गुराखी ते दिग्दर्शक

प्राजक्ता ढेकळे 
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

गप्पा  
आपला अस्सल ग्रामीण बाज जपत मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पाय रोवले. ‘ख्वाडा’च्या माध्यमातून राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कारापर्यंत मजल मारणारे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्याबरोबर ‘बबन’ या चित्रपटाच्या निमित्ताने झालेल्या गप्पा.

सकाळी अकराच्या सुमारास भाऊराव कऱ्हाडे यांना फोन केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचा पीए फोन घेईस असे वाटले होते. पण स्वतः भाऊराव कऱ्हाडे यांनी फोन घेतला आणि कोणतेही आढेवेढे न घेता भेटण्याची वेळ दिली. निमित्त होते अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या बबन या चित्रपटाचे. सर्वसामान्य घरातील मुलाचा दिग्दर्शक म्हणून झालेला प्रवास उलगडताना अनेक रंजक गोष्टी पुढं आल्या. 
लहानपणापासून आवड 

‘शिरूरमधील गव्हाणवाडीसारख्या खेड्यात इतर मुलांप्रमाणंच माझंही बालपण गेलं. त्याकाळात ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर शनिवार-रविवारी सिनेमा बघायचो. गुरं वळायचं काम माझ्याकडं असायचं. एकदा शोले पिक्‍चर बघायला जायचं म्हणून मी आदल्या दिवशीच गुरांच्या वैरण-पाण्याची सगळी तयारी करून ठेवली होती. तालुक्‍याच्या ठिकाणी ‘टाकी’ला शोले बघितला आणि त्यादिवसापासून पुढील अनेक दिवस मी त्यातील अनेक पात्रांना स्वतःशी रिलेट करून पाहत होतो. सिनेमा बघितल्यापासून पुढचा एका आठवडा रानातलं वारूळ मला त्या चित्रपटातल्या गडासारखं वाटायचं, म्हणून मी त्या वारूळावर बसून समोर दगडाची पात्रं तर कधी दोस्तांना उभं करून डायलॉग म्हणायचो. मात्र माझ्या या वर्तनाविषयी वडिलांना कळलं. मी नेहमीप्रमाणं वारूळावर बसलो असतानाच मागनं म्हाताऱ्यानं येऊन मानगटा गवसून रपाटा लावला तसा मी पुढं तोंडावर पडलो. म्हाताऱ्यानं दोन ठेवणीतल्या शिव्या देऊन ‘जाय गुरं सोड’ असं खेकसलं. मात्र काही केल्या माझं चित्रपटाचं वेड कमी होत नव्हतं. अजय देवगण, सुनील शेट्टी, अक्षयकुमार याच्या फायटिंग मला खूप आवडायच्या. मित्रांच्याबरोबर फायटिंग खेळाचो. अनेक दिवस मला पिक्‍चर हे दिग्दर्शक, निर्माते काढतात हेही माहीत नव्हतं. मात्र आपणही चित्रपट काढायचा हे मनात पक्कं ठरवलं होतं.’ 

वाचनामुळं समृद्ध झालो.. 
‘घरी लहानपणी पांडवप्रताप, हरिविजय, नवनाथ कथासार या ग्रंथांचं वडील नेहमी पारायण करीत. मलाही लहानपणापासून हे वाचायची सवय लागली. या ग्रंथवाचनामुळं शब्दांची आवड निर्माण झाली. पुढं शाळेत गेल्यानंतर शाळा जरी गावातली असली, तरी शाळेचं ग्रंथालय मोठं होतं. आठवड्यातील एक दिवस वाचनासाठी असायचा. त्यामुळं तुम्हाला आठवड्यात एक पुस्तक वाचायला मिळत असे. मला आधीपासून वाचनाची आवड असल्यामुळं वाचनाचा स्पीडदेखील चांगला होता. मी शाळेतील त्या ग्रंथालयामधून दिवसाला एक पुस्तक वाचायला घेऊन जायचो. इतर मुलं आठवड्याला एक पुस्तक वाचत असतील, तर माझी पाच-सहा पुस्तकं वाचून व्हायची. चांदोबा, चंपकपासून ते द. मा. मिरासदार, वि. स. खांडेकर यांचं सगळं साहित्य मी सातवीपर्यंत गुरं राखताना वाचून काढलं होतं. आठवीत गेल्यानंतर मी मृत्युंजय कादंबरी तर म्हशीवर बसून वाचून काढली. तोपर्यंत माझ्या मनात विचार पक्का झाला होता, की आपण एक तरी सिनेमा काढायचा. दहावीच्या वर्षात असताना मी वर्तमानपत्रातील एका पुरवणीत एफटीआय व तिथल्या कोर्सची माहिती वाचली. त्यानंतर सिनेमा किती गोष्टींनी बनलेला असतो हे मला कळाले. तेव्हाच मी ठरवलं, की आपण पुढं दिग्दर्शकच व्हायचं; नाही तर आपली शेती करायची दुसरं काय करायचं नाही. आमच्या भागात दहावी - बारावी झाली, की अनेक पोरं मिलिटरीत जातात. माझ्या घरची पण माझ्या मागं लागली होती, की जा मिलिटरीत, पण मी नाय गेलो. मग घरचे म्हणाले दे शाळा सोडून अन कर शेती. मीही दिली बारावीतून शाळा सोडून; शेती करायला लागलो. त्याच दरम्यान माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळं आमची सगळी शेती मी करायला लागलो. पुढं एक दिवस पुण्यात गुलटेकडीला कांदे विकायला आलो, तेव्हा एफटीआय बघून आलो. मग परत यशवंतराव मुक्त विद्यापीठातून बी.ए.ला प्रवेश घेतला. बी.ए. पूर्ण केलं. पुढं शेती करत असतानाच नगरच्या कम्युनिकेशन स्टडीजला प्रवेश घेतला. तिथं समर नखातेसर आम्हाला शिकवायला यायचे. त्यावेळी फिल्मवर सरांची तीन लेक्‍चर झाली. तेव्हा मला वाटलं, की सिनेमा मी फक्त त्यांच्याकडंच शिकू शकतो. तिथून पुढं कैक वर्षं मी घरनं डबा घेऊन ‘रानडे इन्स्टिट्यूट’मध्ये नखातेसरांना भेटायचो, दोन-तीन तास बोलायचो आणि परत माघारी जायचो. त्यांच्याकडंच मी सगळा सिनेमा शिकलो. 

‘ख्वाडा’ची निर्मिती 
‘आपल्याला कधीच दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करता आलं नाही. त्यामुळं ‘ख्वाडा’ची पटकथा तयार असूनही निर्माता न मिळाल्यामुळं दोन वर्षं पडून होती. शेवटी मी माझी जमीन विकून सिनेमा करायचा निर्णय घेतला आणि तसंच केलं. खरं तर ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’ दोन्ही पटकथा बरोबरच तयार होत्या. पण ‘ख्वाडा’चं बजेट कमी असल्यामुळं तो आधी तयार झाला आणि ‘बबन’ आत्ता.’ 

कुटुंबाची साथ मोठी 
‘एका शेतकरी घरातील पोरगं पिक्‍चर काढायचं म्हणतं ही बाब घरच्यांच्या दृष्टीनं अवघडच होती. इतरांच्या दृष्टीनं तर हे भिकेचे डोहाळेच होते. पण तरीही माझ्या घराच्यांनी माझ्यावर विश्‍वास दाखवला. त्यांना मी काहीतरी चांगलंच करीन, ही अशा होती. त्यामुळं आईनं, भावानं मला खूप साथ दिली. अगदी जमीन विकायचा निर्णय घेतला तेव्हादेखील ते काही म्हणाले नाहीत.’ 

तुमचे-माझे प्रतीक - ‘बबन’ 
‘गावगाड्यापासून ते निमशहरी भागापर्यंत प्रत्येक ठिकाणी बबन असतोच. महाराष्ट्रातील अनेक तरूणांचं प्रतिनिधित्व करणारा हा बबन आहे. अनेक तरुणांच्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा यांसारख्या अनेक गोष्टी हा बबन पूर्ण करायला बघतोय. कुठली ही कलाकृती तिसऱ्या जगातून येत नाही. ती कुठंतरी आपल्या आजूबाजूलाच घडत असते, असं मला वाटतं. सिनेमामधून केवळ तिची प्रतिकृती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे.’ 

‘बबन करत असताना चित्रपटसृष्टीत चालत आलेल्या काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न मी केला. आपल्याकडं नायक म्हणजे तब्येत व्यवस्थित मेंटेन केलेला, दाढीमिशा काढलेला चकचकीत (क्‍लीन शेव्हन) असतो. मी मात्र या चित्रपटाचा नायक दाढी वाढवलेला दाखवला आहे. याशिवाय टिटवीचं ओरडणं, कुत्र्याचं रडणं, कोल्हेकुई असेल यासारख्या गोष्टी आजही ग्रामीण भागात अनेक घटनांचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात. त्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बदलत्या समाजव्यवस्थेमध्ये तरुणांची होत असलेली घालमेल ‘बबन’मधून दाखवली आहे. मराठी ग्रामीण भाषेचं सौंदर्य हे ग्रामीण शिव्यांमध्ये आहे. आजही कोणत्याही खेड्यात तुम्ही गेला तर बोलीभाषेत सहज शिव्यांचा वापर केला जातो. त्याचा पद्धतीनं ही ग्रामीण शिव्यांची बोलीभाषा जशीच्या तशी त्यामध्ये वापरली आहे. यामधून कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. ग्रामीण व्यक्तीचा जो बाज आहे तो जसाच्या तसा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता मी एवढंच म्हणू शकतो, की ‘ख्वाडा’मध्ये माळरानावर असलेल्या नायक ‘बबन’मधून आता चौकापर्यंत आला आहे.’ 

कलाकारांचा शोध 
‘साधारणपणे पटकथेनुसार पात्रांचा शोध घेतला जातो. मी मात्र मला हव्या असलेल्या व्यक्तिरेखा आधी ठरवल्या. ‘बबन’च्या नायिकेच्या स्केचनुसार नायिकेचा शोध सुरू झाला. आम्हाला अपेक्षित असलेली नायिका काही केल्या मिळत नव्हती. एक दिवशी आम्ही बाणेरजवळ वडापाव खात असताना गायत्री जाधव (कोमल) तिच्या आईबरोबर चाललेली दिसली. तिचे चालणे, बोलणे बघताच मी आणि माझ्या निर्मात्यांनी एकमेकांकडं बघितलं. ही मुलगी आपल्या या चित्रपटाची नायिका असायला हवी असं आम्हाला वाटून गेलं. मात्र आमच्याबरोबर कुणी मुलगी नसल्यामुळं बोलायचं कसं हा प्रश्‍न पडला. पण धाडस करून आमचे निर्माते गेले आणि त्यांनी तिला चित्रपटात काम करशील का? असं विचारलं. ‘असं रस्त्यावर कोणी ऑडिशन घेतं का?’ ही तिची पहिली प्रतिक्रिया मिळाली. मात्र हार न मानता सगळी माहिती सांगून तिला विचार करून उत्तर द्यायला सांगितलं. अशा पद्धतीनं एका बास्केटबॉल खेळाडूनं आमच्या नायिकेची भूमिका उत्कृष्ट पार पाडली. अनेक पात्रांना तर शेवटपर्यंत काय काम आहे, हेच माहीत नव्हतं. मी स्वतः बैजू पाटलाची भूमिका पार पाडताना खूप अवघड गेलं नाही. कारण बैजू पाटलासारख्या अनेक माणसांमध्ये मी स्वतः वावरल्यामुळं मला ती बापाची भूमिका करणं सोपं गेलं.’ 

‘चित्रपटा करताना गुणवत्ता आणि क्षमतेबरोबरच आर्थिक पाठबळदेखील पुरेसं असावं लागतं. मला अनेक वेळा आर्थिक अडचणी आल्या, पण हार न मानता मी माझे प्रयत्न चालू ठेवले. पडीच्या काळात अनेक लोक माझ्या मदतीला आले. त्या सगळ्यामुळंच हा चित्रपट एवढ्या ताकदीनं काढू शकलो.’

फोटो फीचर

संबंधित बातम्या