझ्या वाटचालीत त्यांच्या संस्कारांचे अमूल्य योगदान आहे, हे मी कधीही विसरू शकणार नाही... 

तुमच्या बालपणाविषयी काही सांगा... 
अनुपम खेर : माझे वडील कारकून होते. त्यांचा पगार ९० रुपये होता. पण त्यांच्याकडे जे ज्ञान होते, ते आज दुर्मिळ झाल्यासारखे वाटते. माझा (बहुधा) आठवी-नववीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागला होता. प्रगतिपुस्तकावर वडिलांची सही हवी होती. मी अभ्यासात जेमतेम ३८-३९ टक्केवाला होतो. प्रगतिपुस्तक त्यांच्याकडे घेऊन जायचे म्हणजे मोठा तणाव. हिंमत करून प्रगतिपुस्तक त्यांच्यासमोर धरले, त्यांनी सही करण्यापूर्वी माझे गुण पाहिले. ‘तुझा ५८ वा क्रमांक आला आहे. वर्गात एकूण मुले किती?’ त्यांनी विचारले. मी म्हटले, ‘साठ आहेत..’ यावर ते म्हणाले, ‘बेटा, ज्या विद्यार्थ्याचा पहिला क्रमांक येतो, तो टिकवण्याच्या काळजीने तो सतत चिंताग्रस्त असतो. पण तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांवर कसलेही बंधन, दडपण नसते. आज तुझा ५८ वा क्रमांक आला आहे. भविष्यात तू ४८, नंतर ३८.. असे करत प्रथम क्रमांकाकडे जाऊ शकतोस. तुझ्या प्रगतीला वाव आहे.’ 
मी पाचवीत असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये पहिले नाटक केले. या नाटकाने माझ्यावर प्रचंड गारुड केले होते. त्याची परिणती पुढे मी अभिनेता होण्यात झाली. वडिलांनी मला विरोध केला नाही, त्यामुळेच अभिनयाचा मी करिअर आणि उपजीविकेचे साधन म्हणून विचार करू शकलो. मुंबईत मला सुरुवातीच्या काळात उत्पन्न नव्हतेच. निर्मात्यांना भेटायचे तर त्यांच्याकडे जाण्यासाठी पैसा नव्हता. वडिलांनी मला २०० रुपयांचा चेक पाठवला. तो बॅंकेत डिपॉझिट केला आणि बाउंस झाला. असे अनेक कठीण प्रसंग त्यावेळी होते. काही काळापूर्वी वडील गेले. त्यांच्यासाठी मी काही करावे यापूर्वी ते गेले होते. त्यांची एक लोखंडी पेटी होती, ती उघडून पाहिली तेव्हा मला पाठवून बाउंस झालेला धनादेश, माझ्याविषयी लिहून आलेले लेख, माझ्या अभिनयाची झालेली स्तुती (ठळक करून), माझ्या काही बालपणीच्या वस्तू... अशा त्यांच्यासाठी मौल्यवान असलेल्या वस्तू त्यांनी अनेक वर्षे जतन करून ठेवल्या होत्या. त्यांच्या आठवणींनी माझे मन अधिकच कातर झाले... 

आयुष्यात कुठली आव्हाने वाटली? 
अनुपम खेर : अवघे आयुष्यच आव्हानांनी भरलेले होते. माझा कोणीही गॉडफादर नव्हता, की इथे कोणी नातेवाईक नव्हते. आज काही कलाकार अगदी सहजपणे म्हणतात, की बॉलिवूडमध्ये फक्त फिल्मी कनेक्‍शन्स - नातेवाईक असलेल्यांना काम मिळते. मला त्यात तथ्य वाटत नाही. शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा हे सगळे ‘सेल्फ मेड’ कलाकार आहेत. त्यांच्या अंगभूत गुणांमुळे ते नावारूपाला आले आहेत. दीपिका, कंगना, अनुष्का या कोणाचेही ‘फिल्मी कनेक्‍शन’ नाही.  मला कामाची गरज होती. १९८२ मध्ये मला ‘आगमन’ हा पहिला सिनेमा मिळाला. या चित्रपटाने मला काहीही मिळवून दिले नाही. दरम्यान, महेश भट्ट त्यांच्या ‘सारांश’ या चित्रपटाची जुळवाजुळव करत होते. माझे वय तेव्हा २७ होते, तर भूमिका ६४ वर्षांच्या बी. व्ही. प्रधान या ज्येष्ठ नागरिकाची होती. त्या काळात आजच्यासारखे मेकअपचे तंत्र अस्तित्वात आले नव्हते. निव्वळ अभिनयाच्या जोरावर मी ही भूमिका पेलली. 
राजश्री प्रॉडक्‍शन्स ‘सारांश’ची निर्मिती करणार होते. लेखक-दिग्दर्शक महेश भट्ट होते. या भूमिकेच्या तयारीत मी २-३ महिने झोकून दिले. पण एक दिवस माझा मित्र सुहास भालेकरचा फोन आला. तो म्हणाला, ‘अनुपम, तुझी भूमिका आता संजीव कुमार करणार आहे.’ माझ्या पायाखालची जमीनच सरकली. या व्यक्तिरेखेसाठी मी स्वतःला झोकून दिले होते. ‘सारांश’ माझ्यासाठी ‘गेटवे’ ठरण्याची शक्‍यता मला वाटत होती. मला पैशांची निकड होती. अतिशय दुःखी अंतःकरणाने मी महेश भट्टकडे जाब विचारण्यासाठी गेलो. मी त्यांच्याबरोबर काय बोललो हेही आज आठवत नाही, पण त्यांना खात्री पटली की पुत्रवियोगाच्या व्यथा-वेदना सशक्तपणे दाखवणारा मीच तो ‘प्रधान’ असेन! ती भूमिका हातून गेली म्हणून अश्रू गाळत मी मुंबई सोडून गेलो असतो, तर आजचा अनुपम खेर जन्माला आलाच नसता. 
पुढे ‘सारांश’ला मोठे यश मिळाले आणि माझ्या खऱ्या वयाबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे मला ‘बापा’च्या भूमिका अधिक मिळू लागल्या. पण हे आव्हानदेखील मी समर्थपणे पेलले. मी रंगवलेला प्रत्येक ‘बाप’ अगदी वेगळा होता. ‘यह शादी कभी नहीं हो सकती।’ किंवा ‘तुमने खानदान की नाक कटवा दी।’ असे ठोकळेबाज संवाद सोडून मी त्यात माझ्या परीने गहिरे रंग भरले. म्हणूनच आजवर माझ्या व्यक्तिरेखा एकसुरी-एकसाची झाल्या नाहीत. 
शेखर कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’तील ‘मोगॅंबो’साठी आधी माझी निवड केली होती. पण ती व्यक्तिरेखा अमरिश पुरी यांच्याकडे कशी गेली हे मला समजले नाही. अर्थात, असे प्रसंग - घटना या क्षेत्रांत घडतच असतात. पण अमरिश पुरी यांनी ‘मोगॅंबो’ला प्रचंड लोकप्रिय केले; त्यांना श्रेय द्यायलाच हवे. 
‘हम आपके है कौन’चे चित्रीकरण सुरू असताना मला ‘फेशियलपाल्सी’चा त्रास झाला होता. ट्रीटमेंटमुळे मी काही काळ काम बंद केले होते. हादेखील मोठा आघात होता.. तरीही न डगमगता मी नंतर नवी खेळी सुरू केली. 

‘ॲक्‍सिडेंटल प्राईममिनिस्टर’मध्ये तुम्ही माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची व्यक्तिरेखा साकारलीत. हे अलीकडचे मोठे आव्हान म्हणायचे का? तुम्ही ट्रोलदेखील झालात... 
अनुपम खेर : भूमिकेसाठी सगळे कष्ट, श्रम घेण्याची माझी नेहमीच तयारी असते. मी रंगभूमीला, अभिनयाला अतिशय समर्पित आहे. मी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चा विद्यार्थी आणि नंतर त्याचा अध्यक्ष होतो. मनमोहन सिंग यांच्या पक्षाचा मी विरोधक आहे, म्हणून मी ही भूमिका केली असे अजिबात नाही; तर हे फार मोठे आव्हान होते. आप हर किसी को एकसाथ खुश नही रख सकते, इतना मै जानता हूँ। .. आणि हो, सगळ्यांना खुश करणे हे माझे ध्येयही नाही. 
या राजकारणाचा मी बळी ठरलोच तर जास्तीत जास्त काय होईल, माझ्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, इतकेच ना! मला त्याची फिकीर नाही. रस्त्यावर उभे राहूनही मी लोकांचे मनोरंजन करेन. इतरांची मर्जी राखत अभिनय करणारा कलाकार मी नाही. मैं नंगा सच बोलता हूँ। सचमें अकेलापन है, पर सच्चाई में ताकतभी बहुत है। 

आपले आत्मचरित्र प्रसिद्ध होते आहे, त्याबद्दल काय सांगाल? 
अनुपम खेर : माझ्या जीवनाचा निकोप, स्वच्छ मनाने घेतलेला हा आढावा आहे. अर्थात मला आता इतक्‍यात ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन कोणी नारळ देऊ नये.. मी निवृत्त होत नाही. अजून खूप विविधांगी भूमिका मला करायच्या आहेत. रंगभूमी, बालचित्रपट, व्यावसायिक चित्रपट, हॉलिवूड, टॉक शोज... खूप काही मला करायचे आहे. 
नव्या पिढीला सांगायचे आहे - अपयशाला घाबरू नका. पण कोणाबरोबर स्पर्धादेखील करू नका. तुमच्या आयुष्यावर मोठ्यांचा प्रभाव असावा, पण तुम्ही कोणाची सावली होता कामा नये. 
सध्या मी ‘वन डे’ हा चित्रपट पूर्ण केला आहे. एका न्यायाधीशाच्या जीवनावर आधारित हा चित्रपटदेखील मला अभिनेता म्हणून मोहरून टाकणारा होता. 
हॉलिवूडसाठी अनेक नवे प्रोजेक्‍ट्‌स आहेत. वेब सिरीजमध्येही मी बिझी आहे.. वयाची ६४ वर्षे आता कुठे सरलीत.. हीच तर नवी सुरुवात आहे.  

संबंधित बातम्या